रायगड परिक्रमा

डॉ. अमर अडके, दुर्ग अभ्यासक
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

किल्ले भ्रमंती

बोलविती ही गिरिशिखरे
अन् साद घालती कडे कपारी
अरण्याचा श्‍वास आमचा 
गंध आमचा या मातीचा 
पुन्हा नवा हा निश्‍चय आमुचा
गडकोटांचा, या वाटांचा
दुर्गांच्या या वाटांवरले
जगणे अमुचे हे असले
जगणे अमुचे हे असले

उन्हाळा संपत आला, की सह्याद्री अधिक आवेगानं हाक मारायला सुरुवात करतो. पश्‍चिमेकडचं निळंभोर आकाश पांढरट, काळसर ढगांनी नटायला लागतं. कडक उन्हाची जागा गदगदून टाकणाऱ्या असह्य उकाड्यानं घेतलेली असते. वळवाचे चार-दोन शिकावेही पडून गेलेले असतात. कुठूनसा आलेला मातीचा गंध मनात मावत नसतो. वसंत सरला असला, तरी कुठं कुठं तजेलदार फुलं एकाकी उमलत असतात. सरत्या वैशाखात कळाकळा तापणाऱ्या उन्हात निष्पर्ण पठारावर ही फुलं कशी उमलतात कुणास ठाऊक! भर पठारावरच्या एखाद्या खड्ड्यात सारलेल्या पण जिरलेल्या पाण्याच्या ओलाव्यात गवताची हिरवी पाती दिसू लागतात. भर उन्हात त्यांना जीवन कसं कळतं कुणास ठाऊक.

पळस, पांगिरा रक्तवर्णी फुलून आता प्रौढ झालेले असतात. पर्णहीन पुष्पसंभाराची शाल्मली आता पानांसह बीजाकडं वळलेली असते. असा अवघा आसमंत नवनिर्मितीसाठी सज्ज झालेला असतो. अनपेक्षित दाटून आलेले ढग अवघा आसमंत कडाडून टाकत वेगानं भूमीकडं झेपावतात आणि क्षणभराच्या त्या पृथ्वीच्या शीतल सुगंधात तुमच्या मनालाही धुमारे फुटतात आणि मन ओढ घ्यायला लागतं डोंगरदऱ्यांकडं... तापणाऱ्या उन्हात असह्य उकाड्यात वळवाच्या सरीनं तुमचं मन डोंगरदऱ्यांकडं धावू लागलं, की समजायचं तुमच्यातला भटक्या अजून मुसमुसतोय. 

हे सगळं आठवायचं कारण म्हणजे बदलणाऱ्या प्रत्येक ऋतुगणिक नवा सह्याद्री नवी साद घालत असतो. 

मातीनं सारवलेल्या आमच्या सोप्यात मातीच्याच गिलाव्याच्या भिंतीवर शिवाजी महाराजांची एक तसबीर होती. ती केव्हापासून होती कुणास ठाऊक. त्याच्या खाली काही ओळी होत्या..

तव सामर्थ्याचा एक कण दे
तव धैर्याचा एक बिंदू दे
तव चारित्र्याचा एक अंश दे
तव कर्तृत्वाचा एक अंश दे
तव जीवनाचा एकच क्षण दे

लहानपणी मनावर ठसलेल्या या ओळी पुढच्या आयुष्यात मला अभावितपणे डोंगरदऱ्यांकडं घेऊन गेल्या. सरत्या उन्हाळ्यात वळवांच्या सरीसारख्या या ओळी माझ्या मनात आजही उतरतात आणि डोंगरदऱ्यांचे बेत पक्के होऊ लागतात. 

आज सकाळीच पाचाडहून मंगेशचा फोन आला, ‘सर रायगडाला केव्हा येताय?’ आणि मनात रायगड त्याच्या घेऱ्यासह उसळी घेऊ लागला. अनाहूतपणे मंगेशला निरोप गेला... ‘रायगड परिक्रमा!’

