व्यसनातून मुक्तता 

नीलांबरी जोशी 
सोमवार, 23 डिसेंबर 2019

माध्यमं आणि मानसशास्त्र
 

आठ महिन्यांची गर्भवती असलेली ३४ वर्षांची एक अमेरिकन महिला. तिच्या मनगटातून खूप कळा आल्याच्या त्रासानं रुग्णालयात दाखल झाली. तिला असा त्रास पूर्वी झालेला नव्हता आणि ती घरात शारीरिक कष्टाची कामं करत नव्हती. पण ख्रिसमसच्या दिवशी तिनं सुमारे सहा तास एक जड मोबाईल फोन हातात धरून ख्रिसमसच्या शुभेच्छा लोकांना दिल्या होत्या, असं तिच्या आजाराचं निदान झालं. वैद्यकीय भाषेत या आजाराला एक भलंमोठं नाव आहे. पण त्याचं टोपणनाव आहे ‘व्हॉटसअॅपायटिस’! ‘लॅन्सेट’ या मासिकात या महिलेबद्दल छापून आलं होतं. 

अर्थात भारतीयही यात मागं नाहीत. २४ फेब्रुवारी २०१४ रोजी सुषमा गोस्वामी या २४ वर्षांच्या तरुणीला फेसबुक वापरायची सवय लागली. त्या सवयीचं व्यसनात रूपांतर झालं. ती सतत कॉंप्युटरसमोर बसून फेसबुक वापरत होती. तिच्या भावालाही तीच सवय लागली. रोजची कामं बहिणभावंडं करत नाहीत म्हणून त्यांचे पालकांशी खटके उडायला सुरुवात झाली. एक दिवस जरा जास्तच वादावादी झाल्यावर सुषमानं दार लावून घेतलं आणि छतावरच्या पंख्याला लटकून आत्महत्या केली. डॅनी ब्राऊन हा १९ वर्षांचा मुलगा आयफोनवरून दिवसाला १० तास घालवून २०० सेल्फी काढायचा. आपले काही सेल्फी चांगले आले नाहीत या कारणानं त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारे २१ व्या शतकात आपलं आयुष्य समाजमाध्यमांनी अनपेक्षितपणे मुळापासून बदलवून आणि हादरवून टाकलं आहे. 

मुळात समाजमाध्यमं वापरणं ही गोष्ट चूक नाही. मित्रांबरोबर जोडलं जाण्यासाठी, विरंगुळा म्हणून थोडा वेळ समाजमाध्यमं वापरणारे अनेक लोक आहेत. पण या सवयीचं व्यसनात रूपांतर होणं सर्रास झालं आहे. ‘फेसबुकवरचे लाइक्स हे नवीन प्रकारचं धूम्रपान झालं आहे’ असं त्यामुळंच म्हटलं जातं. फेसबुकचंच उदाहरण घेतलं, तर आज जगातले ३५० कोटी लोक फेसबुक वापरतात. दिवसाला कमीतकमी ५० मिनिटं ते फेसबुकवर घालवतात असं मार्क झकरबर्गनंच मान्य केलं आहे. दिवसभरात लोक वाचनासाठी सरासरी फक्त १९ मिनिटं आणि व्यायामासाठी सरासरी १७ मिनिटं देतात हा विचार केला, तर फेसबुकसाठी ५० मिनिटं हा आकडा किती मोठा आहे ते लक्षात येईल. 

या व्यसनाचे तुम्ही बळी आहात का? तुम्हाला सोशल मीडियाचं व्यसन लागलं आहे का? यासाठी स्वत:च काही गोष्टी तपासायला हव्यात. एक म्हणजे तुम्ही उठल्या उठल्या प्रथम फेसबुक चेक करता आणि तुमचं समाजमाध्यमांवरचं स्टेटस अपडेट करता का? आपण झोपलो होतो त्या वेळात समाजमाध्यमांवरचं खूप काही आपण गमावलं असं ज्यांना वाटतं ते सकाळी भराभर स्क्रोल करून इतरांनी काय काय पोस्ट केलंय ते तपासतात. अनेकजण गुड मॉर्निंगच्या मेसेजेसपासून, आज कोणाची जयंती/पुण्यतिथी आहे, त्या व्यक्तीची माहिती, नातेवाइकांबद्दलची निरर्थक माहिती, अर्थहीन व्हिडिओज.. असं एकामागून एक तपासत सुटतात. क्षणिक मनोरंजन पुरवणाऱ्या त्या गोष्टी आयुष्यात काहीही उपयोगाच्या नसतात. तुम्ही असं करता का? 

जिथं जाल तिथला फोटो, जिथं काहीही खाल त्या खाद्यपदार्थाबरोबर सेल्फी, ज्या कोणाला भेटाल त्यांच्याबरोबरचा फोटो काढून समाजमाध्यमांवर टाकणारी एखादी व्यक्ती तुम्हाला माहिती आहे का? तुम्हीही तसंच वागता का? सुटीवर गेल्यावर एखाद्यावेळी तुम्ही किंवा कोणीही फोटो काढणं समजण्यासारखं आहे. पण जर सततच तुम्ही ते करत असाल तर काही तरी चुकतं आहे. 

