सफर ब्रह्मगिरीच्या दुर्गद्वयीची

प्रांजल वाघ
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

ट्रेककथा
 

पहाटे चारच्या सुमारास बंद डोळ्यांवर बस मधल्या दिव्यांचा प्रखर प्रकाश पडला आणि माझी साखर झोप मोडली. आपसूकच ''काय शिंची कटकट आहे'' असे भाव चेहऱ्यावर झळकले. हवीहवीशी वाटणारी साखर झोपेची मिठी कशीबशी सोडवत, फक्त डावा डोळा किलकिला करून मी बस कंडक्टरला त्रासिकपणे विचारलं, ''मास्तर, कुठला स्टॉप आहे?''

''शेवटचा स्टॉप... त्र्यंबकेश्वर! चला उतरून घ्या.'' मास्तर निर्वाणीचा इशारा देऊन खाली उतरले.

 लहानपणी शाळेत जाण्यासाठी पहाटे उठताना ज्या यातना होत असत त्यांचीच प्रचिती मला आली आणि मी मोठ्या कष्टानं समान घेऊन उतरलो. सप्टेंबर महिना असल्यामुळं हवेत गारवा होताच. थंडगार वारंपण सुसाट सुटलं होतं. एक बोचरी झुळूक अंगाला चाटून जाताच पाठीचा कणा शहारला आणि उरल्यासुरल्या झोपेला पळवून लावलं! मग तोंडावर पाणी मारून, थोडा ताजातवाना होऊन भोवताली नजर फिरवली. अख्खा डेपो झोपी गेला होता. रात्रभर भुंकून थैमान घालणारी कुत्रीसुद्धा जरा विश्रांती घेत पहुडली होती. डेपोमागील काळ्या आकाशात जरा कुठं उजाडू लागलं होतं. त्या अंधुकशा प्रकाशात नजरेत सहज भरून येत होता तो ब्रह्मगिरी पर्वत. अजस्त्र! आडदांड! अंधारामुळं त्याचा तो अवाढव्य आकार अधिकच मोठा वाटत होता! पाहताक्षणी एक भीतीयुक्त आदराची भावना निर्माण झाली. कैक सहस्र वर्षांपासून तप करीत असलेला जणू एखादा साधुपुरुषच! बेफाम सुटलेल्या वाऱ्यामुळं पावसाचे ढग त्याच्या माथ्यावर आदळत होते, विखुरले जात होते! जणू शेकडो मेघदूत त्या पर्वतऋषींशी संदेशांची देवाणघेवाण करीत असावेत! असा हा ब्रह्मगिरी पर्वतऋषी आपल्या माथ्यावर त्र्यंबकगडाचा मुकुट मिरवत, त्र्यंबकेश्वरास आपल्या कुशीचं अभेद्य संरक्षण देत युगानुयुगे अचल उभा आहे! 

 तसा हा माझा पहिलाच सोलो ट्रेक. निघण्यापूर्वी हवी ती खबरदारी घेतलेली होती. प्रथमोपचार सामग्री, एक छोटी रोप स्लिंग, कॅराबिनर बरोबर ठेवलं होतंच; शिवाय त्र्यंबकेश्वर येथील पोलीस चौकीचा दूरध्वनी क्रमांक, अपघात झाल्यास रेस्क्यू हेल्पलाइन या सगळ्यांची माहिती घरी दिलेली होती. शिवाय पाणी आणि खाण्याचे पदार्थ मुबलक प्रमाणात होते. सरतेशेवटी परिसराची माहिती, गुगलवरून रेकी, किल्ल्याबद्दल पुस्तकात अथवा ब्लॉग्स वरून सविस्तर माहिती फोटोसहीत अभ्यासली होती. तरीही सोलो ट्रेक असल्यामुळं मनात थोडी कालवाकालव होत होती. 

