विमेन ऑफ द इयर

केतकी जोशी
सोमवार, 21 मार्च 2022

‘ती’ची गोष्ट

जगभरात सगळीकडेच स्त्रियांचं भविष्य अधिक सुरक्षित, अधिक चांगलं करण्यासाठी झटणाऱ्या महिलांची निवड करण्याचं आम्ही ठरवलं, असं ‘टाइम’ या जगप्रसिद्ध साप्ताहिकाने त्यांच्या २०२२च्या ‘विमेन ऑफ द इयर’ यादीबद्दल म्हटलं आहे. या यादीतल्या सगळ्याचजणी समाज, पिढ्या आणि सीमा ओलांडून समान आणि सर्वसमावेशक जग निर्माण करण्यासाठी लढत आहेत.

नुकताच महिला दिन साजरा झाला. त्यानिमित्ताने जगभरात विविध क्षेत्रातील महिलांचे सत्कार झाले. आपल्या संघर्षाबरोबरच अन्य महिलांना बरोबर घेऊन जाणाऱ्या किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करणाऱ्या अनेक महिलांच्या यशोगाथा यानिमित्ताने समोर आल्या. कोणत्याही महिलेचा संघर्ष कधीच सोपा नसतो. तिला अगदी आपल्या खासगी आयुष्यापासून ते ऑफिस ते सामाजिक स्तरावरील प्रत्येक पातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या संघर्षाचा सामना करावा लागतो. या संघर्षाचं स्वरूप वेगवेगळं असलं, तरी त्यातून तावून सुलाखून ज्या बाहेर पडतात त्यांची व्यक्तिमत्त्वं सोन्यासारखी झळाळून उठतात. अशाच बारा अस्सल बावनकशी स्त्रियांना ‘टाइम मॅगझीन’ने नुकतेच ‘विमेन ऑफ द इयर’ म्हणून गौरविलं आहे.

या बाराजणींमधली एक आहे अफगणिस्तानची तरुण पत्रकार झाहरा झोया. झाहरा सध्या ब्रिटनमध्ये राहते. अफगाणिस्तान म्हटलं की डोळ्यासमोर येते तालिबानी राजवट आणि त्या राजवटीकडून होणारे स्त्रियांवरचे अत्याचार. झाहरालाही या परिस्थितीला तोंड द्यावे  लागले. पण ती खचून गेली नाही. उलट तिथल्या स्त्रियांचं जगणं जगासमोर मांडण्याचं महत्त्वाचं काम ती तिच्या पत्रकारितेतून करत आहे. झाहरा ब्रिटनमध्ये राहून तिची वृत्तसंस्था चालवते. अफगाणिस्तानातील अल्पसंख्याक असलेल्या एका हाजरा कुटुंबात तिचा जन्म झाला. तालिबान्यांच्या क्रूर राजवटीत मुलींना शिक्षण घ्यायला परवानगीच नव्हती. तेव्हा शिक्षणासाठी म्हणून छोटी झाहरा मुलांचे कपडे घालून शाळेत जायची. आसपास काय चाललं आहे याची सजग जाणीव तिच्या मनात लहानपणापासूनच होती. त्यामुळे लहान असल्यापासूनच रिपोर्टिंगच्या माध्यमातून तिनं स्त्रियांचं जीवन समोर ठेवण्याचं काम सुरू केलं. 

तालिबाननं अफगाणिस्तानावर कब्जा केल्यावर झाहराला देश सोडावा लागला. तिला ब्रिटननं आश्रय दिला. ब्रिटनमध्ये क्राऊड फंडिंग करून तिनं काम सुरू केलं. सध्या झाहरा लंडनमध्ये एका हॉटेलमध्ये राहते आणि अफगाणिस्तानातील आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं तिथल्या स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम करते. तालिबानच्या क्रूर राजवटीतही अफगाणिस्तानात तिची टीम म्हणजेच तिच्यासारख्या अनेक महिला गुप्तपणे रिपोर्टिंग करतात. अफगाणिस्तानातील महिलांच्या जीवनाशी संबंधित बातम्या त्या पाठवतात. याबद्दल झाहराचं जगभरात खूप कौतुक होतंय. सध्याच्या काळात तर झाहराचं काम खूप जास्त महत्त्वाचं आहे. या स्त्रियांचं जगणं, त्यांची परिस्थिती समोर आल्यावर त्यांना काहीतरी मदत होईल आणि त्यांचं भविष्य सुधारेल अशी आशा झाहराला वाटते.

