क्रांतीची लाडकी बाळं

गोपाळ कुलकर्णी
सोमवार, 3 मे 2021

चर्चा   

क्रांती नेहमीच तिच्या पिलांना खात नसते. काही लाडकी बाळं ती मुद्दामहून सांभाळते. फिडेल आणि राउल कॅस्ट्रो या दोघांचा अशाच लाडक्या लेकरांमध्ये समावेश करावा लागेल. अमेरिकेच्या परसात  ‘लाल’ झेंडा रोवणं हे तसं सोपं काम नव्हतं पण ते या कॅस्ट्रो बंधूंनी करून दाखवलं. क्युबन कम्युनिस्ट पक्षाच्या नेतेपदावरून राउल पायउतार झाले असले तरीसुद्धा त्यांना त्यांची पितृभूमी आणि जग हे कधीच विसरू शकत नाही.

लॅटिन अमेरिकेच्या भांडवलशाहीधार्जिण्या मातीत साम्यवाद रुजवण्याचं श्रेय चे गव्हेरा आणि फिडेल कॅस्ट्रो या क्रांतीद्वयींना जातं. कॅस्ट्रोंनी तर क्युबामध्ये देशोदेशींच्या साम्यवादप्रेमींसाठी प्रेरणा ठरेल असं जंगल उभं केलं. क्रांतीचा रुबाब आणि जरब काय असते, त्याची प्रचिती फिडेल आणि चे गव्हेरा यांच्याकडे पाहिल्यानंतर यायची. फिडेल यांचं २०१६ साली निधन झाल्यानंतर क्युबातील एक मोठं क्रांतिपर्व संपलं. त्यानंतर देशाची पर्यायानं क्युबन कम्युनिस्ट पक्षाची धुरा त्यांचेच बंधू राउल कॅस्ट्रो यांच्याकडे आली. क्रांतिकाळात फिडेल यांच्या लष्करात कमांडर असणाऱ्या राउल यांच्यासाठी राजकारण तसं नवं नव्हतं. फिडेल यांच्या क्रांतिपर्वानं निर्माण केलेलं वलय भेदून आपली वेगळी तेजशलाका निर्माण करावी असं त्यांना कधीच वाटलं नाही. त्यामुळे ते नेहमीच पडद्यामागचे पॉवरब्रोकर राहिले. फिडेल यांच्या नेतृत्वाखालील क्रांतिकारकांनी १९५९ मध्ये जेव्हा बटिस्टाचं सरकार उलथून टाकलं, तेव्हा राउल हे भावाच्या खांद्याला खांदा लावून लढले होते. अर्थशास्त्राचे अभ्यासक असलेले राउल तरुण वयामध्येच डाव्या विचारांकडे आकर्षित झाले आणि पुढे त्यांनी कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश देखील केला. सरकारविरोधातील कारवायांमुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास देखील भोगावा लागला. याच काळामध्ये त्यांची ओळख अर्जेंटिनाचे क्रांतिकारक चे गव्हेरा यांच्याशी झाली. फिडेल क्युबाचे पंतप्रधान झाल्यानंतर राउल २००८पर्यंत सेनादलांचे प्रमुख होते. त्यांनीही ऑलिव्ह ग्रीन रंगाचा मिलिटरी युनिफॉर्म थाटात मिरविला. ते १९६५ साली कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस झाले. फिडेल यांच्या निवृत्तीनंतर २०११ साली त्यांच्याकडे कम्युनिस्ट पक्षाची सूत्रं आली होती.

आयुष्यभराचा संघर्ष
आता वयाच्या नव्वदीत पोचलेल्या राउल यांनी क्युबन कम्युनिस्ट पक्षाच्या नेतेपदावरून पायउतार होत नव्या नेतृत्वासाठी मार्ग मोकळा करून दिला आहे. सहा दशकानंतर प्रथमच क्युबाच्या इतिहासात सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळात कॅस्ट्रो हे नाव नसेल. फिडेल नेहमी म्हणायचे, ‘‘क्रांती ही काही गुलाबाची शय्या नसते. तो भविष्य आणि भूतकाळातील संघर्ष असतो.’’ आयुष्यभर ते हा संघर्ष प्राणपणानं लढू शकले, त्याला एकमेव कारण म्हणजे त्यांच्या पाठीशी असणारी राउल नावाची भक्कम ढाल आणि चे गव्हेरानं दिलेली वैचारिक शिदोरी. क्रांती आधी तिच्या पिलांना खाते हे त्रिकालबाधित जागतिक सत्य असलं, तरीसुद्धा काही पिलं तिच्यासाठी खास असतात. क्रांती त्यांना गोंजारते आणि सांभाळते देखील पण त्याची देखील मोठी किंमत त्यांच्याकडून वसूल करते. म्हणूनच की काय फिडेल कॅस्ट्रोंनी आपल्या आख्ख्या हयातीमध्ये अंगावरील मिलिटरी युनिफॉर्म कधीच उतरविला नाही. आपण क्रांतीचं लाडकं बाळ आहोत हे त्यांनी अमेरिकेला टिच्चून सांगितलं.

