सायबरबुलिंग कसे रोखाल?

नीलांबरी जोशी 
सोमवार, 20 मे 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

(इंटरनेटवरच्या किंवा स्मार्टफोनवरच्या कोणत्याही डिजिटल संवादात कोणत्याही प्रकारचा केलेला छळ म्हणजे सायबरबुलिंग. याच्या प्रकारांबद्दल पहिल्या भागात आपण माहिती करून घेतली.) 
- उत्तरार्ध

सायबरबुलिंग करणारे आणि त्याला बळी पडणारे यात त्या व्यक्तींचं व्यक्तिमत्त्व महत्त्वाचं ठरतं. उदाहरणार्थ, सायबरबुलिंगला बळी पडणाऱ्यांचा सोशल इंटेलिजन्स जास्त असतो. ते समाजात आणि ऑनलाइन आपली वैयक्तिक माहिती खुलेपणानं देतात. तसंच त्यांची प्रवृत्ती नैराश्‍य, चिंता आणि आत्महत्या यांकडं झुकणारी असते. त्यांचा स्वतःबद्दलचा अभिमान कमी असतो. सायबरबुलिंगला बळी न पडणाऱ्यांच्या तुलनेत त्यांची सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर मित्रयादी कमी असते. मात्र ही वैशिष्ट्यं असलेले सर्वजण सायबरबुलिंगला बळी पडतात असं नाही. 

सायबरबुलिंग करणाऱ्यांमध्ये समवेदना जाणवण्याची प्रवृत्ती खूप कमी असते. त्यांच्यात विचारक्षमता कमी असते. ते आत्मकेंद्रित असतात. त्यांनाही नैराश्‍य, चिंता आणि स्वतःबद्दलचा अभिमान कमी असतो. त्यांची मित्रयादी मात्र तुलनेनं जास्त असते. ते ऑनलाइन खूप जास्त वेळ घालवतात. ते सायबरबुलिंग न करणाऱ्यांच्या तुलनेत दारू आणि ड्रग्जच्या व्यसनात जास्त प्रमाणात अडकलेले असतात. सायबरबुलिंग करणारे सहसा कायदेही अनेकदा तोडतात. वास्तव आयुष्यात शारीरिक पातळीवर मारहाणही जास्त प्रमाणात करतात. त्यांना बुलिंग करणं अनैतिक वाटत नाही. आपण ज्याला छळतो त्याच्यावर झालेल्या परिणामांची तीव्रता त्यांना जाणवत नाही. पालकांबरोबर नातेसंबंध दुरावलेले आणि भावनिक पातळीवर पालकांची मदत नसलेले सायबरबुलिंग करण्याकडं झुकतात. 

सायबरबुलिंग करणारे आणि त्याला बळी पडणारे या दोघांमध्ये काही गोष्टी समानही असतात. त्यांना शाळा आवडत नसते. त्यामुळं शाळेतलं गैरहजेरीचं प्रमाण जास्त असतं. याचा परिणाम म्हणून त्यांचा शाळेतला परफॉर्मन्स तुलनेनं खालावलेला असतो. त्यांना मुळात अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं जमत नसतं. त्यांना मित्र, पालक आणि शाळेचं वातावरण यातून आपल्याला काही मिळतंय असं वाटत नाही. शाळेतलं वातावरण ज्यांना आवडतं ते फारसे सायबरबुलिंगच्या फंदात पडत नाहीत आणि त्याला फारसे बळीही पडत नाहीत, असं संशोधकांचं म्हणणं आहे. 

