आध्यात्मिकतेचे वैभव : मुल्हेर

डॉ. अमर अडके  
सोमवार, 1 जुलै 2019

किल्ले भ्रमंती
 

खरेतर मुल्हेरला कितीतरी वेळेला गेलो. तिथे पंडित महाराजाचे एक ऐतिहासिक भक्तिपीठ आहे. अवघ्या पंचक्रोशीचे ते आध्यात्मिक अधिष्ठान आहे. तिथले पिठाधिपती रघुराज पंडित महाराज हे माझे सहाध्यायी. नाशिकमध्ये आम्ही वसतिगृहात एकत्र राहायचो. अगदी एकेरी संबोधनाची आमची ओळख. त्यांच्यामुळे मुल्हेर-मोरा-हरगड हे किल्ल्यांचे त्रिकूट हे आमचे खास आकर्षण बनले. मुख्य मुल्हेर आणि त्याचा सखा मोरा हे दुर्गस्थापत्याचे अजोड नमुने आहेत. याच्या बरोबरीने राकट हरगड उभा आहे.

मुल्हेरच्या मुख्य मठात तसे उशिराच पोचलो. उद्धव महाराज आणि काशीराज महाराज यांच्या आध्यात्मिक परंपरेचे सतराव्या शतकापासूनचे हे भक्तिपीठ. त्या आधी सटाण्यामध्ये ब्रिटिश कालखंडातील प्रशासक संत देवमामलेदारांच्या भक्तिपीठाचा आशीर्वाद घेतला होता. मुल्हेरचा मठ हे बागलाणाचे आध्यात्मिक वैभव. या संतपीठाचे दर्शन घेऊन मुल्हेरकडे मार्गस्थ झालो. तशी मुल्हेरच्या पायथ्यापर्यंतची चढाई त्या मानाने सोपी. तुटलेल्या अनगड पायऱ्या आणि उद्‌ध्वस्त दरवाजांमधून आपम मुल्हेर मोरा आणि हरगडाच्या पायथ्याशी पोचतो. तिन्ही किल्ल्यांच्या पायथ्याशी सोमेश्‍वर-रामेश्‍वर आणि एक मंदिर असे संकुल आणि सोमेश्‍वरासमोर पाण्याचे विस्तीर्ण खांबटाके असे प्राचीन मंदिर स्थापत्य विद्यमान आहे. इथूनच खरी मुल्हेर-मोऱ्याची चढाई सुरू होते. त्या मानाने गर्द जंगलातून चढाईचा पहिला टप्पा तसा सोपा; पण मुल्हेर-मोऱ्याच्या मधल्या खिंडीतली चढाई घसाऱ्याची आणि कठीण. भर दुपारी उभ्या कातळावरच्या मुल्हेर मोऱ्याची चढाई सुरू झाली. झाडीतला पहिला टप्पा संपला. मग खिंडीतली खडी चढाई. डाव्या बाजूला मोरा आणि उजव्या बाजूला मुल्हेरची कातळ भिंत आव्हान देत उभी. मुल्हेर-मोरा यांच्या मधल्या खिंडीत येईपर्यंत दोन्ही डोंगरांना जोडणारी अफाट तटभिंत समोर येईपर्यंत मुल्हेर आणि मोऱ्याच्या स्थापत्य वैभवाची सुतराम कल्पना येत नाही. चढाईच्या मधल्या खड्या कातळ टप्प्यावर आधाराला एक जाड लोखंडी तार आहे. मधली कातळ भिंत मुल्हेर आणि मोऱ्याला जोडते. त्याच्या पुढचा टप्पा प्रचंड दगडांच्या राशीतला. मग प्रचंड बुरुजापलीकडे डाव्या बाजूला मोरा किल्ल्याची चढाई. कातळात कोरून काढलेल्या पायऱ्या, उजवीकडे संरक्षक कातळकडा अशी स्वप्नवत चढाई आणि या चढाईत कातळातले एकामागून एक दरवाजे ओलांडणे यात मोऱ्याचे स्थापत्य सौंदर्य दडले आहे. त्यातला एक दरवाजा तर चौकटीतून नाही, तर चौकटीच्या वरून पार करावा लागतो... आणि मग अप्रतिम बांधणीचे शेवटचे दोन दरवाजे. बुरुजांनी संरक्षित हे दरवाजे ओलांडले, की सर्वोच्च माथ्यावरचा दरवाजा म्हणजे देखणे आकाश शिल्प. किल्ल्याच्या माथ्यावर अनेक पाण्याची टाकी आहेत. पण त्याहीपेक्षा या माथ्यावरून दिसणारी मुल्हेर आणि हरगडाची पठारे आणि सेलबारी-डोलबारीच्या डोंगररांगांचे विलोभनीय दर्शन हा दुर्गभटकंतीमधला अनुपम सोहळा असतो.

