‘डिस्ने’ची धुरा सांभाळणारी सुझन

केतकी जोशी
सोमवार, 31 जानेवारी 2022

‘ती’ची गोष्ट

डिस्नेच्या ९८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्चपद एका महिलेकडे सोपवण्यात आले आहे. प्रदीर्घ परंपरा असणाऱ्या कंपन्यांच्या सर्वोच्चपदी जाण्याची सुझनची ही दुसरी वेळ आहे. पंधरा वर्षांपूर्वी सुझनने ‘प्रॉक्टर अँड गँम्बल’च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हाही प्रॉक्टर अँड गँम्बलच्या त्यावेळच्या १८० वर्षांच्या इतिहासात हे सर्वोच्च पद पहिल्यांदाच एका महिलेकडे देण्यात आले होते. 

तिनं वयाच्या ६७व्या वर्षी एक नवी इनिंग सुरू केली आहे. ही तिची नवी इनिंग संपूर्ण मनोरंजन जगासाठी ऐतिहासिक आहे. जे पद मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक दिग्गजांसाठी स्वप्नवत आहे, त्या पदावर ती मेहनत, अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर पोहोचली आहे. ती आहे सुझन अरनॉल्ड! सुझनने काही आठवड्यांपूर्वीच ‘वॉल्ट डिस्ने’ या जगप्रसिद्ध कंपनीची अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. महत्त्वाचे म्हणजे सुझनच्या रूपाने डिस्नेच्या ९८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्चपद महिलेकडे सोपवण्यात आले आहे. प्रदीर्घ परंपरा असणाऱ्या कंपन्यांच्या सर्वोच्चपदी जाण्याची सुझनची ही दुसरी वेळ आहे. पंधरा वर्षांपूर्वी सुझनने प्रॉक्टर अँड गँम्बलच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हाही ‘प्रॉक्टर अँड गँम्बल’च्या त्यावेळच्या १८० वर्षांच्या इतिहासात हे सर्वोच्च पद पहिल्यांदाच एका महिलेकडे देण्यात आले होते. 

खरंतर अनेकांच्या लेखी सत्तरीचा उंबरठा म्हणजे नातवंडांबरोबर वेळ घालवण्याचं किंवा स्वतंत्रपणे राहून आपलं राहून गेलेलं आयुष्य जगण्याचं वय, पण सुझन मात्र आणखी एका नव्या आव्हानाला सामोरी गेली आहे.

डिस्नेसारख्या अत्यंत नामांकित कंपनीची धुरा सांभाळणं म्हणजे एक शिवधनुष्यच आहे. पण गेली १४ वर्षे डिस्ने व्यवस्थापनाची सदस्य असणारी सुझन त्या पदाला पूर्ण न्याय देईल, याची संचालक मंडळाला खात्रीच होती. याचं कारण म्हणजे सुझनच्या गाठीशी असलेला प्रचंड अनुभव. आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतील एकापेक्षा एक बड्या कंपन्यांमध्ये अत्यंत जबाबदारीच्या पदांवर तिनं काम केलं आहे. ‘कार्लाईल’ या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ग्रुपबरोरच तिनं जगभरात पसरलेल्या ‘मॅक डोनाल्ड’ या फास्ट फूड चेनची एक्झिक्युटिव्ह म्हणूनही आपला ठसा उमटवला आहे. 

पेनसिल्व्हानिया विद्यापीठाची कलाशाखेची आणि पिट्सबर्ग विद्यापीठाची व्यवसाय व्यवस्थापनाची पदवी घेतलेली सुझन १९८०च्या दशकात सौंदर्य प्रसाधने आणि अन्य ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या क्षेत्रात दबदबा असणाऱ्या प्रॉक्टर अँड गॅम्बलमध्ये रुजू झाली ती ब्रँड असिस्टंट म्हणून. व्यवस्थापन आणि मार्केटिंग विभागात अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना १९९०मध्ये तिच्यावर प्रॉक्टर अँड गॅम्बलच्या कॅनडातील सौंदर्यप्रसाधनांच्या व्यवसायाच्या व्यवस्थापक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली, आणि १९९९मध्ये तिनं या सौंदर्यप्रसाधनांच्या जगभरातील व्यवसायाची धुरा हाती घेतली. २००४मध्ये सुझनची प्रॉक्टर अँड गॅम्बलच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. तर २००७मध्ये तिनं प्रॉक्टर अँड गॅम्बलचं अध्यक्षपदही भूषवलं. 