सायबरबुलिंग मुळात कोणालाही का करावंसं वाटतं याबाबत मानसोपचारतज्ज्ञ आणि इंटरनेट सुरक्षा व्यवस्थेतले तज्ज्ञ सतत अभ्यास करत असतात. यासाठी केलेल्या सर्वेक्षणांमधून अनेकदा मित्रमैत्रिणींवरचा राग, हेवेदावे किंवा मत्सर यातून निर्माण झालेली सूडभावना आणि एकूणच वैताग, यातून सायबरबुलिंग केलं जातं. यातूनच ‘त्यानं मला मागच्यावर्षी कमी मार्क मिळाले म्हणून छळलं होतं, आता तो गणितात नापास झाला तर मी सगळ्यांना त्याबद्दल इमेल पाठवून वचपा काढला,’ असे संवाद ऐकू येतात. अशा वेळेला आपण केलं ते चूक होतं असं छळ करणाऱ्याला वाटत नाही. कंटाळा आला म्हणून सहज गंमत, हेही कारण सायबरबुलिंगमागं असतं. आजकाल टीनएजर्सच्या हातात वेळ आणि भरपूर गॅजेट्‌स उपलब्ध असतात. मग ‘आपण केलेल्या अशा कॉमेंट्‌स वाचणाऱ्यांना मजा येते, तशा अर्थाचे प्रतिसाद मिळतात’ हे कारणही सांगितलं जातं. आत्मविश्‍वासाचा मुळातच अभाव असलेल्या मुलांना आपण धीट किंवा स्मार्ट भासावं असं आतून वाटत असतं. त्यासाठी आपल्याकडं लक्ष केंद्रित व्हावं, या इच्छेनं ते सायबरबुलिंग करतात. आपण सायबरबुलिंगसारखं सनसनाटी काहीतरी केलं, तर आवडलेल्या गटात आपल्याला सामील करून घेतलं जाईल असं मुलांना वाटतं. 

सायबरबुलिंगचे मुलांच्या मनावर भयानक परिणाम होतात. त्याचं उदाहरण म्हणून, खेळापासून चित्रकलेपर्यंत अनेक गोष्टींत रस असलेल्या तनिष्काची ही केस पुरेशी बोलकी आहे. हसऱ्या आणि प्रसन्न असलेल्या तनिष्काला नववीत असताना एकदम कशातच रस वाटेनासा झाला. तिच्या गटातल्या एका मैत्रिणीनं तनिष्काचा हेवा वाटून तिच्याबद्दल अश्‍लील स्वरूपाचे मेसेजेस गटातल्या सगळ्यांना पाठवले होते. त्यानंतर खेळ, चित्रं, अभ्यास सगळंच तनिष्कानं थांबवलं. ती एकटी आणि निराश राहायला लागली. पुढच्या वर्षात तनिष्कानं मित्रमैत्रिणी बदलले. तिच्या आधीच्या मित्रमैत्रिणींपेक्षा त्या गटातले सर्वजण जास्त आक्रमक होते. ते सगळे वर्गातल्या इतरांना त्रास द्यायचे, तेव्हा ती त्यांच्यात सामील व्हायची. पण तो आपला मार्ग नाही हे लवकरच तिच्या लक्षात आलं. मग तिनं तो गट सोडला. पण त्यामुळं त्याच गटाकडून तिला टोमणे मारणाऱ्या इमेल्स सुरू झाल्या. तनिष्का नंतर शाळेत जाणंच टाळायला लागली. मधेच एक दिवस ती घरीच परतली नाही. पालकांनी पोलिसांकडं तक्रार केल्यावर ती रेल्वे स्टेशनवर सापडली. पालकांनी तिला मानसोपचारतज्ज्ञांकडं नेल्यावर त्यांनी नैराश्‍याचं निदान केलं. आपल्याबाबत शाळेत काय घडलं ते तनिष्कानं एका समुपदेशकाला सांगितलं. अनेक दिवसांच्या थेरपीनंतर तिला बरं वाटलं. 

कोणतीही कॉमेंट लहान मुलांवर कोणीही (पालक/शिक्षक/मित्र) प्रत्यक्षात समोरासमोर केली, तरी त्याचे त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतातच. पण सायबरबुलिंगमध्ये मात्र समोरची व्यक्ती अनोळखी असू शकते. एकदा अशा प्रकारे लावलेलं लेबल इंटरनेटच्या जमान्यात क्षणार्धात सर्वदूर पसरू शकतं आणि तिथं ते कायमचं राहातं. सायबरबुलिंगमध्ये ज्यांचा छळ होतो त्यांना भयानक मानहानीला तोंड द्यावं लागतं. त्यांचा आत्मविश्‍वास पराकोटीचा खालावल्यानं त्यांना घरातही सुरक्षित वाटत नाही. कीबोर्डावरचं एक बटण दाबून आपल्याबद्दल काहीतरी घाणेरडं हजारो लोकांपर्यंत पोचेल या भीतीतून त्यांना बाहेर पडताच येत नाही. मुख्य म्हणजे अनोळखी नावानं आलेल्या या कॉमेंट्‌सवर ॲक्‍शन घेता येतेच असं नाही. आपलं इंटरनेट/स्मार्टफोन वापरणं पालक बंद करतील या भीतीनं मुलंही असे प्रकार घरी सहज सांगत नाहीत. 