रायगड परिक्रमा गेली अनेक दशकं अनेक वेळा केली. अगदी भर पावसातसुद्धा. एखाद्या मंदिराच्या गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा घालताना जे भाव असतात, तेच प्रत्येक वेळी अनुभवले. तसाच सुगंध मनाला भिडतो. जणू शिवरायांच्या संजीवन अस्तित्वाला ते वंदन असतं. 

रायगड परिक्रमा खरं तर सरत्या उन्हाळ्यात पावसाच्या संधिकाळात करावी. वाटा मोकळ्या असतात. रान माजलेलं नसतं, पायतळी ओली माती, त्यावरची चिलटं आणि कीटक नसतात. भर पावसाळ्यात काही चढ-उतार निसरडे असतात, चार-दोन ठिकाणी पाण्याचे प्रवाह आडवे येतात. पावसाळ्यानंतर रान गच्च असतं. ओल्या मातीत कीटकांचं साम्राज्य असतं. पावसाळा आणि नंतरचा काही काळ जमिनीवरच्या आणि आकाशातल्या धुक्याच्या साम्राज्यामुळं रायगड आणि आसमंत त्या धुक्यात लपेटून गेलेला असतो. सरत्या उन्हाळ्यात मात्र हे सारं सह्यमंडळ त्याच्या सर्वांगीण सौंदर्यासह आपल्या समोर येतं, म्हणून ऊन आणि उकाडा असला, तरी यावेळी रायगड परिक्रमा करावी.

आणखी एक कारण आहे. पावसाळ्याच्या प्रवेशद्वारी भुरभुरत्या पावसात रायगडी एक मंगल सोहळा आकारत असतो... ‘शिवराज्याभिषेक’. तो एक भाव मनाला वेगळी उभारी देतो.

रायगडाच्या माथ्यावरून रायगड अनुभवणं हा आनंद सोहळा असतोच, पण परिक्रमेतला रायगड तितकाच रोमांचकारी असतो. परिक्रमेतला रायगड वेगळाच दिसतो. रायगड जसा चित दरवाजा-नाना दरवाजा ते महाद्वार मार्गे अनुभवावा, तसाच तो परिक्रमेतून, कोकणदिव्यावरून, लिंगाण्यावरूनही अनुभवावा. त्यातही भल्या पहाटे रायगड-वाडीच्या बाजूनं निघालो, की चंद्र आणि चांदण्यातला रायगड केवळ अनुपम.

परिक्रमेच्या ओढीनं मधले दिवस कसे सरले कळलंच नाही. आदल्या दिवशी रायगड पायथ्याशी मुक्काम केल्याशिवाय परिक्रमेची पूर्तता नाही. मुक्कामाच्या ओढीनं कोल्हापुराहून निघताना तसा अंमळ उशीरच झाला. रायगड पायथ्याशी पोचेपर्यंत रात्र होणार होती हे नक्की होतं. कलत्या दुपारी कोल्हापूर सोडलं आणि अगदी अनपेक्षित सूर्यास्तावेळी महाबळेश्‍वरात पोचलो. महाबळेश्‍वर ओलांडलं की जसे डोळे प्रतापगड शोधू लागतात, तशी मल नेहमी ओढ लागते ती मधुमकरंद गडाची. उत्तर पश्‍चिमेच्या बाजूचा मधुमकरंदचा डोंगर घाटमाथ्यावरून सूर्यास्तावेळी फारच अप्रतिम दिसतो.

