बैदा रोटी-खिमा भजी

रश्‍मी ठाकूर,
गुरुवार, 19 जुलै 2018

‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

टोमॅटोचा पराठा
साहित्य ः
तीन ते चार लाल टोमॅटो, २ ते ४ हिरव्या मिरच्या, लहानसा आल्याचा तुकडा, थोडी कोथिंबीर, चवीप्रमाणे हळद, साखर, मीठ, कणीक, तळण्यासाठी तूप, सर्व्हिंगसाठी खोबऱ्याची चटणी
कृती : प्रथम टोमॅटो, मिरच्या, आले, कोथिंबीर, हळद, साखर व चवीप्रमाणे मीठ घेऊन मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावे. ते मिश्रण एका भांड्यात घेऊन त्यात जरुरीप्रमाणे कणीक घेऊन ते मिश्रण घट्ट मळून घ्यावे. गॅसवर पॅन ठेवून त्यात तूप टाकावे. मळलेल्या मिश्रणाचे पराठे लाटून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे. गरमा-गरम पराठा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला द्यावे.

कांदा टोमॅटो पुरी
साहित्य ः कणीक, १ कांदा, २ टोमॅटो, लाल तिखट, हळद, साखर, चवीप्रमाणे मीठ, तळण्यासाठी तेल, सर्व्हिंगसाठी खोबऱ्याची चटणी
कृती : प्रथम कांदा व टोमॅटो बारीक कापून मिक्‍सरमधून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. एका भांड्यात ती पेस्ट काढून त्यात १ चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे साखर, मीठ घालून त्यात कणीक टाकून घट्ट मळून घ्यावी. त्याच्या पुऱ्या लाटून कढीतील गरम तेलावर खरपूस तळून गरमागरम पुऱ्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला द्याव्यात.

घोळीचे पॅटीस
साहित्य ः
साधारण पाव किलो काटा काढलेला घोळ मासा, लाल तिखट, गरम मसाला, हळद-मीठ, २ नरम पाव, १ अंडे, २ चमचे कॉर्नफ्लॉवर, १ मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा, तेल, सर्व्हिससाठी सॉस
कृती : प्रथम घोळ स्वच्छ करून त्याचा मिक्‍सरमधून खिमा बनवून घ्यावा. एका पातेल्यात तेल टाकून घोळीचा खिमा, चवीप्रमाणे लाल तिखट, गरम मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ टाकून मंद आचेवर शिजवून घ्यावे.  थंड करायला ठेवावे. दोन पावाचे तुकडे करून त्यात बटाटा कुस्करून व एक अंडे फेटून टाकावे व दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून एकजीव मळून घ्यावे. मळलेल्या मिश्रणाची पॅटीसच्या आकाराची पारी करून त्यात घोळीचे मिश्रण भरून व्यवस्थित बंद करून शॅलोफ्राय करून गरमागरम पॅटीस सॉसबरोबर खायला द्यावे.

पावाचे पुडिंग
साहित्य ः चार पाव, दोन अंडी, १५० ग्रॅम साखर, पाव लिटर दूध, व्हॅनिला इसेन्स चवीनुसार
कृती : प्रथम दुधात साखर टाकून त्यात अंडी टाकून चांगले फेटून घ्यावे. त्यात नरम पावाचे तुकडे टाकून पाच मिनिटे ठेवावे. त्यात दोन ते चार थेंब व्हॅनिला इसेन्स टाकून हे मिश्रण मिक्‍सरमधून बारीक वाटून घ्यावे. कुकरच्या भांड्यात साखर टाकून ते गॅसवर ठेवावे. साखर चॉकलेटी रंगावर वितळल्यावर भांडे उतरून थंड पाण्यावर ठेवावे. म्हणजे चांगले सेट होईल. त्यात पावाचे मिश्रण ओतावे. भांडे झाकण ठेवून कुकरमध्ये ठेवावे. चार ते पाच शिट्या झाल्यावर कुकर थंड झाल्यावर पुडिंग काढून कापून खायला द्यावे.

