प्रेक्षणीय केंजळगड

मानस डांगे 
बुधवार, 1 जुलै 2020

केंजळगड, निसर्ग सौंदर्याने नटलेला छोटेखानी किल्ला. केंजळगड बुलंद आहे, बेलाग आहे... चहूबाजूंनी ताशीव कडे असलेला हा किल्ला कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यात एका डोंगरावर दिमाखात  उभा आहे....

केंजळगड ऊर्फ खेळांजा किंवा मोहनगड. हा किल्ला भोर आणि वाईपासून जवळ आहे. प्राचीन काळी केंजळगडाचा वापर बहुधा टेहळणीसाठी होत असावा. केंजळगडाची उंची साधारण चार हजार फूट आहे. रायरेश्वर डोंगराच्या समोर गांधी टोपीसारखा दिसणारा डोंगर म्हणजेच केंजळगड, हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. म्हणूनच की काय बरेच जण रायरेश्वर करून केंजळगडाकडे न फिरकताच निघून जातात. माझ्यासाठी मात्र केंजळगडाची वारी करण्याचा हा योग तिसऱ्यांदा आला होता. घेरा केंजळगड गाव आणि तिथून शेताच्या बांधावरून जाणारी छोटीशी वाट आपल्याला थेट माथ्यावर घेऊन जाते. रायरेश्वर पठार आणि केंजळगडच्या मधल्या वाटेनेही केंजळाच्या कातळापर्यंत जाता येते, परंतु ही वाट थोडी बिकट असून वाटाड्या सोबत असेल तरच या मार्गाने जावे.

 आम्ही भल्या पहाटे पुण्याहून केंजळगडाकरिता प्रस्थान केले. पुढे भोरमध्ये चहा-फराळ उरकले आणि पुढे निघालो. छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास मुजरा करून कोर्ले गाव गाठले. पुढे घाट रस्ता सुरू होतो. अगदी अलीकडेच या रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. वाटेत छोटे-मोठे धबधबे लागतात. आम्ही एका धबधब्यात मनोसक्त भिजून घेतले. घाटातून डावीकडे असलेला कच्चा रस्ता आपल्याला गडाच्या पायथ्याला घेरा केंजळगड गावात घेऊन जातो. पावसाळ्याचे दिवस होते आणि सगळीकडे चिखलाचे साम्राज्य होते. अशातच आमच्या गाडीचे टायर चिखलात रुतून बसले. काही केल्या गाडी पुढे सरकेचना. शेवटचा प्रयत्न करू नाहीतर गाडी सोडून निघू, नंतर बघू काय करायचे ते, असे ठरवले आणि पुन्हा एकदा प्रयत्न केला. आता मात्र गाडी थोडी पुढे गेली आणि तशीच रिव्हर्स घेतली. हळूहळू आमची गाडी पुन्हा हमरस्त्यावर आली आणि सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला.

 इथून पाचच मिनिटांत गाव पायी गाठले. गावातून छोटीशी पायवाट गडाकडे जाते. संपूर्ण डोंगरावर विपुल प्रमाणात झाडी असून वाट अतिशय सोपी आहे. साधारण अर्धा ते पाऊण तासात आपण गडाच्या कातळाखाली येतो. या मार्गावर बेसुमार गवत वाढले होते. त्यामुळे अतिशय सावध चालावे लागत होते. पुढे यु टर्न घेऊन गेल्यावर समोर भली मोठी कातळ भिंत दिसते. या भिंतीला बिलगून आहे ५५ पायऱ्यांचा प्रशस्त मार्ग. खडकांत कोरलेला हा मार्ग म्हणचे केंजळगडाचे भूषणच म्हणावे लागेल. इथे बराच वेळ फोटो सेशन करून आम्ही गडावर पोचलो. गडावरदेखील गवताचे साम्राज्य होते. अगदी छाती एवढे तरी गवत होते आणि वाट निसरडी. त्यामुळे निसरड्या वाटेने अलगद चालावे लागत होते. इथे पोचल्यावर समोरच्या रायरेश्वराला नमन करून गड प्रदक्षिणा सुरू केली.

 रायरेश्वराच्या डोंगरावरील लोखंडी शिडी गाद माथ्यावरून अगदी स्पष्ट दिसते. रायरेश्वर दर्शनासाठी आता बरीच मंडळी येऊ लागली होती. पठारावर महादेवाचे सुंदर मंदिर असून याच मंदिरात छत्रपतींनी स्वराज्याची शपथ घेतली होती, अशी आख्यायिका आहे. रायरेश्वराच्या माथ्यावर जंगम लोकांची वस्ती असून इथे चहा-फराळ आणि जेवणाची सोय पूर्वसूचना देऊन होऊ शकते. केंजळगडावर मात्र यातील काही मिळत नाही. गाद माथ्यावर पाण्याचे साठे आहेत, मात्र पाणी पिण्याजोगे नाही.