सायबरबुलिंग करणारे खोटं प्रोफाइल घेऊन सुरुवातीला अगदी प्रेमळपणे समोरच्या मुलाशी/मुलीशी बोलल्याचा आव आणतात. पण नंतर दिवसेंदिवस त्यांच्या मेसेजेसची भाषा जास्त आक्रमक, धमकावणारी होत जाते. सायबरबुलिंग सुरू झाल्यावर साधारणपणे पहिल्या टप्प्यात आपल्याबद्दल काय पसरवलं गेलंय, त्यातून आपल्या प्रतिमेला किती हानी पोचणार आहे, त्यात काही धमकी किंवा आव्हान आहे का हे मुलं आजमावतात. नंतरच्या टप्प्यात याला तोंड कसं द्यायचं, कोणाची मदत घ्यायची का याचा विचार करतात. 

त्यानंतर मात्र नैराश्‍य, आत्मविश्‍वास खालावणं, चिंताग्रस्तता, एकाकीपणा, शाळेतली गैरहजेरी, शाळेतला परफॉर्मन्स खालावणं, दारू किंवा ड्रग्जचं व्यसन लागणं असे परिणाम दिसतात. सायबरबुलिंगमुळं मुलं तणावग्रस्त होतात. त्यांचे डोळे अचानक भरून येणं असेही परिणाम दिसतात. एखादा मुलगा स्मार्टफोन तपासल्यानंतर किंवा ऑनलाइन असल्यानंतर एकदम रागावला किंवा अचानक घाबरला, तर त्याचं कारण सायबरबुलिंग हे असू शकतं. या मुलांना मानसिक ताणामुळं आधी नसलेली शारीरिक दुखणी सुरू होऊ शकतात. उदाहरणार्थ, शाळेत जायच्या वेळी पोटात दुखणं किंवा उलट्या होणं असे प्रकार सुरू होतात. 

सर्वांत भयंकर परिणाम म्हणजे, तनिष्काला सावरायला वेळ आणि पालक/समुपदेशक यांची मदत मिळाली; तशी सायबरबुलिंग सहन करणाऱ्या सगळ्यांना मिळतेच असं नाही. ‘बुलिसाइड’ म्हणजे आपल्याबद्दल पसरवलेली एखादी अफवा किंवा ताशेरे खोटे आहेत असं सांगायला सायबरबुलिंग झालेल्या व्यक्तीला वेळच मिळत नाही. त्याच्या आतच त्याच्याबद्दलचा मेसेज/फोटो/व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोचतो. त्यामुळं अनेकदा टीनएजर्स घाबरून आत्महत्या करतात. मात्र केवळ सायबरबुलिंगमुळं ती आत्महत्या केली जाते; की त्याला व्यक्तीचा स्वभाव, आर्थिक परिस्थिती अशी इतर कारणंही पूरक ठरतात याबाबत तज्ज्ञांचं एकमत नाही. 

याचं कारण म्हणजे दोन व्यक्तींना सारख्या प्रकारे सायबरबुलिंग झालं तरी त्यांच्या प्रवृत्तीनुसार त्यांच्यावर वेगवेगळे परिणाम होऊ शकतात. व्यक्ती आणि परिस्थिती यावर परिणामांची तीव्रता अवलंबून असते. ज्यांना बुलिंगची सवय असेल, त्यांना सायबरबुलिंगची भीती कमी वाटत असेल असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात त्यांना सायबरबुलिंगची जास्त भीती वाटते. सायबरबुलिंगच्या प्रकारांवरही परिणामांची तीव्रता अवलंबून असते. उदाहरणार्थ, बऱ्याचदा मेसेजपेक्षा फोटो/व्हिडिओज अनेकजणांपर्यंत पोचतील याची भीती मुलांना जास्त वाटते. 

