शाश्वत प्रतिनिधीत्वासाठी...

केतकी जोशी
सोमवार, 4 एप्रिल 2022


‘ती’ची गोष्ट

“शिक्षणानं माझे डोळे उघडले आणि स्त्रिया किंवा मुलींना किती अन्याय सहन करावा लागतोय हे मला कळायला लागलं. जसजशी इयत्ता वाढत जाते तसं आमच्याकडे मुलींचं शाळेतलं प्रमाण कमी होतं. घरच्या जबाबदाऱ्या किंवा अन्य सामाजिक अडथळ्यांमुळे शिक्षण अर्धवट सोडणं हे अगदी सहज होतं. मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या माझ्या वर्गात १० मुलांमागे एक मुलगी असं प्रमाण होतं. याचाच अर्थ विज्ञान, तंत्रज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी हे विषय अगदी कमी मुली निवडतात,” असं नोरा सांगते.

“मी  अशा समाजात वाढले जिथे स्त्रियांना अजिबात किंमत दिली जात नव्हती. आमच्या शिक्षणाच्या, व्यक्त होण्याच्या किंवा आमच्या अगदी मुलभूत गरजाही क्षुल्लक समजल्या जायच्या. मी जी पुस्तकं वाचून शिक्षण घेतलं, त्यामध्ये स्त्री-पुरुष हा भेद स्पष्टपणे दाखवणारी चित्रं असायची. स्वयंपाकघरात काम करणाऱ्या बायकांच्या पाठीवर मुलं असायची आणि पुरुष मात्र ब्रीफकेस घेऊन नोकरीवर जाणारे असायचे किंवा पदवीदान समारंभातले गाऊन घातलेल्या चित्रांमध्ये फक्त पुरुषच असायचे. ही सगळी चित्रं आमच्या समाजात स्त्री-पुरुषांना कसं वागवलं जायचं याचं चित्रण असायचं,” हा अनुभव आहे केनियामधील एका मॅकेनिकल इंजिनिअरचा.

तिचं नाव नोरा मॅगेरो. तेहेतीस वर्षांची नोरा सध्या नोरा ड्रॉप ॲक्सेस या कंपनीची सीईओ आहे.  ही कंपनी व्यावहारिक आणि परवडणाऱ्या ऊर्जा पर्यायांवर काम करते. या कंपनीत जास्तीत जास्त महिलांना प्रतिनिधीत्व मिळावं यावर तिचा भर असतो. पण तिची ओळख इतकीच मर्यादित नाही. तर कोविडच्या काळात केनियासारख्या गरीब देशात प्रत्येकाला लस मिळावी यासाठी धडपड करत तिनं ‘व्हॅक्सी बॉक्स’ची निर्मिती केली. नोराच्या या धडपडीची संयुक्त राष्ट्रांनीही दखल घेतली. लिंगभेदाच्या ठळक पार्श्वभूमीवर वातावरणीय बदलाशी जुळवून घेण्याच्या तिच्या प्रयत्नांचं जगभर कौतुक होतंय. यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या `वूमेन लीडिंग इनिशिएटिव्हज्’ या संयुक्त राष्ट्रांच्या मालिकेमध्ये नोराला स्थान देण्यात आलं आहे.  

“शिक्षणानं माझे डोळे उघडले आणि स्त्रिया किंवा मुलींना किती अन्याय सहन करावा लागतोय हे मला कळायला लागलं. जसजशी इयत्ता वाढत जाते तसं आमच्याकडे मुलींचं शाळेतलं प्रमाण कमी होतं. घरच्या जबाबदाऱ्या किंवा अन्य सामाजिक अडथळ्यांमुळे शिक्षण अर्धवट सोडणं हे अगदी सहज होतं. मॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या माझ्या वर्गात १० मुलांमागे एक मुलगी असं प्रमाण होतं. याचाच अर्थ विज्ञान, तंत्रज्ञान, गणित आणि अभियांत्रिकी हे विषय अगदी कमी मुली निवडतात,” असं नोरा सांगते. त्यामुळेच तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक क्षेत्रांत महिलांचं प्रतिनिधीत्व अगदी कमी असतं असं तिचं म्हणणं आहे. म्हणूनच नोरा सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथेमॅटिक्स -एसटीईएम, स्टेम -अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताच्या क्षेत्रातील महिलांच्या प्रतिनिधीत्वाविषयी विशेष आग्रही आहे. शिक्षण, ऊर्जा आणि अन्य मुलभूत गरजा यामध्ये त्यांना समान संधी मिळावी यासाठी ती धडपडत आहे. कोविड काळात केनियासारख्या राष्ट्रांना तर लस आणि अन्य औषधांच्या पुरवठ्याबाबतच्या अनेक अडचणींनी तोंड द्यावं लागलं. हे चित्र पूर्णपणे आपण बदलू शकत नाही; पण आपल्या ज्ञानाचा काहीतरी फायदा नक्की करू शकतो असा विचार करून नोरानं ‘व्हॅक्सी बॉक्स’ची निर्मिती केली. 

वातावरण बदलाचा सगळ्यांत जास्त परिणाम महिलांवर होतो. केनियासारख्या देशांमध्ये महिला अनेकदा रुग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाहीत, याचं एक कारण हवामान हेही असल्याचं नोराचं म्हणणं आहे. त्यामुळेच ‘व्हॅक्सी बॉक्स’ तयार करण्यात आला. हा सौरउर्जेवर चालणारा मोबाईल फ्रिज आहे. यामध्ये लशी सुरक्षित पद्धतीने साठवून ठेवल्या जातात आणि त्या वातावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी पोहोचवल्या जातात. ज्या रुग्णालयामध्ये  शीतगृहांची कमतरता आहे किंवा अत्यंत दुर्गम ठिकाणी जिथे कोणत्याही वैद्यकीय सुविधा नाहीत अशा ठिकाणी हा ‘व्हॅक्सी बॉक्स’ वरदानच ठरला.

