कृश शरीराच्या आरोग्यव्यथा

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 22 एप्रिल 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

जीवनशैलीमुळे निर्माण होणारी वजनवाढ हा आजकाल नेहमीच चर्चेचा गरमागरम विषय असतो. आरोग्यविषयक लेखात आणि व्याख्यानात नेहमी स्थूलत्वाचे तोटे सांगून वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. पण ज्यांचे वजन मुळातच खूप कमी असते, अशा सडपातळ, हडकुळ्या अशा लोकांचे काय? त्यांना तर वजन वाढवायची गरज असते. 
 अशा कृश व्यक्ती जगात संख्येने काही कमी नाहीत. ‘लॅन्सेट’ या जगातील सर्वांत दर्जेदार वैद्यकीय नियतकालिकाच्या मार्च २०१६ मधील एका सर्वेक्षणानुसार, जगभरात एकीकडे १०.८ टक्के पुरुष आणि १४.९ टक्के स्त्रिया स्थूल आहेत आणि त्याचवेळेस दुसऱ्या बाजूला ८.८ टक्के पुरुष आणि ९.७ टक्के स्त्रिया या कृश किंवा हडकुळ्या आहेत. भारताचा विचार केला, तर २५ टक्के स्त्रिया आणि  २० टक्के पुरुष अशा साधारणतः १५ कोटी व्यक्ती या अगदी हाडाचा सापळा जरी नसल्या, तरी अतिकृशतेच्या वर्गात मोडतात. 

कृशपणा म्हणजे काय?
 किलोग्रॅममधल्या आपल्या वजनाला मीटरमधील उंचीचा वर्ग करून भागले, की जो भागाकार येतो, त्याला बॉडी मास इंडेक्‍स (बी.एम.आय.) म्हणतात.
बॉडी मास इंडेक्‍स = (वजनाचे किलोग्रॅम) ÷ (मीटरमधील उंची)
 बी.एम.आय. जर १८.५ ते १६ असेल, तर त्या व्यक्तींना सडपातळ म्हणता येते. पण जर तो १६ पेक्षा कमी असेल, तर त्या व्यक्तींना कृश समजले जाते आणि बीएमआय १५ किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर त्या व्यक्ती अतीकृश किंवा हडकुळ्या मानल्या जातात.   

