भीमाशंकर-भोरगिरी प्रवास

डॉ. अमर अडके  
सोमवार, 27 मे 2019

किल्ले भ्रमंती
 

भीमाशंकर! बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक! पवित्र भीमा नदी येथेच उगम पावते आणि अनेक तीर्थक्षेत्रांचे तीर्थ होत अखेरीस कृष्णेला मिळते. सह्याद्रीच्या मस्तकावरचे भीमाशंकरचे स्थान, तिथले घनदाट जंगल, सरळसोट नागफणी सुळका, भीमकाय वदरगड, भीमाशंकर ते भोरगिरीपर्यंतचे शेकरूंनी चैतन्यमयी केलेले गर्द जंगल, त्या जंगलातला नवथर भीमेच्या काठचा प्रवास, ही सारी स्वप्नसृष्टी आहे... 

पण याही पलीकडे भीमाशंकरचे एक रौद्रसौंदर्य आहे. पश्‍चिमेकडच्या बेलाग आणि बुलंद कड्यांचे! सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातून हे उत्तान कातळकडे चढून भीमाशंकरला येणे हा रोमांचकारी अनुभव असतो. तो मी अनेक वेळेला, अनेक वाटांनी, अनेक आव्हानांनी घेतला आहे. 

भीमाशंकरच्या थेट पश्‍चिमेकडच्या पायथ्याला कोकणात खांडस नावाचे छोटेखानी गाव आहे. येथून सह्याद्रीचा उभा कडाच सुरू होतो. खांडसला पुणे-मुंबई मार्गावरील खोपोलीपासून कर्जतमार्गे अंदाजे चाळीस किलोमीटरचा प्रवास करून जाता येते. खांडस हे आमचे मुक्कामाचे, आसऱ्याचे तहान-भुकेचे ठाणे होय. खांडसपासून भीमाशंकरला सह्याद्रीतल्या अनेक आव्हानात्मक घाटवाटांनी जाता येते. गणेश घाट, वाजंत्री घाट, बैलघाट अशी त्यांची गोंडस नावे आहेत. प्रत्येक वाटेचा अनुभव वेगळा. आव्हान वेगळे. 

बरेच दिवस कर्जत ते भीमाशंकर मोहीम खुणावत होती. पण बेत काही जुळून येत नव्हता. कित्येकवेळा या मोहिमेची तयारी केली आणि दुसऱ्याच मोहिमा करून आलो. पण ही मोहीम तशीच राहून गेली. 

पावसाळ्यात एकदा मनाने उचल खाल्ली, पण बेत पुढे ढकलावा लागला. कारण शिडीच्या घाटवाटेनेच वर चढायचे हा निर्णय पक्का होता. ऐन पावसाळ्यातला धो धो पाऊस, शेवाळलेले दगड आणि शिड्यांची अवस्था म्हणून पावसाळा जाऊ द्यायचा आणि सारे काही वाळले, की मगच शिडीच्या वाटेने चढाई करायची असा बेत आखला. 

कड्याच्या पश्‍चिमेकडच्या अंगाने वर चढताना जरी शिड्यांचा आधार असला, तरी दोन शिड्यांच्या मधल्या भागातला कातळकडा चढणे हे पावसाळ्यात फारच धोक्‍याचे. कारण दगड शेवाळलेले आणि पश्‍चिमेकडे तुटलेले सरळसोट कडे. त्यातही दुसऱ्या शिडीकडून तिसऱ्या शिडीकडे जाताना कड्याला वळसा घालून शिडीच्या पायथ्याच्या बेचक्‍यात जावे लागते आणि या दोन्हीही शिड्यांच्या पोटातून पाणी खळाळत खाली कोसळत असते. या साऱ्या आव्हानांचा विचार करता निसर्गाला, त्या सह्याद्रीच्या रौद्रतेला सलाम करून सह्याद्रीच्या कड्यांनी सौम्य होऊन आवतण धाडले की जायचे असे ठरले. पाऊस संपून आसमंत सुकायची वाट पाहता-पाहता नोव्हेंबर महिना निम्मा सरला आणि अखेर भीमाशंकर आणि सह्याद्रीने निरोप पाठवला, ‘आता या गड्यांनो...’ 

मोहिमेची जुळवाजुळव सुरू झाली. तारखा नक्की झाल्या. माणसे निवडली. मोहिमेची आखणी झाली. हरिभाऊ वाटाड्याला निरोप गेला. पूर्वतयारीच्या बैठका झाल्या. 

