शौकतजी म्हणजे प्रसन्न सकाळ! 

जयश्री सुधीर देसाई    
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

स्मरण 
‘इप्टा’, ‘पृथ्वी थिएटर’, ‘इंडियन नॅशनल थिएटर’, ‘त्रिवेणी’ आदी नाट्यसंस्थांची साधारण तिसाच्या आसपास नाटकं, उमरावजान, सलाम बॉम्बे, हकिकत, हीर रांझा, गर्म हवा सारखे १५ गाजलेले चित्रपट यातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शौकत कैफी आझमी यांचं नुकतंच निधन झालं. त्यांचं स्मरण.

‘आयुष्याच्या संध्याकाळीही उत्फुल्ल राहिलेली एक प्रसन्न सकाळ... खऱ्या अर्थानं एक आई!’ 

मला तरी त्या कायम तशाच वाटल्या. मी त्यांच्या संपर्कात आले ती त्यांच्या लेकीमुळं... प्रख्यात अभिनेत्री शबाना आझमी यांच्यामुळं. त्यांच्या मुलाखती मी अनेकदा घेतल्या. त्यामुळं त्यांच्या घरी माझं येणं जाणं होतं. अशीच एकदा त्यांनी मला त्यांच्या आईची ओळख करून दिली. अत्यंत निर्मळ, प्रसन्न हास्य. वार्धक्यातही देखणा असलेला चेहरा आणि अत्यंत आत्मीयतेनं संवाद साधण्याची त्यांची कला यामुळं त्या मला पाहताक्षणीच आवडल्या. त्यांनी मला त्यांचं आत्मचरित्र, ‘याद की राहगुजर’ भेट दिलं. मला ते खूप आवडलं. कारण ते खूप प्रांजळ होतं. काळाचा खूप मोठा आलेख त्यात होता. निजामाच्या आधिपत्याखाली असलेल्या हैदराबादमधील वास्तव ते मुंबईतील कम्युनमधील वास्तव्य... उत्तर प्रदेशातील कैफी आझमी यांच्या छोट्याशा खेड्यातील वास्तव्य... असंख्य संकटं, काही वेळेला उपासमार... मात्र या सगळ्यातून टिकून राहिलेली, सकारात्मक राहिलेली प्रसन्न विजिगीषू वृत्ती... आणि या सगळ्यातून त्यांनी जपलेली रंगमंचावरील निष्ठा म्हणजे शौकतआपा किंवा शौकत आझमी! 

प्रख्यात शायर गीतकार कैफी आझमी यांच्या पत्नी, अभिनेत्री शबाना आझमी व प्रख्यात सिनेमॅटोग्राफर बाबा आझमी यांच्या आई आणि प्रख्यात शायर-गीतकार, पटकथाकार जावेद अख्तर यांच्या सासूबाई... हा झाला त्यांचा सर्वमान्य परिचय. मात्र शौकत आझमी यापेक्षा कितीतरी अधिक होत्या. अतिशय मायाळू होत्या, कलासक्त होत्या, कलावंत तर होत्याच, स्वतंत्र बाण्याच्या होत्या आणि अतिशय प्रांजळ आणि स्पष्टवक्त्या होत्या. 

शबानाजी नेहमी एक किस्सा सांगतात. शबानाजींचा ‘अंकुर’ हा सिनेमा त्यांनी आधी पाहिला आणि नंतर ‘फासले’ हा चित्रपट पाहिला. तो बघितल्यावर त्या म्हणाल्या, ‘शबाना, मी जर ‘फासले’ आधी बघितला असता, तर तुला अभिनयात करिअर करण्यासाठी ठेवलंच नसतं. कुणाही आंधळ्या-पांगळ्याबरोबर तुझं लग्न लावून दिलं असतं...’ 

