अभिमानास्पद मेघालय पर्व 

डॉ. श्रीकांत कार्लेकर  
सोमवार, 7 डिसेंबर 2020

वेध

शोधकांच्या एका आंतरराष्ट्रीय गटाने भारतातील मेघालय राज्यातील मॉमलू (Mawmluh) येथील चुनखडकातील गुहेत तयार झालेल्या अधोमुखी लवणस्तंभांच्या (Stalectite) केलेल्या अभ्यासातून एका विशिष्ट कालखंडात झालेल्या हवामान बदलाच्या, विशेषतः मॉन्सून दुर्बळ झाल्याच्या घटनेचा सर्वप्रथम २०११ मध्ये उलगडा झाला. त्या अभ्यासातून आणि त्यानंतर अजूनही सुरू असलेल्या गुहेच्या सततच्या अभ्यासातून असे लक्षात आले, की ४२०० वर्षांपूर्वी जगभरात अचानक मोठा दुष्काळ पडला, तापमानात घट झाली आणि त्यामुळे जगातील अनेक संस्कृती नष्ट झाल्या. जगाने दुष्काळाचे हे संकट २०० वर्षे सोसले. इजिप्त, ग्रीस, सीरिया, पॅलेस्टाईन, मेसोपोटेमिया याचबरोबर सिंधू खोरे आणि चीनमधील यांगत्सेचे खोरे इथल्या संस्कृती जास्त बाधित झाल्या.       

भारताच्या दृष्टीने हे संशोधन ही नक्कीच एक अभिमानास्पद बाब होती, कारण आंतरराष्ट्रीय स्तरविज्ञान आयोग (International stratigraphy commission) यांनी १३ जुलै २०१८ याच्या आधारे ‘मेघालय पर्व’ अशा नवीन भूशास्त्रीय कालखंडाचा समावेश भूशास्त्रीय कालगणना श्रेणीत केला. 

यातून मिळालेल्या पुराव्याला जागतिक स्तरप्रकार सीमा (Global boundary stratotype)चे मानांकन देण्यात आले. संपूर्ण भूशास्त्रीय कालगणना श्रेणीत (Geological time scale) भारतातील प्रदेशाच्या नावांवरून कालगणना श्रेणीतील कालखंडास संबोधण्याची ही पहिलीच वेळ होती! ज्या चुनखडक गुहेत याचे पुरावे आढळले, त्या गुहेजवळ गेल्याच वर्षी भारतीय भूशास्त्र सर्वेक्षण (Geological Survey of India) विभागाच्या ईशान्य प्रदेश शाखेने ही महत्त्वाची माहिती देणारा फलकही लावला आहे. या स्थानाला भू-वारसा स्थळ (Geoheritage site) म्हणून मान्यता मिळावी म्हणूनही प्रयत्न करण्यात येत आहेत. पृथ्वीच्या साडेचार अब्ज वर्षांच्या इतिहासात ‘मेघालय पर्व’ पहिले असे भूशास्त्रीय पर्व आहे, की जे जागतिक पातळीवरील हवामान बदलांमुळे होऊन गेलेल्या सांस्कृतिक घटनांशी संबंधित आहे आणि म्हणूनच त्याला भूशास्त्रीय कालगणना श्रेणीत इतके महत्त्व आहे!  

मेघालयाला २०० कोटी वर्षांचा भूशास्त्रीय इतिहास आहे. मेघालयात अनेक चुनखडकातील गुहा (Limestone caves) आढळून येतात. मॉमलू येथील गुहा सगळ्यात लांब गुहा असून गुहेत अनेक अधोमुखी (Stalectite) आणि ऊर्ध्वमुखी (Stalegmite) प्रकारचे लवणस्तंभ आहेत. ४,२०० वर्षांपूर्वी मॉन्सून दुर्बल झाल्यामुळे निर्माण झालेल्या महादुष्काळाचे अनेक पुरावे मॉमलू येथील गुहेत लवणस्तंभांत सापडले.  

ही भूशास्त्रीय कालगणना श्रेणी म्हणजे नेमके काय हे समजून घेतल्याशिवाय मेघालयातील या विलक्षण संशोधनाचे महत्त्व लक्षात येणार नाही. 

पृथ्वीचा जन्म झाल्यापासून आत्तापर्यंतच्या साडेचार अब्ज वर्षांत, विविध कालखंडात, नद्या, हिमनद्या, समुद्रतळ, वाळवंटे, गुहा यात विविध प्रकारचा गाळ गाडला गेला किंवा अडकून पडला. त्या त्या कालखंडातील खडक, खनिजे, वनस्पती व प्राण्यांचे अवशेष आणि जीवाष्म गाळाच्या विविध थरात बंदिस्त झाले. आज उत्खनन करताना किंवा भूकंप, महापूर, भूस्खलन अशा नैसर्गिक आपत्तीनंतर पूर्वी गाडल्या गेलेल्या अशा गोष्टी पुन्हा दिसू लागतात. रेडिओ कार्बन, थर्मोल्युमिनिसन्स, पॅलिओ मॅग्नेटिझम अशा कालमापनाच्या अनेक पद्धती वापरून त्यांचे भूशास्त्रीय वय ठरविले जाते. ज्या थरात त्या गोष्टी सापडल्या त्यावरून त्या काळातील भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि भूशास्त्रीय पर्यावरणाबद्दल निष्कर्ष काढले जातात. यातूनच पृथ्वीच्या सगळ्या इतिहासाची पुनर्निर्मिती केली जाते.            