तुम्ही तुमच्या फोनवर सतत नोटिफिकेशन्स तपासता का? ही नोटिफिकेशन्स बहुधा समाजमाध्यमांवरून आलेली असतात. ती फार महत्त्वाची नसतात हे उघड आहे. काहीजणांना तर फोनवर नोटिफिकेशन्सचा आवाज जरी आला नाही तरी तो आल्यासारखा वाटून ते सतत फोन तपासतात. तुम्हीही तसंच वागता का? तुम्हाला किती लाइक्स मिळाले, कितीजणांनी पोस्टवर कॉमेंट्स टाकल्या हे तुम्ही सतत तपासता का? ते लाइक्स मिळाल्यानंतर मेंदूला तरतरी येऊन तुम्हाला छान वाटतं का? त्यापैकी तुम्ही एक आहात का? तसंच तुम्ही मित्रांना प्रत्यक्ष भेटण्याऐवजी फक्त समाजमाध्यमांद्वारेच भेटता का? त्यांना मेसेज करणं किंवा फोन करणंही तुम्हाला जमत नाही असं होतं का? इंटरनेट कनेक्शन नसेल तर तुम्ही अस्वस्थ होता का? तुम्हाला जगापासून तुटल्यासारखं वाटतं का? इंटरनेट जरी काही तासांसाठी गेलं तरी काहीजणांना जिथं इंटरनेट असेल तिथं कधी पोचू असं वाटायला लागतं. अशा प्रकारे समाजमाध्यमं म्हणजे तुमचं आयुष्य झालं आहे का? त्यांच्याशिवाय जगण्याची तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही का? या प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असतील आणि इतर कोणत्याच गोष्टींमध्ये तुमचं मन रमत नसेल, तर समाजमाध्यमांचं व्यसन लागलं असेल अशी दाट शक्यता आहे. 

या व्यसनावर काही उपाय आहेत का? याचं उत्तर नक्कीच ‘हो’ असं आहे. तंत्रज्ञानाशिवाय जगणं हा उपाय होऊ शकणार नाही हेही तितकंच खरं. पण त्यावर डिजिटल उपकरणं आणि समाजमाध्यमं कमीत कमी वापरणं हा उपाय होऊ शकतो. तसंच आपण ऑनलाइन असताना स्क्रीनवर घालवला जाणारा वेळ उपयुक्त पद्धतीनं कसा घालवता येईल याचा विचार करून निर्णय घ्यायला हवेत. ते निर्णय अांमलात आणायला हवेत. 

मुळात हे व्यसन तुम्हाला लागावं यासाठी समाजमाध्यमं आणि ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या हजारो कंपन्या कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तुमचं ‘लक्ष’ हेच त्या कंपन्यांचं नफा कमवण्याचं साधन आहे. त्यामुळं तुमच्या आवडींनिवडींनुसार तुमच्यासमोर सतत आकर्षक पोस्ट्स, बातम्या, फोटोग्राफ्स, व्हिडिओज, सवलतीच्या दरातल्या वस्तू दाखवणं त्या कंपन्या इमानेइतबारे करत असताना त्याला न भुलणं हा या व्यसनमुक्तीमागचा संघर्ष आहे. 

जर हे व्यसन कमी करायचं असेल, तर प्रथम आपण आपण गेल्या महिन्यात/आठवड्यात कोणत्या पोस्ट्स, कधी केल्या ते तपासा. त्यानंतर तुम्ही टाकलेल्या त्या पोस्ट्स गरजेच्या होत्या का ते स्वतःशी ताडून पाहा. उदाहरणार्थ, तुम्ही कुठं जेवलात, कुठं कसे केस कापलेत, जिमला कधी गेलात ते समाजमाध्यमांवर लिहिणं गरजेचं होतं का? त्या पोस्ट्स जर तुम्ही लिहिल्या नसत्या तर तुमच्या किंवा इतरांच्या आनंदात बाधा आली असती का? याचा विचार करून तुमची प्रत्येक गोष्ट समाजमाध्यमांवर टाकणं बंद करा. 

मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडून तुम्ही सतत समाजमाध्यमांवर आहात अशा कॉमेंट्स येत असतील तर त्या झटकून टाकण्यापेक्षा त्यावर विचार करा. तसंच तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळता का हेही तपासा. यानंतर तुम्ही समाजमाध्यमांवर किती वेळ घालवला ते तपासा. मग एकदा साइट पाहिल्यानंतर वहीत नोंद करा. याच कामासाठी ‘क्वालिटी टाइम’सारखी अॅप्स तुम्ही वापरू शकता. त्यानंतर तुम्ही समाजमाध्यमांवर जितका वेळ घालवणं उचित आहे ते ठरवा. त्यापेक्षा आत्ता घालवत असलेला वेळ खूप जास्त असेल तर तुम्हाला समाजमाध्यमांचं व्यसन लागलं आहे हे मान्य करा. 

