‘पोलर प्रीत’

केतकी जोशी
सोमवार, 24 जानेवारी 2022

‘ती’ची गोष्ट

‘तुम्हाला जे हवं ते मिळवण्याची क्षमता तुमच्यात असते. तुम्ही कुठून आला आहात किंवा तुम्ही कुठून सुरुवात करताय हे महत्त्वाचं नाही. प्रत्येकजण कुठूनतरी सुरुवात करतोच.. आणि मला फक्त चौकट मोडायची नव्हती तर ती संपवायची होती,’ हे ज्या व्यक्तीनं म्हटलं आहे, तिला तो म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. कारण तिनं स्वतः जे ठरवलं ते पूर्ण केलं आणि जगासमोर उदाहरण ठेवलं.

तिचा आपला प्रत्यक्ष परिचय नाही, मात्र गेल्या पंधरवड्यात जगभरातील सगळ्या माध्यमांनी तिची दखल घेतली. ती आपल्यापासून बरीच लांब राहते, तिचं जगही आपल्यापेक्षा खूप वेगळं आहे. तिचे वाडवडील मूळचे भारतीय होतेे, हा तिच्या आणि आपल्यामधला समान धागा. आणि आज ती अनेकांची प्रेरणा बनली आहे, याचं कारण म्हणजे तिनं ध्येय गाठायचं कसं ते दाखवून दिलं आहे. ती आहे कॅप्टन हरप्रीत चंडी. ब्रिटनमध्ये राहणारी मूळ भारतीय वंशाची हरप्रीत आता ‘पोलर प्रीत’ म्हणूनही ओळखली जाते. एकट्याने प्रवास करून पृथ्वीच्या अति दक्षिणेकडील टोकावर अर्थात दक्षिण ध्रुवावर पोचणारी ती अश्वेत जगातली पहिली महिला ठरली आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत तिनं एकटीनं ट्रेक पूर्ण केला, इतकंच तिचं यश मर्यादित नाहीये. हरप्रीतचं खरं यश आहे ते स्वतःच्या क्षमता ओळखण्यात आणि त्यांचा पूर्णांशाने वापर करण्यात. 

अवघ्या तीन वर्षांपूर्वी या ट्रेकबद्दल हरप्रीतला काहीही माहिती नव्हती. पण दक्षिण ध्रुवावर पोचण्याचं ध्येय ठरवल्यानंतर मेहनतीच्या जोरावर हरप्रीतनं तुफान बर्फवृष्टीतला हा ट्रेक पूर्ण केला. बत्तीस वर्षांची  हरप्रीत ब्रिटिश लष्करात कॅप्टन आहे. ती फिजिओथेरपिस्ट आहे, उत्तम अॅथलेटही आहे. चाळीस दिवसांत तिनं हा अत्यंत खडतर ट्रेक पूर्ण केला. जिथं जाण्याच्या कल्पनेनंही भल्याभल्या ट्रेकर्सच्या तोंडचं पाणी पळतं, तिथं जाणं सोपं अजिबातच नव्हतं. त्यासाठी शारीरिक तयारीबरोबरच मानसिक धैर्यही महत्त्वाचं होतं. पण हरप्रीतनं ते करून दाखवलं ते इच्छाशक्ती आणि अखंड मेहनतीच्या जोरावर...या चाळीस दिवसांत तिनं एकूण १,१२७ किमी अंतर पार केलं. फक्त स्वतःपुरता ट्रेक करून ती थांबली नाही. तर आपल्या ब्लॉगवर तिनं लाइव्ह ट्रॅकिंग मॅप अपलोड केला होता. आपल्यासोबतच अनेकांनाही या ट्रेकची सफर तिनं या माध्यमातून घडवली.

चाळीस दिवसांच्या या मोहिमेची तयारी तिनं कशी केली, हे ऐकलं तर थक्क व्हायला होतं. गेल्या वर्षी ७ नोव्हेंबरला सुरू झालेली हरप्रीतची मोहीम या वर्षी ३ जानेवारीला संपली. या चाळीस दिवसांसाठी पुरेल एवढं अन्न, इंधन आणि अवजड किट तिनं स्वतःच वाहून नेलं.  प्रचंड थंडी, तासाला ६० किमी वेगानं वाहणारं हाडं गोठवून टाकणारं वारं, सततची बर्फवृष्टी, उणे ५० अंशांच्याही खाली गेलेलं तापमान अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही हरप्रीत आपल्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत राहिली. ही सगळी तयारी अर्थातच काही महिने किंवा एखाद दोन वर्षांची नव्हती. इथे तिच्या कामी आला तिचा मॅरेथॉन, अल्ट्रा मॅरेथॉन पळण्याचा अनुभव. दक्षिण ध्रुवावर प्रचंड बर्फात स्लेज अडकलं तर तो काढण्याचा सराव म्हणून गेले काही महिने दोन जड टायर हाताने ओढायचा सराव ती करत होती. आर्मी ऑफिसर असल्यानं ती याआधीही अनेक खडतर सरावांमध्ये सहभागी झाली होतीच. नेपाळ आणि केनियामधल्या नेमणुकांनंतर नुकतंच तिला दक्षिण सुदानमधल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता पथकात नेमण्यात आलं होतं. 

