रसाळगड ते महिपतगड : रात्रीची दुर्गयात्रा

डॉ. अमर अडके  
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

किल्ले भ्रमंती
 

खेडहून बिरमणीच्या बाजूनं हातलोट घाट चढून मकरंदगडाच्या माथ्यावर पोचलो आणि पूर्व-पश्‍चिमेच्या सह्याद्रीच्या डोंगररांगा न्याहाळू लागलो. रसाळगडाची धार, त्याचं पठार, उंचावलेला सुमारगड आणि प्रशस्त माथ्याचा महिपतगड या दुर्गत्रयीवरून नजर हटेना. आता बरेच दिवस झाले होते रसाळ-सुमार-महिपत दुर्गयात्रा करून. काही दिवसांपूर्वीच ऐकलं होतं, की आता खेडहून तळेमार्गे अगदी रसाळगडाच्या खिंडीपर्यंत पक्की सडक झालीये. सुमारगडाला पूर्वेच्या बाजूला कातळ टप्प्याच्याजवळ शिडी लावलीये. डोंगरधारेच्या वाटेवरही शिडी बसवलीये. मालदेच्या ग्रामस्थांनी किल्ल्यावरच्या गुहा माती काढून साफ केल्या आहेत. महिपतगडाच्या पायथ्याला वाडी बेलदारपर्यंत वाडी जैतापूरमार्गे कच्ची का होईना सडक झालीये. आता या किल्ल्यांवर जाणंच बदलून गेलंय. त्याची दुर्गमता या सुविधांमध्ये हरवून गेलीये आणि मनामध्ये उगीचच या किल्ल्यांच्या खडतर मोहिमा रुंजी घालू लागल्या. खरं तर रसाळ-सुमार-महिपत ही मोहीम म्हणजे केवढं आव्हान वाटायचं. 

नेमकं वर्ष आठवत नाही, पण किमान दोन दशकं तरी झाली असावी; अनपेक्षितपणे घडलेल्या सुमार-महिपत रात्र मोहिमेला. तसा काही रात्र मोहिमेचा इरादा नव्हता. पण घडलं एवढं खरं! 

महिना फेब्रुवारीचा, निमित्त श्री शिवजयंतीचं. रसाळगडावरून श्री. शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं. रसाळ पंचक्रोशीतील मंडळी मोठ्या उत्साहानं प्रतिवर्षी शिवजयंती गडावर साजरी करतात. होय! अगदी महाप्रसादासह. दुर्गम किल्ल्यांवरच्या अशा शिवजयंती उत्सवांना निव्वळ समारंभाचं स्वरूप नसतं, तर या आनंद सोहळ्यांना भावनेची एक किनार असते. 

ठरलं! आमंत्रणाबरोबर हुकूम यावर्षी श्री शिवजयंती रसाळगडी जायचं आणि बेत पक्काही झाला. रसाळगडी शिवजयंती, त्यादिवशी मुक्काम तिथंच. मग दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून सुमारगड गाठायचा. तिथून महिपतगडाच्या पायथ्याला वाडी बेलदारला पोचायचं. तिथून वर जाऊन महिपतगडावर मुक्काम करायचा आणि मग उठून महिपतगडाची भटकंती पूर्ण झाली, की पायथ्याच्या वाडी बेलदारहून जंगलवाटेनं वाडी जैतापूरमार्गे खेडला पोचायचं. 

कोल्हापूरहून भल्या पहाटे खेडसाठी प्रस्थान केलं. खेडहून तळेमार्गे रसाळगड पायथा गाठला. तेव्हा वर रसाळवाडीच्या खिंडीपर्यंत वाहन जात नव्हतं. पायथ्यापासून खिंडीपर्यंत डोंगरचढाई, मग खिंडीच्या डाव्या बाजूला रसाळवाडी तर उजवीकडं रसाळगड. रसाळगडाचा प्रवेशमार्ग अत्यंत देखणा आहे. खिंडीच्या किंचित वरच्या बाजूनं सुंदर पायऱ्यांची वाट सुरू होते. मग दरवाजे ओलांडत या पायरी मार्गानं किल्ल्याच्या माथ्यावर झोलाई मंदिरापर्यंत पोचायचं. पुढं प्रशस्त पठाराचा रसाळगड. खेडहून रसाळगडाच्या पायथ्याशी पोचलो. डोंगर चढून पायरी वाटेनं मंदिरात पोचेपर्यंत तसा उशीरच झाला. मंदिर परिसरात जन्मसोहळ्याची लगबग सुरू होती. आम्हीही त्या सोहळ्याचा भाग होऊन गेलो. ग्रामस्थांच्या अमाप उत्साहात सोहळा पार पडला. शिवनेरीवरच्या शिवजन्मोत्सवाचं वर्णन सांगता सांगता मीही भारावून गेलो. महाप्रसाद आटोपला तोपर्यंत टळटळीत दुपार झालेली होती. थोडी विश्रांती घेऊन निवांत किल्ला फिरायचा, मग गप्पा आणि रात्रीचा मुक्काम किल्ल्यावरच असा बेत. बरोबरच्या सहकाऱ्यांकडून एक अनपेक्षित बेत हळूच समोर आला. 