एकदा ते मान्य केल्यानंतर पुढचं काम तुलनेनं सोपं आहे. सुरुवातीला एक तास समाजमाध्यमांपासून, मोबाईलपासून दूर राहा. तो एक तास, आठ तासांवर आणा. यानंतर तुम्हाला आयुष्यात उपयोगी पडणारी महत्त्वाची अॅप्स कोणती यांची एक यादी करा. ती यादी करताना कॉंप्युटर आणि मोबाईल यावरची अॅप्स, वेबसाइट्स आणि टूल्स, व्हिडिओ गेम्स, स्ट्रीमिंग व्हिडिओज सगळ्याचा विचार करा. तसंच ज्यामुळं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर जी अॅप न वापरल्यानं काहीच परिणाम होणार नाही, अशा ऑनलाइन गोष्टींचीही दुसरी यादी करा. दुसऱ्या यादीतल्या गोष्टी वापरणं लगेच थांबवा. 

यानंतर समाजमाध्यमांपासून सरळ ३० दिवसांचा ब्रेक घ्या. हे करताना पहिला आणि दुसरा आठवडा जड जाईल. ते तंत्रज्ञान वापरायचा मोह होईल. पण ते क्षण निघून जातील. मात्र या वेळात काय करायचं याबद्दल आधीच ठरवलेलं असायला हवं. 

उदाहरणार्थ, घरात फोन ठेवून दूरवर फिरायला जायला सुरुवात करा. कानाला हेडफोन्स लावून, हातातल्या मोबाइलवरच्या मेसेजेसकडं पाहात फिरणं हे खरं फिरणं नव्हे. नित्शे हा विचारवंत दिवसातून आठ तास चालायचा. त्या अनुभवांवरून त्यानं सहा वह्या भरून नोट्स काढल्या. त्या नोट्समधून ‘वॉंडरर अॅंड हिज शॅडो’ हे त्याचं पुस्तक जन्माला आलं होतं. आपण सगळेजण पुस्तक लिहू शकलो नाही, तरी अनुभव नोंदवून ठेवू शकतो. त्या अनुभवांवर स्वतःला पत्रं लिहायला सुरुवात करा. आयुष्यात एखादा निर्णय अडलेला असतो, कोणाबद्दल तरी भावनांची तीव्रता जाणवत असते, काही क्षण जगणं अवघड झालेलं असतं.. ते सुसूत्रपणे लिहून काढलं तर नातेसंबंध सुधारायला खूप मदत होते. तुम्ही मोकळ्या मनानं जगाकडं पाहू शकता. 

यादरम्यान दर आठवड्याला काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करा. घरातले दिवे बसवणं, नळाची किरकोळ दुरुस्ती करणं, वाद्य शिकणं, गायन शिकणं, चित्रकला शिकणं, नृत्य शिकणं, झाडं लावणं, नवीन भाषा शिकणं अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला शिकता येतील. क्राफ्ट म्हणजे काहीतरी मौलिक गोष्ट तयार करणं. तोही छंद जोपासता येऊ शकेल. क्राफ्ट तयार करताना त्यात विचारशक्ती, सर्जनशीलता आणि प्रतिभा यांचा वापर होतो. आजकाल हातांचा वापर स्क्रीनवर लाइक टाकण्यातच जास्त होतो. तिथं विचारशक्ती, प्रतिभा, सृजनशीलता खुंटलेली असते. आपलं काहीतरी चांगलं निर्माण करण्याचं कौशल्य वाया जात असतं. ते सत्कारणी लावायला हवं. 

आपल्या आवडीनिवडीनुसार कम्युनिटीज सापडणं हे आता सोशल मीडियावर सहजसोपं झालं आहे. तिथं विशिष्ट हेतू किंवा उद्दिष्ट साध्य न करता अधुऱ्या, अपुऱ्या, एकांगी माहितीची देवाणघेवाण करणं हेच अनेकांचं वेळ घालवण्याचं साधन झालं आहे. पण त्यानं काहीच साध्य होत नाही. यासाठी दर आठवड्याला प्रत्यक्ष भेटून एकत्र काहीतरी काम करणाऱ्या एखाद्या ग्रुपचे सदस्य व्हा. हा ग्रुप चित्रपट पाहणारा, गाणी ऐकणारा, समाजात मिसळून काम करणारा असू शकतो. तिथं विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. खेळणंदेखील आता इंटरनेट गेमिंगपुरतं मर्यादित होत चाललं आहे. पण मैदानी खेळ किंवा बोर्ड गेम्स, पळण्याच्या वॉकेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेणं हे समाजमाध्यमं वापरण्याला पर्याय असू शकतात. 

तीस दिवसांच्या ब्रेकनंतर तुम्ही जेव्हा समाजमाध्यमं परत वापरायला लागाल तेव्हा ‘वेळ घालवण्या’पेक्षा एकदाच मिळालेल्या आयुष्यातला ‘वेळ वापरायला हवा’ हे सूत्र अमलात आणा. 
समाप्त

संबंधित बातम्या