आंतरराष्ट्रीय स्तरविज्ञान आयोग (International stratigraphy commission) ही आंतरराष्ट्रीय भूशास्त्रीय संघटनेशी निगडित संस्था पृथ्वीचा स्तररचनेतून प्राप्त झालेला इतिहास महाकल्प (Era), कल्प (Period) आणि पर्व (Epoch) अशा कालगणनेत मांडण्याचे कार्य करते. या आंतरराष्ट्रीय अनुक्रमीय स्तररचनेचा (Chrnostratigraphy) तक्ता नवीन माहितीसह, डरहॅम विद्यापीठाच्या प्रा. डेव्हीड हार्पर यांच्या अध्यक्षतेखाली १३ जुलै २०१८ रोजी जाहीर करण्यात आणि त्यात वर सांगितलेल्या संशोधनानंतर ‘मेघालय पर्व’ अशा नवीन भूशास्त्रीय कालखंडाचा समावेश करण्यात आला.        

भूशास्त्रीय कालगणना श्रेणीतील विविध कालखंड विभागात पृथ्वीच्या जन्मापासून आत्तापर्यंत घडत आलेल्या निरनिराळ्या भूवैज्ञानिक घडामोडींचा संशोधनांती समावेश केलेला असतो. भूखंड निर्मिती, भूखंड वहनाचा कालखंड, रूपांतरण, हिमयुगे अशा घटना त्यांच्या घटनाक्रमानुसार यात दाखविलेल्या असतात. त्या त्या कालखंडातील प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश करून एक अनुक्रमीय भूरचनाही (Geochronolgy) दिलेली असते.  

सर्वसाधारणपणे पृथ्वी पृष्ठाखाली किंवा वर आढळणारे विविध खडकांचे स्तर व त्यांची रचना, अनुक्रम यांचा अभ्यास म्हणजे शिलास्तर विज्ञान (Lithostratigraphy) आणि अवसादीय किंवा गाळाच्या खडकातील थरांचा अभ्यास म्हणजे अवसाद स्तर विज्ञान (Sediment stratigraphy). या दोन्हीचा भूशास्त्रीय कालगणनेसाठी उपयोग केला जातो. पृथ्वी पृष्ठाखालील विविध स्तरातील जीवाष्मांच्या (Fossils) साहाय्याने ते थर कोणत्या भूशास्त्रीय कालखंडात निर्माण झाले असावेत, ते ठरवून त्यावरून प्राचीन पर्यावरणीय इतिहासाची पुनर्रचना केली जाते. प्रत्येक स्तरात आढळणाऱ्या जीवाष्मांच्या साहाय्याने जो अभ्यास केला जातो, त्यास जैव स्तर विज्ञान (Biostratigraphy) म्हटले जाते. पृथ्वीवरील जिवांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करण्यासाठी स्तर रचना विज्ञानाचा खूपच उपयोग होतो. कोणते जीव केव्हा जन्माला आले, केव्हा नष्ट झाले त्याचाही यातून शोध घेता येतो. भूशास्त्रीय कालगणनेचा अनुक्रम हा  स्तर रचना विज्ञानातूनच नक्की करण्यात येतो. स्तर विज्ञानात कालानुक्रम फारच महत्त्वाचा. जवळ जवळच्या दोन स्तरातील विसंवाद, त्यातील सीमारेषा व ज्या प्रक्रियेतून ते स्तर तयार झाले त्यांचे स्वरूप, अशा अनेक गोष्टींच्या अभ्यासातून प्राचीन पर्यावरणाचा उलगडा करता येतो.   

पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंतच्या सगळ्या भूशास्त्रीय काळाची भूवैज्ञानिकांनी निरनिराळ्या कालखंडात विभागणी केलेली आहे. ही विभागणी प्राथमिक, द्वितियक, तृतीयक आणि चतुर्थक अशा चार प्रमुख महाकल्पात किंवा अजीव (Azoic), प्रागजीव (Proterozoic), पुराजीव (Paleozoic), मध्यजीव (Mesozoic) आणि नवजीवन (Cainozoic) अशा नावानेही केलेली आहे.  

भूशास्त्रीय कालगणनेनुसार साडेचार अब्ज वर्षांपासून म्हणजे पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंतच्या कालखंडाची महाकल्प (Era), कल्प (Period) आणि युग (Epoch) अशा काळात विभागणी केलेली आहे.  

