विचारवंत पत्रकार प्रभाकर पाध्ये
- सदा डुम्बरे-04-04-09 गेल्या शतकातील महाराष्ट्राच्या वाङ्मयीन, वृत्तपत्रीय व वैचारिक अवकाशावर आपल्या
ऊर्जस्वल कर्तृत्वाने स्वतःची ठसठशीत मुद्रा उमटविणाऱ्या प्रभाकर पाध्ये यांचं हे
जन्मशताब्दी वर्ष (4 जानेवारी 1909 ते 22 मार्च 1984). त्यानिमित्त 4 एप्रिल रोजी
"अगस्तीचे अंगण' हा पाध्यांच्या निवडक साहित्याचा ग्रंथ मौज प्रकाशनगृहाच्या वतीने
प्रकाशित होत आहे. पाध्यांच्या एका विद्यार्थ्याने त्यांना वाहिलेली ही आदरांजली.
प्रभाकर पाध्ये नावाच्या मराठीतील एका तेजस्वी पत्रकाराचं हे जन्मशताब्दी
वर्ष. पाध्ये म्हणजे नवशक्ती. पाध्ये म्हणजे धनुर्धारी. संपादकाच्या नावाने
वर्तमानपत्र ओळखलं जात असे तो पाध्यांचा काळ.
प्रा. धनंजयराव गाडगीळ यांच्या हाताखाली गोखले इन्स्टिट्यूटमध्ये अर्थशास्त्रात
एम. ए. करणाऱ्या पाध्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि पुन्हा आपल्या मूळ गावी,
मुंबईला प्रस्थान ठेवले ते पत्रकारितेसाठी. प्रा. अनंत काणेकर पाध्यांचे स्नेही.
दोघेही तेव्हाचे प्रखर मार्क्सवादी. "पॅरिस कम्यून'च्या धर्तीवर, कॉ. जगन्नाथ
अधिकारी यांच्या बांद्य्राच्या घरी चालणाऱ्या बांद्रा कम्यूनचे सदस्य. तर काणेकर
आणि मो. ग. रांगणेकर यांनी काढलेल्या "चित्रा' साप्ताहिकात पाध्ये दाखल झाले.
दत्तू बांदेकर, त्र्यं. श. पर्वते हे त्यांचे इतर सहकारी. राजकीय विषयावरील
पाध्यांच्या व्यासंगपूर्ण आणि झणझणीत लिखाणाची ही सुरवात. त्याआधी हरिभाऊ मोटे
यांच्या "प्रतिभा' साप्ताहिकात पाध्यांनी लिहिले, पण ते मुख्यत्वे साहित्यिक
घडामोडींवर. "चित्रा'ने पाध्यांना पत्रकार बनविले. "आपण विचारांच्या विश्वात
वावरायचे ही धारणा "चित्रा'च्या काळात निर्माण झाली, आणि तिची एक विलक्षण पूर्ती
"धनुर्धारी'च्या काळात झाली' असे पाध्यांनीच एके ठिकाणी म्हटले आहे. पाध्ये त्या
वेळी म्हणजे नेमके पंचवीस वर्षांचे होते.
बौद्धिक साहसं करण्याचं, विचारवंत होऊ पाहणाऱ्या व्यक्तीचं या क्षेत्रातील
प्रवेशाचं योग्य वय. मॅट्रिक झाल्याझाल्याच तसे ते युसूफ मेहरअली या त्या वेळच्या
तरुणांच्यात "क्रेझ' असलेल्या युवा नेत्याच्या यूथ लीग चळवळीकडे ओढले गेलेच होते.