आपापल्या कामामधून अन्य स्त्रियांसाठी काहीतरी करणाऱ्या आणखी अकरा जणींनाही या ‘विमेन ऑफ द इयर’च्या यादीत स्थान देण्यात आलं आहे. मानवाधिकार वकील अमॉ क्लूनी, अमेरिकी अभिनेत्री केरी वॉशिंग्टन, गायिका कॅसी मसग्रेव्हज, सॉफ्टवेअर इंजिनिअर च्रेसी चू, ब्रिटिश मिडवाइफ जेनी जोसेफ, कवयित्री अमेंडा गॉरमेन, ॲथलिट ॲलिसन फेलिक्स, नॅसडॅकची चीफ एक्झिक्युटिव्ह ॲडीना फ्रीडमन, वकील शेरलीन आयफल, नागरी हक्क कार्यकर्ती ॲमेंडा नॅग्युयेन आणि ट्रान्स अभिनेत्री मिशेल जे रॉड्रिग्ज यांचा या यादीत समावेश आहे.

या सगळ्याजणींची कार्यक्षेत्रं वेगवेगळी असली तरी त्यांच्यात एक समान धागा आहे. जगभरात सगळीकडेच स्त्रियांचं भविष्य अधिक सुरक्षित, अधिक चांगलं करण्यासाठी झटणाऱ्या महिलांची निवड करण्याचं आम्ही ठरवलं, असं ‘टाइम मॅगेझीन’ने त्यांच्या या वर्षाच्या ‘विमेन ऑफ द इयर’ यादीबद्दल म्हटलं आहे. या यादीतल्या सगळ्याजणी समाज, पिढ्या आणि सीमा ओलांडून समान आणि सर्वसमावेशक जग निर्माण करण्यासाठी लढत आहेत. कोरोना काळानं जगभरात सगळ्यांनाच अनेक धडे दिले. कोरोनाचा फटका महिलांना जास्त प्रमाणात बसला. सामाजिक, आर्थिक, मानसिक, भावनिक पातळीवरचा त्यांचा संघर्ष या महासाथीच्या काळात आणि त्यानंतर अधिक तीव्र झाला. अमेरिकेसारख्या संपन्न देशांपासून ते अगदी गरीब देशांपर्यंत सगळीकडेच महिलांवरील घरगुती हिंसाचारात वाढ झालेली पाहायला मिळाली. हजारो स्त्रियांच्या नोकऱ्या, उत्पन्नाची साधनं गेली. या परिस्थितीत अनेकदा अन्याय झालेल्या स्त्रिया त्यांच्यावरील अन्यायाबद्दल बोलण्यासाठी पुढे यायलाही तयार नव्हत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी लढणं, त्यांच्या समस्या मांडणं आणि त्यांना अधिक चांगलं आणि सुरक्षित भविष्य मिळेल यासाठी प्रयत्न करणाऱ्या या रणरागिणींची निवड ‘टाइम’ने केली आहे.

यातील अमॉ क्लूनी ही मूळची लेबेनॉनची आहे. दोन वर्षांची असताना तिचं कुटुंब लंडनला स्थायिक झालं. आयसिसच्या क्रौर्याचा सामना करणाऱ्या यजीदींच्या बरोबर तिनं काम केलं आहे. आंतरराष्ट्रीय कायदा आणि मानवाधिकार तज्ज्ञ असणारी बॅरिस्टर अमॉ आणि तिचा पती हॉलीवूड अभिनेता जॉर्ज क्लूनी यांनी स्त्रिया, मुली आणि एलजीबीटाक्यू समुदायाच्या हक्कांसाठी ‘क्लूनी फाउंडेशन फॉर जस्टिस’ची स्थापना केली आहे. 