'सर! आत्ताच निघूया का सुमारगडाला जायला?' सूर्यास्तापर्यंत सुमारगडावर पोचायचं आणि तिथंच मुक्काम करायचा. मग सकाळी महिपतगडाकडं निघायचं. 

खरं तर रसाळ-सुमार-महिपत मोहिमेत यावेळी सुमारगडावर मुक्कामाची परंपरा नव्हती. मी होकार दिला नाही, पण मलाही ती कल्पना भावली होती. थोडं वेगळं! काय हरकत आहे सुमारगडावर मुक्काम करायला? जाऊया! मग हाच बेत नक्की केला आणि पाठीवर सॅक चढवून सुमारगडाकडं निघालो. कदाचित अंदाज चुकून रात्री-अपरात्री दुर्गम वाटांवर, अरण्यात चालावं लागेल म्हणून रसाळवाडीच्या तुकारामला सोबत घेतलं. रसाळगडावरच्या मंडळींना बेत सांगितल्यावर ते आमच्याकडं डोळे मोठ्ठे करून पाहू लागले आणि मुक्कामाचा आग्रह करून सकाळी जा असं म्हणू लागले. त्यांचं समाधान करून निघणं जिकिरीचं होतं. त्यांना समजावून सांगून त्यांचा निरोप घेऊन रसाळवाडीच्या खिंडीत पोचलो. किमान सुमारगडावर पोचेपर्यंत उजेड असावा अशी अपेक्षा ठेवून पावलं जलद टाकत डोंगरधारेवरून अरण्यात शिरलो. सोबत रसाळवाडीचा तुकाराम होताच. रसाळगड ते सुमारगड पायथा ही सर्वानंदी डोंगर-अरण्ययात्रा आहे. या प्रवासाच्या दोन्ही बाजूला सह्याद्रीच्या विलोभनीय रांगा आहेत. तसं रसाळ आणि सुमारगडावर पूर्व आणि पश्‍चिम दोन्ही बाजूंनी चढता येतं. 

रसाळवाडी मागं पडली. दुपार कलतीकडं झुकल्याची जाणीव तणाव वाढवत होती. रसाळगड ते सुमारगड अगदी जलद चालीनं म्हटलं तरी किमान तीन ते चार तासांचा टप्पा. अंधार पडायच्या आत सुमारगडावर पोचायचं होतं. पावलं झपाझप पडत होती. सुमारगड रसाळच्या बाजूनं चढाईला फार उंच नसला, तरी थोडीफार प्रस्तर चढाई जोखमीचीच. चढाईच्या कातळाच्या बाजूची दरी ही खरी जोखीम. तसं निव्वळ सुमारगडावर जाण्यासाठी मालदेवाडीच्या बाजूनं पूर्वेकडूनही येता येतं. पण रसाळगडाकडून येताना त्या बाजूचा प्रश्‍नच नव्हता. रसाळगडाच्या बाजूनं सुमारगडावर जातांना अर्धीअधिक जंगलवाट पार केली, की उजव्या हाताला उंच डोंगर दिसतो. तो 'पानसा डोंगर'. तो उजवीकडं ठेवून पुढं गेलं, की कातळ कड्यांचा सुमारगड लक्ष वेधून घेतो. पानसा डोंगर पार करेपर्यंत सूर्य अस्तमानाकडं झुकला होता. सुमारगडावर अंधारापूर्वी पोचण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त सुरू होती. पानसा डोंगर ओलांडला, की थोडं मोकळं वन लागतं. इथून सुमारगडाची कातळभिंत आणि माथा जणू अंगावर आल्यासारखा वाटतो. या बाजूनं वर जाणं जवळजवळ अशक्‍यच. इथून उजवीकडं वळून सुमारची धार डाव्या हाताला ठेवून एका दुर्गम वाटेनं पूर्व बाजूला चढाईच्या कातळ टप्प्यापर्यंत पोचता येते, पण ही वाट फारशी प्रचारात नव्हती. साहजिकच त्या वाटेवर फारसा राबता नव्हता. पूर्वी त्याही वाटेनं गेलो होतो, पण आता संध्याकाळ दारात येऊन ठेपली होती. त्या वाटेची जोखीम घेणं शक्‍यच नव्हतं. 

