फक्त वीस मिनिटं  जास्त झोप हवी...

केतकी जोशी
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

‘ती’ची गोष्ट

अपुरी,अशांत झोप आणि त्याचे होणारे परिणाम हे एक दुष्टचक्र आहे. शारीरिक बदलांमधून जात असताना प्रत्येक महिलेमध्ये हार्मोनल बदलही बरेच होतात. शारीरिक अस्वस्थता किंवा दुखणी, वेदना यामुळंही महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते. पण रोजच्या व्यग्र दिनक्रमात झोप अत्यावश्यक आहे, याकडे दुर्लक्षच होतं आणि सततच्या अपुऱ्या झोपेमुळे अनेक महिलांच्या तब्येतीवर परिणाम होतो.

तुमच्या स्वप्नांवर तुमचं भविष्य अवलंबून असतं, असं म्हटलं जातं आणि यशस्वी आयुष्याची स्वप्नं जागेपणीच पाहायला हवीत हे खरं असलं तरी स्वप्न पाहण्याचा आणि ती पुरी करण्याचा संदर्भ आणखी एका महत्त्वाच्या गोष्टीशीही आहे -प्रत्येकाला हवी असणारी आणि आवश्यकही असणारी शांत झोप. पण आपल्या आजूबाजूच्या अनेकांच्या नशिबी हे सुख असतंच असं नाही. बायकांच्या बाबतीत बोलायचं तर अनेकींना हवी तशी पुरेशी झोप मिळत नाही, हेही तितकंच खरं. अर्थातच प्रत्येकीची कारणं वेगळी असतात. पण गेल्या काही वर्षांमध्ये केल्या गेलेल्या संशोधनानुसार स्त्रियांना पुरुषांपेक्षा झोपेची गरज जास्त असते, असं स्पष्ट झालं आहे. पण मुख्य प्रश्न आहे तो, स्त्रियांना हवी तितकी किंवा खरंतर पुरेशी झोप मिळते का हाच.  

इंग्लंडमधील लॉबोरो युनिव्हर्सिटीतल्या स्लीप रिसर्च सेंटर या झोपेवर संशोधन करणाऱ्या केंद्राने अलीकडेच केलेल्या अभ्यासातून स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त गरज असते असा निष्कर्ष पुढे आला आहे. पण जास्त म्हणजे किती जास्त? तर फक्त २० मिनिटं...अभ्यासातूनच हे स्पष्ट झालं आहे की पुरुषांच्या तुलनेत फक्त वीस मिनिटं जास्त झोप स्त्रियांना मिळाली तर त्यांचं मानसिक आरोग्य उत्तम राहतं. यामागचं मुख्य कारण म्हणजे मल्टीटास्कर असणाऱ्या स्त्रियांचा मेंदू जागे असताना जास्त दमतो. त्यामुळेच ही जास्तीची वीस मिनिटं त्यांच्यासाठी खूप मोठा दिलासा असू शकतो. 

पूर्णवेळ गृहिणी असो किंवा ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया किंवा स्वतःचा व्यवसाय करणारी बिझनेस वुमन किंवा अगदी पार्ट टाइम छोटा जॉब करणारी स्त्री...प्रत्येकीवरच्या जबाबदाऱ्या सारख्याच असतात. म्हणजे आपलं ऑफिस किंवा घरचं काम करायचं, मुलंबाळं, सासर-माहेरच्या जबाबदाऱ्या, नोकरीतील ताण-तणाव, स्वयंपाक, पै-पाहुणे अशा अनेक गोष्टी सांभाळण्याची तारेवरची कसरत प्रत्येकच महिला करत असते. अर्थातच हे मल्टीटास्किंग भरपूर थकवणारं असतं. त्यातच जगात सगळीकडेच स्त्रियांकडून नेहमीच अवाजवी अपेक्षा ठेवल्या जातात आणि या जबाबदारीचं ओझंही त्यांच्यावर असतं. हे सगळं पाहता शांत आणि पुरेशी झोप हा प्रत्येक स्त्रीचा अधिकार असतोच. पण तो तिला मिळतोच असं नाही. त्यात लहान मुलं असतील तर मग महिलेला ही रात्रीची झोपही कित्येकदा मिळतही नाही.

अपुरी झोप हा कशाचा तरी परिणाम नाही तर ते अनेक 

आजारांचं लक्षण असू शकतं, असं इंग्लंडमधील वॅटफोल्ड येथील कन्सल्टिंग स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. हिमांशू बोरसे यांचं म्हणणं आहे. “म्हणजे ताप जसा अनेक आजारांचं लक्षण असतो. पण तो मुख्य आजार नसतो, तसंच झोपेच्या बाबतीतही म्हणता येईल. अनेकदा झोप अपुरी होण्यामागे किंवा अशांत झोप लागण्यामागे ऑफिसमधील ताणतणाव, घरच्या जबाबदाऱ्या, आर्थिक अस्थिरता अशी कारणं असू शकतात. या कारणांमुळे झोप नीट न लागणं, उशिरापर्यंत न लागणं, अपुरी झोप होणं असं होतं. “असं सतत झालं की त्याचा शरीरावर परिणाम व्हायला सुरुवात होते,” असं डॉ.बोरसे म्हणाले. ताणतणावामुळे, परिस्थितीमुळे अपुरी झोप होते, मग त्यामुळे पुन्हा चिडचिड, अस्वस्थता, ताण वाढणं आणि त्याचा परिणाम पुन्हा झोपेवर असं हे चक्र सुरूच राहतं. खरंतर महिलांची झोप ही पुरुषांपेक्षा जास्त चांगली असते. म्हणजे त्या पटकन झोपेच्या अधीन होऊ शकतात. पण अनेक कारणांमुळे झोप डिस्टर्ब होते. याचा परिणाम अर्थातच शरीरावर होतो. मासिक पाळीचं चक्र बिघडतं, गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असलेल्या महिलांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.”

