माचाळ ते प्रभानवल्ली 

डॉ. अमर अडके
सोमवार, 15 एप्रिल 2019

किल्ले भ्रमंती
 

उत्तरार्ध 
विशाळगडाच्या उत्तर अंगाला असणाऱ्या वाडीमाचाळच्या वरच्या अंगाला गावची परंपरा जपणारं एक मंदिर आहे. त्या प्रचंड पठाराचं ते श्रद्धास्थान आहे. त्या मंदिरात गेलो, तो मध्यभागीच्या लाकडी चौपाळ्याला अनेक फळं टांगली होती. फळं सुकली होती, पण कुजली नव्हती. मंदिराचा उल्लेख तसा भैरीभवानी असा करतात. त्या चौपाळ्याच्या गाभाऱ्यात डावीकडं एक तांदळा आहे, तो ब्राह्मणदेव होय. मग भैरीभवानी तिच्या दोन्ही बाजूला विठ्ठलाई आणि वाघजाई. मुख्य गाभाऱ्याच्या किंचित खाली घुमटीत उदगिरी आणि बाहेर दगडात कोरलेले वाघाचे शिल्प. वाडीवरल्या लोकांची ही अविचल श्रद्धास्थानं. वाडीतला तुकाराम सांगू लागला, ‘देवाचं जरा काही चुकलं किंवा कोण नीट वागला न्हाई... की वाघ गावात फिरलाच म्हणून समजा.’ तसं हे वाघाचं घरच. अधूनमधून तो दर्शन देतोच. त्याच्यापासून काही त्रास होऊ नये, म्हणून दगडी शिल्पाच्या रूपात त्याला देवत्व. वाघाची अशी अनेक शिल्पं मी हरिश्‍चंद्रापासून अनेक किल्ल्यांवर पाहिली आहेत. सगळीकडं श्रद्धा तीच, अशा मंदिरात काही वेळ बसलं, की किती शांत वाटतं; हे सांगता येणं अवघड आहे. 

थकलेल्या गात्रांनी उद्याचा बेत आखत झोपी गेलो. पहाटेच्या गार वाऱ्यानं जाग आली. अंधारच पण येणाऱ्या उजेडापूर्वीचा. लगबगीनं सारे तयार होऊ लागलो. कारण मुचकुंदी गुहेकडं जाऊन परत प्रभानवल्लीपर्यंत उतरायचं होतं. अंधार फिकट होऊ लागला होता. पूर्व उजळू लागली होती. त्या हिरव्या पिवळ्या पठारावरच्या वाडीलगतच्या भात खाचरांमधून मुचकुंदी गुहेकडं जाऊ लागलो. पायांना भिडणाऱ्या गवताच्या पात्यावरले दवबिंदू पायावर ठिबकू लागले. पठारावरची ती प्रभातयात्रा सूर्योदयासमीप मुचकुंदी गुहेपर्यंत येऊन पोचली. मुचकुंदी गुहेपासून सर्व दिशांना होणारं सह्याद्रीच्या रागांचं सौंदर्यशाली दर्शन केवळ अप्रतिम... 

विशाळगडाच्या डोंगरापासून ते मानोली सडा बावट्याच्या काठीचा सडा ते अगदी थेट उदगिरीपर्यंतचा सह्याद्री नजरेत मावत नव्हता. खरंतर मुचकुंदी नदीच्या उगमाचा हा परिसर एक नैसर्गिक गुहा मुचकुंदी ऋषींची गुहा म्हणून ओळखली जाते. श्रीकृष्ण आणि महाभारतातील राक्षस वधाचा संदर्भ या परिसराशी जोडणाऱ्या कथा परंपरेनं सांगितल्या जातात. गुहेच्या उत्तर-पश्‍चिमेच्या खोल दऱ्या आणि पूर्व दक्षिणेच्या डोंगररांगा केवळ अपूर्व. हा सोहळा अनुभवत प्रभानवल्लीच्या मुख्य उतराईसाठी वाडीत पोचलो आणि इथून सुरू झाला मोहिमेचा मुख्य अंक. 

माचाळहून प्रभानवल्लीत उतरणाऱ्या तशा दोन रानवाटा एक गच्च जंगलातली आणि तीव्र उताराची. दुसरी त्यामानानं कमी उताराची, विरळ जंगलातली, उघडी आणि वाढलेल्या गवतातली वाट. दोन्ही वाटांचे ऐतिहासिक संदर्भ धूसर. श्री संभाजीराजांची पावलं कोणती वाट उतरले असतील इतिहास जाणे. पण काही धूसर संदर्भांची मोट बांधत जंगल उताराच्या वाटेनं उतरायचा निर्णय घेतला आणि सुरू झाला भूगोलाच्या गर्भातल्या धूसर, पण प्रेरणादायी इतिहासाचा अरण्यप्रवास. 

उन्हं एव्हाना वर आली होती. वाडीची भातखाचरं मागं पडली. मग सुरू झालं, लांबलचक पठार. तेही पार केलं आणि डोंगररांगांच्या पोटात शिरलो. वाट मळलेली तर सोडाच, पण कित्येक काळ कोणी वावरलं असेल याच्या खुणाही नव्हत्या. तीव्र उतार, मग पाण्याचे ओहोळ, पुन्हा बगल, पुन्हा उतार असा हा प्रवास. दगडगोट्यांनी भरलेल्या पाण्याच्या एका वाळलेल्या प्रवाहापर्यंत पोचलो. एव्हाना साऱ्यांचीच दमछाक झाली होती. प्रवाहातून वर जंगलातल्याच, पण थोड्या सपाटीवर आलो. डावीकडं पाहतो तो विशाळगडाचा विशालकाय पर्वत एका वेगळ्याच बाजूनं सामोरा आला. 