सुमारगडावर अंधार पडायच्या आत कसंबसं पोचू हा अंदाज आल्यानं खिंडीच्या राबत्या वाटेनं जायचा निर्णय घेतला. ही वाटसुद्धा काही सोपी नाही. दिवसाही परीक्षा घेणारी तर अंधाराच्या वेळी काय? 

अस्तमानाला जाऊ पाहणाऱ्या सूर्याच्या साक्षीनं सुमारगडाच्या दक्षिणेकडच्या खिंडीत पोचलो. इथून उजवीकडं थोडा चढ चढून कड्याच्या अगदी पायाशी जावं लागतं. मग अवघा कडा उजवीकडं ठेवून त्या कड्याच्या पोटातून अरुंद आणि घसाऱ्याच्या दुर्गम वाटेनं उत्तरेकडं जात राहायचं. मार्गात कड्याच्या पोटात काही मोरीसदृश्‍य खोदकामं आढळतात. दुर्गस्थापत्याच्या अन्य काही खुणाही आढळतात. खिंडीतून उजवीकडं वळून कड्याला लागून उत्तरेकडं जात राहिलो, की बरंच अंतर गेल्यावर पूर्वेच्या बाजूची सपाटी आणि झाडी लागते. कडा तसाच उजवीकडं ठेवून उत्तरेकडची भट्टीची खिंड गाठावी. मग डोंगरदांडानं वर चढून कातळटप्प्याचा पायथा गाठावा. कातळ टप्प्याच्या पायथ्यानं आडवं जात राहिलो, की गडाच्या पूर्व टोकाला पोचतो. मग घट्ट कातळातल्या उभ्या वाटेनं कमी उंचीचं प्रस्तरारोहण करून गडमाथ्यावर जाता येतं. हा कातळटप्पा पार करताना कातळ भेदून वर आलेल्या जाड आणि घट्ट मुळ्यांचाही आधार घेता येतो. कित्येक दशकं या बाजूनंच चढाई करून वर जाणं श्रेयस्कर मानलं जातं. कारण सरळसोट उंच कडा फक्त याच बाजूला आढळत नाही. हे असं दुर्गम वाटेनं चालत येऊन आणि कडा चढून सुमारवर पोचण्याची मजाच काही वेगळी होती. हल्ली याच भागात लोखंडी शिडी बसवलीये. पण आजही सुमारगडावर जायचं म्हटलं, की दक्षिण खिंडीकडून उजव्या बाजूनं कड्याला बिलगून त्याच्याच पोटातून उत्तरेकडं जाऊन पूर्व टोकाकडून कडा चढून माफक प्रस्तरारोहणानं गडावर पोचायचं हेच समीकरण मनात पक्कं बसलंय. 

पूर्व टोकाला दरीच्या बाजूनं कातळ टप्प्याच्या पायथ्याला पोचलो, तेव्हा सूर्य क्षितिजाला टेकला होता. त्या लाल प्रकाशात कातळांवर हात पाय रोवत, मुळ्यांना पकडत माथ्यावर पोचलो, तेव्हा सूर्य क्षितिजाआड गेला होता. पश्‍चिम क्षितिजावर लाली असली, तरी आकाशाच्या पोकळीत अंधारून येऊ लागलं होतं. काही वेळानं अरण्य, डोंगर शिखरं हळूहळू त्यात गडप होणार होती. अशा वेळी सुमारगडावर असण्याचा आनंद काही वेगळाच होता. त्यावेळी आमच्याशिवाय त्या किल्ल्यावर दुसरं कोणीच नव्हतं. 

कातळटप्पा चढून गडावर आलं, की लगेचच एक पाण्याचं टाकं लागतं. तेव्हा त्यात बऱ्यापैकी पाणी असायचं. टाक्‍याला खोदून काढलेल्या भिंतीच्या आत आणखी गुहासदृश खोदकामं आहेत. त्यात अलीकडं कोण्या साधूबाबांनी देव स्थापलेत. टाक्‍या शेजारीच एक जुनी शंकराची पिंड आहे. अजून पूर्ण अंधार नव्हता. गवतात पाय खुपसत किल्ल्याच्या माथ्यावरून फिरू लागलो. आणखी काही पाण्याची टाकी, उद्‌्‌ध्वस्त बुरुजांचे अवशेष सोडले, तर गडावर फारसं काही नाही. गडावर येणाऱ्या काही उद्‌्‌ध्वस्त पायऱ्यांचे मातीत गाडलेले अवशेष काळजीपूर्वक पाहिले, तर आढळतात. आता याही पूर्व-उत्तरेच्या बाजूला शिडी लावलीये. वरच्या मातीत गाडलेल्या गुहा, पाण्याची टाकी मालदे परिसरातल्या दुर्गप्रेमींनी साफ केल्या आहेत. 