सायबरबुलिंगची भीती मुलांइतकीच मोठ्यांनाही सतावत असते. त्यामुळं इंटरनेट सुरक्षा या विषयावर जगभरात जितके लोक काम करतात त्यांना सायबरबुलिंग ही भवितव्यात भेडसावणारी समस्या वाटते. 

यावर उपाययोजना म्हणून सरकारनं कायदे करावेत याबद्दल मात्र तज्ज्ञांमध्ये मतभेद आढळतात. अशा कायद्यांमुळं अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरच गदा येईल असं काहीजणांना वाटतं. तसंच इंटरनेटचं महाजाल पाहता कायदे केले तरी हे प्रकार थांबतील का याबाबत अनेकजण साशंक आहेत. त्यापेक्षा सायबरबुलिंगबाबत शिक्षण आणि जागृती करावी, असं अनेकजण मानतात. अर्थातच हे पुरेसं नसल्यामुळं तसे कठोर कायदे करावेत अशा मताचीही अनेक माणसं समाजात आहेत. 

सायबरबुलिंगला आळा घालण्यासाठी काही उपाययोजना सुचवल्या जातात. ज्या मुलांना सायबरबुलिंगला तोंड द्यावं लागलं असेल त्याच्याशी उत्तम संवाद साधणं हा पहिला उपाय आहे. सायबरबुलिंग म्हणजे काय? त्याच्या/तिच्या माहितीत कोणाला असा त्रास होतो आहे का? असं झालं तर मुलांनी काय करायला हवं असं तुला वाटतं अशा प्रकारचे प्रश्‍न विचारून संवादाला सुरुवात करता येईल. त्यातून आपलं मूल या प्रकारात कुठं आहे ते लक्षात येईल. 

दुसरा उपाय म्हणजे, आधुनिक काळात मुलांचे काही आदर्श असतात. त्यांना ते फॉलो करतात. गायक, खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री असं कोणीतरी त्यांचा आदर्श असतं. त्यांच्यापैकी कोणी जर आपल्या सायबरबुलिंगच्या समस्येबद्दल किंवा ते का करू नये याबद्दल बोललं असेल तर त्याचा वापर मुलांशी बोलताना करावा. 

तिसरं म्हणजे मुलांचा फोन काढून घेणं हा उपाय योग्य ठरत नाही. त्याऐवजी मुलं सोशल मीडियावर काय काय करतात त्याचं निरीक्षण पालकांनी करायला हवं. ते कोणाशी, काय बोलतात याची कल्पना आईवडिलांना हवी. पण मुलांना लुडबूड वाटल्यानं त्यांच्याबरोबर संवादच संपला, असं यातून होणार नाही याची दक्षता पालकांनी घ्यायलाच हवी. 

भोवतालचे पालक आणि तरुण यांच्या मदतीनं एखादा स्वमदत गट स्थापन करता येईल. या समस्यांविषयी त्यांच्याबरोबर चर्चा करून मार्ग शोधता येतील. सायबरबुलिंगचा रिपोर्ट कसा करायचा अशा गोष्टी या गटाद्वारे जाणून घेता येईल. मुलांच्या शाळेतल्या शिक्षकांना याची कल्पना देऊन त्यांचं सहकार्य आणि सहभाग मिळवणं महत्त्वाचं असतं. 

सायबरबुलिंगवर उपाय करताना मुलांचा खालावलेला आत्मविश्‍वास वाढवणं आणि त्यांच्या मनातली भीती कमी करणं हे साध्य करण्यासाठी घाईत काहीतरी उपाय करण्यापेक्षा शांतपणे परिस्थिती हाताळता यायला हवी. यासाठी जे काय घडलं असेल त्याबद्दलचे पुरावे गोळा करून संबंधित व्यक्तींशी बोलणं हाही एक उपाय आहे. थोडक्‍यात, सायबरबुलिंग हा प्रकार कोणालाच आवडत नाही. पण त्याविरोधात प्रत्येकानं काहीतरी केल्याशिवाय तो थांबणार नाही हेही खरंच..!

संबंधित बातम्या