 गडाच्या डाव्या बाजूस कोणतेच अवशेष नाहीत. इथून तटाच्या कडेने चालताना आपल्याला अतिशय सावकाश चालावे लागते. पुढे एक छोटेसे तळे आहे, या तळ्यातील पाणी स्वच्छ आणि नितळ आहे. थोड्या अंतरावर उघड्यावर काही देवी-देवतांच्या मूर्ती दिसतात. त्यापुढे चुन्याचा घाणा आणि चाक दिसते, जे केंजळचे आणखी एक भूषण आहे. प्राचीन काळात केंजळगडावर विपुल प्रमाणात बांधकाम असावे असा अनुमान काढू शकतो. पुढे छत नसलेली एक इमारत दिसते. बाकी इतर कोणतेच अवशेष आजमितीस गडावर नाहीत. बेसुमार गवतामुळे गडावरील अवशेष नीट बघता येत नव्हते. गडावर कुठेही आसरा नाही, अगदी मुक्काम करायचा झाल्यास गावातील शाळेत किंवा मंदिरात करता येईल. गावात मात्र जेवणाची सोय नाही, त्यामुळे भोर किंवा वाईमध्ये थांबणे सोयीचे ठरते.

 उजव्या अंगाने पुढे रायरेश्वराच्या बाजूस जाताना गडाची भग्न तटबंदी दिसते. वातावरण ढगाळ असल्यामुळे केंजळचे तालेवार सोबती मात्र ढगात लपून बसले होते. अधूनमधून रायरेश्वरचा डोंगर हळूच दर्शन देत होता. वातावरण स्वच्छ असेल, तर केंजळचे सोबती असलेले पांडवगड, कमळगड, वसंतगड, रोहिडा, वाईपर्यंतचा परिसर, धोमधरण, मांढरदेवी असा बराच लांबवरचा प्रदेश सहज दिसतो.

 रिमझिम पाऊस, बोचरी थंडी आणि भन्नाट वारा सोबतीला होता. धुक्यामुळे गड प्रदक्षिणेत थोडी अडचण जाणवत होती, मात्र संपूर्ण परिसर हिंडून पाहिला आणि परतीची वाट धरली. गडावर छोट्या-छोट्या पायवाटा असून याच वाटांचा वापर करावा. गवतावरून शक्यतो चालणे टाळावे, कारण घसरून पडण्याची शक्यता असते. शिवाय पायऱ्यांच्या मार्गावरदेखील शेवाळे साठलेले असते, तेव्हा काळजीपूर्वक चालणे सोयीस्कर ठरते. इतर गडांवर दिसणारे अवशेष, तट, बुरूज, गोमुखी प्रवेशद्वार, माची असे केंजळगडावर काही नाही, मात्र केंजळची सफर खूपच आनंददायी आहे. अगदी कुटुंबाबरोबरही ही यात्रा करण्यासारखी आहे. केंजळगड, रायरेश्वर असे नियोजन करता येईल किंवा केंजळगड करून पुढे मेणवली मार्गे वाई, पाचगणी महाबळेश्वर अशी छोटी सहल करू शकतो. रायरेश्वरावर जेवण-चहा-नाष्टा अशी सोय उपलब्ध आहे. केंजळगडावर मात्र यातील काही उपलब्ध नाही. पाण्याच्या बाटल्या आणि पोटपूजेचे सामान घेऊनच केंजळची यात्रा करावी लागते.

 केंजळगड आणि वाई बरीच वर्षे बिजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात होते. शिवरायांनी राज्याभिषेकापूर्वी हा किल्ला जिंकून घेतला. केंजळगडाच्या खडकांत कोरून काढलेल्या पायऱ्या, गडावरील चुन्याचा घाणा आणि चाक, नैसर्गिक तटबंदी या गोष्टी मात्र आवर्जून लक्षात राहतात.  

कसे जाल?
पुणे-भोर मार्गे वरंधा घाटाकडे जाणाऱ्या रस्त्याने डावीकडे वळून कोर्ले गावातून घेरा केंजळ गाव गाठावे. हा रस्ता नाटंबी मार्गे पुढे कोरल्यात जातो. कोर्ले गावात झुलता पूल, कान्होजी जेधे यांची समाधी आणि त्यांचा वाडा असेही बघता येईल. पुणे-वाई-धोम असा प्रवास करून रायरेश्वर केंजळच्या खिंडीतून पुढे घेरा केंजळ गाव गाठावे. वाईचे गणेश मंदिर, मेणवलीतील नाना फडणवीसांचा वाडा, धोम धरण, असे बरेच काही बघता येईल. दोन्ही मार्गांवर छोटेखानी परंतु निसर्गरम्य घाट असून सकाळी लवकर निघून गड गाठावा. एका दिवसात सहज बघून होईल असा केंजळगड आणि रायरेश्वरचा ट्रेक आवर्जून करण्यासारखा आहे.

संबंधित बातम्या