हा अनुभव मलाही आला. मी भाषांतरित केलेल्या त्यांच्या ‘कैफी आणि मी’ या पुस्तकाचं प्रकाशन नाशिकमध्ये झालं. सकाळी मी त्यांना ताज हॉटेलला जेव्हा ‘रिसिव्ह’ करायला गेले तेव्हाची माझी साधीशी साडी त्यांना प्रचंड आवडली होती. ते त्यांनी बोलूनही दाखवलं आणि संध्याकाळी समारंभासाठी त्यांना न्यायला जेव्हा गेले तेव्हा समारंभासाठी मी नेसलेली साडी त्यांना अजिबात आवडली नाही. तिथंच मला म्हणाल्या, ‘तुला याच्यापेक्षा बरी साडी मिळाली नाही का दुसरी?’ त्यांचा स्वभाव आणि त्यांचं साड्यांवरचं प्रेम मला माहित असल्यानं मला गंमत वाटली. शबानाजी गमतीत म्हणायच्या, मम्मीचं कैफींवरचं प्रेम आणि साड्यांवरचं प्रेम यात स्पर्धा लावली तर तिचं कैफींवरचं प्रेम साड्यांवरच्या तिच्या प्रेमापेक्षा कणभरच जास्त ठरेल. त्या साड्यांचे ब्लाऊजदेखील त्या अंथरुणाला खिळेपर्यंत स्वतः आणि तेही हातानं शिवायच्या. त्यांच्याकडं कधी सकाळी ब्रेकफास्टला गेले तर समोर जुहूच्या सागराला साक्षी ठेवत चहा पिणे हा समारंभपूर्वक चाललेला कार्यक्रम दिसायचा. जेव्हा त्यांच्याकडं पैसे आले तेव्हा असा समारंभ करणे सोपे होते. पण जेव्हा पैसे नव्हते तेव्हाही त्यांची उच्च अभिरुची अशीच दिसायची. 

अतिशय सुखवस्तू परिवारातली ही मुलगी केवळ कैफींवरच्या प्रेमाखातर मुंबईला जेव्हा रेड फ्लॅग कम्युनमध्ये राहायला आली तेव्हा त्यांची तिथली अवघी एक खोली त्यांनी अतिशय उत्तम सजवली होती. त्या त्यांच्या साड्यांचे पडदे शिवायच्या. त्यांच्याकडं एकच ट्रंक होती. त्यावर त्यांनी सुंदर व गुबगुबीत गोधडी शिवून घातली आणि ते एक सुंदरसं आसन झालं. त्या कम्युन परिसरात फुललेल्या झाडांची सुगंधी फुले तांब्याच्या पात्रात ठेवून, त्याच्या शेजारी बसून त्या चहाचा आस्वाद घेत. त्यांना एकूण सुगंधाचं जबरदस्त वेड होतं. हैदराबादच्या खानदानी संस्कृतीचे त्यांच्यावर झालेले ते संस्कार होते. त्या सांगायच्या, ‘हैदराबादमध्ये स्त्रिया धूपामध्ये घालून, ‘अगरबडीया’ नावानं मिळणाऱ्या सुगंधी वनस्पतींचा वाफारा केसावर घ्यायच्या. त्यामुळं केस सुगंधी होऊन जायचे. तसंच कपड्यांमध्ये सुगंधी अत्तराच्या कुप्या ठेवल्या जायच्या. त्यामुळं कपडे सुगंधी व्हायचे.’ शौकतआपाही जसा ऋतू असेल अशी अत्तरं लावायच्या. उन्हाळा असेल तर त्यांचं खसचं अत्तर ठरलेलं असायचं आणि हिवाळा असेल शमामाचा सुगंध त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून दरवळायचा. अगदी लहानपणापासून त्यांना चित्र आणि रंग यांचंही जबरदस्त आकर्षण होतं आणि ती कलाही त्यांच्यात उपजत होती. 

त्यांच्या माहेरचं वातावरण अतिशय मोकळे होतं. वडील अतिशय पुढारलेले होते. त्यामुळं घरात मुलामुलींना समान वागणूक दिली जात होती. १९३८ मध्ये त्यांच्या दोन्ही मोठ्या बहिणींना वडिलांनी सहशिक्षण असलेल्या मिशन स्कूलमध्ये घातलं होतं. मुलींनी शिकलं पाहिजे हा त्यांचा आग्रह त्याकाळात आणि हैदराबादसारख्या कर्मठ संस्थानात असून होता. ते स्वतः उर्दू, तेलगू आणि इंग्लिश या भाषांमध्ये पारंगत होते आणि मुलांना शिकवणं ही त्यांची आवड होती. तेच संस्कार शौकतजी यांच्यावरही झाले होते. शौकतजी यांना कैफी आणि अन्य प्रागतिक कवींच्या कवितांनी जबरदस्त प्रभावित केले. कैफींच्या तर त्या प्रेमातच पडल्या. कैफी हे अतिशय अव्वल दर्जाचे कवी म्हणून प्रसिद्ध होते. मात्र कफल्लक होते. कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर असल्यानं कम्युनमध्ये राहत होते. केवळ तीन जोड कपडे एवढंच त्यांच्यापाशी होते. त्यामुळं अर्थातच या प्रेमाला शौकतजींची आई व भाऊ यांचा विरोध होता. वडिलांनी मात्र मुलीला साथ दिली. पण कैफींशी लग्न केलं तर तिला काय सोसावं लागेल याची तिला जाणीव व्हावी म्हणून ते तिला घेऊन मुंबईला आले. कम्युनमध्ये जाऊन त्यांनी तिला कैफी कसं जगतात ते दाखवलं. तरीही निर्धार कायम राहिलेला बघून त्यांनी तिथल्या तिथं त्यांचं लग्न लावून दिलं. तिथले वातावरण खूप मोकळं होतं. सगळे कॉम्रेड व त्यांच्या बायका हे सगळे एका कुटुंबासारखे राहत होते. त्यामुळे एका बाजूला हे अतिशय समृद्ध करणारं वातावरण होते आणि दुसरीकडं तिथे पावलोपावली संघर्ष होता. कधी उपासमार सहन करावी लागत होती, कधी कुचंबणा! मात्र त्याही परिस्थितीत शौकत यांनी जुळवून घेतलं. 