“कोविड काळात दुर्गम भागात औषधांची आणि अन्य जीवनावश्यक गोष्टींची कमतरता विशेष जाणवत होती. जीव वाचवणाऱ्या लशीपासून हजारो लोक या वंचित राहत होते. हे सगळं थांबवण्यासाठी काहीतरी करायला हवं होतं. तेव्हा या सौर फ्रिजची खूप मदत झाली,” असं नोरा सांगते. या सौर फ्रिजला डेटा मॉनिटरिंग सुविधा आहे आणि बॅटरी बॅकअपही आहे. त्यामुळे वीजपुरवठ्या अभावी तो बंद पडला असं सहसा होत नाही. एका व्हॅक्सी बॉक्सच्या निर्मितीसाठी ८०० युरो (साधारण ६६ हजार रुपये) खर्च येतो आणि चाळीस लिटरचा हा बॉक्स बोटींमधून किंवा गरज पडल्यास मोटारसायकल, सायकलवरही नेता येऊ शकतो. केनियातील मेरुशी या अतिदुर्गम भागातील आरोग्य केंद्रामंध्ये या व्हॅक्सी बॉक्समधून औषधं आणि लशी पोहोचवण्यात आल्या. औषधांसाठा होणारी बायकांची कित्येक किलोमीटरची पायपीट टळली. पण ‘व्हॅक्सीबॉक्स’मुळे लस  दारोदारी जाऊन मुलांना लस देता आली आणि त्यामुळे लसीकरणात जवळपास दिडशे टक्के वाढ झाली. पुढच्या दोन वर्षांत २०२४पर्यंत अशी दीड हजार युनिट्स निर्माण करू शकू अशी नोराला आशा आहे. त्यामाध्यमातून तीस लाख मुलांपर्यंत लशी आणि औषधं पोचवण्याचं तिचं स्वप्नं आहे. व्हॅक्सी बॉक्समध्ये फक्त लशीच नाही तर रक्त आणि टिश्यू म्हणजेच पेशीही साठवल्या जातात. एका ॲपद्वारे बॉक्समधील साठा आणि वितरणावरही लक्ष ठेवलं जातं. ‘या बॉक्सच्या संपूर्ण निर्मितीच्या काळात माझ्या मनात प्रचंड भावनिक आंदोलनं सुरू होती. अगदी निराशेपासून ते संशय आणि मग अभिमान अशा सगळ्या भावनांमधून मी या काळात गेले आहे,’ असं नोरा सांगते. 

एरवी हा बॉक्स म्हणजे फ्रिज अगदी अन्न-पाणी पुरवण्यासाठीही वापरला जाऊ शकतो. केनियामध्ये अनेक ठिकाणी शीतगृहांची कमतरता आहे. अशा ठिकाणी हा सोलार फ्रिज उपयुक्त ठरतो. अर्थात त्याचं म्हणावं तसं उत्पादन व्हायला वेळ लागेल. पण या सगळ्यामागे नोराचा विचार खूप महत्त्वाचा आहे. हवामान संकटांचा सगळ्यांत जास्त परिणाम स्त्रियांवरच होतो. त्यामुळे जेव्हा हवामान बदलाबाबत स्त्रियांवर थेट परिणाम करणारी आणि त्यांचा सहभाग वाढवणारी पावलं अत्यंत विचारपूर्वक उचलली गेली पाहिजेत असं तिला वाटतं. अगदी सामान्य शेतकरी महिलांनाही परवडू शकतील असे उपाय पोहोचवणं गरजेचं आहे. जेव्हा स्त्रियांचा अशा गोष्टींमधला सहभाग, प्रतिनिधीत्व वाढेल तेव्हाच हा बदल शक्य आहे.  हवामान बदलाबाबत केल्या गेलेल्या उपाययोजनांमध्ये पुरुषप्रधान वृत्तीचा वरचष्मा दिसतो. त्यामुळेच तंत्रज्ञान, विज्ञानाची कास धरत स्त्रियांचा या क्षेत्रात वाढवल्या जाणाऱ्या सहभागागाबद्दल सातत्यानं काम करणाऱ्या नोरासारख्या धाडसी महिलांच्या प्रयत्नांची म्हणूनच दखल घेतली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि व्यासपीठही मिळवून देणं गरजेचं आहे.

“मी फक्त माझ्या मुलीला लस देऊन थांबू शकत नाही. तिच्या मित्र-मैत्रिणींना लस देणं गरजेचं आहे हेही मला जाणवलं. मी एक इंजिनिअर आहे आणि या समस्येचं उत्तर शोधणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे असं मी समजते,” या भावनेने काम करणाऱ्या नोराने त्यामुळेच हा ‘व्हॅक्सी बॉक्स’ केनियामधील सर्व मातांना समर्पित केला आहे. 

लिंगभेदावर आधारलेल्या प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन त्याच समाजातील वंचित घटकासाठी काहीतरी करण्याची उमेद असणं हे खूप विशेष आहे. नोरासारख्या स्त्रिया ती उमेद जागवून ठेवतात. अंधारात कोणाच्या तरी सावलीच्या मागे जाण्यापेक्षा एकटं चालणं आणि नवा मार्ग निर्माण करणं काहीजणी पसंत करतात, नोरा त्यापैकीच एक आहे.

संबंधित बातम्या