घाट सुरू होऊन थोडं अंतर गेलो, की पावलं आपोआप रेंगाळतातच. डावीकडच्या मधुमकरंदापासून ते जुना रडतोंडी घाट, समोरचा प्रतापगड, उजवीकडं मढीमहाल अर्थात हल्लीचं आर्थरसीट आणि त्याही पलीकडं सह्याद्रीच्या उत्तुंग शिखरांमध्ये आणि दऱ्यांमध्ये सामावलेलं जावळीचं खोरं किती विलक्षण दिसतं, हे सूर्यास्ताला तिथं उभं राहिल्यावरच कळतं. सूर्यास्तानंतरच्या आंबेनळी आणि पारघाटाच्या वळणावळणाच्या प्रवासात या साऱ्या डोंगररांगा हळूहळू काळोखाच्या कुशीत विरून जातात आणि मग पोलादपुरात पोचल्यावर भानावर येणं होतं.

पोलादपुरात पोचेपर्यंत रात्र झाली होती. इथं एक विसावा नेहमीच असतो. कविंद्र परमानंदांच्या समाधीचं दर्शन. हे शिवरायांचे त्यांच्याच हयातीतले चरित्रकार. शिवभारत हे त्या ओवीबद्ध चरित्रग्रंथाचं नाव. त्यांची समाधी एसटी स्टँडच्या थेट मागील बाजूस आहे. उशीर झाला होता, तरी त्यांच्या समाधीचं दर्शन घेऊन महाडकडं मार्गस्थ झालो. रायगड पायथ्याशी पोचेपर्यंत जेवणाची वेळ टळून जाणार होती. महाडच्या अलीकडं एका वाडीत हनुमंताचं एक प्रशस्त मंदिर आहे. बऱ्याच वेळा पाठीवरचं जेवण तिथंच पोटात जातं हा अनुभव आहे. आजचंही जेवण तिथंच. जेवण आटोपून महाड ओलांडून समीप गेल्याशिवाय रायगडाचं मनसोक्त दर्शन दिवसाही होत नाही आणि आता तर रात्रच. रायगडाच्या घाटरस्त्याच्या चढाला लागलो आणि त्या अंधारातली एक एक शिखरं जणू उजळू लागली. पाचाडला पोचलो. काळाकभिन्न हिरकणी कडा त्याच्या माथ्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात तेवढंच दिसणारं ते गिरिशिखर, अंधारात भासणारी टकमकाची आकृती, प्रचंड काळ्या कड्यांच्या वरचं ताऱ्यांनी सजलेलं आकाश, यात रायगडाची एक आकृती समोर उभी राहते. उशिरा रात्री रायगड पायथ्याशी पोचलं, की असा दिसणारा रायगडही विलक्षण असतो. आता उर्वरित रात्र भल्या पहाटेपर्यंत रायगडाच्या पायथ्याच्या सुखनिद्रेत...

मोहिमेपूर्वीची रात्र तशी यथातथा झोपेचीच असते. रात्र आणि पहाटेचा संधिकाळ कधी येतो कळतच नाही. सगळ्या ऋतूत पहाटवारा गारच असतो. चांदण्या अजूनही आपल्यातच मशगूल होत्या. डोंगरदांडांवर, डोंगरमाथ्यांवर, डोंगरच्या कुशीत जेव्हा जेव्हा विसावलेलो असतो, तेव्हा तेव्हा पहाटेच्या संधिप्रकाशात या चांदण्या विरून जाताना अधिकच प्रकाशमान भासतात. अशा प्रकाशमान चांदण्यातच दुर्ग आणि डोंगर चढाईला सुरुवात करावी, म्हणजे थकवा कधीच येत नाही.

आज पाठीवर फारसं सामान नव्हतं. परिक्रमाही तशी फारशी अवघड नाही. अंतर म्हणावं तर सोळा ते सतरा किमीचं. खडे चढ कमी. अगदी प्रत्येक टप्पा समजून घेत गेलं, तरी पाच-सहा तास पुरेसे. ही परिक्रमा म्हणजे काही जंगलात धावण्याची शर्यत नव्हे. ही तर इतिहासाच्या सर्वोच्च आशयाला घातलेली कृतज्ञ प्रदक्षिणाच होय. आवश्‍यक तेवढं खाणं, पाणी आणि टिपणांची वही घेऊन मार्गस्थ झालो. 

