शब्दकोशकार मोल्सवर्थ

डॉ. किरण ठाकूर
सोमवार, 11 जुलै 2022

वयाच्या सोळाव्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीत एक सैनिक म्हणून दाखल झालेल्या जेम्स मोल्सवर्थ या तरुणाने अधिकारी म्हणून काम करताना प्रशासनाची गरज म्हणून मराठी भाषेतील जाणकारांच्या मदतीने शब्द, वाक्प्रचार, म्हणी गोळा करत शब्दकोशाची निर्मिती केली. मराठी भाषेतील हा पहिला शब्दकोश. १३ जुलै २०२२ हा मोल्सवर्थ यांचा १५१वा स्मृतिदिन, त्या निमित्ताने...

‘बाजिंद’ किंवा ‘सैराट’ या शब्दांचे नेमके अर्थ किती जणांना माहीत असतील, कुणास ठाऊक? दूरचित्रवाणी आणि चित्रपटामुळे हे शब्द लोकांसमोर आल्यावर व्हॉट्सअॅपवर खूप जणांनी एकमेकांकडे विचारणा केली: या शब्दांचा अर्थ काय? आधुनिक मराठी-इंग्रजी शब्दकोशात अर्थ सहज सापडेना. जणू कुणालाच या शब्दांचा नेमका अर्थ माहिती नाही, असे चित्र निर्माण झाले. मात्र १८५७मध्ये जेम्स थॉमस मोल्सवर्थ नावाच्या एका ब्रिटिश माणसाला हे दोन्ही आणि असे हजारो शब्द माहीत होते, त्यांचे अर्थसुद्धा माहीत होते. हा माणूस इंग्लंडहून  भारतात आला तोपर्यंत त्याला मराठीचा एक शब्दही माहिती नव्हता. किंबहुना मराठी अशी भाषा आहे हेदेखील त्याला माहीत नव्हते. नोकरीचा भाग म्हणून तो मराठी भाषा शिकला, आणि कालांतराने सुमारे ६० हजार मराठी शब्द गोळा करून; त्यांचे इंग्रजी अर्थ संकलित करून त्यानं एका अद्‌भुत शब्दकोशाची निर्मिती केली.

इंग्लंडहून नोकरीसाठी महाराष्ट्रात आलेला हा युवक त्यावेळी फक्त सोळा वर्षांचा असावा. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सोल्जर म्हणून तो दाखल झाला, आणि लवकरच कर्नल पदावर पोहोचला. युद्धभूमीवर ईस्ट इंडिया कंपनी  किंवा नंतर राणीच्या इंग्लंडसाठी लढणारा सैनिक म्हणून त्याने क्वचितच काम केले असेल. पण भारत विद्या अभ्यासक (इंडोलॉजीस्ट) आणि शब्दकोशकार (लेक्सिकॉग्राफर) अशी विभिन्न प्रकारची कामं त्याने हाताळली.  

एप्रिल ४, १८१६ या दिवशी जेम्स मोल्सवर्थ यांना लेफ्टनंट म्हणून  बढती मिळाली. ते  भूदलात काम करू लागले. त्यानंतर काही काळ त्यांनी  अन्न धान्य आणि लष्करी साहित्य पुरवठा विभागात काम केले. ह्या सगळ्या काळात ते सोलापूर, कोल्हापूर आणि मुंबई अशा ठिकाणी कामात व्यग्र असले पाहिजेत. याच काळात  मोल्सवर्थ आणि त्यांचे सहकारी थॉमस कॅंडी यांनी  स्वतंत्रपणे छोटेसे पण खूप महत्त्वाचे काम सुरू केले होते. ब्रिटिश अधिकारी आणि प्रशासनात काम करणाऱ्या इतरांना मराठी भाषेची ओळख असावी म्हणून मराठी शब्दांची एक सूची इंग्रजी अर्थासह तयार करण्याचे काम  त्यांच्यावर सोपवले होते.  ते त्यांनी निष्ठापूर्वक केले. त्यातूनच मराठी-इंग्रजी शब्दकोश ही संकल्पना त्यांनी हाताळली.

