‘द क्वीन्स् गॅम्बिट’

केतकी जोशी
सोमवार, 7 मार्च 2022

‘ती’ची गोष्ट

दिवसाकाठी बारा-बारा तास लोकांकडे घरकाम करायचं. कामावर गेलं नाही तर पैसे नाहीत, परिस्थिती जेमतेमच. वयाच्या पंचविशीतच एकट्यानेच मुलाचा सांभाळ करायचा. अशा परिस्थितीला शरण न जाता आपल्या स्वप्नाची ज्योत जागती ठेवायला मनाची घडण तशीच घट्ट लागते. पण काही थोडी लोकं असतात अशी घट्ट. ब्राझीलमधली एका तरुण मुलगी अशीच. तिनं पाहिलेलं स्वप्न जपलं. ज्या परिस्थितीत हे स्वप्नं तिनं पूर्ण केलं ती बघितली तर तिच्या ध्येयपूर्तीचं महत्त्व लक्षात येतं. ती आहे ब्राझीलची सिबाले फ्लॉरेन्झिया.. 

फुटबॉल हा श्वास असलेल्या ब्राझीलमध्ये सिबाले फ्लोरेन्सिओनं बुद्धिबळासारख्या ‘बैठ्या’ समजल्या जाणाऱ्या खेळात नाव कमावलं आहे. गेल्या वर्षी ब्राझीलच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेती ठरली तेव्हा सिबाले फक्त २४ वर्षांची होती. अन्य खेळाडू तास न् तास सराव करतात, खेळाचा, चालींचा विचार करत असतात, त्या वेळेस सिबाले लोकांच्या घराची साफसफाईची करत असायची. दिवसातले बारा तास.
सिबाले राहत असलेला ब्राझीलच्या ईशान्येकडील भाग अगदी गरीब म्हणून ओळखला जातो. ब्राझीलमध्ये फुटबॉलचं किती वेड आहे हे काही वेगळं सांगायला नको. अशा देशात अजूनही ‘उच्चभ्रू’ समजल्या जाणाऱ्या बुद्धिबळात सिबालेनं आपलं नाव कोरलं आहे. एक घरकाम करणारी मुलगी बुद्धिबळ खेळते, स्पर्धांमध्ये सहभागी होते, या ‘कारणां’मुळे तिला आजवर भरपूर टोमणे ऐकायला लागले आहेत. पण पूर्ण प्रतिकूल परिस्थितीलाच यशाचा मार्ग कसा बनवायचा हे सिबालेकडून शिकावं. ती म्हणते, “माझ्या प्रतिस्पर्ध्यांना आश्चर्य वाटायचं की ही इथं काय करतीय. मी याच गोष्टीचा फायदा घेतला. कारण ते माझ्याबद्दल फक्त हाच विचार करत बसायचे...आणि मी खेळाचा…’’ 
एरवी सिबाले सध्याच्या काळातल्या इतर कोणत्याही तरुणीसारखीच आहे. तिच्या हातावरच्या टॅटूमध्ये तिला आवडणाऱ्या सिंहाची प्रतिमा आणि तिचा पाच वर्षांचा मुलगा निकोलस याच्या नावाची अक्षरंही गोंदवून घेतलेली आहेत. सिबालेच्या मित्रमैत्रीणींनी तिची तुलना नेटफ्लिक्सवरील वेबसीरीज ‘द क्वीन्स गॅम्बिट’च्या नायिकेशी करतात. १९५०च्या दशकात अमेरिकेत बुद्धिबळ जगतात अव्वल स्थान मिळवणाऱ्या एका धडपड्या तरुणीची गोष्ट म्हणजे ‘द क्वीन्स गॅम्बिट’.  एलिझाबेथ हार्मन ही यातली नायिका. वॉल्टर टेव्हीसयाच्या १९८३ मधील कादंबरीवर ही वेबसीरीज आधारित आहे. एलिझाबेथ ही एक अनाथ मुलगी. तिला बुद्धिबळ जगतात स्थान मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला होता. बेथच्या आणि तिच्या स्वतःच्या गोष्टीत खूप साम्य आहे, असं सिबालेला वाटतं. 
