समृद्ध 

ऋता बावडेकर 
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

स्मरण

इब्राहिम अल्काझी यांचा आणि माझा काहीही (?) संबंध नाही. संबंध नव्हता म्हणण्याचे कारण मी त्यांच्याबरोबर कधी बोललेही नव्हते. पण जसे कळत गेले, तसे या व्यक्तीबद्दल प्रचंड आदर वाटत आला आहे. त्यामुळे त्यांच्याशी संबंध नाही, असेही म्हणता येणार नाही... साधारण १५-१६ वर्षांपूर्वी त्यांना (दुरून का असेना) बघण्याची, ऐकण्याची संधी मिळाली. अतिशय शांत, धीरगंभीर चेहरा, कसलाही आवेश नाही, अभिनिवेश नाही.. हेच इब्राहिम अल्काझी? 

अल्काझी या व्यक्तिमत्त्वाबरोबर माझी ‘भेट’ एवढीच! कार्यक्रमानंतर त्यांना भेटण्याची खूप इच्छा होती. पण त्यांच्याबरोबर बोलायचे काय, या संकोचामुळे ते राहूनच गेले. खरे तर काही व्यक्तिमत्त्वांपुढे असेच कोरे जावे, तेच त्यावर आपली अक्षरे उमटवतात; ती कायम राहतात.. ही ‘समज’ खूप उशिरा आली. 

नाटक बघणे या पलीकडे माझा नाटकाशी काही संबंध नव्हता. पण दैनिक सकाळमध्ये नाट्य परिचय (परीक्षण किंवा समीक्षा नव्हे) लिहू लागले, तसे या विषयाकडे बारकाईने बघू लागले. शिबिरे, कार्यशाळा, व्याख्याने.. नाटकाशी संबंधित सगळ्या कार्यक्रमांना जाऊ लागले. या प्रत्येक ठिकाणी, विविध लेखांत खूप वेळा ‘इब्राहिम अल्काझी’ हे नाव अपरिहार्यपणे येत असे. हे नाव माहिती होते, त्याचे कार्य माहिती होते; पण खोलात जाऊन कधी त्याविषयी माहिती घेतली नव्हती. त्यातच प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून या नावाचा जो परिचय झाला त्यामुळे अधिक उत्सुकता वाढली. मिळेल तिथून माहिती घेत गेले.. आणि या व्यक्तीबद्दलचा आदर वाढतच गेला... 

प्रत्यक्ष नसले, तरी ‘तन्वीर सन्माना’निमित्त आयोजित कार्यक्रमांत त्यांना बघता - ऐकता आले. 

अल्काझी हे रंगभूमीवरील दिग्दर्शक, नाट्यविषयक शिक्षक होते. एखादे नाटक रंगभूमीवर आणण्याआधी ते त्याविषयी प्रचंड अभ्यास, संशोधन करीत. १९६२-७७ दरम्यान ते दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक होते. किंबहुना ही संस्था स्थापन करण्यात त्यांचा सर्वांत मोठा वाटा होता. त्यांनीच ही संस्था नावारूपाला आणली. विविध कलांची त्यांना चांगली जाण व पारख होती. आपली पत्नी रोशनसह त्यांनी दिल्लीत आर्ट हेरिटेज गॅलरी सुरू केली होती. साधारण पन्नासाहून अधिक नाटके त्यांनी रंगभूमीवर आणली होती.. अशासह त्यांच्याविषयी बरीच माहिती नेटवर, नियतकालिकांत उपलब्ध आहे. पंधरा-सोळा वर्षांपूर्वी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात या व्यतिरिक्त त्यांच्याविषयी माहिती कळाली.. 