प्रदक्षिणेची सुरुवात चित दरवाजाला साक्षी ठेऊनच होते. नाना दरवाजाची वाट उजव्या हातास ठेऊन थोडं अंतर रस्त्यानं जाऊन मग उजव्या बाजूच्या झाडीत पाऊलवाटेनं शिरायचं. इथून खऱ्या राजगड परिक्रमेला सुरुवात...

सुरुवातीला थोडी प्रशस्त आणि उघड्यावरची वाट आहे. खाली डाव्या हाताला रायगडवाडी असते. या मार्गावर एक धनगरवाडा आहे. रायगडावरच्या वर्दळीतही आपलं जगणं आणि अस्तित्व हे भूमिपुत्र टिकवून आहेत. टकमकावरून खाली पाहणाऱ्या रायगडावरून आलेल्या मंडळींना हे कळणारही नाही, की टकमकाच्या पायथ्याच्या झाडीत हे अस्सल जीवन शतकानुशतके तग धरून आहे. 

रायगड परिक्रमेत इतिहासाबरोबरच माणसाच्या जगण्याचे अस्सल तरंग अनुभवावयास मिळतात. रायगडाचे उत्तुंग कडे उजव्या हाताला ठेऊन रायगड परिक्रमेला सुरुवात केली, की डाव्या हाताला समोरच्या डोंगरातली वाघबिळं, उत्तरेकडचा कोकणदिवा आणि त्याच्या पायथ्याची कावल्या-बावल्याची खिंड वेगळीच भासते. दोन्हीकडच्या या दर्शनात चित दरवाजा, नाना दरवाजाची वाट, रायगडवाडी मागं टाकत आपण टकमकाच्या पायथ्याला पोचतो. रायगडवाडीच्या वरच्या अंगाचं कोळी आवार ओलांडलं, की रायगड पायथ्याच्या जंगलात आपण शिरतो. कड्याच्या थेट पायथ्याशी जाण्याकरता थोडं दक्षिणेकडं चालत जावं लागतं. मग पूर्वेकडं वळून आपण महाद्वाराच्या खळग्याच्या विरळ जंगलात चालत राहतो ते थेट टकमकाच्या पायथ्यापर्यंत. इथं डावीकडं खाली मोजक्या घरांची टकमकवाडी आहे. हे रायगडाचं रूपच वेगळं आहे. हा पायथ्याचा रायगड आणि वरच्या माणसांनी गजबजलेला रायगड, खरं तर दोन्ही मिळून परिपूर्ण रायगड होतो. त्यात रायगड घेराही समाविष्ट करायला हवा. टकमकच्या पुढच्या अंगाला झाडीत एका कच्च्या आडोशाखाली एक स्मारक आहे. ‘रायनाक स्मारक’ असं म्हणतात. याची एक दंतकथा पिढ्यानपिढ्या सांगितली जाते. १८१८ मध्ये हिंदुस्थानचा पर्यायानं स्वराज्याचा ताबा ब्रिटिशांनी घेतेवेळी स्वराज्याचे संरक्षकच नव्हे, अस्मिता असणारे दुर्ग ताब्यात घेऊन उद्‍ध्वस्त करण्याचा सपाटा इंग्रजांनी लावला होता. त्यात रायगड तर प्राधान्य क्रमावर होता. पण हा अभेद्य दुर्ग पडता पडेना. आजूबाजूच्या डोंगरांवरून तोफा डागल्या, तरी रायगडच पडेना. मग एका एतद्देशीय माणसानं पोटल्याच्या टोकावरून केल्या जाणाऱ्या तोफांच्या माऱ्याला एक युक्ती सांगितली. तोफेच्या गाडीच्या चाकाखाली तत्कालीन नाणं सरकवावं, म्हणजे तोफेच्या माऱ्याचा कोन बदलला जाईल. मग तो तोफेचा गोळा गडावरच्या बारा टाक्याच्या पुढं असणाऱ्या दारूगोळ्याच्या कोठारावर पडला, कोठाराचा भडका उडाला. ती आग अवघ्या रायगडभर पसरली. रायगड उद्‍ध्वस्त झाला. अर्थात ब्रिटिशांनी ताबा तर घेतलाच पण ही युक्ती सांगणाऱ्या रायनाकाला बक्षीस काय? तर स्वराष्ट्राशी द्रोह करण्याबद्दल कडेलोट. त्याचं हे स्मारक. ही दंतकथा खरी की खोटी कुणास ठाऊक? पण स्मारकाच्या निमित्तानं सांगितली जाते एवढं खरं, असो.

