वेबमालिका आणि हिंसा

नीलांबरी जोशी 
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

उंच उंच इमारती.. त्यातल्या वरच्या मजल्यावरून अचानक काहीतरी खाली फेकलं जातं.. ते काहीतरी खाली पडलेलं प्रेक्षकांना दिसतं. ते असतं रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं कुत्र्याचं पिल्लू. ते भयानक दृश्य पाहून शाळेत जाणाऱ्या मुली जोरात किंचाळतात. पुढच्याच दृश्यात रक्तानं माखलेली एक स्त्री जमिनीवरून फरफटत असते. तिच्यामागं एक पुरुष बंदूक रोखून तिच्यावर गोळी झाडतो. ‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सवरच्या बहुचर्चित वेबमालिकेतलं हे सुरुवातीचं दृश्य..! जे आता अनेकांना परिचित आहे. 

‘लव्ह पर स्क्वेअर फूट’ हा नेटफ्लिक्सवर सादर झालेला पहिला भारतीय चित्रपट होता. त्यानंतर ‘सेक्रेड गेम्स-१’ ही भारतीय वेबमालिका २०१८ च्या जुलैमध्ये १९१ देशांमध्ये एकाचवेळी प्रक्षेपित झाली. २० पेक्षा जास्त भाषांमध्ये सबटायटल्स असलेली ही मालिका पाहणाऱ्या एकूण लोकांपैकी ७५ टक्के लोक भारताबाहेरचे होते. नुकताच म्हणजे १५ ऑगस्ट २०१९ ला या वेबमालिकेचा दुसरा सीझन नेटफ्लिक्सवर आला. तेव्हा ‘सेक्रेड गेम्स’चे जगभरातले चाहते या दुसऱ्या सीझनची अत्यंत आतुरतेनं वाट पाहात होते. 

मनोरंजन या मूळ हेतूशी अत्यंत प्रामाणिक राहून निर्माण केलेल्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबमालिकेचे दोन्ही सीझन्स विक्रम चंद्रा यांच्या २००६ च्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहेत. या पुस्तकाला या मालिकेपेक्षा चांगला न्याय दुसरं कोणीच देऊ शकलं नसतं असं अनेकजणांचं मत आहे. ९०० पानांच्या या प्रदीर्घ कादंबरीत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शहरांमधली विशेषतः महानगरांमधली बदलती सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थिती आणि वेगानं वाढणारी गुन्हेगारी सतत समोर येते. कथानकाच्या अनुषंगानं मुंबईतल्या माफियांपासून ते आंतरराष्ट्रीय दहशतवादापर्यंत लेखक आपल्याला फिरवून आणतो. 

या पुस्तकात आणि मालिकेत सुरुवातीलाच सरताज सिंग या पोलिस इन्स्पेक्टरला एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा मागोवा घेत असताना मुंबईत होऊ घातलेल्या बॉंबस्फोटाची माहिती देणारा एक फोन येतो. तो फोन शहरातला कुविख्यात गुंड गणेश गायतोंडे यानं केलेला असतो. गणेश गायतोंडेचं अनन्वित छळानं गांजलेलं बालपण, त्यातून त्याचं महत्त्वाकांक्षीपणे गुन्हेगारीकडं वळणं, त्याचे निरनिराळ्या स्त्रियांबरोबर येणारे संबंध, मधेच येणारी अनेक चित्रविचित्र उपकथानकं हे या मालिकेत एका बाजूला घडत असतं. दुसरीकडं सरताज या बॉम्बस्फोटांच्या रहस्याचा आणि त्यातून घडत असलेल्या गुन्ह्यांचा अंजली माथुर या गुप्तहेर महिलेच्या साहाय्यानं शोध घेत असतो. 