कृशतेची कारणे
कृशतेची असंख्य कारणे असतात. काही व्यक्ती लहानपणापासूनच कृश असतात, तर काही आजारपणामुळे कृश बनतात. कृश व्यक्तींमध्ये एकापेक्षा अधिक कारणेसुद्धा अनेकदा आढळतात. 
कौटुंबिक परंपरा : काही घराण्यांमध्ये पिढ्यान्‌पिढ्या बीएमआय कमीच असतो. आणि सर्व वंशज वजन-उंचीच्या या गुणोत्तरामध्ये कमी भरतात. जगभरातदेखील काही आदिवासी जमातींमध्ये शारीरिक वाढ निसर्गतःच खुरटलेली आढळते. 
चयापचय क्रियेचा वेग : खाल्लेल्या अन्नामधून निर्माण होणारी ऊर्जा शरीराच्या विविध कार्यासाठी वापरली जाणे म्हणजे चयापचय क्रिया (मेटाबोलिझम). यामध्ये जर शरीरातील ऊर्जा जास्त वेगाने आणि जास्त प्रमाणात वापरली गेली, तर वजन कमीच राहते. त्यामुळे अशा व्यक्तींनी इतर सर्वसाधारण व्यक्ती एवढाच किंवा जरा जास्त आहार जरी घेतला, तरी त्यांचे वजन कमीच राहते.
शारीरिक श्रम : जास्त प्रमाणातले मानवी कष्ट, अति शारीरिक श्रम, जास्त प्रमाणात होणारा एरोबिक व्यायाम यामध्ये वजन कमी असते.
काही आजार : अनियंत्रित मधुमेह, थायरॉईड हार्मोनचे प्रमाण जास्त असल्यामुळे होणारा हायपरथायरॉइडिझम, ॲनिमिया, क्षयरोग, दीर्घकालीन ताप, कर्करोग, यकृताचे आणि आतड्यांचे आजार, एड्‌सची अंतिम अवस्था यामध्ये रुग्णांचे वजन झडून ते कृश बनतात. दीर्घकाळ उलट्या-जुलाबांचा त्रास होत राहिल्यासही रुग्णांचे वजन खूप घटते. 
मानसिक आजार : ताणतणाव, चिंता, नैराश्‍य, ऑबसेसिव्ह कंपल्सिव्ह डिसॉर्डर अशा आजारांमध्ये रुग्णाचे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होऊन वजन वेगाने घटत जाते. बुलिमिया, ॲनोरेक्‍सिया नर्वोजा अशा आजारांमध्ये आहार प्रमाणापेक्षा खूप कमी होऊन व्यक्ती कृश होतात. 
औषधे : मधुमेहाची काही औषधे, कर्करोगावरील केमोथेरपी, संधिवातावरील काही औषधे यामुळे भूक मंदावते. साहजिकच वजन घटू शकते.
वृद्धापकाळ : साधारणतः ६५ ते ७५ वर्षे वयाच्या दरम्यान नैसर्गिक भूक कमी होते आणि वजन घटू लागते. 
कुपोषण : भारतात आणि जागतिक स्तरावर प्रथिने आणि उष्मांक कमी मिळाल्याने होणाऱ्या कुपोषित बालकांचे प्रमाण अतोनात आहे. ही बालके कृश असतात आणि योग्य आहार न मिळाल्यास किंवा उपचार न झाल्यास पुढील आयुष्यातदेखील कृश राहतात.

कमी वजनाचे दुष्परिणाम
एका मर्यादेपेक्षा वजन खूप कमी असेल, तर त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर हळूहळू पण निश्‍चितपणे होत जातात. साधारणतः १८ ते १८.५ बीएमआय असणाऱ्यांना हे त्रास जाणवत नाहीत, पण त्याखाली तो गेल्यास अनेक व्याधींना सामोरे जाण्याचा प्रसंग येतो.
हाडे ठिसूळ होणे : शारीरिक कृशता असलेल्या स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळानंतर ‘ऑस्टीओपोरोसिस’चा विकार उद्भवतो. यात हाडे ठिसूळ बनतात आणि साध्या धक्‍क्‍याने ती मोडू शकतात.
त्वचा, केस आणि दात : अतिकृश व्यक्तींची त्वचा शुष्क आणि पातळ बनते. साध्या ओरखडयाने जखमा होतात. त्यांचे केस लवकर गळतात आणि लवकर टक्कल पडू लागते. त्यांचे दातही ठिसूळ बनतात आणि ते पडणे किंवा त्यांचे तुकडे पडतात.
सतत आजारपण : अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथे झालेल्या एका संशोधनाच्या निष्कर्षानुसार, कृश व्यक्तीत रोग प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे सतत सर्दी होणे, नेहमी कणकण जाणवणे, डोके दुखणे, ताप येणे, थोड्या श्रमाने थकवा येणे अशी लक्षणे नेहमी दिसतात. त्यांच्या शरीरात लाल रक्तपेशी कमी असतात. त्यामुळे त्या ॲनिमिक बनतात. 
दमणे : शरीराला योग्य प्रमाणांत ऊर्जा मिळत नाही, त्यामुळे किंचितशा कामाने दमायला होते. काम करण्यास उत्साह कमी असतो. या व्यक्ती शारीरिक किंवा बौद्धिक असे कोणतेही काम दीर्घकाळ करू शकत नाहीत.
वंध्यत्व : अतिशय कृश स्त्रियांच्या शरीरात लैंगिक हार्मोन्सचे प्रमाण कमी होऊन त्यांना पाळी अनियमित होणे, रजोनिवृत्ती लवकर होणे, गर्भधारणा न होणे असे त्रास आढळून वंध्यत्व निर्माण होते.
गर्भवती स्त्रिया : कमी वजनाच्या मातांची अपुऱ्या दिवसात प्रसूती होऊ शकते, तसेच प्रसूतीदरम्यान रक्तस्राव होऊन त्यांना गंभीर धोका होऊ शकतो. अशा मातांची बालके कमी वजनाची आणि अशक्त निपजू शकतात. 
वाढ खुरटणे : लहान मुले किंवा तरुणांमध्ये जन्मजात कमी वजनामुळे शारीरिक वाढ खुरटू शकते.
मृत्यूचे प्रमाण : ‘बायो-मेडिकल सेंट्रल (बी.एम.सी.) पब्लिक हेल्थ’ या अमेरिकन वैद्यकीय नियतकालिकात १६ एप्रिल २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका शोध निबंधात, कमी वजनाच्या कृश व्यक्तींची आयुर्मर्यादा कमी राहते, असे सप्रमाण दाखवून दिले आहे.