 गडावर माकडांपासून धोका आहे, असं कळताच काळजात चर्र झालं! माकडांची आणि माझी मोठी दुष्मनी! अंकाई-टंकाई किल्ल्यावर अशाच एका माकडाच्या टोळीनं हल्लकल्लोळ करून आम्हाला टंकाई किल्ल्यात प्रवेश करू दिला नव्हता. त्यावेळी ट्रेकवर आम्ही दोघं मित्र होतो. इथं मी एकटा होतो. आता जे होईल ते होईल असं मनात म्हटलं. 

 सहज म्हणून डोंगराकडं नजर टाकली, तर थोडं उजाडलं होतं. पण ढगांनी किल्ल्यावर एकच दाटी केली होती. अशा परिस्थितीत किल्ल्यावर जाऊन पावसाचा मारा सोसावा लागला असता किंवा धुक्यात हरवून दिशाभूलही झाली असती. गडाचा माथा माझ्या परिचयाचा नव्हता. जमीन पायाखालची नव्हती. त्यात डोंगर अजस्त्र! वर हरवलो, तर सापडायला दोन दिवस लागतील इतका प्रचंड पर्वत! टपरीवर चहा सांगून वातावरण अनुकूल होण्याची वाट बघत बसलो. ३-४ कडक चहा पिऊन माझी कडक तपश्चर्या झाल्यावर ब्रह्मगिरी प्रसन्न झाला. ढगांचे आवरण झुगारून देऊन, पहाटेच्या मवाळ उजेडात दर्शन देत आम्हासमोर उभा राहिला. आपले पुष्ट बाहू पसरून मला भेटीला येण्याचं आवाहन करू लागला. सूर्योदयाची चाहूल लागली होतीच. त्र्यंबकगडाच्या आणि खासकरून भांडारदुर्गच्या भेटीची ओढ स्वस्थ बसू देईना. मग लागलीच आवरतं घेतलं आणि निघालो. चढाईची वाट तशी बांधलेली असल्यामुळं कसलाच त्रास नाही खरंतर. झपाझप पावलं टाकत मी अंतर कापू लागलो.

 हातात कॅमेरा पारजत जशी मी वाट चढू लागलो, तसा सूर्य वर येऊ लागला. लक्षावधी सूर्यकिरणं उधळीत, ढगांना पिटाळून लावीत मला गगनराज भास्कराचं दर्शन झालं. पहाटेची उन्हं आपल्या लख्ख तेजानं ब्रह्मगिरीस न्हाऊ घालत होती. त्याच्या अंगाखांद्यावर नागमोडी वळणं खेळणाऱ्या असंख्य जलधारा सूर्यप्रकाशात लकाकत होत्या. आखाड्यातून व्यायाम करून नुकत्याच निघालेल्या, तेला-मातीनं माखलेल्या एखाद्या मल्लासारखा तो रुबाबात उन्हं खात उभा होता.    

 ब्रह्मगिरीच्या परिसराला नाथ संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे. नाथ संप्रदायातील अनेक सिद्ध पुरुषांचा वावर इथं झालेला आहे. याच डोंगरातील एका गुहेत गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना संपूर्ण आत्मज्ञान दिलं. पुढं हेच ज्ञान निवृत्तीनाथांनी गुरू या नात्यानं ज्ञानेश्वर माउलींना देऊन नाथसंप्रदायाची थोर परंपरा पुढं चालवली. अशा या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. 