रंगमंचावर जाताना अनेक जण मंचाला नमस्कार करतात. पण अल्काझी यांना ते अजिबात आवडत नाही, हे माहिती होते, पण त्याचे कारण पुण्यातील त्या कार्यक्रमात कळले. नसिरुद्दिन शाह म्हणाले, ‘रंगभूमीचा सन्मान तिच्यावर माथा टेकून नव्हे, तर घाम गाळून होतो, असे ते मानतात.’ शाह यावेळी म्हणाले होते, ‘अल्काझींविषयी मी बोलणे म्हणजे, ‘लो अँगल शॉट’मधून उत्तुंग माणसाकडे बघणे आहे. ‘माझ्या आयुष्याला वळण दिले़,’ असे त्यांच्याविषयी म्हणणारा मी एकटा नाही यात काय ते आले. नटाने नाटकाची संहिता मूळातूनच वाचावी, त्याने भरपूर वाचावे, त्याला गाणे यायलाच हवे.. हे त्यांचे सांगणे मला आता कुठे कळू लागले आहे. आम्हा विद्यार्थ्यांत त्यांच्याविषयी ऑब्सेशन होते. रंगभूमीवर एरवी कोणालाही शक्य होणार नाही, असे स्थान त्यांनी मिळविले आहे...’ 

प्रसिद्ध लेखक महेश एलकुंचवार यावेळी म्हणाले होते, ‘त्यांनी दिग्दर्शकांच्या तीन पिढ्या घडवल्या, तोपर्यंत आमची उडी इब्सेनपर्यंत होती. ग्रीक, युरोपीय रंगभूमीचे दरवाजे त्यांनी उघडले. आधुनिकता म्हणजे केवळ परंपरा नाकारणे नाही, तर परंपरेचे सत्त्व अंगी लावून घेणे आहे, हे त्यांनी शिकविले. व्यक्तिमत्त्व समृद्ध करण्यासाठी इतर कलांचाही आस्वाद घ्यावा, हे सांगणारेही तेच होते.’ 

यावेळचे अल्काझी यांचे मनोगत म्हणजे, ‘ऐकता किती ऐकशील दो कानांनी..’ असे होते... ते म्हणाले, ‘मी मूळचा पुणेकर आहे आणि महाराष्ट्रावर माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. तो सांगायला मी येथे आलो आहे. मी स्वतःला ‘महाराष्ट्रीय अरब’ समजतो. लहानपणी लावण्या, पोवाड्याचे स्वर माझ्या कानांवर पडले आहेत. सेंट व्हिन्सेंट हायस्कूलचे फादर आम्हाला सिनेमा थिएटरात ‘संत तुकाराम’ पाहायला घेऊन गेले आणि तो अनुभव कधीही पुसला गेला नाही.’ या कार्यक्रमात त्यांनी खूप आठवणी सांगितल्या. केवळ रंगकर्मींसांठीच नव्हे, सामान्य लोकांनाही त्यातून खूप काही मिळाले असेल.. उज्ज्वल व्यावसायिक आंतरराष्ट्रीय भविष्य समोर दिसत असतानाही त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे आव्हान स्वीकारले. हाताने माती कालवून रंगभूमी तयार करण्यापासून दिल्ली परिसरातील प्राचीन अवशेषांचा वापर नेपथ्यासाठी करण्यापर्यंत असंख्य आठवणी त्यांनी यावेळी सांगितल्या. तसेच ‘आषाढ का एक दिन’ लिहिणारे मोहन राकेश यांना सामान्य माणसाची भाषा वापरण्याचा सल्ला कसा दिला, त्यानंतरचे ‘आधे अधुरे़’ हे नाटक, शिवराम कारंथ यांच्याबरोबरचे यक्षगान.. असे कितीतरी अनुभव त्यांनी सांगितले. नाटकापलीकडे ते बोललेच नाहीत. ‘रंगभूमी ही जागा रक्ताच्या त्यागाची आहे. तिचे पावित्र्य जपायलाच हवे,’ असे ते म्हणाले. 

अशा या समृद्ध, संपन्न व्यक्तिमत्वाला नम्र अभिवादन!

संबंधित बातम्या