सरताज आणि गायतोंडे या दोघांच्या कथानकांबरोबरच असंख्य उपकथानकांमधून बॉलिवूड, उद्योजक, पोलिस खातं आणि या सगळ्यामागचं एक गुन्हेगारी जग ‘सेक्रेड गेम्स’मधून प्रेक्षकांसमोर येत राहातं. सरताज सिंगचं काम केलेला सैफ अली खान, गायतोंडेचं काम केलेला नवाजुद्दिन सिद्दिकी आणि अंजलीचं काम केलेली राधिका आपटे या सगळ्यांच्या अभिनयालाही या मालिकेमुळं प्रेक्षकांची दाद मिळाली. माफियांची मेहबूबा असलेल्या मुंबईतल्या अंडरवर्ल्डवर अनेक चित्रपट निघाले आहेत. पण आजही तो विषय लोकांना किती भुरळ घालतो ते ‘सेक्रेड गेम्स’च्या यशामुळं दिसून आलं. 

‘सेक्रेड गेम्स’चा भलामोठा प्रेक्षकवर्ग म्हणजे आजची तरुणाई. त्याच त्या टीव्ही मालिका पाहून कंटाळलेल्या तरुणाईनं या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. त्यामुळंच या मालिकेबद्दल सोशल मीडियावरचं स्टेटस आणि ट्विट्स यांची संख्याही अफाट आहे. 

असं असलं, तरी ‘सेक्रेड गेम्स’ ही इअरप्लग्ज घालून पाहावी, असा एक इशारा दिला जातो. यातल्या व्यक्तिरेखांच्या तोंडी दर वाक्यागणिक असणाऱ्या गलिच्छ शिव्या सगळ्या कुटुंबीयांबरोबर बसून ऐकणं केवळ अशक्य आहे. पण कुटुंबानं एकत्रितपणे ही मालिका पाहणं हे केवळ त्या शिव्यांमुळंच अशक्य आहे असं नाही, तर यातली अत्यंत बटबटीत हिंसा आणि लैंगिकता हादेखील अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे. 

‘सेक्रेड गेम्स’मध्ये समोर येणाऱ्या प्रत्येक दृश्यात थेटपणे किंवा सूचकपणे मानसिक किंवा शारीरिक भयावह हिंसा दिसते. उदाहरणार्थ, बेछूट गोळीबार करून या मालिकेत एखादी व्यक्ती मरण पावल्यानं त्यातला हल्ला पूर्ण होत नाही. त्याच्यावरून परत एक ट्रक जावा लागतो. या वेबमालिकेत गायतोंडेची महत्त्वाकांक्षा वाढते, त्याबरोबरच मरणारी माणसं वाढत जातात. रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं कुत्रं अशी सुरुवात असणाऱ्या मालिकेतल्या सगळ्याच व्यक्तिरेखा एक दिवस स्वतःच रक्ताच्या थारोळ्यात सापडतील असं प्रेक्षकांना ही मालिका पाहताना सतत वाटत राहतं. 

कदाचित यामुळंच महाराष्ट्रात नागपूरच्या हायकोर्टानं ‘अशा वेबमालिकांमधली गलिच्छ भाषा, हिंसक दृश्यं आणि पोर्नोग्राफिक दृश्यं यामुळं भारतीय संस्कृती आणि नीतिमत्तेवर आघात होतो’ असा दावा केला आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार इत्यादी इंटरनेटवरच्या खासगी चॅनेल्सवरच्या निषिद्ध भाषा वापरणाऱ्या, विविध प्रकारची हिंसा दाखवणाऱ्या आणि उघड लैंगिकता दाखवणाऱ्या मालिकांच्या विरोधात माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं योग्य ती पावलं उचलावीत अशी याचिकाही त्यांनी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाकडं दाखल केली आहे. 