शब्दकोशाच्या निर्मितीची प्रक्रिया
शब्दकोशाच्या निर्मितीची प्रक्रिया  माहीत करून घेणेदेखील रंजक आहे. मराठी-इंग्रजी शब्दकोशाच्या प्रथम आवृत्तीच्या पहिल्या पानावर याचा उल्लेख सविस्तर केलेला आहे. वर्ष १८२५मध्ये हे काम सुरू झाले, तेव्हाच या प्रक्रियेचा शास्त्रशुद्ध विचार सुरू झाला. या चमूने  शब्दकोशाच्या निर्मितीचे शास्त्र आणि तंत्र अवगत केले. हळूहळू शब्दकोशकार  म्हणून अनुभव गाठीशी येत गेला. 

“त्यांनी शास्त्री पंडित नेमले. शब्द, म्हणी, वाक्प्रचार, विशिष्ट शब्दप्रयोग गोळा करायला सुरुवात केली. दुरुस्ती झालेले, अनावश्यक असलेले, भ्रष्ट वाटलेले, खूप बोजड किंवा खूप हलके-फुलके क्षुल्लक शब्द, उथळ भाषा अशा गोष्टींची  त्यांनी छाननी सुरू ठेवली. सुमारे पंचवीस हजार योग्य निवडक शब्द गोळा झाले. या पंडितांनी प्रत्येक शब्दाची तपासणी करून, चाळणी करून शब्द निश्चित केले. शब्दाच्या व्याकरणाचा अभ्यास केला. शब्दांच्या निर्मितीची संकल्पना तपासली. हा शब्द त्या-त्या भागापुरता प्रचलित आहे, की सार्वत्रिक आहे याचा विचार केला. शब्द  निश्चित झाल्यावर तो शब्द स्वीकारायचा की नाही याचा निर्णय केला, त्याचे इंग्रजी प्रतिशब्द विचारपूर्वक ठरवले.  हे सर्व लिखित शब्द स्वतंत्रपणे सुरक्षित ठेवले, एका वेगळ्या खोलीत पंडितांशी  चर्चा करत संपादनाचे काम केले. हे काम संपायला १८२८ उजाडलं. ‘महाराष्ट्र भाषेचा कोश’ (The Dictionary of the Language of Maharashtra) या नावाने कोश  प्रसिद्धीसाठी सिद्ध झाला. पण छपाईमध्ये अडचणी आल्या. कोश प्रसिद्ध व्हायला पुन्हा उशीर होऊ लागला. या उशिराचादेखील ‘मोल्सवर्थ  शास्त्रीजीं’नी फायदा करून घेतला. या काळामध्ये सुमारे १५ हजार शब्दांची भर घालून त्यांनी चाळीस हजार शब्दांचा कोश तयार केला. तोपर्यंत १८३१ वर्ष उजाडलं होतं,” असा एक उल्लेख सापडतो.

मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे मोल्सवर्थ यांना अल्पावधीतच शब्दकोशाचे पुढचे काम थांबवावे लागले. ते इंग्लंडला परतले. आपण ख्रिस्ती धर्माची 

उपासना करणारे असल्यामुळे  सैन्याचे काम करणे योग्य नाही, असे त्यांनी ठरवले. लष्करी सेवेचे त्यागपत्र देऊन टाकले.  एवढेच नव्हे तर ब्रिटिश सरकारचे निवृत्ती वेतनसुद्धा आपण घेणार नाही असेही शासनाला कळवून टाकले. 

असे असले तरी त्यांच्या कामाचे महत्त्व शासनाला इतके पटले होते की इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना १८५१मध्ये इंग्लंडहून परत बोलावून घेतले.  मराठी-इंग्रजी शब्दकोशाची सुधारित आवृत्ती  संपादनाचे काम त्यांना पुन्हा करायला मिळाले. पुन्हा नव्या शब्दांची भर  घालून सुमारे साठ हजार शब्द असलेला कोश पूर्ण केला. सोलापूर, पुणे, बाणकोट किल्ला, मुंबई, दापोली, महाबळेश्वर आणि गुजरातमधले खेडा या ठिकाणी मुक्काम करत त्यांनी कोशाचे  काम पूर्ण केले. 