डोंगररांग आणि दरीपलीकडं दिसणारं विशाळगडाच्या या बाजूचं देखणं रूप कधीच पाहिलं नव्हतं. विशाळगडावरच्या काही वास्तू अस्पष्ट दिसत होत्या. मलिक रेहान दर्ग्याचा घुमट आणि अलीकडील काळात बांधलेला विशाळगडावर जाण्यासाठीचा पूल स्पष्ट दिसत होता. हा विशाळगडाचा डोंगर चढउतारात सातत्यानं साथ देऊ लागला. एका उतारावर तर दर्ग्याची अजान स्पष्ट ऐकू येऊ लागली. उतार काही सोपा नव्हता. खाली टाकलेलं पाऊल जमिनीवर ठरत नव्हतं. जवळजवळ अडीच-तीन तास होऊन गेले, उतरतच होतो. स्थानिक वाटाड्यांना बोलतं करत होतो. वाटांचे काही संदर्भ क्षीणपणे जुळत होते. एका संदर्भानं कुतूहल जागं झालं. वाटेवर भट्टी नावाची वाडी आहे. इथून घाणीचा चुना विशाळगडावरच्या बांधकामासाठी वर जात होता. वाट मोडून पडली असली, तरी जागोजागच्या अशा खुणा हरवलेल्या वाटेचं अस्तित्व जाणवून देत होत्या. इतिहास मनामध्ये जागा करीत होत्या. अवघड उताराची उतरंड सुरूच होती. अखेरीस प्रभानवल्लीच्या वरच्या अंगाला पोचलो. डावीकडची विशाळगडाची प्रभानवल्लीकडची बाजू आता आकाशात घुसल्यासारखी वाटत होती. 

विशाळगडाच्या हनुमानटेकाच्या दरीतून खळाळणारं पाणी वेगवेगळ्या प्रवाहांनी पसरतं. कोकणातही जातं. अशाच विशाळगडाच्या पाण्याच्या प्रवाहावर ‘खोर निनको’ हे धरण प्रभानवल्लीच्या वरच्या अंगाला आहे. या पाण्याचंही नातं थेट विशाळगडाशी आहे.

उतरत्या दुपारी थकलेल्या अंगानं जंगमाच्या घरी पोचलो. कसे आलो, कुठून आलो याची चर्चा सुरू झाली आणि अचानक जंगल म्हणाला, ‘सर, तुम्ही आलेल्या वाटेनं दर तीन वर्षांनी माचाळहून पालखी नागवेकरांच्या दारात येते. हल्ली वाट तुटल्यामुळे कळवलीच्या बाजूनं येते.’ तो सहज बोलून गेला पण आमचे बाहू स्फुरण पावू लागले. पालखीचं येणं हे कदाचित धार्मिक परंपरा असेल, पण कधी काळीच्या राबत्या वाटेची ती साक्षीदार आहे. बस्सं एवढंच आम्हाला पुरेसं होतं. 

विशाळगडावरून श्री शिवशंभू कोणत्यातरी वाटेनं नक्‍कीच कोकणात उतरले असतील या श्रद्धेपोटी साऱ्या वाटा वेड्यासारखा फिरलो. कधी विशाळगडावरून माचाळ, मग मुचकुंदी गुहा ओलांडून उताराच्या वाटेनं तळकोकणात मुचकुंदी पार करून छत्रेवाडीमार्गे साखरपा. कधी याच मार्गानं थोड्या वरच्या अंगानं देवड्यात उतरलो. कधी माचाळहून केळवलीमार्गे तर कधी कोचरीमार्गे, कधी विशाळगडावरून अवघड उतार आणि पाण्याच्या वाटेनं प्रभानवल्लीत जायचा प्रयत्न केला. कधी हनुमानटोकाच्या बाजूनं कोकणात उतरायचा प्रयत्न केला. ‘खोरनिनको’ धरणाच्या पाणीसाठ्यानं काही वाटा आता बंद झाल्या. पण भर मे महिन्यात काही शोधायचा प्रयत्न केला. 

असा विशाळगडावरून अनेक वाटांनी कोकणात उतरलो, ते याच श्रद्धेवर की या साऱ्या वाटांच्या आसमंतातूनच कधीकाळी श्री शिवाजी महाराज आणि श्री संभाजीराजे उतरले असतील. यांच्या पावलांचा स्पर्श या मातीला झाला असेल. इतिहासाच्या भूगोलाचा संदर्भ शोधत सह्याद्रीच्या दऱ्या जंगलात असा अखंड फिरतो आहे आणि फिरत राहीन. निव्वळ दुर्गच नव्हे, त्या दुर्गांना जोडणाऱ्या अरण्यवाटा, डोंगरवाटा, घाटवाटा, या इतिहासाच्या प्रेरणेकडं नेणाऱ्या स्फूर्तीवाटा आहेत. गडकोटांच्या भटकंतीइतकंच या वाटांवरचं भटकणं हे शिवकालाच्या प्रेरणेचं अविभाज्य अंग आहे.
 

संबंधित बातम्या