गार वाऱ्याच्या झुळुकी आता गडावर खेळू लागल्या होत्या. पुन्हा कातळटप्प्याच्या जवळच्या टाक्‍यापाशी येईपर्यंत अंधार पडला होता. गडावर मुक्काम करायचा झालाच, तर फक्त इथंच शक्‍य होतं. 

बरोबरचे सगळे सहकारी एकत्र जमलो आणि एका विचारानं मनाला भारून टाकलं, का नाही? आता रात्रीच्या अरण्यचालीनं महिपतगड पायथ्याचं वाडी बेलदार गाठायचं. त्या कल्पनेनं साऱ्यांचे डोळे लकाकले. रात्रीच्या अंधारात कातळ टप्पा उभा उतरून दरीचा अंदाज घेत पुन्हा दक्षिण खिंडीपाशी पोचायचं. मग अरण्यातून वाडी बेलदारला पोचायचं हे सोपं काम नव्हतं. मग हा नवा रोमांच अनुभवायचा या ऊर्मीनं जायचा निश्‍चय केला. 

कातळटप्पा चढणं सोपं पण उतरणं अवघड! त्यात रात्रीचा अंधार. पण सह्याद्रीत अशा अनेक बेलाग दुर्गम वाटा रात्री अपरात्री चढणं आणि उतरणं ही एक निश्‍चयात्मक अनुभूती असते आणि ती आज अनपेक्षित सामोरी आली होती. 

ठरलं, आता रात्रीच महिपतगडाची अरण्ययात्रा. अंधारातच कडा उतरून डावीकडच्या कातळकड्याचा आधार घेत अरुंद घसाऱ्याच्या वाटेनं अखेरीस दक्षिणेकडच्या खिंडीत पोचलो. इतकी वर्षं झाली तरीही या सुमारगडाची ही कातळ उतराई अजूनही अंगावर रोमांच उठविते. 

आता महिपतगडाचं अरण्यगान. पायाखालच्या पाल्यापाचोळ्याचाच काय तो आवाज आणि त्यात मिसळलेला आमचा लयबद्ध श्‍वास. रात्रीच्या निःशब्द अंधाराला भेदत ही आमची अरण्ययात्रा महिपतगडाच्या दिशेनं चालू लागली. एक वेगळीच अनुभूती. अंधारात मिसळून गेलेला सुमारगड केव्हाच मागं पडला होता. अरण्याशिवाय आजूबाजूला काहीच नव्हतं आणि अचानक दूरवरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला. एवढ्या वेळानंतर तुकाराम बोलला वाडी बेलदारातली कुत्री भुंकायला लागलीत. वाडी तर अजून नजरेच्या टप्प्यात येत नव्हती. पण इतक्‍या दूरवरून त्या कुत्र्यांना आमची चाहूल लागली होती. जेव्हा रात्री, पहाटे कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आला, की ओळखायचं मानवी वस्ती जवळ आली. आसपास कुठंतरी एखादी वाडीवस्ती असावी. 

 वाडी जसजशी जवळ येऊ लागली, तशी कुत्र्यांच्या भुंकण्याची लय वाढू लागली. आता वाडीतले दिवेही दिसू लागले. 

 जंगल संपलं. भात खाचरं, सपाटी, मोकळे चढ-उतार लागले. वाडीच्या अगदी नजीक आलो. इवल्याशा वाडीत सगळीकडं सामसूम. 

वाडीच्या अलीकडं एक बांधीव विहीर आहे. रहाटानं पाणी काढून स्वच्छ हातपाय धुतले. विहिरीच्या काठावरच जेवलो. मागच्या मिट्ट काळोखात हरवलेला सुमारगड शोधण्याचा उगीचच प्रयत्न केला. 

 गावाच्या माथ्यावरच्या हनुमान मंदिरात पथारी पसरली. दमलेल्या अंगानं डोळा लागला तरी सुमारगडाची अंधार उतराई आणि महिपत पायथ्यापर्यंतची अरण्ययात्रा डोळ्यासमोरून हलेना. 