कोशाच्या कामासाठी मराठी आणि इंग्रजी टाइप कलकत्त्याहून करून आणावे लागले.  कोशाची छपाई झाली ती मात्र बॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये. मराठी भाषेतील त्या वेळच्या तज्ज्ञ मंडळींनी कोशाचे कौतुक केले. त्याखेरीज त्यांनी  मोल्सवर्थ शास्त्रीजींवर एवढे प्रेम केले की त्यांना ते आदराने  ‘मोलेसर शास्त्री’ किंवा ‘मोरेश्वर शास्त्री’ असे म्हणत असत, असं वाचनात आलेल्या  काही उल्लेखांवरून जाणवते. वर्ष १८६०मध्ये मोल्सवर्थ शास्त्री मायभूमी इंग्लंडला परत गेले. ख्रिश्चन धर्माच्या संदर्भानेही त्यांनी इंग्रजीमध्ये काही लेखन केले आहे.

मोल्सवर्थ यांच्याविषयी माहिती गोळा करताना त्यांच्या कामाची दखल खुद्द इंग्लंडमध्ये घेतली गेली नाही, असे लक्षात आले. माझ्या खटपटीमध्ये जी काही थोडी माहिती मिळाली त्यात  ब्रिस्टॉल या गावी एक भाड्याचं घर त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटी घेतलं होतं, असं कळून आलं. त्या काळच्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा मृत्यूनंतर  त्यांच्या नात्यातील कोणीतरी कदाचित त्यांच्या थडग्यावर  त्यांच्या नावाचा उल्लेख केला असेल, असे गृहीत धरून मी ई-मेलच्या माध्यमातून इंग्लंडमधील वर्तमानपत्रात चौकशी केली. मदत मागितली, पण मला यश आले नाही.

मात्र, आजच्या पिढीमध्ये  त्यांच्या कामाचे महत्त्व थोडे तरी लक्षात यावे म्हणून छोटासा प्रयत्न केला. तेरा  जुलै २०२१ रोजी मोल्सवर्थ यांची  दिडशेवी पुण्यतिथी होती. त्यानिमित्ताने त्यांना श्रद्धांजली म्हणून पुण्यातील विश्वकर्मा विद्यापीठाच्या पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागातर्फे एक संशोधन पत्रिका प्रकाशित केली, त्यांच्याविषयी काही लेखही प्रकाशित केले. 

शब्दकोषाचे काम अद्याप संपलेले नाही
मोल्सवर्थ यांचे इतके महत्त्वाचे काम अद्याप संपलेले नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा शब्दकोश अद्यापही ताजा ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. वर्ष १८५७मध्ये शिळा प्रेसवर केलेले काम ऑफसेट प्रिंटिंगच्या माध्यमातून १९७५ मध्ये शुभदा सारस्वत प्रकाशन संस्थेने सुरू ठेवले.  मूळ ग्रंथाचे प्रकाशन ऑफसेटवर केल्यामुळे  मूळ  मजकुराची खिळे जुळवून छपाई करावी लागली नाही. त्याच्याही सहा-सात आवृत्त्या निघाल्या. आता निराली प्रकाशनाच्यावतीने ‘प्रिंट ऑन डिमांड’ तंत्राच्या साहाय्याने मोल्सवर्थ यांचा हा शब्दकोश उपलब्ध करून देण्यात येतो.

अलीकडेच इंटरनेट आणि युनिकोडचा  वापर करून देवनागरी लिपीमध्ये हा शब्दकोश पुन्हा सिद्ध करता आला. राष्ट्रीय ग्रंथालय आणि विविध संस्थांनी मदत केल्यामुळे ‘द डिजिटल  डिक्शनरीज ऑफ साऊथ एशिया प्रोग्रॅम’च्या माध्यमातून हे काम अजूनही पुढे सुरू आहे.

(लेखक पत्रकारितेचे अभ्यासक, अध्यापक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभागप्रमुख आहेत.)

 

संबंधित बातम्या