डॉक्‍टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?
 वजन कमी होणे हा एक आजार जरी नसला, तरी एखाद्या गंभीर आजाराचे प्रथम लक्षण असू शकते. त्यामुळे वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असते. यामध्ये -
१. लहान मुलांमध्ये किंवा किशोरवयीन अवस्थेत जर वजन-उंचीच्या तक्‍त्यानुसार मुलांचे वजन कमी भरत असेल,
२. वाढत्या वयातील मुला-मुलींचे वजन दीर्घ कालावधीत न वाढता तेवढेच राहत असेल,
३. एरवी व्यवस्थित वजन असलेल्या व्यक्तींमध्ये काही दिवसात अथवा महिन्या-दोन महिन्यांच्या काळात ३ ते ५ किलो वजनाची घट आढळल्यास,
४. घरातील लहान अथवा कोणत्याही वयाच्या व्यक्तीमध्ये भुकेचे तसेच आहाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या आणि अचानक कमी झाल्यास, आपल्या डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. 

वजन कसे वाढवावे?
 आहारातून शरीराच्या क्रियांसाठी मिळणाऱ्या उष्मांकातून काही शिल्लक राहिले, तर वजन वाढते. आहारातील अन्नघटकांमधून चरबीयुक्त पदार्थ आणि कर्बोदकांपासून आपल्याला उष्मांक मोठ्या प्रमाणात मिळतात. तर प्रथिनांच्या सेवनाने शरीरातील मांसाची, स्नायूंची वाढ होते. ड जीवनसत्त्व आणि कॅल्शिअमसारखी खनिजे हाडांची घनता वाढवतात. साहजिकच सर्व अन्नघटक, जीवनसत्त्वे, खनिजे, क्षार आणि पाणी योग्य प्रमाणात आणि जास्त मापात जर आहारातून मिळाले तरच वजन वाढू शकते. म्हणजेच ‘थोड्या जास्त मापात असलेला, पण समतोल आहार हीच आरोग्यकारक वजनवाढीची गुरुकिल्ली आहे.’   
 चरबीयुक्त आहार घेतला, गोडधोड आणि तेल-तूप खूप खाल्ले म्हणजे आपले वजन चटकन वाढेल असा एक पक्का समज सगळ्यांच्या मनात असतो. मात्र, लक्षात घ्या, आपल्या शरीरात चरबी जमा होणे आणि चयापचय क्रियेत तिचा वापर ऊर्जा म्हणून होणे याचे एक नैसर्गिक चक्र असते. आपल्या शरीरातील विविध अवयवांच्या कार्यासाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि शरीराची वाढ होण्यासाठी स्निग्ध पदार्थ हा एक आवश्‍यक अन्नघटक असतो. 
 चरबीयुक्त पदार्थांपासून बनणारी ऊर्जा आपल्याला अंगमेहनतीची कामे आणि व्यायाम करताना उपयुक्त ठरते. मेंदूच्या पेशींच्या कार्यासाठी, शरीरात निर्माण होणारे दाह नियंत्रित करण्यासाठी चरबीपासून बनणारे शारीरिक घटक आवश्‍यक असतात. रक्तप्रवाहात गुठळ्या निर्माण होऊ नये म्हणून तसेच केस, त्वचा, हाडे निरोगी आणि भक्कम व्हायलादेखील चरबीची मदत होते. 
वजन कमी आहे म्हणून उठसूट काहीही खा किंवा तेलतुपाचा मारा करा, मांसाहार आणि जंकफूडवर आडवा हात मारा असे नसते.   
 जंकफूड खाऊन वजन वाढू शकते. पण शरीराला आवश्‍यक अशी पोषकमूल्ये योग्य प्रमाणात त्यातून मिळत नाहीत. वजन कमी करण्याच्या कार्यक्रमासारखेच संतुलित वजन वाढवण्याची योजना आखावी लागते. कृश व्यक्तींचे वजन वाढवायचा कार्यक्रम आखताना, बॉडी मास इंडेक्‍सचा (बीएमआय) तक्ता वापरून वजन कितपत कमी आहे हे प्रथम निर्धारित केले जाते. त्याचबरोबर उंची, वजन, आहार आणि शारीरिक क्रियांची पातळी यावर वजन कितपत वाढवावे हे ठरवले जाते. 