.. आणि शनिवारच्या भल्या पहाटे आम्ही सारे सवंगडी कर्जत आणि पुढे खांडसच्या दिशेने निघालो. 

खांडस म्हणजे भीमाशंकरचा पश्‍चिम पायथा, सह्याद्रीच्या प्रचंड कड्याच्या पायाशी वसलेले चिमुकले गाव. इथूनच भीमाशंकरच्या बेलाग पहाडाचे छाती दडपून टाकणारे आव्हानात्मक दर्शन होते. इथे आमचा एक वाटाड्या आहे, हरिश्‍चंद्र त्याचे नाव. आपलेपणाने आम्ही त्याला ‘हरीभाऊ’ म्हणतो. हा नुसता वाटाड्या नाही, तो आमचा जंगलमित्र आहे; सोबती आहे किंबहुना कुटुंबातलाच एक आहे. 

पहिला विसावा याच्या घरी. हातपाय धुऊन, त्याच्या घरचा चहा पिऊन आम्ही ताजेतवाने झालो. आता मोहिमेला सुरुवात. पाणी-जेवण, आवश्‍यक साहित्य पिशवीत घालून, पिशवी पाठीवर लावली. सह्याद्रीच्या त्या उत्तुंग कड्याला मनोमन नमस्कार केला आणि भीमाशंकरच्या दिशेने चालू लागलो. खरे तर हरीभाऊंचे घर म्हणजे खांडसचे भीमाशंकरकडचे शेवटचेच घर. इथे गाव संपतेच. गाव ओलांडल्यावर मोठा ओढा लागला. त्या वरच्या पुलावरून पलीकडे गेले, की डाव्या आणि उजव्या बाजूला अशा दोन वाटा फुटतात. उजवीकडची वाट म्हणजे गणेशघाटाची वाट. तुलनेत सोपी, राबता असलेली, डावीकडची वाट म्हणजे थेट कड्याला भिडणारी, जंगलातली, उभ्या चढावाची अवघड अशी शिडीची वाट. या शिडीच्या वाटेनेच जायचे हा निश्‍चय म्हणूनच पावसाळा जाऊ दिला होता. कारण शिडीच्या वाटेने तीन ठिकाणी उभा कडा शिडीच्या आधारानेच चढावा लागतो. दोन शिड्यांमधील उभा कातळ चढावा लागतो. त्यातही दुसऱ्या आणि तिसऱ्या शिडीमधला कातळ अंगावर येणारा. डावीकडे वळसा घेऊन वर चढावा लागणारा. पावसाळ्यात कातळ शेवाळतात, निसरडे होतात. वरून जलप्रपात कोसळत असतात. तेव्हा शिडीच्या वाटेने चढाई जिकिरीची असते. म्हणून पावसाळा जाऊ दिला. आता आसमंत वाळला होता. शेवाळ सुकले होते. कातळ पायाला थारा देत होते म्हणून शिडीच्या वाटेनेच जायचे ठरले...

ओढा ओलांडून डावीकडे वळलो. शिडीच्या वाटेकडे रुळलेला रस्ता संपला. उजवीकडे भातखाचरांत शिरलो, कापणी झालेली भातखाचरे घट्ट झाली होती. हळूहळू कड्याकडे सरकू लागलो. गाव मागे पडले. भातखाचरे संपली. जंगल सुरू झाले. गर्द झाडांच्या सावलीतून जंगलामधली चढावाची पायवाट सुरू झाली. नागमोडी वळणे घेत ही वाट चढत चढत कड्याच्या दिशेने जाऊ लागलो. फुप्फुसांचे भाते फुलू लागले. घाम निथळू लागला. दमछाक करणारा चढ शिडीकडे घेऊन जाऊ लागला. सहकारी मागेपुढे होऊ लागले. तसे थंडीचे दिवस. गर्द झाडी, पण कोकणातला उष्मा, खडी चढाई, नाकी दम येऊ लागला. ‘थांबू नका’, ‘बसू नका’ असे हाकारे देत, उत्साह टिकवून ठेवत टप्प्याटप्प्याने वर चढू लागलो आणि अखेरीस कड्याला बिलगलेल्या पहिल्या शिडीचे दर्शन झाले. आत्ता कुठे पहिला टप्पा पार केला! आता या तीन शिड्या चढून, त्याच्या मधल्या कातळांवरून कसोशीने वर चढून, कड्याच्या खांद्यावरच्या जंगलात शिरायचे. शिड्या कमकुवत. वरच्या दोन शिड्यांना कसलाच आधार नाही. उजव्या हाताला प्रचंड कातळ भिंत आणि डाव्या हाताला खोल दरी, उभी चढाई, सावकाश आस्तेकदम प्रयत्नपूर्वक सारे वर चढलो. खाली दरीकडे पाहिले, कुठून कसे चढत आलो ते!