 एव्हाना गडाच्या कातळ कोरीव पायऱ्या सुरू झाल्या होत्या. कातळ पोखरून केलेल्या या चिंचोळ्या रस्त्याच्या कडेला जकात वसुलीसाठी बसल्याप्रमाणं माकडांची टोळी होती. किल्ल्यावर एव्हाना मी एकटाच होतो. निदान मागं अर्धा किलोमीटर, तरी कोणीही नव्हतं. त्यामुळं आता या टोळक्याचा सामना मला एकट्याला करावा लागणार होता. गपगुमान कॅमेरा बॅगमध्ये ठेवून दिला, नजर खाली रस्त्याकडं ठेवून, वॉकिंग स्टिक आपटत, माकडांकडं दुर्लक्ष केल्याच्या आविर्भावात निघालो. पण खरंतर माझा एक डोळा माकडांवर होताच, पण आश्चर्य म्हणजे माकडांनी मला काहीच केलं नाही आणि त्यांच्या वेढ्यातून सहीसलामत मी निसटलो! वास्तविक जोपर्यंत तुम्ही माकडांची छेड काढत नाही तोपर्यंत ते तुमच्या वाट्याला जात नाहीत. पण आपल्याकडचे पर्यटक माकडांना चिडवतात, चित्रविचित्र आवाज आणि हावभाव करतात, त्यांना खारट-गोड-तिखट पदार्थ खायला देतात. माकडांना चटक लागली, की ते तुमच्या हातातून गोष्टी खेचून घेतात... आणि तुम्ही विरोध केला, की तुम्हाला चावतात-बोचकारतात. मुकी जनावरं ती! त्यांच्या नैसर्गिक गुणांनुसार वागतात. त्यांना अरबट-चरबट खायला घालून, त्यांची छेड काढून आपणच त्यांना त्रास देत असतो.

 ही पायऱ्यांची खोदीव वाट म्हणजे त्र्यंबकगडाचा राजमार्ग! या मार्गावर दगडात कोरून काढलेले दरवाजे लागतात. अनामिक कारागिरांनी छिन्नीचे असंख्य घाव घालून तयार केलेला हा राजमार्ग, हे कोरीव दरवाजे, या कातळातील गुंफा, गडावरील अत्यावश्यक असलेली खोदीव पाण्याची टाकी म्हणजे सह्याद्रीच्या पाषाणात निर्मिलेली एक अजरामर वास्तुशास्त्रीय कलाकृतीच होय!  

 किल्ल्याचं साधारण असं बांधकाम असलं, की किल्ला सहज आठशे-हजार वर्षे जुना आहे असं समजायचं! त्या अंदाजानं त्र्यंबकगड नक्कीच सहस्र वर्षे जुना किल्ला असला पाहिजे! त्र्यंबकगड हा देवगिरीच्या रामदेवराय याच्या कारकिर्दीत बांधला जाण्याची शक्यता वर्तवता येते. वास्तविक ब्रह्मगिरीच्या माथ्यावर वसलेले त्र्यंबकगड आणि भांडारदुर्ग हे वेगळे नसून एकाच किल्ल्याचे दोन भाग आहेत. त्यातील त्र्यंबकगड हा मुख्य किल्ला आणि भांडारदुर्ग हा त्याचा जोडकिल्ला. शत्रूचं आक्रमण होता मुख्य किल्ला पडला, तर पळून जाण्यासाठी किंवा रसद सुरू ठेवण्यासाठी भांडारदुर्गाचा उपयोग होत असावा. 

 एव्हाना पायऱ्या चढून मी गडात प्रवेश केला होता. वर जाताच माझं स्वागत केलं ते घोंघावणाऱ्या वाऱ्यानं, ढगांनी आणि अर्थात पोटामधल्या कावळ्यांनी! एक मोकळी ओसरी पाहून न्याहारी आटपली आणि बरोबर आणलेल्या नकाशाच्या आधारे गोदावरी मंदिराच्या शोधात निघालो. गोदावरी नदी म्हणजे दक्षिणगंगा. गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतावर आहे. गोहत्येचं पातक दूर करण्यासाठी गौतम ऋषींनी ब्रम्हागिरीवर तपश्चर्या केली व महादेवाला प्रसन्न करून घेतलं. त्यानंतर शंकराच्या जटेतल्या गंगेची मागणी गौतम ऋषींनी केली, पण गंगा मात्र राजी नव्हती. तेव्हा शंकरानं आपल्या जटा ब्रम्हागिरीवर आपटल्या व गंगा भूमंडळी आणली. त्या जटा जिथं आपटल्या त्या जागी किल्ल्यावर आज जटा मंदिर आहे आणि किल्ल्याच्या दक्षिणेस गोदावरी उगमस्थान आहे. अशी ही पावन दक्षिणगंगा या ब्रह्मगिरी पर्वतावर अवतरली!