सध्या आपण ज्या कालखंडात राहत आहोत, त्याला होलोसीन (Holocene) कालखंड म्हटले जाते. होलोसीन म्हणजे ‘नुतनतम’. या सध्या सुरू असलेल्या भूशास्त्रीय कालखंडाची सुरुवात अकरा हजार सातशे वर्षांपूर्वी, पृथ्वीवरच्या शेवटच्या हिमयुगानंतर झाली असे मानण्यात येते. याच कालखंडाच्या अगदी  शेवटच्या म्हणजे गेल्या काही दशकांच्या, मनुष्याच्या प्राबल्यामुळे महत्त्व प्राप्त झालेल्या काळास आंथ्रपोसीन (Anthropocene) म्हणजे ‘मनुष्याचा कालखंड’ म्हणावे अशा तऱ्हेची सूचनाही नुकतीच पुढे आली आहे. मनुष्य प्रभावाची सगळी लक्षणे गेल्या काही वर्षांत तयार झालेल्या मृदेच्या स्तरात आढळणाऱ्या अवसादात बंदिस्त झाली असून त्यातून या कालखंडाची नेमकी सुरुवात केव्हा झाली ते ठरविता येईल असे अभ्यासकांना वाटते आहे. आज  अठराव्या शतकानंतरचा काळ हा खऱ्या अर्थाने ‘मनुष्याचा कालखंड’ मानावा यावर एकवाक्यता दिसते आणि म्हणूनच ‘मेघालय पर्व’ त्या आधी ४,२०० वर्षे असे असावे असेही सुचविण्यात आले आहे!         

समुद्र सपाटीपासून १३०० मीटर उंचीवर असलेल्या ‘मॉमलू’ गुहेतील चुनखडकात तयार झालेल्या लवणस्तंभातील अवसादांच्या पृथक्करणातून वर सांगितलेला हवामान आणि मॉन्सून संबंधीचा निष्कर्ष काढता आला, म्हणून होलोसीन कालखंडाच्या ४,२०० वर्षे ते आजपर्यंतच्या कालखंडाला ‘मेघालय पर्व’ असे नाव देण्यात आले. याचवेळी होलोसीन या नूतन काळाची विभागणी ग्रीनलॅन्डियन (११,७०० ते ८,३०० वर्षांपूर्वीचा काळ), नॉर्थग्रीपिअन (८,३०० ते ४,२००  वर्षांपूर्वीचा काळ) आणि मेघालयन (४,२०० ते आजपर्यंतचा काळ) अशी नक्की करण्यात आली. हे तीनही कालखंड समुद्रतळावरील व सरोवरातील गाळ, हिमनद्यातील आणि हिमनगातील बर्फ व ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी लवणस्तंभातील कॅल्साइट खनिजांचे थर यावरून सुनिश्चित करण्यात आले. ११,७०० वर्षांपूर्वी ग्रीनलॅन्डियन काळात मिळालेले तापमान वाढीचे पुरावे, ८,३०० वर्षांपूर्वीच्या नॉर्थग्रीपिअन काळातील आत्यंतिक थंडीचे पुरावे आणि मेघालय काळातील ४,२०० वर्षांपूर्वीचे महादुष्काळाचे अनेक पुरावे अशा अवसादात मिळाले. मेघालय पर्वात, चीनकडून मध्य आशियाकडे व भारतातील मेघालय प्रदेशाकडे मोठी मानवी स्थलांतरे झाली असावीत असाही निष्कर्ष काढणे शक्य झाले. या दुष्काळाचे पुरावे जगातील इतर ठिकाणच्या भू अवसादात (Geosediments) आणि प्राचीन पुरातत्त्व ठिकाणीही (Archaeological Sites) सापडतात. 

‘मेघालय पर्वा’त जगभरात समुद्र आणि वातावरणातील अभिसरण चक्रात (Atomspheric circulation) मोठ्या हालचाली होऊन हवामान बदल घडून आले. याचे पुरावे जगात इतरत्र अनेक ठिकाणी अवसादांच्या थरात, प्राणी वनस्पती यांच्या जीवाश्मांत आणि रासायनिक समस्थानिकांत (Isotopes) साचून राहिलेले आढळतात. त्यांचे कालमापन करून त्यावेळच्या पर्यावरणाचे नेमके वर्णन करता येते. ग्रीनलॅन्डियन आणि नॉर्थग्रीपिअन काळातील कालमापन सीमा  बर्फाच्या साठ्यात साचून राहिलेल्या जीवाश्मांमुळे नक्की करता आली, तर मेघालयातील या गुहेत लवण स्तंभातील उपलब्ध जीवाश्मांच्या साहाय्याने ४,२०० वर्षांची सीमा ठरवता आली. 

संबंधित बातम्या