समोर मावळतीकडे पदरगड किल्ला उभा होता. खरे तर खांडसपासूनच महादेवाच्या पिंडीच्या आकाराच्या या पदरगडाचे विहंगम दर्शन होते. गड तसा दुर्गम. पहिले दोन टप्पे कष्टपूर्वक चढता येतात. पण तिसरा अति अवघड. पदरगड चढाईही एक स्वतंत्र मोहीमच होऊ शकते. परंतु, आज त्याचे प्रयोजन नव्हते. म्हणून नुसत्या दर्शनावरच समाधान मानले. खांडसहून पदरगड आकाशात उंच घुसलेला दिसत होता. हळूहळू त्याच्या उंचीशी स्पर्धा करणारा कडा चढू लागलो. तसतसा तो नजरेत मावू लागला. आता तर जवळजवळ त्याच्या उंचीएवढ्या उंचीवर पोचलो. सातत्याने होणारे त्याचे दर्शन फारच विलोभनीय होते. 

थोडे पाणी, अल्पस्वल्प विसावा घेऊन, शिडीच्या वरच्या अंगाच्या जंगलात शिरलो. परंतु, जंगल येण्यापूर्वी कड्याच्या कडेकडेने जाणारी वाट उन्हातूनच जाणारी होती. भर उन्हातला तो चढ संपवून एकदाचे कड्याच्या खांद्यावरच्या जंगलात शिरलो. गर्द झाडीतल्या चढावाच्या नागमोडी वाटेने चालत चालत जंगलातल्याच एका झोपड्यापाशी थांबलो. पदरवाडीचा एक गडी इथे ताक विकण्यासाठी घेऊन आला होता. दमलेल्या पर्वतारोहीला ते ताक म्हणजे जणू अमृतच! त्या ताकाच्या चवीचे वर्णन करणे शक्‍य नाही. याच्या किंचित पुढे गणेशघाटाकडून येणारी वाट आणि शिडीची वाट एकत्र येतात. इथून पुढचा बहुतेक मार्ग जंगलातून, टप्प्याटप्प्याने पण तीव्र चढाचा, काहीसा रुंद... असा चढतचढत भीमाशंकरच्या माथ्याकडे घेऊन जातो. हा मोहिमेतला तिसरा टप्पा. दमलेले सहकारी पुन्हा नव्या जोमाने चढाईला सिद्ध झाले. जंगल मागे मागे सरकू लागले. आता झाडीतून मधूनच उजव्या हाताला भीमाशंकरचा नागफणी सुळका, डाव्या हाताला पूर्वेकडचा लांबच लांब कडा, मधली दरी दिसू लागली आणि दूरवरच्या भीमाशंकरच्या घंटेचा घनगंभीर आवाजही येऊ लागला. आपसूकच पावलांची गती वाढली. जंगलाची सावली विरळ झाली. कारवीच्या गच्च रानातून पाऊलवाटेला लागलो. आता डाव्या हाताला भीमाशंकरचे बसस्थानक, तिथून खालच्या दरीकडे पाहणारे पर्यटक दिसू लागले. उजव्या हाताला उंचावर नागफणी सुळक्‍याकडे जाणारे पठार दिसू लागले. सहकाऱ्यांच्या मनात आनंद मावेना. घामेजलेल्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले आणि कलतीकडे निघालेल्या सूर्याच्या साक्षीने आम्ही सारेजण भीमाशंकरच्या पठारावर पोचलो. जवळजवळ साडेचार-पाच तास अखंड चढाई करून! डाव्या बाजूला वाजणारी भीमाशंकरची आसमंत निनादून टाकणारी घंटा, नागफणीच्या पठारावरचे कलतीकडचे ऊन, अंगाला झोंबणारा वारा... हा सारा अनुभवच मोठा विलक्षण होता. या वातावरणानेच एवढ्या चढाईचा थकवा कुठल्या कुठे पळाला. 