स्वातंत्र्य चळवळीचा तो काळच तसा रसरशीत होता. वैचारिक संघर्षाचा, प्रत्यक्ष
कृतीचा. तरुण पिढी ध्येयवादाने भारलेली होती. ज्ञानलालसा, तल्लख बुद्धी, अन्यायाची
चीड, स्वतःची मतं त्वेषाने व ठामपणे मांडण्याची खुमखुमी असलेले तरुण स्वाभाविकपणेच
वृत्तपत्र व्यवसायाकडे वळत. परिवर्तनाचं माध्यम म्हणून वर्तमानपत्राचं स्थान
तेव्हा वादातीत होतं. प्रा. अनंत काणेकरांनी त्या भारलेल्या वातावरणासंबंधी
म्हटलंय, ""विचारी आणि व्यासंगी असले, हातात कायम दोन-तीन पुस्तकं असली, तरी
पाध्ये तत्कालीन प्रश्नांनी पेटून उठतात. रशियामधल्या स्टालीनच्या हुकूमशाहीने
आणि त्याच्या राक्षसी शिरकाणाने त्या वेळचे आम्ही जहाल समाजवादी खवळून गेलो होतो,
मार्क्सवादाचा फेरविचार करू लागलो होतो; पण स्टालीन आणि स्टालीनवाद यांच्या
चिंधड्या चिंधड्या कुणी केल्या असतील, तर पाध्यांच्या धारदार लेखणीनेच. पाध्यांचा
आवेश शत्रूंचाच काय, पण मित्रांचाही थरकाप उडवतो.''
"इंटलेक्च्युअल टेररिस्ट' ही पाध्यांची तरुणपणी तयार झालेली प्रतिमा शेवटपर्यंत
अभंग राहिली. पाध्ये केवळ पत्रकार, फक्त संपादक नव्हेत. ते साहित्यिक आहेत. कथाकार
आहेत. चार कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. "मैत्रीण' ही त्यांची एक कादंबरिका.
"त्रिसुपर्ण' हा तीन दृष्टान्तकथांचा संग्रह 1983 मध्ये प्रसिद्ध झाला आहे. नामवंत
समीक्षक कुसुमावती देशपांडे यांनी सत्यकथेत अगदी सुरवातीला पाध्यांच्या कथालेखनाची
समीक्षा केली आहे, त्यांच्या शैलीची प्रशंसा केली आहे; पण तरीही एकुणात त्यांच्या
कथालेखनाची समीक्षकांनी उपेक्षाच केली, अशी खंत पाध्यांच्या मनात शेवटपर्यंत होती.
मराठी नवकथेच्या आगमनाचा हा काळ. गाडगीळ, गोखले, भावे, माडगूळकर यांनी मराठी कथेची
वाटच बदलून टाकली, तेव्हा पाध्ये यांची मार्गक्रमणा साहित्यिकाऐवजी विचारवंताच्या
मार्गाने सुरू झाली होती. पाध्ये यांच्या ललित वाङ्मयाच्या क्षेत्रातील या
कामगिरीचे यथायोग्य मूल्यमापन पुरेशा वस्तुनिष्ठपणे केले आहे.
पाध्ये यांचे दुसरे लेखनवैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रवासवर्णने. "कॉंग्रेस फॉर
कल्चरल फ्रीडम' या पॅरिसस्थित संस्थेचे ते आशियाचे विभागप्रमुख. त्यानिमित्ताने
त्यांना जगभर फिरता आले. अनेक नामवंतांना भेटता आले. थोरामोठ्यांशी स्नेह जमविता
आले. पाध्ये मुळात "इंटलेक्च्युअल'. विचारवंत या मराठी पर्यायात त्याच्या सर्व
छटा व्यक्त होतीलच असे नाही, परंतु साहित्य, कला, संस्कृती, समाज व राजकारण अशा
सर्वच अंगांनी फुलारलेल्या पाध्यांच्या व्यक्तिमत्त्वाला या प्रवासाने आणखी अनेक
"डायमेन्शन्स' मिळवून दिली, आणि त्याचे प्रतिबिंब या प्रवासवर्णनात उमटले.
तत्कालीन जगातील जीवनाचं, "स्लाइस ऑफ लाइफ' म्हणता येईल असं प्रत्ययकारी दर्शन
त्यांच्या या लेखनातून होतं. त्या वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेलं,
नावाजलेलं, गाजत असलेलं पाध्यांचं नाव. एवढा सहेतुक परदेश प्रवास केलेला पत्रकार
त्या वेळी मराठीत नव्हताच; भारतातही अभावानेच.