बुद्धिबळाशी ओळख झाली तेव्हा सिबालेची फक्त नऊ वर्षांची होती. बुद्धिबळानं तिला अक्षरश: वेड लावलं. धुळीनं माखलेल्या वर्गांमध्ये तासन तास बुद्धिबळाचे डाव टाकत एकही शब्द न बोलता तिनं शाळेत तिच्या अनेक प्रतिस्पर्ध्यांना हरवलं आणि तिच्या शिक्षकांचं लक्षही वेधून घेतलं. “तिचा फोकस अगदी स्पष्ट असायचा. प्रतिस्पर्धी खेळाडूची नेमकी चाल कशी असू शकते याचं बरोब्बर गणित तिच्या डोक्यात असायचं. ते डोळ्यासमोर आणूनच ती खेळायची,” असं बुद्धिबळाचे शिक्षक मॅक्सिमो मॅसीडो सिबालेबद्दल सांगतात. तिची चिकाटी, विचार हे सगळं सगळं तिच्यावर झालेल्या संस्कारांतून आलं आहे असं त्यांना वाटतं. 
सिबालेचं गाव म्हणजे  जगभरच्या पर्यटकांसाठी स्वप्ननगरी असणारं रिओ-द-जानिरो. रिओच्या एकूण लोकसंख्येपैकी चाळीस टक्के कुटुंबं अत्यंत गरिबीत राहतात. सिबाले आणि तिचे सहा भाऊ बहीण असं एक मोठं कुटुंबही त्यातलंच एक. लोकांच्या घरात स्वयंपाक करायला जाणारी तिची आई स्वतःच्या कुटुंबाला मात्र पुरेसं खायला घालण्याच्या परिस्थितीत नसायची. त्यामुळे सिबाले आणि तिच्या भावाबहीणींना अनेकदा अर्धपोटीच झोपायला लागायचं. रिओतल्या सिबालेच्या याच घरात ती अजूनही राहते. या छोट्याशा घराच्या भिंती आता मेडल्स, गोल्ड कप्सनं भरून गेल्या आहेत. याच अत्यंत गजबजलेल्या दरिद्री वस्तीत, एकीकडे कोंबड्यांचा कलकलाट, दुसरीकडे वस्तीतल्या लोकांची गडबड अशा वातावरणात आपल्या छोट्याशा घराबाहेरच्या प्लास्टिक टेबलवर सराव करत तिनं अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. या अशा कोलाहलात सिबालेला ही एकाग्रता कशी गवसली असेल याचंच राहून राहून आश्चर्य वाटतं. 
शाळेतल्या स्पर्धा खेळत असताना सिबालेनं तिच्या जुन्या मोबाईलवर बुद्धिबळाचा सराव सुरू केला. मोबाईल अॅपवर काल्पनिक प्रतिस्पर्ध्यांसोबत खेळताना सुरुवातीला अनेकदा तिला हार पत्करावी लागली. पण ती मनानी कधीच हरली नाही. अगदी रिचार्ज केला नाही म्हणून इंटरनेट कट होईपर्यंत ती सतत सराव करायची, मग कधीतरी  तिच्या तुटपुंज्या कमाईतून इंटरनेट कनेक्शन रिचार्जही व्हायचं. शाळा सोडल्यानंतर तिनं घराशेजारच्या सधन वस्तीतल्या घरांमध्ये कामं करायला सुरुवात केली. दिवसभराच्या कष्टानं ती इतकी थकून जायची की तिला रात्री परत सराव करायचीही ताकद राहायची नाही. त्यातच जगण्याच्या खेळाची चाल कुठेतरी चुकली आणि सिबालेच्या नशिबात एक अर्धवट राहिलेला संसारही आला. पण बुद्धिबळाच्या पटावरची तिची चाल सुरूच राहिली. कधीकधी ती तिचा मुलगा आणि चुलत भावाबरोबर शेअर करत असलेल्या अरुंद खोलीत पडून राहायची आणि डोक्यात सतत खेळाचे विचार करत रात्र जागवायची. 