आता घाई होती नागफणीच्या सुळक्‍यावर जाण्याची. तिथल्या सूर्यास्ताचे साक्षीदार होण्याची. इथून नागफणी तसा काही अगदीच जवळ नव्हता. नाही म्हटले तरी अर्ध्या-पाऊण तासाची पायपीट आणि चढण होतीच. पण नागफणीवरून दिसणारा सूर्यास्त, तिथून खालच्या कोकणाचे दृश्‍य अत्यंत विलोभनीय असते. त्याचे दर्शन करणेच अवघड आहे. झपाट्याने नागफणीकडे निघालो. झाडी संपली, परत पठार, मग हनुमान तळे, मग पुन्हा दाट, झाडीतली चढण, परत पठाराची चढण आणि मग दोन बाजूला दोन उत्तुंग सुळके. उजवीकडचा नागफणी; पण त्याचे खरे रौद्र दर्शन होते डावीकडच्या सुळक्‍यावरून. वेड्यासारखे या सुळक्‍यावरून त्यावर, असे भटकलो. सुळक्‍याच्या खाली कड्याची प्रचंड भिंत, दरी, त्याही पलीकडचे कोकण. अविस्मरणीय दृश्‍य डोळ्यात मावेना. सूर्याचा गोळा हळूहळू लाल होऊ लागला. मोठा दिसू लागला. आकाशीचे रंग बदलू लागले. समोरचे निळे आकाश तांबड्या प्रकाशाने सजले. डोंगर गर्द होऊ लागले. दऱ्या काळोखात मिटू लागल्या. अनिमिष नेत्रांनी हा संध्याकाळचा समारंभ पाहू लागलो. सूर्य क्षितिजाआड गेला. आकाश काळे झाले. आजूबाजूचे डोंगर, दऱ्या या काळोखात हरवून गेल्या. खालच्या वाड्या-वस्त्यांमधील दिवे लुकलुकू लागले. मग भानावर आलो. पण तिथून उठवेचना. भटकंतीच्या अनुभवकथनाच्या आनंदात रंगून गेलो. 

आता मात्र उठायलाच हवे. काळोखातून पठाराची उतरण, मग जंगलवाट उतरायची आहे. किमान हनुमान तळ्यापर्यंत. सारेच उठलो, सावकाशीने उपलब्ध विजेऱ्यांच्या उजेडात परस्परांना सावरत हनुमान तळ्यापर्यंत आलो. जीव भांड्यात पडला. पुढे? आल्या वाटेने भीमाशंकराकडे निघालो. वाजणारी घंटा अधिकच गंभीर भासू लागली. उजेड आला, माणसे दिसली. मंदिराच्या पायऱ्या आल्या. भीमाशंकरच्या दर्शनाच्या ओढीने त्या पायऱ्या उतरू लागलो. मंदिरात पोचलो. घंटा, झांज, शंखांच्या निनादात भीमाशंकरची आरती सुरू होती. त्या मांगल्यात विरघळून गेलो. आरती संपली, शनीचीही आरती संपली. भीमाशंकरच्या पिंडीवर माथा टेकवला. याच्याच आशीर्वादाने तर खडा कडा चढून इथपर्यंत आलो. त्या भारलेल्या अवस्थेतच पावले मुक्कामाच्या दिशेने पायऱ्या चढू लागली.

पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि गार वाऱ्याच्या झुळुकीने पहाटे जागा झालो. सहकारीही जागे झाले. प्रातःकर्मे आवरून उगवत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने वळणावळणाच्या घाट रस्त्याने भीमाशंकरच्या पठारावर आलो. प्रसन्न सकाळी पुन्हा एकदा भीमाशंकरचे दर्शन घेऊन पुढच्या मोहिमेसाठी मार्गस्थ झालो. भीमाशंकर ते भोरगिरी ही ती मोहीम. खरेतर भीमाशंकरला येण्याचा हाच पूर्वापार मार्ग. घनदाट जंगलातून येणारा, बऱ्याच ठिकाणी दगडी फरसबंदीने बांधून काढलेला. या मार्गावर भीमा नदी प्रथम डावीकडे मग उजवीकडे, कधी दगडांच्या उतरंडीवरून उड्या मारत, कधी खोल घळीमधून वाहात, कधी उथळपणे खळखळाट करत, कधी निश्‍चल डोह होत, डावी-उजवीकडे वळणे घेत थेट भोरगिरीपर्यंत सोबत करते. भीमेचे आणि भीमाशंकरच्या जंगलाचे खऱ्या अर्थाने दर्शन घडवणारा हा अडीच-तीन तासांचा अरण्यप्रवास एक अविस्मरणीय अनुभव होऊन जातो. मग भातखाचरांच्या बांद्यावरून भीमेच्या प्रवाहाच्या साक्षीने भोरगिरीच्या पायथ्याशी असणाऱ्या छोट्या टुमदार गावात पोचलो. भोरगिरी हे या गावाचे नाव. गावाच्या शाळेसमोर एक प्राचीन शिवमंदिर आहे. कधी काळी उद्‌ध्वस्त केलेले. आता काही प्रमाणात जीर्णोद्धारीत. आजही प्राचीन कोरीव कामाचे अवशेष मंदिराच्या आसपास इतस्ततः विखुरलेले दिसतात. मंदिर थेट भीमेच्या काठावर. इथे क्षणभर विसावलो. समोर जणू काही सर्व बाजूंनी तासून गोलाई दिल्यासारखा भोरगिरी किल्ला उभा. 