त्यांचं आणि कैफी यांचं सहजीवन फार अनोखं होतं. लग्नानंतर कैफी यांनी आपल्या नवपरिणीत पत्नीला ‘इन्सान का उरूज’ हे पुस्तक भेट दिलं. म्हणजे मानवाचे उत्थान. शौकतजींनी ते पूर्ण वाचून काढलं आणि त्यांना जाणवलं, की हैदराबादमधील वास्तव्यानं त्यांच्या मेंदूत साठलेली सरंजामशाही जळमटं हळूहळू निघून जायला लागली आहेत. त्यानंतर प्रत्येक सुधारणावादी विचार त्यांचं मन तात्काळ स्वीकारायला लागलं. 

त्यांना ‘टी कोझी’चं  जबरदस्त वेड होते. त्या कम्युनमध्ये राहायला आल्या तरी सकाळचा चहा समारंभपूर्वक आरामात पिता यावा ही त्यांची आवड बदलली नव्हती. कोणी कुठंही गेलं तरी त्या त्यांना ‘टी कोझी’च आणायला सांगायच्या. त्या काळात एकदा कॉम्रेड पी. सी. जोशी यांनी त्यांना ‘दिवसभर काय करतेस?’ असं विचारलं. त्या शरमून ‘काहीच नाही’ असं म्हणाल्या. त्यावर ते अतिशय मृदू आवाजात शौकतजींना म्हणाले, ‘कम्युनिस्ट पतीची पत्नी कधी बेकार बसत नाही. तिनं तिच्या पतीबरोबर पार्टीचं काम करायला हवं. पैसे कमवायला हवेत आणि नंतर जेव्हा मुलं होतील तेव्हा त्यांना उत्तम नागरिक बनवायला हवं. तरच ती खऱ्या अर्थानं कम्युनिस्ट पतीची पत्नी ठरू शकते.’ 

हे शब्द म्हणजे शौकतजी यांच्या काळजावर कायमची कोरली गेलेली एक रेघ ठरली. पण पैसे कमवायचे तर काय करणार? कारण त्या जेमतेम मॅट्रिक होत्या. मग त्यांनी विचार केला, की त्या शाळेच्या प्रत्येक वर्षीच्या स्नेहसंमेलनात नाटकं करायच्या. त्यामुळं रेडिओवरच्या नाटकात आपण भाग घेऊ शकतो, आपला आवाज चांगला आहे. चित्रपटातल्या गाण्यांत कोरसमध्ये जरी गायला मिळालं, तरी आपण कमावू शकतो. कैफी त्यांना रेडिओ स्टेशनवर घेऊन गेले. तिथं दुबे नावाचे त्यांचे मित्र होते. त्यांनी यांची ऑडिशन घेतली. त्यात त्या पास झाल्या. रेडिओवरील नाटकात काम करण्यासाठी त्यांना जेव्हा पहिल्यांदा दहा रुपये मिळाले तेव्हा तर त्यांना अत्यानंद झाला. त्याचं वर्णन करणं कठीण आहे असं त्या सांगायच्या. नंतर एस. डी. बर्मन यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी कोरसमध्येही गायलं. त्याचे त्यांना ३० रुपये मिळाले आणि त्या अशी कामं करतात हे कळल्यावर त्यांना डबिंगची कामं मिळायला लागली. त्याचे कधी दोनशे किंवा पाचशे रुपये त्यांना मिळू लागले. त्यानंतर के. ए. अब्बास यांच्या पत्नीमुळं त्या ‘इप्टा’मध्ये आल्या. इप्टा, पृथ्वी थिएटरमधून कामे करत त्यांची अभिनयातील कारकीर्द बहरत गेली. त्यांच्या अभिनयाचा ठसा त्यांनी रजतपटावरही उमटवला. ‘उमराव जान’मधली त्यांची भूमिका तर विसरणंच शक्य नाही. 