पण मुळात भारतात वेबमालिका पाहून तरुणांमध्ये हिंसात्मक आणि आक्रमक प्रवृत्ती वाढतात का? यावर काही मानसशास्त्रज्ञांनी संशोधन केलं आहे. भारतातली मुलं रोज ६ ते ८ तास वेबमालिका पाहतात. पदवी प्राप्त होईपर्यंत सर्वसाधारणपणे टीनएजर्सनी वर्गात घालवलेल्या वेळापेक्षा जास्त वेळ वेबमालिका पाहण्यात घालवलेला असतो, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे. या संशोधकांच्या मते, आज इंटरनेट आणि स्मार्टफोन यांचं तरुणांमध्ये वाढलेलं व्यसन ही चिंतेची बाब झाली आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार, युट्यूब अशा माध्यमांना तरुणाई खिळलेली दिसते. वेबमालिकांमधून जगभरातल्या गोष्टी मुलांपर्यंत पोचतात. नवनवीन संकल्पना त्यांना समजतात. नवीन समाजाचं आणि संस्कृतीचं दर्शन होतं हे खरं आहे. तरुण मुलं यातून नकारात्मक गोष्टीच जास्त प्रमाणात शिकतात. शाळा-कॉलेजमधला अभ्यास, ऑफिसमधली किंवा घरातली कामं, कुटुंब, मित्रमैत्रिणी यांच्यासाठी कोणाकडंच वेळ उरत नाही. जेव्हा पाहावं तेव्हा सगळेजण मोबाईल, लॅपटॉप, टॅब उघडून सगळेजण वेबमालिका पाहात असतात. त्यातल्या त्यात गुन्हेगारीविषयक मालिका भारतात लोकप्रिय आहेत. या मालिका पाहण्यात सर्वजण वेळ घालवतात, एवढ्यापुरतेच त्यांचे दुष्परिणाम मर्यादित नाहीत, तर त्यातून कल्पना घेऊन गुन्हे कसे करावेत हेही लोक शिकत असतात. 

अशा विषयांवर १८ ते ३० या वयादरम्यानच्या १०० तरुण/तरुणींना एक प्रश्नावली देऊन वेबमालिकांबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी पहिला प्रश्न म्हणजे, ते रोज किती वेळ वेबमालिका पाहतात. या प्रश्नाच्या उत्तरात ५० टक्के तरुण रोज ४ तासांपेक्षा जास्त वेळ वेबमालिका पाहतात असं लक्षात आलं. १० टक्के तर रोज ७ ते १० तास वेबमालिका पाहात असतात. 

वेबमालिकांमधलं तुम्हाला काय आकर्षित करतं हा या पुढचा प्रश्न होता. त्यावर ७० टक्के जणांनी त्यातल्या आक्रमकता, शिव्या असलेली मुजोर भाषा, अश्लील विनोद आणि हिंसा आवडते हे उत्तर दिलं. २० टक्के जणांना त्या वेबमालिकेमधल्या उंची राहणीमानाचं आकर्षण होतं. तर ५ टक्के जणांना जातीयवाद समोर आलेला आवडत होता. या मालिकेतली धूम्रपान, दारूपान आणि लैंगिक जवळिकीची दृश्यं या तरुणांपैकी ८० टक्के जणांना आवडत होती. अशा दृश्यांच्या विरोधात त्यापैकी फक्त १० टक्के जण होते.

या वेबमालिकांमधल्या उघड लैंगिकतेमुळं मुलांना असंच वागणं बरोबर आहे असा संदेश मिळत जातो. वेबमालिकांमध्ये विवाहित जोडप्यांनी एकत्र येण्यापेक्षा अविवाहित लोकांनी एकत्र आलेलं दाखवण्याचं प्रमाण २४ पट जास्त आहे. पण त्याचबरोबर यातून होणारे लैंगिक विकार किंवा नको असलेला गर्भ/गर्भपात दाखवण्याचं प्रमाण जवळपास शून्य आहे. अशा प्रकारच्या सेक्समधले धोके त्यामुळं तरुणांसमोर सहजी येत नाहीत. 

या वेबमालिकांमुळं अभ्यास, काम आणि कुटुंबीय यांच्याकडं दुर्लक्ष होतं का? या प्रश्नाचं होकारार्थी उत्तर जवळपास ८० टक्के जणांनी दिलं होतं. याच मुलांचं ट्रीप्सना जाणं, मैदानी खेळ खेळणं आणि छापील पुस्तकं वाचणं जवळपास संपलं होतं. तसंच यातल्या ६० टक्के जणांना निद्रानाश, नैराश्‍य, डोळ्यांचे विकार आणि लठ्ठपणा सतावत होता. ९० टक्के मुलांना वेबमालिकांमुळं आपल्यावर मानसिक परिणाम होतात याची खात्री होती. 

