श्रीलंकेतील हिंसाचाराचे नवे रूप 

योगेश परळे    
गुरुवार, 22 मार्च 2018

श्रीलंकेमधील संघर्ष भडकण्यामागे सोशल मीडियाचाही सहभाग मोठा आहे. फेसबुकच्या माध्यमामधून चिथावणीखोर व सत्याचा अपलाप करणाऱ्या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याने ही आग आणखी भडकल्याचे निष्पन्न झाले आहे. देशांतर्गत परिस्थिती तणावपूर्ण व हिंसक होण्यामागे सोशल मीडियाचा झालेला वापर हे गेल्या काही वर्षांतील राजकारणाचे वैशिष्ट्यच होऊन बसले आहे.

हिंदी महासागरामधील अत्यंत महत्त्वपूर्ण देश असलेल्या श्रीलंकेमध्ये गेल्या आठवड्यामध्ये सिंहली बौद्ध व मुस्लिम या समुदायांमध्ये झालेल्या दंगलीमुळे येथील सरकारला आणीबाणी जाहीर करावी लागली. हिंसाचार श्रीलंकेला नवा नाही. मात्र श्रीलंकेमधील हिंसाचारामध्ये येथील मुस्लिम समुदायाचा सहभाग आढळण्याचा ‘ट्रेंड’ हा गेल्या काही वर्षांतील आहे. श्रीलंकेमधील तमीळ व सिंहलीमधील यादवी युद्ध अंतिमतः २००९ मध्ये संपल्यानंतर या देशात आता स्थिरता व शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. मात्र त्यानंतर लगेचच काही वर्षांत या देशात मुस्लिम व बौद्ध धर्मीयांमधील तणाव वाढला. दोन कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या श्रीलंकेमध्ये सिंहली हे बहुसंख्याक म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या ७० टक्के आहेत. मुस्लिम हे लोकसंख्येच्या सुमारे १० टक्के; तर तमीळ हिंदू हे लोकसंख्येच्या सुमारे १३ टक्के इतके आहेत. श्रीलंकेमधील राजकारणाच्या दृष्टिकोनामधूनही देशात सध्या सुरू असलेला हा हिंसाचार अत्यंत संवेदनशील आहे. 

श्रीलंकेतील कॅंडी येथे सिंहली समुदायामधील एका ट्रकचालकाचे चार मुस्लिमांशी भांडण झाल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झालेल्या विक्रमसिंघे (वय ४२) याचे निधन झाल्याच्या नैमित्तिक कारणामुळे ही दंगल पेटली. विक्रमसिंघे याच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या बौद्ध जमावाने कॅंडी जिल्ह्यातील मुस्लिम समुदायावर हल्ला चढविला. विक्रमसिंघे याला मारहाण केलेल्या आरोपींना जमावाच्या स्वाधीन करावे, अशी मागणी करत बौद्ध भिक्षुंच्या नेतृत्वाखालील संतप्त जमावाने येथील पोलिस स्थानकालाही वेढा घातला. जमावाने नंतर मशिदी व अनेक मुस्लिम दुकानांवर हल्ला चढविला. पोलिसांनी जमावावर अश्रुधुराचा मारा करत जमावबंदी लागू केली.  श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांच्या नेतृत्वाखाली येथील मंत्रिमंडळाच्या झालेल्या तातडीच्या बैठकीमध्ये येथे १० दिवसांसाठी आणीबाणी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

श्रीलंकेच्या अंतर्गत राजकारणातील दोन प्रभावी घटक या पार्श्‍वभूमीवर विचारात घ्यावे लागतील. श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचा येथील राजकारणावरील प्रभाव हा यांमधील मुख्य घटक होय. सिरिसेना प्रशासनाने या हिंसाचारामध्ये राजपक्षे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे. राजपक्षे यांनी अर्थातच हा आरोप फेटाळून लावला असला; तरी येथील सिंहली समुदायावर राजपक्षे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. श्रीलंकेत गेल्या महिन्यात झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये ३४० जागांपैकी २३९ जागा जिंकून राजपक्षे यांनी त्यांच्या प्रभावाची चुणूक दाखविली आहे. या हिंसाचारामुळे राजकीय ध्रुवीकरण झाल्यास सिंहली समुदाय राजपक्षे यांच्या अधिक जवळ जाण्यास मदतच होणार आहे. सिंहली-मुस्लिम दंगल, सामाजिक तणाव कमी करण्यात सिरिसेना सरकारला येत असलेल्या अपयशामुळे त्यांच्यावर टीका होत असल्याचे राजपक्षे यांनी म्हटले आहे. खुद्द राजपक्षे यांच्या कारकिर्दीत २०१४ मध्ये झालेल्या सिंहली-मुस्लिम दंगलीत काही जणांना प्राण गमवावा लागला होता; तर हजारो विस्थापित झाले होते. 