दुर्गदर्शनाच्या ओढीने टळटळीत दुपार असूनही भोरगिरीच्या चढाला लागलो. प्राचीन लेणी आणि जुना दुर्ग यांचे मिश्रण म्हणजे भोरगिरी होय. उघड्या कातळांवरून हासाऱ्याच्या वाटेने डोंगराची अर्धी चढण चढून लेण्यांपाशी पोचलो. फारसे कोरीव काम नसलेली, ही हिंदू गुहा मंदिरे ओबडधोबड खांब पाण्याच्या टाक्‍यांनीयुक्त आहेत. ही लेणी म्हणजे भोरगिरीच्या प्राचीनत्वाचे साक्षीदारच. ही लेणीसुद्धा श्री शंकराचे स्थानच मानली जातात. कालौघात लेण्यांमध्ये अलीकडे काही देवतांची स्थापना केलेली आढळते. 

लेणी डावीकडे ठेवून डोंगराला वळसा घालून उद्‌ध्वस्त फरसबंद आणि पायऱ्यांच्या अवशेषाच्या अनुरोधाने किल्ल्याकडे चालू लागलो. माथ्यावर पोचल्यावर डावी-उजवीकडे तटबंदी दिसू लागली. तटबंदी उजव्या हाताला ठेवून अनगड पायऱ्यांवरून उद्‌ध्वस्त दरवाजातून गडाच्या मुख्य प्राकारात पोचलो. गडाच्या प्राकारात कारवीचे गच्च रान माजलेले. राबता फारसा नाही. किल्ल्याच्या इतिहासाविषयी तशी अनभिज्ञताच. किल्ला कसा पाहायचा हा प्रश्‍न. खालच्या वस्तीतील दोन चिमुरड्या मुली उत्साहाने मध्यावरच्या लेण्यांपासून आमच्याबरोबर होत्या. प्रथम आम्ही दुर्लक्ष केले. पण आता त्याच आमच्या वाटाड्या आणि मार्गदर्शक झाल्या. कारवीच्या गच्च रानातून कुठे फिरायचे आणि काय पाहायचे हा प्रश्‍न त्यांनी सोडविला. उत्तम बांधलेली पाण्याची खांबटाकी, अनेक वीरगळी, महादेवाच्या पिंडी, गणपती, शेष, देवी आदी मूर्ती, व्याल-शरभांची शिल्पे, किर्तीमुखे आणि उद्‌ध्वस्त बांधकामांच्या पायांचे चौथरे असे बरेचसे दाखवत त्या मुलींनी आख्खा गड लीलया फिरविला. भीमाशंकराहून येथपर्यंत आणलेला वाटाड्याही सारे पाहून चकित झाला. तोही हे प्रथमच पाहात होता. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांत असे कितीतरी प्राचीन अवशेष गतवैभवाची साक्ष देत जंगलांमध्ये विखरून पडले आहेत. असे अनपेक्षित ते गवसतात. 

एव्हाना भर दुपार झाली होती. भोरगिरी उतरून पुन्हा गावातल्या शंकराच्या मंदिरापाशी पोचलो. भीमेच्या थंडगार पाण्यात मनसोक्त डुंबलो. जवळ होती-नव्हती तेवढी खाण्याची शिदोरी संपवली. क्षणभर तिथेच आडवे झालो आणि कलत्या दुपारी पुन्हा एकदा भीमाशंकरच्या दिशेने दंडवत घालून परतीच्या प्रवासाला लागलो...   

संबंधित बातम्या