बैदा रोटी
साहित्य ः एक वाटी कणीक, २ ते ३ हिरव्या मिरच्या, लहानसा आल्याचा तुकडा, १ अंडे मीठ व तूप, सर्व्हिंगसाठी सॉस
कृती :
प्रथम कणीक बाजरीच्या पिठाप्रमाणे पातळ करून घ्यावी. त्यात बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या व आले, १ अंडे फेटून, चवीप्रमाणे मीठ टाकून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. पॅनमध्ये तूप टाकून त्यावर मिश्रणाचे लहान - लहान गोळे टाकून दोन्ही बाजूची खरपूस भाजून घ्यावे. गरमागरम बैदा रोटी सॉस बरोबर खायला द्यावी.

खिमा भजी
साहित्य ः शंभर ग्रॅम मटण खिमा, १ मोठा कांदा, एक नरम पाव, एक अंडे, लहानसा आल्याचा तुकडा, अर्धी वाटी बेसन, चिकन मसाला, हळद चवीप्रमाणे मीठ, तळण्यासाठी तेल, सर्व्हिंगसाठी सॉस
कृती : प्रथम खिमा स्वच्छ करून एका पातेल्यात घ्यावा. त्यात एक चमचा चिकन मसाला, बारीक चिरलेला कांदा, आले, पावाचे तुकडे करून अर्धी लहान वाटी बेसन अंडे फेटून व चवीप्रमाणे हळद, मीठ टाकून थोडे पाणी टाकून घट्ट मळून घ्यावे. तापलेल्या कढईतील तेलावर मिश्रणाचे लहान गोळे टाकून मंद आचेवर तपकिरी रंगावर खरपूस तळून घ्यावे. गरमागरम भजी सॉसबरोबर खायला द्यावी.

फ्युजन कटलेट
साहित्य ः दोन गाजर, १ बीट, ५० ग्रॅम भोपळा, ५० ग्रॅम कोबी, ५० ग्रॅम दुधी, १ अंडे, २ चमचे कॉर्नफ्लॉवर, १ चमचा नाचणीचे पीठ, १ चमचा ज्वारीचे पीठ, १ चमचा धने पावडर, हळद, मीठ, तळण्यासाठी तेल, सर्व्हिंगसाठी सॉस
कृती : प्रथम सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात. गाजर, बीट, भोपळा, कोबी, दुधी किसून एकत्र करून घ्यावे. त्यात दोन चमचे कॉर्नफ्लॉवर, १ चमचा नाचणीचे पीठ, १ चमचा ज्वारीचे पीठ, १ चमचा तांदळाचे पीठ, मिरची, आले बारीक कापून, अर्धा चमचा धने पावडर, हळद व अंडे फेटून टाकावे. चवीप्रमाणे मीठ टाकून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. मिश्रणाचे छोटे छोटे गोल कटलेट वळून मंद आचेवर शॅलोफ्राय करून घ्यावे. गरमागरम कटलेट सॉसबरोबर खायला द्यावे.

मटण पराठा
साहित्य ः
लहान तुकडे केलेले बोनलेस मटण पाव किलो, कणीक, १ कांदा, हळद, लाल तिखट, मटण मसाला, तेल चवीप्रमाणे मीठ, सर्व्हिंगसाठी सॉस
कृती : प्रथम पॅनमध्ये तेल टाकून त्यात चिरलेला कांदा, पाव चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, १ चमचा गरम मसाला (मटण) मीठ टाकून चांगले परतून घ्यावे. त्यात बोनलेस मटणाचे लहान तुकडे करून ते मिश्रण चांगले वाफवून शिजवून थंड करून घ्यावे. कणकेची जाडसर पोळी लाटून त्यावर शिजलेल्या मटणाचे मिश्रण हलक्‍या हाताने पसरून त्यावर दुसरी जाडसर लाटलेली पोळी ठेवून सर्व बाजूंनी बंद करून घ्यावे. पॅनमध्ये तेल टाकून दोन्ही बाजूंनी पोळी खरपूस भाजून घ्यावी. गरमागरम पराठ्याचे चार तुकडे करून सॉसबरोबर खायला द्यावेत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या