रायनाक स्मारक ओलांडून परिक्रमेचा मार्ग चालू लागलो, की एक मोजक्या घरांची आदिवासी वाडी लागते. तहान असो नसो इथल्या पाण्याची चवच वेगळी आहे. आदिवासी वाडीनंतर किंचित चढ लागतो. उजव्या हाताच्या रायगडच्या कड्याला वारंगीचा कडा म्हणतात. या वारंगीच्या कड्याची एक गंमत आहे. इथले भूमिपुत्र, रायगडचे जागते रक्षक सांगतात, आमचा मंगेश शेडगेही तेच सांगतो. तो त्यांचा समज आहे. खरा खोटा इतिहास जाणे.

संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मोघलांनी रायगडावर हल्ला केला. तेव्हा रायगडावरचं सुवर्ण सिंहासन झुल्फीकार खानाच्या ताब्यात जाऊ नये म्हणून रायगडानं अटोकाट प्रयत्न केला होता. हे सिंहासन मोगलांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी वारंगीच्या कड्यावरून जाड साखळीच्या साहाय्यानं गडाखाली उतरवण्याचा प्रयत्न केला, असं परिसरातले जुने जाणते सांगतात. तशा जाड साखळ्याही असल्याचं सांगितलं जातं. इतिहासातल्या अशा सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींमधल्या सत्यतेपेक्षा त्यातल्या भावना आणि अस्मिता मला भावतात. मंगेशला म्हटलं, ‘मला एकदा ती साखळी पाहायची आहे. बघू केव्हा घडतं ते!’ या वारंगीच्या कड्याचा गडावरचा भाग म्हणजे टकमकाच्या वरच्या अंगाच्या दारू कोठारापासून जगदीश्‍वराकडं जाऊ लागलं, की शिबंदीची घरटी ते कोळींब तलाव याच्या खालच्या अंगाचा बेलग कडा. या वारंगी कड्याच्या पायथ्याच्या दूर डावीकडं वारंगी गाव आहे. म्हणून कड्याचे नाव वारंगी.

यांच्यापुढं लागतो सातविणीच्या खळग्याचा पायथा. पुढं माडाच्या खळग्याचा पायथा. हे खळगे म्हणजे रायगडाच्या उत्तुंग कड्यांमधल्या अंतर्वक्र ओबडधोबड नाळी. यातून पावसाळ्यात रायगडावरच्या पठाराचं पाणी खाली झेपावतं. या खळग्यांच्या पायथ्यांच्या बेचक्यात थोडी जास्त झाडी ती उजव्या हाताला ठेऊनच परिक्रमेचा मार्ग आक्रमावा लागतो. इथून पुढं मात्र परिक्रमेतला थोडा कठीण भाग लागतो. भवानी कड्याच्या खालच्या अंगाची डोंगर सोंड चढून पुन्हा उतरावी लागते. ज्या खिंडीसारख्या चिंचोळ्या भागातून आपण रायगडच्या दक्षिण अंगाला उतरतो, त्याला ‘वाघोली खिंड’ म्हणतात. उजवीकडचा भवानी कडा या खिंडीतून ओलांडून आपण उतरू लागलो, की डावीकडं दूरवर पोटल्याची वाडी दिसते. 