मुल्हेरवर जाण्यासाठी पुन्हा मोऱ्याचे कातळ सौंदर्य उतरून खिंडीत यावे लागते आणि परत सुरू होते मुल्हेरची अफलातून चढाई. उद्‌ध्वस्त दरवाजे, फरसबंदी अशी चढाई करत मुल्हेरचा माथा गाठणे हा प्राचीन स्थापत्यातल्या प्रवासाचा रोमांचकारी अनुभव असतो. कातळ भिंतीमधली गुहा आणि विहार रचना, खांबांची दालने हे मुल्हेरचे वैशिष्ट्य. मुल्हेरवरही दोन डोंगरकड्यांना जोडणाऱ्या तटभिंती आहेत. माथ्यावर अतिशय विस्तीर्ण अशी पाण्याची टाकी आणि कातळात कोरलेल्या हनुमंताच्या मूर्ती आहेत. मुल्हेरची कमी रुंदीची उंच काळतभिंत रौद्रसुंदर आहे. मुल्हेरच्या माथ्यावरून सूर्यास्त पाहणे ही निसर्गसौंदर्याची उधळण असते. सोमेश्‍वर मंदिरापासून मुल्हेर-मोऱ्याची चढाई करताना या डोंगरी किल्ल्यांच्या पोटात असे विस्मयकारक स्थापत्यवैभव दडलेले आहे याची कल्पनाच येत नाही. मुल्हेरच्या माथ्यावर सूर्यास्त होऊन गेला मग मुल्हेरचा प्रशस्त माथा ओलांडून त्या रोमांचकारी दुर्गमार्गाने अंधारवेळी पायथ्याशी सोमेश्‍वर मंदिरापर्यंत येणे ही अनुभूती शब्दातीत आहे. दमलेल्या अंगांनी काळोखातच पायथ्याच्या सोमेश्‍वराच्या प्रांगणात पोचलो. पोचताक्षणी मंडळींनी आपापल्या पथाऱ्या पसरायला सुरुवात केली. थकलेल्या गात्रांना कड्याला थडकून येणारा गार वारा झोंबू लागला. कितीही दमलेले असलो तरी दुर्गांवर रात्री लवकर झोप येत नाही. उलट दुर्गांच्या गप्पा रंगतात. मग चांदणे भरल्या आकाशाखाली सोमेश्‍वराच्या प्रांगणात फिरू लागली इतिहासाची पालखी. सुरत स्वारीच्या मार्गापासून ते साल्हेरच्या लढाईपर्यंत आणि हंबीरराव मोरोपंतांच्या युद्ध पराक्रमापासून ते सूर्याजी काकडे यांच्या हौतात्म्यापर्यंत साऱ्या बागलाणाचा इतिहास मुल्हेर-मोऱ्याच्या बेटक्‍यात घुमू लागला. ऐकता-ऐकता, बोलता-बोलताच सारे त्या डोंगराच्या कुशीत केव्हा विसावले हे कळलेच नाही.

मुल्हेर-मोरा पायथ्याचे मुघल स्थापत्य शैलीतले गणेश मंदिर, सोमेश्‍वर मंदिर, रामेश्‍वर मंदिर, प्राचीन आणि विस्तीर्ण खांबटाके, मुल्हेरचा तीन दरवाजांमधून जाणारा सुंदर कातळ स्थापत्याचा प्रवेशमार्ग, तितकीच देखणी मोरा किल्ल्यावर घेऊन जाणारी कोरीव कातळवाट, त्यातली कातळ द्वारे, वरची पाण्याची प्राचीन टाकी, दोन्ही किल्ल्यांच्या माथ्यावरून दिसणाऱ्या बागलाणातल्या डोंगररांगा अशी मुल्हेर मोऱ्याची भटकंती अवर्णनीय आहे.

पक्ष्यांच्या किलबिलाटाने पहाटेची चाहूल लागली. आज हरगडावर जायचे. मी उठल्याची चाहूल लागताच एकेक उठू लागला. आमचे काही मावळे आधीच उठून तयारीला लागले होते. सगळे आवरूनच निघायचे होते. कारण खाली उतरून पुन्हा घसाऱ्याने हरगड चढून परतीला मधल्या खिंडीपर्यंत येऊन थेट मुल्हेरच्या मठातच उतरायचे होते. मुल्हेर माचीपासून हरगड पायथ्यापर्यंतची वाट तशी बरी, झाडीतली पण पायथ्यापर्यंतच्या सपाटीची वाट काटेरी रानमोडीने गिळंकृत केलेली. सगळी वाट काटेरी खुज्या झुडुपांनी व्यापलेली. त्यातूनच हरगडाचा दगडगोट्यांचा चढ सुरू होतो. शेवटच्या खिंडीचा चढ उभा पण सकाळ असल्यामुळे फारसे श्रम जाणवले नाहीत. हरगडाचा माथा तसा विस्तीर्ण. दुर्ग म्हणून अवशेष थोडकेच. नाही म्हणायला दक्षिणेच्या बाजूला एक द्वार, थोडी तटबंदी आणि एक चोरवाट. पठाराच्या मध्यावर हनुमंताची उघड्यावरची मूर्ती. पण हरगडाच्या माथ्यावर एक बावीस फूट लांब मोठी बांगडी तोफ आहे. हेच काय ते दुर्गमाथ्याचे वैशिष्ट्य. हरगडाच्या माथ्यावरून मात्र मुल्हेर-मोरा आणि मधल्या खिंडीचे दृश्‍य अप्रतिम दिसते. हरगडाचा विस्तीर्ण माथा चोहोबाजूंनी फिरताना बागलाणातल्या डोंगररांगा आणि भूमीपठारे यांचे कलाकाराच्या कुंचल्याने रेखाटल्यासारखे सुंदर चित्रमय दर्शन होते. 

एव्हाना सूर्य चांगला वर आला होता. हरगड उतरून मठात भोजन करून साल्हेरसाठी प्रस्थान ठेवायचे होते. आजचा मुक्काम साल्हेर. तो सारखा खुणावत होता. त्याचा जोडीदार सालोटा तोही बोलवत होता. उद्धव महाराजांचा आणि मठाचा आशीर्वाद घेऊन हळहळत्या उन्हात साल्हेर सालोट्याच्या ओढीने त्या उत्तुंग दुर्गाकडे आम्ही मार्गस्थ झालो.

संबंधित बातम्या