समीक्षा लेखनात "कलेची क्षितिजे' या पहिल्या पुस्तकापासून "सौंदर्यानुभव' या
साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळालेल्या ग्रंथापर्यंत पाध्ये यांच्या या
क्षेत्रातील योगदानाची दखल घेतल्याशिवाय मराठी समीक्षेची चर्चा पूर्ण होत नाही.
सौंदर्यशास्त्राच्या सिद्धान्तात तर मराठीत मर्ढेकर, पाटणकर आणि पाध्ये या त्रयीने
मूलभूत स्वरूपाचे, पायाभरणीचे काम केले. मर्ढेकर-पाध्ये, पाध्ये-पाटणकर यांच्यात
या संदर्भात निर्माण झालेल्या सर्जनशील, प्रवाही ताणतणावाने वाङ्मयीन वातावरण
"चार्ज' झालेलं होतं. एवढं, की त्याची दुसरी टोकाची प्रतिक्रिया होती, ती म्हणजे
सर्जनशील लेखन आणि सौंदर्यशास्त्र यांचा काडीचा संबंध नाही; पण पाध्यांचा या
क्षेत्रातील व्यासंग सातत्यपूर्ण आणि दीर्घकाळ होता. ज्ञानाधारित जगाच्या केवळ
कल्पना करून आत्मवंचना करणाऱ्या महाराष्ट्रातील तरुण पिढीपुढे हा केवढा आदर्श आहे!
केवळ या विषयाच्या अभ्यासासाठी 1963 मध्ये अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात
अभ्यागत विद्यार्थी म्हणून चार महिने त्यांनी प्रवेश घेतला, 54 व्या वर्षी.
अभिरुची आणि सौंदर्य
पाध्ये यांच्या बहुमितीय व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध आविष्कार त्यांच्या अर्धशतकी
लेखन कारकिर्दीत साकार झाले आहेत. पाध्ये यांनी विपुल लेखन केले. त्यांचे वाचनही
अफाट होते. त्यांचा ग्रंथसंग्रह समृद्ध होता. देशोदेशीच्या प्रवासात, मुंबई-
दिल्लीच्या वास्तव्यात त्यांनी विलक्षणपणे पुस्तकांची खरेदी केली होती. पुस्तकातील
महत्त्वाचा भाग अधोरेखित करण्याची त्यांची सवय होती. त्यांचा फार उत्तम
ग्रंथसंग्रह त्यांच्या निधनानंतर कमलताईंनी- त्यांच्या पत्नीने पुणे
विद्यापीठाच्या जयकर ग्रंथालयाकडे सुपूर्त केला. त्यात बहुतांश पुस्तकं इंग्रजी
भाषेतील. पाध्यांच्या शैलीदार मराठीची प्रशंसा अनेकांनी केली आहे, पण त्यांचं
ऍकॅडमिक वाचन- मुख्यत्वे इंग्रजी ग्रंथ आणि नियतकालिकांचं. इंग्रजीमध्येही ते
उत्तम लिहीत. पाध्यांच्या मराठी, इंग्रजी अक्षराचं वळण आणि भाषेचा डौल जणू
पाध्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अंतर्बाह्य उधळण... त्यांच्यासारखीच खानदानी,
रुबाबदार, सुसंस्कृत. वळणदार, घाटदार.
पाध्ये सौंदर्यशास्त्राचा अभ्यास करीत होतेच, पण त्यांच्या जीवनातही
सौंदर्याभिरुचीचे प्रतिबिंब अनेक स्तरांवर पडलेलं दिसतं. वेशभूषेपासून
अभ्यासिकेपर्यंत आणि खाण्यापिण्यापासून नातेसंबंधांपर्यंत पाध्यांच्या
परिसस्पर्शाने सगळ्या गोष्टी सहजसुंदर होऊन जात. त्यांच्याबरोबर गप्पांची अनेक
सत्रं झडली. एकदा एखादी वस्तू, कलाकृती, सुंदर दिसते, तर तिच्यात ऑब्जेक्टिव
ब्यूटीमेकिंग क्वालिटीज' कोणत्या असतात, वगैरे प्रश्नांवर चर्चा सुरू होती.
