ये घर बहुत हसीन है....

केतकी जोशी
सोमवार, 14 मार्च 2022

‘ती’ची गोष्ट
 

आपल्याकडे महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि अर्थसाक्षरता अजूनही हवी तितकी नाही. तरीही गुंतवणूक म्हणून घर घेण्याकडे महिलांचा वाढलेला कल ही नक्कीच एक सकारात्मक बाब आहे. आपलं घर ही प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी संकल्पना आहे. स्त्रियांसाठी तर हे घर म्हणजे फक्त चार भिंतीच नसतात, त्यांचं अवघं जग त्यात सामावलेलं असतं, त्यांची नाती असतात, हे घर त्यांचं अस्तित्व असतं..

“इन भुलभुलैय्या गलियों में, अपना भी कोई घर होगा
अम्बर पे खुलेगी खिड़कीया, खिड़की पे खुला अम्बर होगा”

‘घरोंदा’ चित्रपटातलं हे कित्येकांच्या मनात अजूनही रूंजी घालणारं हे गाणं... आपलं हक्काचं घर असावं, तिथे आपली हक्काची जागा असावी, ते घर आपल्या आवडीप्रमाणे सजवलेलं असावं, तिथल्या वस्तू आपल्या आवडीच्या असाव्यात असं प्रत्येक मुलीचं, बाईचं म्हणू हवं तर, स्वप्नं असतं. लग्नाच्या आधी आईवडिलांचं घर आणि लग्नानंतर नवऱ्याचं घर म्हणजे सासर हेच बाईचं घर असं भारतात परंपरेनं अजूनही प्रत्येक मुलीच्या मनावर ठसवलेलं असतं. असं असलं तरी तिच्या मनात तिच्या हक्काच्या घराची ओढ काही कमी होत नाही. इतके दिवस कदाचित ह्या स्वप्नाला मूर्त रूप येत नसेल, पण आता मात्र हे चित्र बदलतंय. एका खासगी सर्व्हेवरून हे लक्षात येतं. निदान महानगरांमध्ये तरी आता अधिकाधिक महिला स्वतःच्या नावावर घर घेऊ लागल्या आहेत किंवा गुंतवणूक म्हणून रिअल इस्टेटकडे त्या गांभीर्यानं पाहू लागल्या आहेत, असं या सर्व्हेवरून स्पष्ट होतं. 

अॅनॉरॉक या मुंबईतील  इमारत बांधणी ग्रुपनं हा सर्व्हे केला आहे. या कन्झ्युमर सेंटिमेंट सर्व्हेमध्ये घरखरेदीमध्ये मुख्य निर्णयकर्त्या म्हणून अधिकाधिक महिला पुढे येत असल्याचं दिसून येतंय. घर खरेदी करणाऱ्या जवळपास ६४ टक्के महिला घरखरेदीकडे गुंतवणूक म्हणून पाहत असल्याचं या सर्व्हेत म्हटलं आहे. या आधीच्या सर्वेक्षणात हे प्रमाण ६२ टक्के होतं तर कोविडपूर्व काळात म्हणजे २०१९मध्ये हे प्रमाण ५७ टक्के इतकं होतं. त्यानुसार जवळपास ४१ टक्के महिलांनी थ्री-बीएचचके प्लॅट खरेदीला प्राधान्य दिलं आहे तर ३६ टक्के महिलांनी टू-बीएचकेला पसंती दिली आहे. तर ११ टक्के महिलांना फोर-बीएचके फ्लॅट किंवा त्याहीपेक्षा मोठ्या फ्लॅटमध्ये गुंतवणूक करायला आवडेल असं त्यांनी म्हटलंय.

या सर्व्हेच्या निमित्ताने आणखी एक महत्त्वाची गोष्ट अधोरेखित झाली आहे, ती म्हणजे महिलांची घर खरेदीबाबतची बदलती मानसिकता. अगदी  फार पूर्वी महिलेच्या नावावर घर असणं किंवा घरावर महिलेचं नाव असणं म्हणजे अगदीच दुर्मीळ गोष्ट होती. पण महिला कमावत्या झाल्या, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्या, घरातला आर्थिक भार उचलू लागल्या आणि मग घरासाठी कर्ज काढण्यात त्या सहभागी होऊ लागल्या. मोठ्या शहरांमध्ये आणि उपनगरांमध्ये नवरा बायकोनं मिळून एकत्र घर घेणं आणि घरावर नवऱ्याबरोबर बायकोचंही नाव असणं, हे आता फार नवीन राहिलेलं नाही. पण आता निदान मोठ्या शहरांमध्ये बायका किंवा अगदी तरुण  मुलीही स्वतःच्या नावावर घरं घेऊ लागल्या आहेत. यातील काही मध्यमवयीन नोकरदार महिला आधीचं एक घर असतानाही गुंतवणूक म्हणून घर घेण्याला पसंती देतात. तर दुसरीकडे अगदी वयाची तिशी गाठण्याच्या आतच भक्कम पगार हातात येत असल्याने तरुण मुलीही आपल्या नावावर घर घेऊ लागल्या आहेत. 