मुख्य म्हणजे वेबमालिकांतल्या हिंसेमुळं तरुणाईमध्ये आक्रमकता वाढते आहे का? या प्रश्नाचं उत्तर १०० टक्के जणांनी होकारार्थी दिलं होतं. आपली भाषा आणि वागणूक त्यामुळं बदलते असं या सगळ्यांचं म्हणणं होतं. एकूणच समाजात गुन्हेगार खूप आहेत असं यातल्या ७० टक्के जणांना वाटायला लागलं होतं. 

वेबमालिकांमधली हिंसा आणि तरुणांचं हिंसक वागणं यांचं एकमेकांत नातं आहे, हे या सर्वेक्षणावरून सिद्ध होतं. तरुण वयात मित्रांबरोबर खेळणं, वाचन, गृहपाठ अशा सर्व गोष्टी टाळून वेबमालिका पाहण्यामुळं तरुणाईची शारीरिक आणि मानसिक हानी होतेच. पण समाजात वावरण्याचं कौशल्य जवळपास संपतं. वेबमालिकेत जे काही दाखवलं जातं ते आचरणात आणण्याचं मुलांना आकर्षण वाटायला लागतं. उदाहरणार्थ, तंबाखू आणि दारू यांच्या जाहिराती या वेबमालिकांमध्ये थेटच दिसतात. तरुणाई त्याप्रमाणं वागायचा प्रयत्न करते. त्यातून दारू किंवा धूम्रपान यांचं व्यसन लागू शकतं. अर्थात सगळा दोष तरुणाईचा नाही. स्वतंत्र बेडरुम्स, प्रत्येकाला असलेलं वाय-फायचं कनेक्शन आणि पालकांना मुलांसाठी नसलेला वेळ ही यामागची तीन महत्त्वाची कारणंही लक्षात घ्यायला हवीत. 

खरं तर टीव्ही, चित्रपट अशा दृश्यमाध्यमांमुळं तरुणांमधली हिंसा वाढत चालली आहे का, हा प्रश्न गेली ५० वर्षं चर्चेत आहेच. त्यासाठी गुन्हेगारी, त्याबाबतचे कायदे, नीतिमत्तेच्या संस्कृतीनुसार बदलणाऱ्या कल्पना समाजशास्त्र, मानसशास्त्र अशा सर्व दृष्टिकोनांमधून मानवात निर्माण झालेली हिंसेची उत्पत्ती हा विषय समजून घ्यायला हवा. 

साधारणपणे या प्रश्नाकडं ‘नेचर की नर्चर’ अशा दोन प्रकारे पाहिलं जातं. या प्रश्नावर ज्या पुरुषांच्या एक्स गुणसूत्रामध्ये अॅलील हा जीन असतो आणि ज्यांना टीनएजमध्ये दुर्लक्षित किंवा उपेक्षित जिणं जगावं लागतं त्यांच्यात समाजविघातक प्रवृत्ती वाढतात, असं एक संशोधन सांगतं. माणसाची वर्तणूक ही जन्माला आल्यानंतर विकसित होते. त्यामुळं हिंसा ही जन्मजात असू शकत नाही असं ‘अमेरिकन सॉयकॉलॉजिकल असोसिएशन’सारख्या अनेक संस्था मान्य करतात. हिंसात्मक घटना जास्त प्रमाणात पाहिल्या किंवा अनुभवल्या, तर मुलं जास्त आक्रमक किंवा हिंसक होतात, असं लर्नेड बिहेविअर ही थिअरी सांगते. ‘सेक्रेड गेम्स’मधल्या गणेश गायतोंडेचा लहानपणी झालेला छळ आणि त्यातून त्याचं नंतर हिंसक वागणं यांचा असा संबंध लावता येईल. 

हिंसेमुळं घडलेल्या अशा गोष्टींचं विश्लेषण करताना ‘हिंसेमुळं काहीतरी चांगलं घडलं असा भास निर्माण होऊ शकतो, पण ते चांगलं तात्कालिक असतं आणि हिंसेनं केलेला विनाश मात्र कायमस्वरूपी असतो. त्यामुळं माझा हिंसेला विरोध आहे,’ हे महात्मा गांधी यांचं म्हणणं हिंसेबाबतचं सार्वकालिक सत्य आहे हेच लक्षात येतं.

संबंधित बातम्या