अमेरिकन गायिका आणि गीतकार केसी मसग्रेव्हज हीच्या खात्यावर प्रतिष्ठेचे ग्रॅमी अवॉर्ड जमा आहे. ‘गोल्डन अवर’ या अल्बमसाठी तिला ग्रॅमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मूळच्या टेक्सासच्या केसीनं आपल्या क्षेत्रात स्वतःचा वेगळा मार्ग निवडून ठसा उमटवला आहे. त्यामुळेच ‘टाइम’च्या या ‘विमेन ऑफ द इयर’ या कार्यक्रमात तिचा खास परफॉरमन्सही होता. अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शक केरी वॉशिंग्टन हिलाही या यादीत स्थान देण्यात आलं आहे. एबीसी ड्रामा सीरीजमधील ‘स्कॅंडल’ (२०१२-१८) या नाटकातील आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ ऑलिव्हिया पोप या भूमिकेमुळे केसी जगभरात ओळखली जाऊ लागली. या भूमिकेसाठी तिला ‘गोल्डन ग्लोब’सह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कारही मिळाले. पण ती ‘वुमन ऑफ द इयर’ ठरली आहे ते तिच्या सामाजिक जाणिवेमुळे. आई आणि चार मावशांच्या देखरेखीखाली लहानाची मोठी झालेल्या केसीला महिला स्वावलंबी होण्याचं महत्त्व चांगलंच माहिती आहे. त्यामुळेच तिनं महिलांच्या काही स्टार्टअपसाठी आर्थिक मदत केली आहे. ‘सॉल्व्ह’ ही आरोग्यविषयक कंपनी आणि ‘ऑरेट’ या सस्टेनेबल आणि रिसायकल्ड गोल्ड वापरणाऱ्या ज्वेलरी ब्रँडमध्ये तीने गुंतवणूक केली आहे. तिचं लहानपण ज्या ठिकाणी गेलं त्या रस्त्याच्या नावानं ती एक प्रॉडक्शन कंपनीही चालवते.

सॉफ्टवेअर इंजिनिअर ट्रेसी चाव ही तैवानमधून स्थलांतरित  झालेल्या कुटुंबातील एक आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये आयटी क्षेत्रात महिलांवर होणारे अन्याय आणि भेदभावाबाबत तिनं नेहमीच वाचा फोडली आहे. अमेरिकेतील शारीरिक आणि मानसिक अत्याचाराला तीही बळी पडली, पण इंटरनेट प्लॅटफॉर्मवर होणारे अन्य महिलांचे शोषण थांबवण्यासाठी उपयुक्त ठरेल असं एक ॲप्लीकेशन तिनं तयार केलं आहे. 

आपल्या हक्कांसाठी तर अनेकजणी लढतात. पण आपल्या कामातून अन्य स्त्रियांसाठी लढणं, त्यांच्यासाठी काहीतरी करणं यामुळे अवघड वाटांवर चालणाऱ्या अनेकींना आधार मिळतो, त्यांच्यासाठी नवे मार्ग, नवी क्षितीजं खुली होतात. जगभरातील स्त्रिया, मग त्या कोणत्याही जातीच्या, धर्माच्या, समाजाच्या असू देत जेव्हा कुणा दुसऱ्या स्त्री साठी उभ्या राहतात तेव्हा त्या संपूर्ण स्त्री जातीसाठी उभ्या राहतात. कुठेतरी वाचलेलं ते वाक्य या अशा स्त्रियांच्या बाबतीत आठवतं...

‘Some women fear the fire, some women simply become it!’

 

संबंधित बातम्या