काही वर्षांपूर्वी मुलीचं लग्न करून देण्याआधी मुलाच्या नावावर घर आहे ना हे बघितलं जायचं. त्याच्या वाडवडिलांचं घर असलं आणि तो नोकरीनिमित्त जिथे राहात असेल तिथे त्याच्या डोक्यावर छप्पर आहे ना, याची चौकशी केली जायची. पण आता लग्नाआधीच मुलगा-मुलगी मिळून ठरवून घर घेतात आणि लग्नानंतर तिथे शिफ्ट होतात. पण आर्थिक स्वावलंबनामुळे लग्नाच्या आधीच अनेक तरुण मुलीही स्वतःसाठी म्हणून घर बुक करतात, त्यासाठी कर्ज घेतात आणि ते फेडतातही. गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून याकडे पाहिलं जाणाऱ्या तरुण मुलींची संख्याही वाढत आहे. घर घेणाऱ्या महिलांपैकी जवळपास २६ टक्के महिला घराकडे गुंतवणुकीचा प्राथमिक पर्याय म्हणून बघतात, हेदेखील या सर्वेक्षणामधून ठळकपणे दिसतं. गुंतवणुकीचा रेशो वाढत असल्याचंही यातून समोर येतंय, तसंच घर घेणाऱ्या महिलांपैकी ३८ टक्के महिला शहराच्या परिघातीलच घरांना प्राधान्य देतात,जिथे बऱ्यापैकी सुविधा असतील.तर ३० टक्के महिला शहरात घरं घेण्याला प्राधान्य देतात. तर फक्त ११ टक्के महिला शहराच्या मध्यावधी घरांना पसंती देतात असंही या सर्व्हेतून पुढं आलं आहे.

बजेटच्या दृष्टीनंही या सर्व्हेच्या विश्लेषणातून काही महत्त्वाचे मुद्दे दिसतात. घर घेणाऱ्या जवळपास ६७ टक्के महिला साधारणपणे मध्यम बजेटच्या म्हणजे ४५ लाख ते दीड कोटींपर्यंत घरांना प्राधान्य देतात.त्यातही ९० लाख ते दीड कोटीपर्यंतच्या घरांच्या बाजूने ३४ टक्के महिलांचा कल आहे. अल्ट्रा लक्झरी प्रॉपर्टीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाली आहे.  अर्थात ही आकडेवारी फक्त मुंबईसारख्या महानगरापुरती मर्यादित आहे. 

अपूर्ण बांधकाम असलेल्या घरांपेक्षा तयार असलेल्या घरांमध्ये जाणं किंवा पुढच्या सहा महिन्यांमध्ये जिथं शिफ्ट होता येतील अशी घरं महिलांना जास्त आवडतात असंही, या सर्व्हेवरून लक्षात येतं. नवीन लाँच झालेल्या प्रॉपर्टीजमध्ये गुंतवणूक करण्याकडे साधारण दहा टक्के महिलांचा कल असते, तर अकरा टक्के महिला तारीख ठरलेल्या किंवा पुढच्या काही महिन्यांत पूर्ण होणाऱ्या प्रॉपर्टीजमध्ये पैसे गुंतवतात असं या सर्व्हेमधून समोर आलं आहे.    

शिक्षण, करिअर, नोकरी अशा अनेक कारणांनी लग्नापूर्वीच आपलं राहतं घर सोडून अन्य ठिकाणी किंवा शहरांमध्ये जाणाऱ्या मुलींच्या संख्येत गेल्या काही वर्षांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. नोकरीच्या निमित्ताने आधी हैदराबाद आणि नंतर ठाण्यात स्थायिक झालेल्या माझ्यासारख्या पूर्णपणे शहरी मुलीसाठी तर आपलं स्वतंत्र घर असावं, हे अगदी नोकरीला सुरुवात केल्यापासूनचं स्वप्नं होतं. अशी स्वप्नं बघणाऱ्या माझ्यासारख्या कितीतरी जणी असतील. कदाचित आधी हॉस्टेलवर किंवा पेइंग गेस्ट म्हणून मुली राहतात. पण नोकरी करायला लागल्यावर मात्र फ्लॅट भाड्याने घेऊन, रूम शेअर करून राहतात. चांगली नोकरी लागली की मात्र हल्ली मुलीच स्वतः घर घेण्याला प्राधान्य देत आहेत. एकच मुलगी असलेल्या कुटुंबांमध्ये लग्नानंतर आई वडिलांना आपल्या घरी न्यायचं असेल किंवा आपल्याजवळ ठेवून घ्यायचं असेल तर त्यासाठी नियोजन म्हणूनही कितीतरी मुली लग्न झाल्यावर किंवा लग्नाआधी घरात गुंतवणूक करू लागल्या आहेत. ग्रामीण भागातून शहरांकडे येणारी फक्त मुलेच नाहीत तर मुलीही शहरांत स्वतःच्या बळावर स्थायिक होण्याची स्वप्नं पाहतात आणि ती पूर्णही करतात. 

आपल्याकडे महिलांचं आर्थिक स्वातंत्र्य आणि अर्थसाक्षरता अजूनही हवी तितकी नाही. तरीही गुंतवणूक म्हणून घर घेण्याकडे महिलांचा वाढलेला कल ही नक्कीच एक सकारात्मक बाब आहे. आपलं घर ही प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी संकल्पना आहे. स्त्रियांसाठी तर हे घर म्हणजे फक्त चार भिंतीच नसतात, त्यांचं अवघं जग त्यात सामावलेलं असतं, त्यांची नाती असतात,  हे घर त्यांचं अस्तित्व असतं..

साथ साथ चित्रपटातलं दीप्ती नवल आणि फारुख शेख यांच्यावर चित्रित केलेलं एक कमालीचं गोड गाणं यानिमित्तानं आठवतं..
ये ईंट पत्थरोंका घर, हमारी हसरतों का घर...
ये तेरा घर ये मेरा घर
ये घर बहुत हसीन है...

संबंधित बातम्या