‘महाराष्ट्र केसरी’
मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेतील चुरशीच्या अंतिम लढतीत अभिजित कटके याने विजय मिळविला. यानिमित्ताने त्याचे स्वप्न, त्यासाठी तो करत असलेली मेहनत, त्याचे पुढील बेत.. अशा विविध मुद्द्यांवर त्याच्याबरोबर साधलेला संवाद.
महाराष्ट्र केसरीची लढत झाली आणि पुण्यातील गुरुवर्य शिवरामदास तालमीचा शोध घेत गणेश पेठेतील तालीम गाठली. गणेश पेठ चौकातील मुख्य रस्त्यासमोर असलेल्या बोळातून सरळ आत जाताच पिवळ्या रंगाच्या चार मजली उंच इमारतीच्या भिंतीवर लाल रंगाने मोठ्या अक्षरात ‘गुरुवर्य शिवरामदास तालीम’ या अक्षरातील पाटी तुमचे स्वागत करते. दोन पायऱ्या चढून आत जात असताना पायऱ्यांवर आजूबाजूला उमटलेले तांबड्या मातीचे पाय तुम्हाला तालमीच्या मूळ गुणांची जाणीव करून देतात. दरवाजातून आत शिरताच दोन पावले अंतरावर वरच्या मजल्यावर जाणारा जिना सुरू होतो. जिन्याच्या बाजूलाच तांबड्या मातीपासून तयार केलेला आखाडा लक्ष वेधून घेतो. जिन्यावर पडलेली माती तुडवत तुम्ही पायऱ्या चढत असताना प्रत्येक मजल्यावर तुमच्याकडे अदबीच्या नजरेने पाहणारे पहिलवान दिसतात. याबरोबरच गॅस, जेवणाची भांडी, दोरीवर टाकलेले कपडे, लंगोट, अंथरुणे, ट्रॅकसूट, डंबेल्स यासारख्या सर्वसाधारण तालमीत असलेल्या वस्तू नजरेस पडत असतात. या सगळे नजरअंदाज करत चालत असताना, तुम्ही तिसऱ्या मजल्यावर पोचल्यावर कुस्तीच्या सरावासाठी अंथरलेली मॅट आणि त्या मॅटच्या एका कोपऱ्यात ठेवलेले पुष्पगुच्छ आणि हार पाहून ‘महाराष्ट्र केसरी’च्या होत असलेल्या कौतुक सोहळ्याचा अंदाज येतो. याच पुष्पगुच्छाशेजारी अत्यंत दिमाखात उभी केलेली मानाची चांदीची गदा नजरेत भरते.
हा सगळा लवाजमा मागे सारत तुम्ही चौथ्या मजल्यावर पोचता.. समोर उभा असतो - २०१७ चा महाराष्ट्र केसरी अभिजित कटके! अत्यंत निर्मळ हास्य, धिप्पाड शरीरयष्टीच्या या उमद्या तरुणाने काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या मातीच्या रांगड्या खेळात म्हणजे कुस्तीत मानाचा किताब पटकावलेला! पण चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा आविर्भाव नव्हता, प्रसन्न हास्याने तो तुमचे स्वागत करतो.
‘आजोबा, वडील असे मागच्या दोन पिढ्यांनी जागवलेले ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाचे स्वप्न आज पूर्ण झाले याचा सगळ्यात जास्त आनंद आहे,’ या वाक्याने अभिजितने बोलायला सुरवात केली.
‘माझे आजोबा पहिलवान होते, वडीलदेखील पहिलवान होते; मात्र त्या काळात परिस्थितीमुळे त्यांना खेळता आले नाही. पण वडिलांनी मोठ्या जिद्दीने मला घडवले..’ तो सांगत होता..
कुस्तीच्या कारकिर्दीला सुरवात
‘वयाच्या नवव्या - दहाव्या वर्षांपासून वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचा सराव करायला सुरवात केली. दररोजचा व्यायाम, योग्य आहार, झोप हे सगळे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. दोन वर्षे केवळ व्यायाम आणि सरावानंतर मी जत्रांमधील आखाड्यांमध्ये कुस्ती खेळायला सुरवात केली. गावोगाव भरणाऱ्या जत्रांमधील आखाड्यात मी कुस्त्या गाजवत होतो. जेव्हा जेव्हा कुस्ती जिंकायचो, तेव्हा वडील म्हणायचे - ‘तुझं मुख्य ध्येय ‘महाराष्ट्र केसरी’ आहे. कुस्तीचा सराव करत असताना एक दिवस खांद्याजवळ दुखापत झाली अन् २०१३ ला खांद्याचे ऑपरेशन करावे लागले. डॉक्टरांनी पूर्णवेळ आराम करायला लावला. त्यावेळी थोडा मानसिक खचलो होतो. मात्र त्यावेळी कुटुंबातील सर्व सदस्यांनी माझे मनोबल वाढवले.. वडील म्हणायचे, ‘अरे, आपल्याला इतक्यात हार मानून कसे चालले, अजून आपल्याला लय मजल मारायची आहे.. लवकर बरा हो. आपल्याला जोमाने प्रॅक्टिस करायची आहे,’ असे म्हणून मला प्रोत्साहित करायचे. २०१३ च्या दुखण्यातून बरा झाल्यावर मी पुन्हा तालमीत येऊन सराव करायला सुरवात केली. वडिलांनी सांगितले, ‘शाळा थोडी शिकलास तरी चालेल पण खेळाकडे दुर्लक्ष होता काम नये.’ सुरवातीच्या काळात एखाद्या दिवशी व्यायाम करण्याचा कंटाळा केला तर त्यादिवशी मात्र नेहमी कौतुक, प्रोत्साहित करणाऱ्या वडिलांकडून शिव्या खायला लागायच्या. नंतर नंतर मात्र सरावाचे, व्यायामाचे महत्त्व समजत गेले. मग मात्र व्यायामाचा कधीही कंटाळा केला नाही.’