त्यांनी सहज केलेलं विधान सुभाषितासारखं माझ्या आजही लक्षात आहे. ते म्हणाले होते,
""इट इज द रिलेशनशिप, दॅट इज ब्यूटिफुल.''
या सार्वत्रिक सत्याचा प्रत्यय घेणाऱ्या माणसांचं अवघं जीवन उजळून निघतं. खुद्द
पाध्यांच्या आयुष्यात अशा नात्यांना, नातेसंबंधांना कळीचं महत्त्व होतं. स्नेह हे
त्यांच्या जीवनाचं टॉनिक होतं. त्यांचं भाग्य असं, की जयप्रकाशांपासून
कुसुमाग्रजांपर्यंत व श्री. पु. आणि सुनीताबाईंपर्यंत अनेकांशी त्यांना असं
अकृत्रिम जिव्हाळ्याचं नातं निर्माण करता आलं. पाध्यांच्या एका आजारपणात ते ज्या
हॉस्पिटलमध्ये होते, त्याच्या शेजारीच पु. ल. आणि सुनीताबाई राहत. सुनीताबाई
अगत्याने येऊन देखभाल करीतच, पण त्यांनी आम्हालाही बजावलं होतं, की सध्या तरी
पाध्यांचं घर "3 कमलबाग' नसून, "1 रूपाली' आहे. जे काही लागेल ते इथून घ्यायचं,
न्यायचं. कसोटीच्या प्रसंगी श्री. पु., सुनीताबाई आणि प्रसंगी तात्यासाहेब
शिरवाडकरांशी सल्लामसलत करण्यात त्यांना मानसिक आधार मिळत असे. पाध्यांच्या
सौंदर्याभिरुचीचं एक मजेदार उदाहरण पत्रपंडित व पाध्यांचे स्नेही पां. वा. गाडगीळ
यांनी एका समारंभात दिलं होतं, ते त्यांच्या लेखनशैलीविषयी. पाध्ये अभ्यासाशिवाय
कधी लिहीत नसत. विषयाबद्दल आत्मीयता असल्याशिवाय त्याच्या वाट्याला जात नसत.
त्यामुळे त्यांच्या लिखाणात विलक्षण आक्रमकता असे; पण ते निर्वैरही असे. त्यामुळे
ते अधिकच आकर्षक होई. गाडगीळ म्हणतात, ""आक्रमक लिहिणारे पाध्ये अंतःकरणाने अत्यंत
ऋजू आहेत. हत्ती अंगावर चाल करण्यासाठी मोहरा करतो, तेव्हा फार सुंदर पोज घेतो.
पाध्ये यांच्या आक्रमकतेतही अशीच आकर्षकता आहे. ते चालून आले तरी त्यांच्या शैलीचं
कौतुक वाटतं.''
पाध्ये यांची ही शैली म्हणजे केवळ वाचकांना आकर्षित करण्यासाठी घेतलेला मोहरा
नव्हता, मुखवटा नव्हता. पाध्ये यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा तो नैसर्गिक आविष्कार
होता. पाध्ये यांच्या जीवनदृष्टीचा, जीवनशैलीचा त्यांची निष्ठा असलेल्या
मूल्यांच्या रक्षणासाठी प्राणपणाने केलेल्या लढाईचा तो भाग होता. "चित्रा'नंतर ते
"धनुर्धारी'चे संपादक झाले (1938 ते 45) आणि त्यानंतर नवशक्तीचे (1945 ते 53). हा
सगळा काळ वैचारिक संघर्षाचा, नव्याने प्रस्थापित होत असलेल्या आधुनिक मूल्यांचा.