“जेव्हा तुम्ही एखादं महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित करता, तेव्हा ते सुरुवातीला आपल्या टप्प्यापलिकडचं वाटतं. पण माझ्या प्रशिक्षणातला प्रत्येक क्षण मला माझ्या ध्येयाच्या जवळ घेऊन गेला,” असं हरप्रीतनं म्हटलंय. ग्रीनलँड आणि नॉर्वेमध्ये झालेल्या प्रशिक्षणाचा आपल्याला खूप फायदा झाला आणि आता माझं ध्येय माझ्या टप्प्यात आहे, असं दक्षिण ध्रुवाच्या या मोहिमेला निघण्यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात तिनं म्हटलं होतं. हरप्रीतनं फक्त आपलं ध्येय समोर ठेवून वाटचाल केली. लाइव्ह ट्रॅकींग मॅप आणि बर्फानं संपूर्ण आच्छादलेल्या भागातून तिनं नियमितपणे तिचे ब्लॉगही पोस्ट केले. 

हरप्रीत सध्या लंडनमध्ये राहते. ती क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमधून स्पोर्ट्स अँड एक्सरसाईज मेडिसिनमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करते आहे. आर्मी रिझर्विस्ट डेव्हिड जॅरमन बरोबर तिचं लग्नही ठरलं आहे. या खडतर मोहिमेवर निघण्यापूर्वी दोघांचा साखरपुडाही झाला. हरप्रीत दक्षिण ध्रुवावरून परत आली की जानेवारी महिन्याच्या अखेरीस चिलीमध्ये हे दोघं एकमेकांना भेटतील. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये तिला मानसिक आधार देणाऱ्या विचारांमध्ये महत्त्वाचे होते तिचे वेडिंग प्लॅन्स. आजूबाजूला नजर जाईल तिथं फक्त बर्फ, माणसांचा मागमूस नाही अशा परिस्थितीत कडाक्याच्या थंडीत लक्ष विचलित होऊ नये यासाठी ती आपल्या वेडिंग प्लॅन्सबद्दल विचार करत असायची, असं तिनं नंतर एका मुलाखतीत सांगितलं आहे. ‘ब्राईड्समेड’ म्हणजे नववधूच्या करवल्यांना लग्नात प्रचंड महत्त्व असतं. लग्नात तुम्ही ब्राईड्समेड होणार का, हे विचारण्याचीही अगदी खास पध्दत असते. हरप्रीतनंही तिच्या बहिणी आणि मैत्रीणींना याबद्द्ल विचारलं तिच्या खास शैलीत... थेट अंटार्क्टिकामधून. ‘मी कुठेतरी वाचलं होतं की ब्राईड्समेड होण्याबद्दल अगदी खास पद्धतीनं विचारलं गेलं तर ते आणखीनच छान वाटतं. म्हणून मी इथून अंटार्क्टिकामधून तुम्हाला विचारतीये की तुम्ही जर माझ्या ब्राईड्समेड झालात तर मला ते खूप आवडेल.’

‘या इतक्या उंचीवर आल्यावर साहजिकच थंडी वाजतेय. इथून मी कुणालाही पाहून शकत नाहीये...आणि मी आता साऊथ पोलपासून फक्त पंधरा नॉटिकल मैल दूर आहे. मी जवळजवळ इथं पोहोचलेच आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये...’ मोहीम पूर्ण होण्यापूर्वीच्या शेवटच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना म्हणजे एक दिवस आधी ती लिहिते. “ही मोहीम माझ्या स्वतःपेक्षा जास्त महत्त्वाची होती. आपल्या क्षमतांच्या पलिकडे जाण्याचा विचार प्रत्येकानं करावा आणि स्वतःवर विश्वास ठेवावा. त्यासाठी दरवेळेस बंडखोरी किंवा विद्रोह करण्याची गरज नसते,” हरप्रीत अगदी सहजपणाने सांगते.

दक्षिण गोलार्धावर ठरलेल्या ठिकाणी पोहोचल्यावर या या ‘पोलर प्रीत’च्या मनात असंख्य भावना उचंबळून येणं स्वाभाविकच होतं. हे धाडस करू नकोस असं सांगणारे अनेकजण तिलाही भेटले. पण ती तिच्या ध्येयाविषयी अविचल राहिली. तिच्या यशावरून एकच वाटतं, तुमच्या क्षमता, तुमच्या मर्यादा फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच माहिती असतात. त्यांचा पूर्ण वापर करा, ध्येय ठरवा, मग ते छोटं असो की हरप्रीतसारखं एखादं इतिहास घडविणारं... त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत राहा, जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा तुम्हालाही ‘पोलर प्रीत’ झाल्याचाच अनुभव येईल.

 

संबंधित बातम्या