शबानाजी सांगतात, की ‘रंगमंच ही खूप मोठी, श्रेष्ठ अशी चीज आहे’ ही पहिली जाणीव मला आईनं करून दिली. तिची रंगभूमीवरील निष्ठा किती अतूट होती याचे अनेक किस्से सांगता येतील. एकदा तिच्या ‘आफ्रिका जवान परेशान’ या ए. के. हंगल यांच्याबरोबरच्या ‘इप्टा’च्या नाटकाचा हैदराबादला प्रयोग होता. त्याची फक्त आठ तिकिटं विकली गेली होती. आठ लोकांसाठी प्रयोग करण्यापेक्षा तो रद्द करावा असं तिथल्या आयोजकांचंही म्हणणं होतं. मात्र शौकतजी यांनी ते मानलं नाही. त्या आठ रसिकांसाठी त्यांनी जीव ओतून तो प्रयोग केला आणि ‘शो मस्ट गो ऑन’ हा संस्कार माझ्यावर कायमचा रुजला. मी अभिनेत्री झाल्यावर मीही कलेशी अशीच बांधिलकी ठेवावी, याबाबतही ती नेहमीच दक्ष राहिली. एकदा मी झोपडपट्टीवासीयांसाठी आंदोलन केलं. आम्ही दंगल केली नसली तरी दंगलीचा आरोप ठेवून आम्हाला अटक केली गेली. त्यामुळं मी चिडले. मी जामीन घेणार नाही असा माझा निर्धार ठाम होता. त्यादिवशी संध्याकाळी माझ्या ‘तुम्हारी अमृता’ या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोग रद्द होण्याची कल्पनासुद्धा तिला मानवणारी नव्हती. जावेदबरोबर ती पोलिस ठाण्यावर आली आणि प्रेक्षकांप्रती कलाकार म्हणून असलेल्या माझ्या बांधिलकीची मला जाणीव करून देऊन, मला जामिनावर सोडवून घेऊन गेली. चित्रीकरणाच्या वेळीही कोणी सहकलाकार उशिरा येतो म्हणून मी उशिरा जाईन असं मी म्हटलं तर ते तिला चालायचं नाही. तुझी बांधिलकी निर्मात्यांशी आणि कलेशी आहे. ती तू पाळलीच पाहिजेस असं ती सांगायची. 

या सगळ्यामुळं कैफींसाठीच नव्हे तर मुलांसाठीही त्या त्यांची ताकद बनल्या. कैफींसाठी तर त्या मिजवाँसारख्या छोट्याशा खेड्यात जाऊन सामाजिक काम करत राहिल्याच; पण ८६ मध्ये शबानाजी जेव्हा झोपडपट्टीवासीयांसाठी मुंबईत उपोषणाला बसल्या, तेव्हा अतिशय आजारी असतानाही जिवाचा रेटा करून शौकतजी रोज जुहूहून कुलाब्याला उपोषणस्थळी जायच्या. घोषणा द्यायच्या आणि परत यायच्या. शबानाजींच्या अपरोक्ष जावेदसमोर (त्यांच्या भाषेत जादू - जावेद यांचे लाडाचे नाव) रडायच्या पण त्यांनी शबानाजी यांच्यासमोर एकदाही डोळ्यातून पाणी काढलं नाही. औषधोपचारासाठी पैसे नसल्यानं शौकतजींचं पहिलं बाळ दगावलं, पावलोपावली संघर्ष करावा लागला, मात्र तरीही त्या जीवनावर कधी रागावल्या नाहीत, त्यांच्या स्वभावात कधी कडवटपणा आला नाही त्या तशाच प्रसन्न राहिल्या... एखादी प्रसन्न शुचिर्भूत, सुस्नात सकाळ उगवावी तशा!

त्यांची आठवण कायम येत राहील...

संबंधित बातम्या