देश सांभाळला
क्युबा भोवतीचं क्रांतिवलय जगभरातील डाव्यांना भुरळ घालायचं. फिडेल पर्वाच्या अस्तानंतर राउल यांनी देशाची सूत्रे सांभाळली, त्यांच्या कारकीर्दीमध्ये देशात फार मोठी स्थित्यंतरं झाली असे म्हणता येणार नाही पण ‘लाल’गडाच्या भिंती त्यांनी ढासळू दिल्या नाहीत. नुसत्या क्रांतीनं पोटं भरत नाहीत हे त्यांच्यातील धोरणी राजकारण्यानं आधीच ओळखलं होतं, त्यामुळे राउल यांच्या काळात क्युबन उसाच्या मळ्यांत मुक्ततेचं वारं खेळू लागलं. २०११ साली क्युबन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस झाल्यानंतर त्यांनी अनेक सुधारणांचं सूतोवाच केलं. २०१४ ते २०१६ या काळामध्ये क्युबाचे अमेरिकेसोबतचे संबंध कमालीचे सुधारले होते. याला कारण म्हणजे तेव्हा जागतिक महासत्तेची धुरा बराक ओबामा नावाच्या जाणत्या नेत्याच्या हाती होती. पुढे ट्रम्प सत्तेवर येताच सगळं काही बिघडलं. आताही ज्यो बायडेन यांच्या आगमनानं क्युबाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. खुद्द बायडेन यांनीही तसे संकेत दिले असले तरी हा विषय अद्याप व्हाइट हाउसच्या प्राधान्य यादीत आलेला नाही. राउल यांच्याच पुढाकारामुळं २०१९ साली क्युबाला नवी राज्यघटना मिळाली.
आव्हाने मोठी कायदेशीरबाबतीत देशाला बऱ्याच नव्या चौकटी मिळाल्या असल्या
तरीसुद्धा नवा क्युबा अद्याप जन्माला यायचा आहे. आता क्युबन कम्युनिस्ट पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या मिग्युएल दियाझ-कॅनल यांच्यासमोर दुहेरी आव्हान आहे. एक म्हणजे कॅस्ट्रोंनी दिलेला भरभक्कम वारसा पेलताना त्यांना देशाची आर्थिक घडी देखील बसवावी लागेल. कोरोनाच्या संकटानं जागतिक अर्थव्यवस्थेला एका अनिश्‍चिततेच्या गर्तेत ढकललं आहे. क्युबासारख्या छोटा जीव असणाऱ्या देशाला या संकटाचा मुकाबला करताना आर्थिक गणितं देखील सांभाळावी लागतील. देशात सध्या शीत युद्धानंतर जे आर्थिक अरिष्ट निर्माण झालं होतं त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसून येते. या संकटाचे निवारण करतानाच कॅनल यांना देशातील चलन गोंधळ देखील निस्तारावा लागेल. कोरोनामुळं अख्ख्या जगाचाच पर्यटन व्यवसाय बसला आहे, त्याला क्युबा आणि अन्य देश देखील अपवाद नाहीत. अशा स्थितीमध्ये उद्योगचक्र पुन्हा गतीमान करणं, तरुणाईकडून सोशल मीडिया स्वातंत्र्याची जी मागणी होते आहे त्यावर तोडगा काढणं इत्यादी समस्या कॅनल यांना मार्गी लावाव्या लागतील. 
आधार व्हावे लागणार नियतीचा न्याय पाहा, आता सहा दशकानंतर देखील क्युबाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याला सत्तेची ‘गुलाबी  शय्या’ मिळणं अवघड दिसतंय. अर्थात या लढाईमध्ये कॅनल एकटे नसतील. राउल येथेही पडद्यामागचे पॉवरब्रोकर म्हणून काम करणार आहेत. फादरलँड, क्रांती आणि साम्यवाद यांच्याशी आजन्म बांधील असणाऱ्या या लढवय्या नेत्यानं तशी उद्‌घोषणा खूप आधीच केले होती. जागतिक पातळीवर क्युबा ओळखला जातो तो आरोग्य क्षेत्रातील मदत कार्याबाबत. इबोला असो नाही तर 
कोरोना. जेव्हा-जेव्हा जग संकटामध्ये सापडलं तेव्हा क्युबन परिचारिका आणि वैद्यकीय पथके आधी मदतीला धावून आली, हा इतिहास आहे. क्युबातील आरोग्यसुविधा या जगात आदर्श मानल्या जातात. आताही कोरोनाकाळामध्ये क्युबातील ५९३ वैद्यकीय पथकं चौदा देशांच्या मदतीला धावून गेली आहेत. क्युबन सरकारने आज जैवतंत्रज्ञान क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यातूनच देशाला मोठ्या प्रमाणात परकी चलन देखील मिळतं. कॅनल यांना हाच दातृत्वाचा वसा पुढे नेत व्हेनेझुएला, निकारीग्वा आणि पोर्टोरिको यांच्यासारख्या छोट्या कम्युनिस्ट देशांचा आधार व्हावं लागेल.

संबंधित बातम्या