 धुक्यातून वाट काढत, चाचपडत अंदाज घेत मी गोदावरी उगमस्थान गाठलं. गोदावरी नदी इथं उगम पावते आणि लगेच गुप्त होऊन डोंगराच्या पायथ्याला गंगाद्वारी प्रकट होते. तिथं एक गुरव काही भाविकांना पूजा सांगत बसला होता. गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या यांच्या मूर्तींची आणि गोदावरीची पूजा सुरू होती. त्यांची पूजा होताच, त्यांच्याकडून किल्ल्याच्या पडक्या हत्ती दरवाजाची माहिती काढून घेतली आणि मोर्चा तिकडं वळवला. एक व्यवस्थित मळलेली, रुळलेली वाट अर्ध्या तासाच्या चालीनंतर आपल्याला उभी करते पडक्या दरवाजा समोर. वास्तविक हा खचलेला आणि पडलेला दरवाजा उक्त सुंदर आहे आणि इतका शिल्पांनी संपन्न आहे, की जर उत्खनन केलं तर आजूबाजूला बरेच अवशेष सापडतील. पण यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक वास्तू मोकळा श्वास घेऊ शकेल! दरवाजा पाहून पावलं मागं फिरून थेट चालू लागली गोदावरी उगमस्थानाकडं. आता वेध लागलेले जटा मंदिर आणि त्या पुढील तो गूढरम्य असा भांडारदुर्ग पाहण्याचे!

 झपझप पावलं उचलत मी अर्ध्या तासात ते विस्तीर्ण असं पठार पायाखाली घातलं. गडाच्या पश्चिमेकडील बाजू म्हणजे उभा ताशीव कडा! या बाजूनं कोणी शत्रू चुकूनसुद्धा वर यायचा नाही, इतके उभे सरळसोट कडे. पलीकडं दूर ढगात लपलेला हरिहर ऊर्फ हर्षगड, ब्रह्म्या ऊर्फ भास्करगड क्षितिजावर ठळकपणे उठून दिसत होते. इतक्या वेळात ढगांची दुलई पांघरून गड गाढ झोपला होता, पण आता त्या शुभ्र आकाशातून छोटेछोटे निळे कवडसे डोकावत होते. जटा मंदिराची छोटीशी पण सुबक वास्तू नजरेत येऊ लागताच अचानक सोसाट्याचा वारा सुटला, पांढऱ्या ढगांची पांगापांग झाली, गर्द निळा आसमंत दिसू लागला... आणि उन्हाच्या तिरिपीनं ब्रह्मगिरीचं लुप्त झालेलं शिखर उजळून निघालं! कुरुक्षेत्री जगतगुरू श्रीकृष्णानं आपलं विराटरूप पार्थास दाखवलं, तेव्हा त्याची जशी गत झाली होती तशी काहीशी माझी अवस्था झाली! त्या विराटरूपापुढं मनुष्याचं अस्तित्व किती नगण्य आहे याची फिरून पुन्हा जाणीव झाली. 

 जटा मंदिरातील शंकरास नमस्कार करून आता पुढं निघायचं होतं. मंदिर आणि एका पाण्याच्या टाक्यामधून जाणारी पायवाट धरली आणि वाढलेल्या गवतातून गडाच्या उत्तरेकडं निघालो. ब्रह्मगिरीच्या उत्तरेकडं एक एकलकोंडा किल्ला अथवा जोडकिल्ला आहे. प्राचीन दुर्गस्थापत्यशास्त्राचा मूर्तिमंत आविष्कार! निसर्गाशी एकरूप होऊन वास्तुनिर्मिती करतानाच किल्ल्याच्या संरक्षणाचे महत्त्व कसं टिकवून ठेवायचं याचं उत्तम उदाहरण. पावसाळ्यातील वर्षावानं गड पुरता हिरवा झाला होता. पण अचानक चालता चालता रंग पालटू लागले. हिरव्याकंच शालूच्या पदरावर जांभळी गर्द वेलबुट्टी उमटू लागली... आणि आश्चर्यानं तोंडात बोटं घालण्याची वेळ आली. माझ्यासमोर जांभळा गालीचा जणू अंथरला होता. सात वर्षांतून एकदा फुलणारी कारवी वनस्पती नेमकी मी किल्ल्यावर आलो असताना बहरली होती! इतकंच नव्हे, तर या जांभळ्या फुलांकडं पाहण्यात गर्क असताना समोर ढगांचा पडदा बाजूला सरला गेला आणि भांडारदुर्गानं दर्शन दिलं. दुग्धशर्करा योग म्हणावा तो हाच असणार!