वाघोलीची खिंड उतरून काही अंतर आपण चालत राहिलो, की भवानी कड्याची दक्षिण बाजू संपते. मग डावीकडं दिसतो तो ‘गुयरीचा डोंगर’ या गुयरीच्या डोंगराचा उत्तरेकडं म्हणजे रायगडाकडं येणारा जो फाटा आहे तो काळकाईचा डोंगर. त्याची उत्तर बाजू म्हणजे पोटल्याचा डोंगर आणि त्याचं रायगडाकडचं टोक म्हणजे पोटल्याचा कडा. मागे वर्णन केलेला रागयडावर मारा करणारा पोटल्याचा डोंगर हाच. आता रायगडाच्या दक्षिण बाजूची उत्तुंगता जाणवायला लागते. उजवीकडचा उंच कड्यात लक्ष वेधून घेतो तो ‘वाघ दरवाजा’ आणि त्याच्या अलीकडचा जलप्रपात. वाघ दरवाजाच्या खालच्या अंगाला जी डोंगरनाळ आहे. त्याला कोंडेखळीचा खळगा म्हणतात. या बाजूनं वाघ दरवाजाचं दृश्‍य शीतल वाटू लागतं. इथं रायगड पायथ्याच्या वाडी वस्त्यांतल्या बाया-बापड्यांची थोडी वर्दळ जाणवते. त्यांना माहिती असतं, की परिक्रमावाले इथपर्यंत पोचले की त्यांना ताकाची गरज असते. काळकाईची डोंगर आणि रागयड याच्यामधली किंचित चढाची काळकाईची खिंड चढून आलो, की रस्त्याची चाहूल लागले. इथं एका अज्ञात वीराची समाधी आणि वीरगळ लागते. ही जिवाजी लाडांची समाधी असं मानलं जातं.

या वीरगळीपासून पुढं गेलो, की उजवीकडं वळणारा रस्ता थेट हिरकणी वाडीकडं, रज्जू रथाकडं घेऊन जातो. पहाटे चांदण्यांच्या साक्षीनं सुरू केलेली रायगड परिक्रमा चित दरवाजापाशी माथ्यावरच्या सूर्याच्या साक्षीनं संपते. नकळत माथा चित दरवाजाच्या पायरीवर टेकवला जातो आणि अवघ्या रायगड त्याच्या सार्वकालिक प्रेरणेसह उरात सामावल्याचं समाधान मिळतं. पहाटेपासूनच्या एका स्वप्नमथी यात्रेतून भानावर येणं होतं आणि झपाटल्यासारखी पावले खूळलढा, महाद्वाराच्या दिशेनं पडू लागतात. राजसदरेचं आणि शिवसमाधीचं दर्शन घेण्यासाठी पावले रायगड चढताना आकाशात ढगांची जमवाजमव सुरू झालेली असते. समाधीचं दर्शन घेईपर्यंत चोहोबाजूंनी वारा उधाणलेला असतो. कुठूनसा मातीच गंध जाणवत असतो. जगदीश्‍वरातून परतीच्या वाटेवर टकमकाजवळच असताना अचानक वाऱ्याच्या वेगाबरोबरच टपोरे थेंब अंगावर पडू लागतात. होळीच्या माळावर येईपर्यंत चिंब भिजून गेलेला असतो. डावीकडे जगदीश्‍वर आणि समाधी, उजवीकडे नगारखाना आणि आतली राजसदर या साऱ्यांच्या साक्षीनं परिक्रमेची अशी सांगता होते. परतीच्या वाटेवर महाद्वारात पोचेपर्यंत सूर्य पुन्हा लख्ख चमकू लागलेला असतो. पुन्हा नव्या प्रकाशवाटांसाठी दुर्गवाटांसाठी...!

फोटो फीचर

संबंधित बातम्या