निरोगी वजन वाढविण्यासाठी
 मनापासून खाऊनदेखील वजन वाढत नसल्याने चिंताग्रस्त असलेल्यांची संख्या कमी नसल्याने, तथाकथित आहार तज्ज्ञांपासून अगदी आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित उपचारांपर्यंत अनेक उपचारपद्धती आज सहज उपलब्ध आहेत.
 वैद्यकीय तपासणी : कृश व्यक्तींनी डॉक्‍टरांचा सल्ला सर्वप्रथम घेऊन कोणता आजार नाही याची खात्री करून घ्यावी. आजार असल्यास त्याचा उपचार करणे जरुरीचे असते. काही आजार कालांतराने बरे होतात, तर काही आजारात कायमस्वरूपी औषधेही चालू ठेवायची असतात. 
औषधे : न्यूट्रिशन सप्लिमेंटस, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या, टॉनिक्‍स यांनी वजन वाढत नाही. त्यांचा वापर करण्याची गरज डॉक्‍टरी सल्ल्यानेच ठरवावी.  
व्यायाम : प्रथम स्नायूंच्या बळकटीसाठी योग्य व्यायाम करावा. यामध्ये जिममधील वेट ट्रेनिंग, डंबेल्स, जोर-बैठका अशा व्यायामाचा समावेश असावा. व्यायाम रोजच्या रोज नियमितपणे करावा. 
आहाराच्या वेळा : दिवसांतून दोनच वेळा भरपूर जेवण्यापेक्षा थोड्याथोड्या वेळाच्या अंतराने ५-६ वेळा खावे, पण जंकफूड खाऊ नये. भरभर खाण्यापेक्षा हळूहळू खावे म्हणजे भूक वाढते. 
आहार : ठराविक दिवसांनी आहार थोडा थोडा वाढवत न्यावा. सुरुवातील नेहमीपेक्षा चतकोर किंवा अर्धी पोळी वाढवा, भात वाढवा, रोज एक फळ खावे.
याचबरोबर दूध, अंडी, ओट्‌स, केळी, बटाटा, सोयाबीन, नूडल्स, मांसाहार, लोणी, सुकामेवा या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास वजन वाढवण्यास मदत होते.

संबंधित बातम्या