राजपक्षे यांनी स्वतः यासंदर्भात लिहिलेल्या लेखामध्ये १९८० नंतरच्या काळात श्रीलंकेतील मुस्लिम समुदायातील एक घटक जातीयवादाकडे वळल्याची स्पष्ट टीका केली आहे. ‘श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षे सिंहली, तमीळ आणि मुस्लिम नेत्यांनी भागीदार म्हणून श्रीलंकेचा कारभार पाहिला. याआधी श्रीलंकेतील दोन मुख्य राजकीय पक्षांमधील ए सी एस हमीद, एम एच मोहम्मद, बदिउद्दीन मोहम्मद आणि अलवी मौलाना यांसारख्या मुस्लिम नेत्यांना केवळ मुस्लिम मतदारांनीच नव्हे; तर सिंहली मतदारांनीही निवडून दिले होते. आता तशी परिस्थिती नाही. मात्र देशात पुन्हा एकदा सिंहली, तमीळ आणि मुस्लिम नेत्यांचा समावेश असलेल्या राष्ट्रवादी नेत्यांचा समावेश असलेल्या आघाडीची स्थापना करणे आवश्‍यक आहे,’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी या लेखामधून मांडली आहे. अशा आघाडीचे नेतृत्व कोणाकडे असेल, हे सांगायला नकोच. 

दुसरा घटक म्हणजे, श्रीलंकेतील राजकारणात सातत्याने प्रभावी ठरत असलेला बौद्ध राष्ट्रवाद्यांचा गट होय. बौद्ध राष्ट्रवादाच्या वाढत्या आक्रमकतेचे स्पष्ट प्रतिबिंब श्रीलंकेतील या रक्तरंजित दंगलीत आढळले. श्रीलंकेमधील काही कट्टर बौद्ध संघटनांनी मुस्लिम हे श्रीलंकेमधील बौद्ध धर्मस्थळांची विटंबना करत असल्याची टीका केली होती. याचबरोबर, मुस्लिमांकडून देशात धर्मांतराची आक्रमक मोहीम राबविली जात असल्याचीही या संघटनांची भूमिका आहे. श्रीलंकेमधील बौद्धधर्मीय सिंहलींचा प्रभाव असलेल्या मुख्य प्रवाहातील राजकारणात वाढणाऱ्या मुस्लिमविरोधास आंतरराष्ट्रीय प्रमाणही आहेच. श्रीलंकेप्रमाणेच बौद्धधर्मीय बहुसंख्याक असलेल्या म्यानमारमध्ये गेली काही वर्षे बौद्ध-मुस्लिम (रोहिंग्या) संघर्ष सुरू असून यामुळे सहस्रावधी रोहिंग्यांना म्यानमारबाहेर विस्थापित व्हावे लागले आहे. रोहिंग्यांचा विस्थापनाचा हा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय स्तरावरील; विशेषतः दक्षिण व दक्षिण-पूर्व आशियातील देशांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. भारतामध्येही रोहिंग्या प्रश्‍नाचे पडसाद उमटत आहेतच. तसेच श्रीलंकेमध्येही या प्रश्‍नाचे पडसाद उमटले आहेत. श्रीलंकेत आश्रयासाठी येणाऱ्या रोहिंग्यांना येथील बौद्ध संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. 