फुटबॉलचं वेड असलेल्या ब्राझीलमध्ये अगदी स्थानिक पातळीवरच्या खेळाडूंनाही प्रायोजकत्व मिळतं, पण बुद्धिबळ खेळणाऱ्याला असं प्रायोजकत्व अप्राप्यच. सिबालेनं मात्र ती काम करत असलेल्या घरांपैकी एका घरमालकांकडे मोर्चा वळवला. ब्राझीलच्या कृषी खात्यात असलेले अधिकारी अँड्रे बॉर्गस आणि लिगिया यांनी तिला मदत केली. खरंतर ती खेळू शकेल की नाही याचाही त्यांना विश्वास नव्हता, पण तरी त्यांनी तिची राष्ट्रीय चॅम्पियनशीपसाठी असलेली तीस डॉलरची प्रवेश फी भरली. सिबाले ज्या गटात खेळत होती, तिथं केवळ तीन मिनिटांत खेळ संपवण्याचं आव्हान असतं. तिचा खेळ पाहून ब्राझिलच्या बुद्धिबळ संघटनेचे प्रमुख तिच्याकडे आले आणि तिला म्हणाले की तुला कदाचित तुझा पासपोर्ट तयार करावा लागेल. कारण त्यावर्षी वर्ल्ड रॅपिड अॅण्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप पोलंडमध्ये होणार होती. सिबालेचा एक  चुलत भाऊ रेडिओ होस्ट आहे. त्यानं त्याच्या शोमध्ये सिबालेला मदत करण्याचं आवाहन केलं. एका स्थानिक हॉस्पिटलचे मालक मार्सेडो क्यॅस्युडो हा शो ऐकत होते. त्यांनी तिला मदत देऊ केली. तिनं आतापर्यंतचं आयुष्य फक्त संघर्ष केला होता. तिचा स्पर्धेसाठी जाण्याचा सगळा खर्च त्यांच्या हॉस्पिटलनं केला. डॉक्टरांनी मिळून सिबालेला पोलंडमधल्या कडाक्याच्या थंडीत उपयोगी पडतील असा ओव्हरकोट आणि बूट घेऊन दिले. आपल्या वस्तीपलीकडेही कधी फारसा प्रवास न केलेली सिबाले थेट पोलंडला गेली. 
कोणतंही अधिकृत प्रशिक्षण नसताना, यूट्यूबवरचे फक्त शंभरएक व्हिडिओ पाहून ती खेळली, हरली, पण मागे हटली नाही. तिच्यामागे उभ्या राहिलेल्या हॉस्पिटलनं नंतरही इतर काही स्पर्धां खेळण्यासाठी तिला खूप मदत केली, तिला तिथंच कायमस्वरूपी काम दिलं. अजूनही सिबालेनं तिची जिद्द सोडलेली नाही. अर्थात एखाद्या ब्राझिलिअन फूटबॉलपटूएवढं ग्लॅमर तिला मिळालं नाही, पण तिला तिनं यशाचा एक टप्पा गाठला आहे. 
बुद्धिबळामध्ये प्रत्येक प्यादं महत्त्वाचं असतं... कारण शेवटपर्यंत एकेक घर चालत तेच डावाचा रोख बदलू शकतं. आजूबाजूला कितीही नकारात्मकता असली तरी आपलं स्वप्नं आपणच फुलवायचं, तेवत ठेवायचं हाच सिबालेच्या कष्टांचा धडा.

संबंधित बातम्या