साम्यवाद, समाजवादापासून तो साहित्यातील नव्या प्रवाहापर्यंत उसळून आलेल्या
प्रश्नांवर नवनवोन्मेषशाली अखंड चर्चा चालू असत. स्वातंत्र्य चळवळीने भारावलेला,
राजकीय, सामाजिक उलथापालथ होत असलेला तो मंतरलेला कालखंड होता. त्या यज्ञकुंडात
स्वतःची आहुती देण्यासाठी संवेदनशील माणसं तत्पर होती. लिखित शब्द हे त्याचं
माध्यम होतं. पाध्ये यांनी पत्रकारिता, ललित लेखन, समीक्षा, सौंदर्यशास्त्र,
वैचारिक लेखन, व्याख्यानं, कॉंग्रेस फॉर कल्चरल फ्रीडम या आंतरराष्ट्रीय
संघटनेच्या कामानिमित्त विपुल प्रवास अशा अनेक आघाड्यांवर त्यांच्या पन्नास
वर्षांच्या नेत्रदीपक (या शब्दाचे जनक स्वतः पाध्येच) कारकिर्दीत भरघोस कामगिरी
केली हे खरेच, पण या सगळ्याच्या प्रेरणा, त्यांचा ड्रायव्हिंग फोर्स, त्यांच्या
पत्रकारितेच्या कालखंडात त्यांना आलेलं मूल्यभान हेच आहे. ज्ञानलालसा,
विचारस्वातंत्र्य आणि नैतिकता या त्रिगुणांनी पाध्यांचं अवघं जीवन साकारलं आहे.
विचाराला सैद्धान्तिक बैठक देण्याची एक आंतरिक ऊर्मी असल्यामुळे वाचन, चिंतन व मनन
हा पाध्यांचा स्थायीभाव बनला. मार्क्सवादापासून सौंदर्यशास्त्रापर्यंत पाध्यांनी
सिद्ध केलेल्या विविध ग्रंथांतून याची प्रचिती येते. पाध्ये विद्वान होते यात
शंकाच नाही, पण विद्व
त्तेपेक्षा पाध्यांचं "विचारवंत' असणं हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा होता,
"इसेन्स' होता.
"आशियातील बुद्धिमंतांची सद्यःस्थिती' हा त्यांचा निबंध 1955 च्या रंगूनमधील
परिषदेत फार गाजला. त्यांचा व्यासंग त्यात दिसतोच, पण त्यांची इंटलेक्च्युअल
व्हायब्रन्सी'ही त्यात परिवर्तित झालेली दिसते. "पत्रकार केवळ विद्वान असून चालणार
नाही, तर तो विचारवंत असला पाहिजे, विचारवंत म्हणजे विद्वान नव्हे, ती वेगळीच जात
आहे. विचारवंत कॉफी हाउसमध्ये सापडेल, तर विद्वान ग्रंथालयात. विचारवंतांकडे
काहीतरी सांगण्यासारखं असतं ते तो चव्हाट्यावर येऊन सांगतो, वाद करतो. सॉक्रेटिस
खरा पहिला पत्रकार. त्याने चव्हाट्यावर येऊन वादविवाद केला,' असं पाध्ये यांनी
स्वतःच म्हटलं आहे. पाध्ये यांना वादविवादाची खुमखुमी होती, पण त्याचा पाया भक्कम
होता. विद्वत्ता, साहित्यिक गुण आणि वैचारिकता या तिन्ही गोष्टींची अनुपम एकसंधता
पाध्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. आपल्या वैचारिक स्वातंत्र्यासाठी किंमत
चुकविण्याची पाध्यांची तयारी होती. स्वकर्तृत्वाने नवशक्तीला लोकप्रियतेच्या
शिखरावर नेलं असताना त्याच टप्प्यावर "फ्री प्रेस' समूहाचे मालक एस. सदानंद
यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यावर पाध्यांनी तडकाफडकी राजीनामा देऊन मराठी
पत्रकारितेच्या इतिहासातील एक पान तेजस्वी करून टाकलं. सदानंद यांच्याबद्दलचं
वैयक्तिक प्रेम आणि आपुलकी मात्र संपली नाही. शेवटपर्यंत ते त्यांचा गौरवपूर्ण
उल्लेख करीत.