 भांडारदुर्गाचं वैशिष्ट्य असं, की तो एक नैसर्गिक बुरूज आहे व मुख्य ब्रह्मगिरी आणि त्यामधील एकमेव दुवा म्हणजे त्या दोघांमधील अरुंद नैसर्गिक दगडी सेतू. शत्रूचं आक्रमण जरी झालं, तरी मोजक्या शिबंदीनिशी लढवता येईल असा छोटेखानी जोडकिल्ला. पण या किल्ल्याचं खास वैशिष्ट्य असं, की याचं प्रवेशद्वार अजिबात दिसत नाही. चालता चालता डोंगर संपून जाईल असं वाटायला लागतं आणि आपण पावलं साशंकपणे टाकतो. इतक्यात उभं ठाकतं ते कातळात उभं खोदलेलं किल्ल्याचं द्वार! डोंगराच्या पोटात उभा कातळ लेण्यासारखा कोरून जवळजवळ ४० पायऱ्या आहेत. या पायऱ्या उतरून खाली गेल्यावर एक छोटं द्वार येतं. बहुधा ते बुजलं असावं. उत्खनन केलं, तर ते एक पुरुष उंचीचं सहज असेल असं वाटतं. इथून बाहेर पडल्यावर आपण त्या दगडी पुलावर येतो. हा नैसर्गिक दगडी पूल म्हणजे २०० फूट उभी कातळ भिंत. इथून खाली वाकून पाहिलं, तर डोळे फिरतात. उजवीकडं गंगाद्वार आणि त्र्यंबकेश्वर, तर डावीकडं किल्ल्यांनी नटलेला संपन्न असा विस्तीर्ण डोंगराळ परिसर. हा पूल ओलांडून पुढं गेलं, की डावीकडं एक छोटं, अगदी जमिनीपासून दोन फूट उंचीचं द्वार दिसतं. इथून सरपटतच आत जावं लागतं. आत गेल्यावर विस्फारलेल्या नेत्रांनी आपण हा स्थापत्यशास्त्राचा नमुना पाहत बसतो. या बाजूसही कातळ खोदून वर चढणाऱ्या सुमारे ४० पायऱ्या आपल्याला गडावर घेऊन जातात. गडावर पाहायला फारसे अवशेष नाहीत. स्फटिकासारखं स्वच्छ पाणी असलेली दोन टाकी आहेत आणि गडाच्या उत्तर बाजूस एक दगडात खोदून काढलेला पाषाण बुरूज आहे. टेहळणीसाठी बांधलेला हा बुरूज त्र्यंबकेश्वर आणि त्याच्या उत्तरेच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जाई. किल्ल्याबद्दल फारशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही, पण त्र्यंबकगडासोबत शिवाजी महाराजांनी हा किल्लादेखील १६७० मध्ये स्वराज्यात आणला! 

 बुरुजावरील थंड वाऱ्यानं आणि समोरील विहंगम दृश्यानं मला तिथंच खिळवून ठेवलं होतं. पण घड्याळाचे काटे निघण्याचा इशारा देत होते. नाइलाजानं काढता पाय घ्यावा लागला. या रुबाबदार गडपुरुषाचा निरोप घेत पावलं परत गड पायथ्याकडं वळली, पण पुन्हा इथं येण्याचं वचन स्वतःला देऊनच!

(संदर्भ : ‘त्र्यंबकगड-अंजनेरी-रामशेज’ - मंगेश तेंडूलकर
विशेष आभार : अजय काकडे 
छायाचित्रे : प्रांजल वाघ, अजय काकडे)

संबंधित बातम्या