कोरोनाच्या महासाथीच्या काळात अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. याचा स्त्रियांच्या झोपेवर आणि पर्यायानं आरोग्यावरही परिणाम झाल्याचं मानसोपचारतज्ज्ञ आणि न्यूयॉर्कच्या अल्बर्ट एलिस इन्स्टिट्यूटमध्ये असोसिएट फेलो असलेल्या डॉ. वैशाली चव्हाण सांगतात. “स्त्रियांना पुरुषांपेक्षा २०-३० मिनिटे जास्त झोप आवश्यक असते असं नॅशनल लिबर्टी मेडिसीनचं २०१४ मधील एक संशोधन सांगतं. या महासाथीमध्ये चिंता, नैराश्य या  आजारांनी डोकं वर काढलं आहे.  हे दोन्ही आजार तसंच वर्क फ्रॉम होम किंवा लॉकडाउनमुळे म्हणा शारीरिक हालचालींवर निर्बंध आल्यामुळे झोपेवर दुष्परिणाम झाला आहे. मुळात स्त्रियांमध्ये चिंता व नैराश्य हे विकार पुरुषांच्या तुलनेत दुप्पट प्रमाणात आढळून येतात. स्त्रियांना आधीच कराव्या लागणाऱ्या मल्टीटास्किंगमध्ये कोरोनाकाळात अंगावर पडलेल्या वाढीव जबाबदाऱ्या, काळज्यादेखील, उदाहरणार्थ, घरातील आजारी व्यक्तींची काळजी घेणं, घरची कमाई कमी होणं किंवा थांबणं, स्त्रियांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरल्या आहेत.

आपल्याकडे आजही बऱ्याच ठिकाणी स्त्रियांनी त्यांच्या गरजा बोलून दाखवणे, त्या पूर्ण करणे मान्य नाही. सकाळी लवकर उठून कामाला न लागणाऱ्या सुनांवर तर ‘आळशी’ किंवा ‘कामचुकार’ असा शिक्काच बसतो. अशा बंधनांमुळे अनेकजणी आपण थकलो आहोत व आपल्याला विश्रांतीची गरज आहे, असे स्पष्टपणे व्यक्त करणे सुद्धा टाळतात. कितीही थकल्या तरी स्वतःला खेचत राहतात. मग अपुऱ्या झोपेमुळे होणारे उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार व मानसिक आजार हे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळतात. 

पुरुषांच्या तुलनेत अधिक जबाबदाऱ्या, अपेक्षांचं ओझं उचलणाऱ्या, बंधनांना सामोरे जात असणाऱ्या स्त्रियांसाठी झोप हा हक्काचा विसावा आहे. सध्याच्या काळात तर आर्थिक गणित जमवताना होणारी दमछाक, करिअर, घर यांच्यात समतोल साधताना होणारी धावपळ या सगळ्यासाठी प्रत्येक स्त्रीनं पुरेशी झोप घेणं अत्यावश्यक ठरते आहे. त्यामुळे स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज आहे का? आणि जास्त झोपेची का गरज आहे? यावर संशोधन सुरूच आहे. तज्ज्ञांच्या मते थोड्याशा गोष्टींचं योग्य नियोजन केलं तर हे शक्य होऊ शकतं. या काही गोष्टी मात्र नक्की लक्षात ठेवा -

  • रोज झोपेची आणि उठण्याची वेळ नक्की ठरवून घ्या
  • स्वतः:ला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अॅक्टिव्ह ठेवा. व्यायामासाठी म्हणून रोजचा अर्धा तास राखून ठेवा
  • दुपारी दोननंतर चहा-कॉफीचं सेवन मर्यादित ठेवा
  • झोपायला जाण्यापूर्वी एक तास आधी तुमचा मोबाईल लांब ठेवा
  • तुमच्या खिशाला परवडतील अशी पण स्वच्छ अंथरुणं, पांघरुणं घ्या
  • झोपताना दिवसभरातले सगळे ताण तणाव बाजूला ठेवा
  • महत्त्वाचं म्हणजे तुमचा ‘सुपरवुमन सिंड्रोम’ म्हणजे मीच सगळं करणार हा हट्ट बाजूला ठेवा.

अगदी साध्या गोष्टी आहेत या. पण या केल्यात तर नक्की फरक पडू शकतो. पुरुष असो किंवा स्त्री झोप ही नैसर्गिक अत्यावश्यक गरज आहे. पण स्त्रियांची झोप बिनसली तर मात्र त्यांच्या तब्येतीबरोबरच घरातलं वातावरणही बिघडू शकतं. लक्षात असू द्या, “लेट हर स्लीप, फॉर व्हेन शी अवेकस, शी विल शेक द वर्ल्ड...!”

 

संबंधित बातम्या