आजही जगभरातील लहानथोरांना वेड लावणारे ‘मिकी माऊस’, ‘मिनी माऊस’ आणि ‘डोनाल्ड डक’ अशी मुलखावेगळी पात्रे किंवा ‘द लायन किंग’, ‘जंगल बुक’, ‘टारझन’, ‘स्नो व्हाइट, ‘सिंड्रेला’, ‘अलाउद्दीन’ असे एकाहून एक सरस चित्रपट निर्माण करणारी कंपनी एवढीच आज डिस्नेची ओळख नाही. शताब्दीकडे वाटचाल करणाऱ्या डिस्नेचा पसारा ‘डिस्ने लँड’, ‘डिस्ने रिसॉर्ट’, ‘डिस्ने क्रूझ लाइन’, ‘डिस्ने व्हेकेशन क्लब’ अशा विविधांगाने बहरला आहे. एक वैभवशाली परंपरा असणाऱ्या या कंपनीचं चेअरमनपद भूषवणं हा सुझनचा सन्मान आहेच, पण सध्याच्या काळात ती एक जबाबदारीही आहे.

मावळते अध्यक्ष बॉब आयगर यांच्याकडून सुझनने नवी जबाबदारी स्वीकारली. “सुझनकडे अनुभवाचा प्रचंड साठा आहे, अफाट कार्यक्षमता आहे आणि अनुभवी नजरेतून आलेलं शहाणपणही आहे. २००७मध्ये ती बोर्डाची सदस्य झाल्यापासून तिच्या या ज्ञानाचा कंपनीला उपयोग होत आहे,” अशा शब्दांत आयगर यांनी सुझनविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आयगर यांच्या म्हणण्याला खरोखरच वजन आहे. कारण आयगर यांनी निवृत्ती म्हणजे डिस्नेच्या एका कालखंडाची समाप्ती मानली जात आहे. त्यामुळे अर्थातच आयगर यांच्या निवृत्तीनंतर सुझन यांच्याकडूनही फार मोठ्या अपेक्षा आहेत.

या पदासाठी झालेली सुझनची निवडही चर्चेत आहे. खरंतर डिस्नेचे सीईओ बॉब चॅपेक यांची चेअरमनपदी निवड होण्याची शक्यताही चर्चेत होती. अनेक बड्या कंपन्यांमध्ये सध्या मुख्य कार्यकारी आणि अध्यक्ष एकच असण्याची प्रथा आहे. मात्र गुंतवणूकदार, प्रशासन यांच्या दबावामुळे सुझन यांची निवड झाली, याला खूप वेगळा अर्थ आहे. सुझनच्या गाठीशी खूप मोठ्या कंपन्यांमधील अनुभव तर आहेच. पण त्याशिवाय केवळ अमेरिकेतलाच नव्हे तर जगभरातील एक प्रमुख इन्व्हेस्टमेंट ग्रुप असणाऱ्या कार्लाईल ग्रुपमधील त्यांच्या सहभागामुळेही सुझनच्या नावासाठी आग्रह धरण्यात येत होता, असंही सांगितलं जातं. दुसरं म्हणजे कोरोनाची लाट, त्यानंतरचं आर्थिक संकट यामध्ये डिस्नेचं प्रचंड आर्थिक नुकसान झालं. अशातच डिस्नेचे काही चित्रपटांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांचं नुकसान झालं. त्यामुळे आता आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुझन यांच्या निवडीला पाठिंबा दिला जात गेला, असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. 

या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल इतकी क्षमता सुझनमध्ये आहेच. फॉर्च्युन मासिकाच्या ‘जगातील पन्नास सर्वात प्रभावी व्यावसायिक महिलां’च्या यादीत २००२ सालापासून ती सातत्यानं झळकतीये. वर्ष २००८मध्ये ती या यादीत सातव्या क्रमांकावर होती. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या २००४-०५ सालच्या ‘फिफ्टी वूमेन टू वॉच’ या यादीतही सुझन होती. उद्योग व्यवसायात महिलांच्या प्रगतीसाठी चालवण्यात येणाऱ्या ‘कॅटलिस्ट’ कंपनीच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्यपदीही ती काही वर्षे होती. म्हणजे फक्त स्वतः बिझनेस वूमन होण्याबरोबरच त्या क्षेत्रात अन्य महिलांनी यावं यासाठीही ती प्रयत्न करते. 

फक्त महिला आहे म्हणून सुझनची निवड झालेली नाही तर तिच्या कर्तृत्वामुळे तिनं ती करायला भाग पाडली आहे. तिच्या निवडीमुळे अनेक महिलांसाठी कदाचित तिथली काही दारं खुलीही होतील. ‘बोर्डाची अध्यक्ष’ ही नवीन भूमिका स्वीकारताना डिस्नेच्या शेअरहोल्डरसोबत असलेलं नातं आणखी दृढ होईल असा मला विश्वास आहे. तसंच एक शतकभराची परंपरा लाभलेल्या या कंपनीला अत्युच्च स्थानावर पोहोचवण्यात मोठं योगदान असलेल्या सीईओ बॉब चेपॉक यांच्या बरोबर काम करण्यासाठी मी उत्सुक आहे,’ असं सुझननं तिच्या निवेदनात म्हटलं आहे.  फक्त महिला म्हणून नाही तर ‘बिझनेस आयकॉन’ म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या सुझनचा वाढदिवस ८ मार्च म्हणजेच महिला दिनी असतो, हे विशेष..

 

संबंधित बातम्या