बौद्ध धर्माच्या एका शाखेचा (थेरवाडा) श्रीलंका व म्यानमारमध्ये प्रसार झाला आहे. यामुळे दोन्ही देशांतील बौद्धधर्मीयांमध्ये परस्पर जिव्हाळा आहेच; शिवाय भक्कम सांस्कृतिक आदानप्रदानही होत असते. सप्टेंबर २०१४ मध्ये येथील बोदु बाला सेना (बीबीएस) या कट्टर बौद्ध संघटनेने म्यानमारमधील बौद्ध भिक्षु आशिन विराथु याला आमंत्रण दिले होते. विराथु हा रोहिंग्याविरोधातील आक्रमक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. कोलंबो येथे झालेल्या सभेमध्ये विराथु याने श्रीलंकेमधील बौद्धधर्मीयांना आपला ‘भक्कम पाठिंबा’ असल्याचे घोषित केले होते. किंबहुना म्यानमारमध्ये उद्‌भविलेल्या रोहिंग्या-बौद्ध संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवरच बीबीएसची स्थापना करण्यात आली होती. श्रीलंकेमध्ये वाढणाऱ्या सिंहली-मुस्लिम तणावामागील हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. अर्थात बौद्ध-मुस्लिम तणाव वाढण्यास केवळ बौद्ध जबाबदार नाहीतच. म्यानमारमधील संघर्षाचे वार्तांकन करतानाही बौद्ध समुदायास खलनायक ठरवून माध्यमे मोकळी झाली होती. प्रत्यक्षातील परिस्थिती वेगळी असून रोहिंग्या समुदायामधील एका घटकाने दहशतवादाला आश्रय दिल्याचे स्पष्ट होते. श्रीलंकेमधील बौद्ध-मुस्लिम संघर्षाचे विश्‍लेषण करतानाही तत्काळ तेथील बौद्ध समाजास आरोपी करणे घिसाडघाईचे ठरेल. 

श्रीलंकेमधील हा संघर्ष भडकण्यामागे सोशल मीडियाचाही मोठा सहभाग आहे. फेसबुकच्या माध्यमामधून चिथावणीखोर व सत्याचा अपलाप करणाऱ्या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्याने ही आग आणखी भडकल्याचे निष्पन्न झाले आहे. मुस्लिम अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यासाठी फेसबुक, व्हॉट्‌सॲप आणि इन्स्टाग्रामचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचेही दिसून आले. येथील सरकारने सोशल मीडियावर तात्पुरती बंदी घालण्यासाठी पाऊले उचलली; मात्र तोपर्यंत पहिला विखारी प्रचार होऊन गेला होता. देशांतर्गत परिस्थिती तणावपूर्ण व हिंसक होण्यामागे सोशल मीडियाचा झालेला वापर हे गेल्या काही वर्षांतील राजकारणाचे वैशिष्ट्यच होऊन बसले आहे. श्रीलंकेसह जगाच्या इतर भागांतही फेसबुकचा वापर राजकीय अजेंड्यासाठी वा चिथावणी देण्यासाठी झाल्याचे दिसून आले आहे. म्यानमारमध्येही सोशल मीडियाचा ‘प्रभावी’ वापर झाला होताच! 

श्रीलंका व्यूहात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण देश आहे. जागतिक राजकारणाचे केंद्रस्थान आता हिंदी महासागर व दक्षिण पूर्व आशियाकडे झुकले असताना श्रीलंकेमधील अंतर्गत घडामोडी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. भारताच्या दृष्टिकोनामधून पाहिले असता तमीळ व मुस्लिम हे दोन्ही समुदाय भारतात मोठ्या प्रमाणात आहेतच. यामुळे तमीळ प्रश्‍नाप्रमाणेच श्रीलंकेतील मुस्लिम प्रश्‍नाचेही भारतात मर्यादित पडसाद उमटू शकतात. भारत व एकंदरच जगाच्या दृष्टिकोनामधून श्रीलंकेत स्थिरता असणे आवश्‍यक आहे. मुळात अनेक दशकांच्या रक्तरंजित संघर्षानंतर श्रीलंकेमध्ये आत्ता कुठे स्थिरता प्रस्थापित होऊ लागली होती. अशा वळणावर श्रीलंका पुन्हा हिंसाचाराच्या थैमानात ढकलला गेल्यास हिंदी महासागराचे राजकारण त्यामुळे नक्कीच प्रभावित होईल. मात्र हा प्रश्‍न इतक्‍या कमी जिवांच्या किमतीवर सुटेल, असे दुर्दैवाने वाटत नाही.

फोटो फीचर

संबंधित बातम्या