सोशल मीडियाचा अचूक वापर
सोशल मीडियाच्या वापराबद्दल अभिजित म्हणतो, ‘कुस्ती हा अत्यंत जाणीवपूर्वक आणि सातत्याने लक्ष देऊन खेळला जाणारा खेळ आहे. तुमचे थोडे दुर्लक्ष, तुमचे संपूर्ण करिअर पाण्यात घालवू शकते. त्यामुळे खेळाकडे शंभर टक्के लक्ष देणे आवश्यक आहे. या सगळ्यात मी सोशल मीडियाचा वापर माझ्या खेळाला मदत होईल अशाप्रकारे करतो. यू-ट्यूबच्या माध्यमातून मी कुस्तीचे नॅशनलवरील व्हिडिओ पाहून, आपण सरावात कुठे कमी पडतो का याचा शोध घेतो. कुस्तीच्या डावातील नेमक्या कोणत्या डावावर आपली पकड जास्त आहे याचा अंदाज घेतो. या व्यतिरिक्त व्हॉट्स ॲपवरून दिल्ली, हरियाना या राज्यातील माझ्या मित्रांबरोबर खेळाविषयी चर्चा करतो. फेसबुकला माझे खाते असले, तरी त्याचा म्हणावा तितका वापर मी करत नाही. माझे फेसबुकचे खाते बहीण चालवते. गावगप्पा करण्यासाठी अजिबात सोशल मीडियाचा वापर करत नाही. मात्र सोशल मीडियाच्या अचूक वापरामुळे मला त्याचा खेळात भरपूर फायदा होतो.’
दैनंदिनीची आवश्यकता
‘कुठल्याही खेळात तुमच्या सराव, आहार, व्यायामाला खूप महत्त्व असते. यामध्ये सातत्य राखणे हे खूप कष्टप्रद काम आहे. कुस्तीसाठी मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी तीन - तीन तास जोर-बैठका, क्रॉसकंट्री असे व्यायाम करतो. याबरोबरच दूध, ड्रायफ्रूटपासून बनवलेली थंडाई, फळांचे ज्यूस, तूप आणि मांसाहाराचा आहारात समावेश करतो. या सगळ्यांबरोबर आवश्यक असलेली पुरेशी झोपही घेतो.’
कुस्ती हाच एकमेव छंद
‘कुस्ती हा माझा छंद आहे. या व्यतिरिक्त दुसरा कोणताही छंद मला नाही. लहानपणापासून जोपासलेला हा छंद आजही कायम आहे. कुस्तीमध्ये कशाचाही व्यत्यय येऊ नये, म्हणून बारावीनंतर बाहेरूनच कॉलेज करतोय. दररोज जास्तीत जास्त सराव कसा होईल यासाठी प्रयत्न करत असतो. आता ‘महाराष्ट्र केसरी’ जिंकल्यानंतरही गावचे दोन सत्कार समारंभाचे कार्यक्रम सोडले. इतरही कुठे सत्काराला गेलो नाही, कारण २०१८ मध्ये ‘हिंद केसरी’ आणि नॅशनलच्या स्पर्धा आहेत.’
कुटुंबीयांची मोठी साथ
‘मी घरामध्ये एकुलता एक मुलगा असलो तरी घरच्यांनी कोणत्याही प्रकारचे शिक्षणाचे दडपण माझ्यावर आणले नाही. खेळातच माझे करिअर घडवण्यासाठी ते कायमस्वरूपी झटत आले. खेळासाठी मोठ्या नियमितपणे प्रोत्साहित करत आले आहेत. आईचा मी अत्यंत लाडका आहे...’ आईविषयी बोलताना काहीसा भावुक होत अभिजित म्हणतो... ‘माझ्या यशात माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे. मी घरून तालमीत येईपर्यंत तिने माझ्या आहाराची खूप जास्त काळजी घेतली. अगदी परवादेखील ‘महाराष्ट्र केसरी’चा किताब जिंकल्यानंतर घरी फोन केला तेव्हादेखील तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहात होते. माझ्या बहिणींनी मला नेहमी मानसिक सपोर्ट केला. वेळोवेळी माझ्या ध्येयाची मला आठवण करून देत आल्या आहेत. मात्र स्पर्धा जिंकल्यापासून मी अजूनही घरी गेलो नाही.’
उपमहाराष्ट्र केसरीनंतर
‘मागील वर्षी २०१६ ला विजय चौधरीबरोबर महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जेव्हा मी उपमहाराष्ट्र केसरी झालो; तेव्हापासून मी नाराज न होता, पुन्हा जोमाने सराव करण्यास सुरवात केली. माझ्या खेळात नेमक्या काय चुका झाल्या, त्या चुकांवर लक्ष केंद्रित केले. त्या सुधारणा केल्या. माझे वस्ताद अमर निंबाळकर, हणमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. मागच्या वर्षीच झालेल्या हिंद केसरी स्पर्धेतही मी थोडक्यात हरलो. मात्र यंदा मी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरलो आणि मागची सगळी कसर यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत जिंकून भरून काढली. आता केवळ २०१८ मध्ये होणाऱ्या हिंद केसरी आणि नॅशनल गेम्सवर लक्ष केंद्रित केले आहे. केवळ यावरच समाधान न मानता मी २०२० ला होणाऱ्या ऑलिंपिकच्या दृष्टीनेही तयारी करणार आहे...’ बोलणे संपवत अभिजित निरोप घेतो आणि पुढच्या तयारीला लागतो...