पहाटेच्या गार वाऱ्यानं जाग आली. आता भल्या पहाटेच महिपतगड चढायचा होता. सूर्योदयाला महिपतगडावर पोचायलाच हवं होतं. सगळं आवरून बांधाबांध केली. सॅक देवळातच ठेवल्या, कारण परतीला वाडीत येणं भागच होतं. वाड्यावस्त्यांवरच्या माणसांकडं काहीही सोपवा ते जसं आहे तसं तुम्हाला परत मिळतं. सॅक यांच्या भरवशावर कुठंही ठेवा ती सुरक्षितच! त्यांचा विश्‍वासच दांडगा! 

बरोबर फक्त कॅमेरा, पाणी आणि खायचं घेतलं आणि त्या प्रसन्न पहाटे महिपतगडाच्या चढाईला लागलो. सूर्योदयापूर्वीची दुर्ग चढाई फारच आल्हाददायक असते. 

सूर्योदयाच्या आधीच गडावर पोचलो. प्रसन्न सकाळ. पूर्वेकडच्या सूर्योदयाचं अवर्णनीय सौंदर्य पहातंच रहावं असं. 

महिपतगडाचा माथा फारच विस्तृत. गडावर अलीकडं जीर्णोद्धारात केलेलं पारेश्‍वर महादेव मंदिर आणि त्याच्या समोरची अलीकडं पुन्हा नव्यानं बांधणी केलेली प्रशस्त विहीर हे महिपतगडाचं केंद्रस्थान. इथं राबता जास्त. गडावर झाडीही भरपूर आणि पठारही मोठं. गडावरच्या बांधकामासाठी तयार केलेल्या चुन्याचा राहिलेला भाग. मोठ्या घट्ट दगडासारखा झालेला आजही गडावर पाहायला मिळतो. 

मधुमकरंद-महिपत-सुमार परिसरात अंजनाची झाडं फार. फेब्रुवारी-मार्चमध्ये त्याच्या फांद्या-फांद्यांना लगडलेली पांढरी जांभळट फुलं हा निसर्गाचा एक सौंदर्य सोहळा असतो. महिपत माथ्याचा दीर्घ फेरफटका मारून गड उतरू लागलो. वाडी बेलदारात येऊन सॅक पाठीला लावल्या. गावकऱ्यांचा निरोप घेतला. कारण अजूनही किमान तीन तासांच्या चालीनं डोंगरवाटेनं वाडी जैतपूर गाठून खेडच्या रस्त्यापर्यंत पोचायचं होतं. 

महिपतगडाच्या माथ्यावरून आणि अजूनही उतरत्या डोंगरधारेनं वेगळा ओळखू येणारा रसाळगड, डोंगर आणि झाडीतून उंच उठावलेला कातळकड्याचा, माथ्याला बिलगून असलेल्या सड्याचा सुमारगड दिसत होता. 

ती दुर्गशिल्प अखंड डोळ्यात साठवत वाडी बेलदार सोडलं आणि वाडी जैतपूरच्या दिशेनं मार्गस्थ झालो. आता तर वाडी बेलदारपर्यंतही कच्ची सडक तयार झाली आहे. 

गेल्या तीन तपाहूनही अधिक काळच्या भटकंतीत वाड्यावस्त्यांचे, रस्त्यांचे असे बरेच बदल अनुभवले. एखादी मुक्कामी बस गडपायथ्यापासूनच्या लांबच्या वाडीपर्यंत घेऊन जायची तिथंपासून गडाच्या अर्ध्या चढणीपर्यंत वाहन जाऊ लागले. डाळ, तांदूळ मिसळून शिधा घेऊन जाण्याच्या अपरिहार्यतेपासून मोबाइलवर गडपायथ्याच्या वाडीत जेवणाची ऑर्डर देण्यापर्यंतचा बदल अनुभवला. चिल्लर गोळा करून दुर्ग भटकंतीचा प्रवासखर्च करण्यापासून ते फेसबुक, वॉट्‌सअॅपवर दुर्गमोहिमांची सशुल्क अॅड हाही बदल अनुभवला. देवळाच्या ओसरीवर झोपण्यापासून ते लाइटसह असणाऱ्या तंबूत आरामाचा बदलही पाहिला. कुणी न भेटणाऱ्या दुर्गांवर आता कॅंपींगही पाहातोय. पण या साऱ्यात आनंद इतकाच आहे की तरुण पिढी बहुसंख्येनं दुर्गभटंकतीकडं वळतीये. याचं एकच कारण सुविधा कितीही बदलल्या तरीही दुर्गांचा आत्मा तोच आहे आणि तसाच राहणार आहे. म्हणूनच दोन दशकांपूर्वीची रसाळ-सुमार-महिपत रात्रयात्रा पुन्हा नव्यानं तुम्हाला सांगावीशी वाटली.

संबंधित बातम्या