त्याआधी 1952 मध्ये कोल्हापुरात झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या 12 व्या
अधिवेशनाचे अध्यक्ष या नात्याने केलेल्या भाषणात पाध्यांनी आपली वृत्तपत्रविषयक
मतं स्पष्ट शब्दांत मांडली आहेत. वृत्तपत्र व्यवसाय हा कापड-पोलादासारखा निर्जीव
मालाचा उद्योग करणारा धंदा नव्हे. विचार हे या व्यवसायाचं अधिष्ठान असतं.
संस्कृतीचंही तेच अधिष्ठान असतं. म्हणून वृत्तपत्र व्यवसायाचं वैभव भौतिक
फूटपट्टीने मोजता येत नाही. वैचारिक विकास हेच त्याचे खरे वैभव, तेच त्याचे खरे
यश, आणि म्हणून वैचारिक स्वातंत्र्य हा वृत्तव्यवसायाचा खरा आधार म्हटला पाहिजे.''
पाध्यांनी अर्धशतकापूर्वी ठाशीवपणे मांडलेली ही भूमिका म्हणजे वृत्तपत्रांचं
प्राणतत्त्व. पत्राचं प्रॉडक्ट झालेल्या आजच्या काळात त्याचा संदर्भ अधिकच गडद
झालेला आहे.
नैतिकता
पाध्यांच्या जीवनाचं तिसरं सूत्र नैतिकता. वाङ्मयीन विश्वात "सामाजिक
बांधिलकी'च्या आग्रहामुळे मधल्या काळात अनेक वादळं निर्माण झाली. पाध्यांनी
लेखकाच्या स्वायत्ततेच्या बाजूने कायम कौल दिला आणि प्रचलित परिभाषेचा स्वीकार
केला नाही तरी त्यांनी आतल्या आवाजासारखं नैतिकतेचं अधिष्ठान मानल्यामुळे त्यांचं
सर्वच लेखन विजेप्रमाणे लखलखीत उजळून निघालं. राष्ट्रवादी, क्रांतिकारी व समाजवादी
असूनही "स्वातंत्र्य' या मूल्याशी त्यांनी कधी तडजोड केली नाही. गो. ग. आगरकर,
आचार्य जावडेकर, वा. म. जोशी आणि जयप्रकाश नारायण ही पाध्यांची आराध्य दैवतं झाली
ती त्यांच्या केवळ विचारांमुळेच नव्हे, तर त्यांच्या वैयक्तिक जीवनातील शुद्ध
नैतिक आचरणामुळे. जेपींचं एक फार सुंदर छायाचित्र पाध्यांच्या दिवाणखान्यात
लावलेलं असे. ते प्रतीकात्मकच म्हणायला हवं. जावडेकरांचं आधुनिक भारत वाचलं नसेल
तर तुम्ही कसले पत्रकार होणार, असा सज्जड दम ते आम्हा विद्यार्थ्यांना देत. वामन
मल्हार जोशींवर त्यांनी विपुल लिहिलं असलं तरी ते पुरेसं आहे असं समाधान त्यांना
कधी वाटलं नाही.
पाध्यांनी स्वीकारलेली ही विचारांची बैठक त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत
संक्रांत केली. गुरू-शिष्याच्या पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन. पाध्ये उतारवयात अधिकच
रुबाबदार दिसत. त्यांचं मनही तसंच हळवं आणि ऋजू. बुद्धी तल्लख. पाध्यांच्या
एकुलत्या एका मुलाचं- प्रशांतचं- तो मुंबईच्या आय.आय.टी.त असताना अपघाती निधन
झालं. आम्हा अनेकांमध्ये त्यांनी प्रशांतला पाहिलं असेल. "त्यांनी योग्य तेच केलं'
हेच या लेखाचं अखेरचं वाक्य असायला हवं! |