स्टार किड्सचे ‘रुपेरी’ आगमन

संतोष भिंगार्डे
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

प्रीमियर 

डॉक्टरच्या मुलाने डॉक्टर होणे... शिक्षकाच्या मुलाने शिक्षक होणे किंवा राजकारणी नेत्याच्या मुलाने नेता होणे, तसेच कलाकाराच्या मुलाने कलाकार होणे, यामध्ये नावीन्य काही राहिलेले नाही. कित्येक कलाकारांची पुढील पिढी चित्रपटसृष्टीत राज्य करीत आहे. आत्तापर्यंत आपण बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्सना बघितले आहे. बी-टाऊनमध्ये पदार्पण होताच त्यांना चांगला नावलौकिकदेखील मिळाला आहे. 

सध्याच्या आघाडीच्या कलाकारांची नावे घ्यायची झाली, तर सारा अली खान, जान्हवी कपूर, अभिषेक बच्चन, आलिया भट, टायगर श्रॉफ, सोनम कपूर, वरुण धवन, करीना कपूर, श्रद्धा कपूर, अर्जुन कपूर, अनन्या पांडे अशी काही जणांची नावे घेता येतील. हे सध्याचे बी-टाऊनचे सेलिब्रिटी कलाकार आहेत. त्यातील काहींना लवकर यश मिळाले, तर काहींना यशासाठी झगडावे लागले. परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही आणि आपला आत्मविश्वास तसूभरही कमी होऊ दिला नाही. त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. 

आता या स्टार किड्सचा हिंदी चित्रपटसृष्टीत बोलबाला असताना, यावर्षी आणखी काही स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत. खरे तर मागील वर्षीच काही स्टार किड्स रुपेरी पडद्यावर येणार होते. परंतु कोरोनाच्या साथीमुळे सगळेच गणित विस्कळीत झाले. यावर्षी मात्र हे स्टार किड्स रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत असे दिसते. त्यामुळे आधीपासूनच त्यांच्याबाबतीत सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. त्यामध्ये आघाडीवर आहे किंग खानचा मुलगा आर्यन. निर्माता करण जोहर ‘स्टुडंट ऑफ द इयर’चा तिसरा भाग तयार करत आहे आणि त्यामध्ये आर्यन मुख्य भूमिका साकारणार असल्याची जोरदार चर्चा आहे. किंग खानप्रमाणेच त्याचादेखील सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे आणि त्याचा चित्रपट येणार आहे म्हणून त्यांनी आत्तापासूनच त्याला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. शाहरूखची मुलगी सुहानादेखील याच वर्षी हिंदी चित्रपटसृष्टीत येणार आहे. याआधी सुहाना खानने ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ या लघुपटात आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. त्यामुळे आपल्या वडिलांसारखे हे दोघेदेखील बॉक्स ऑफिसवर कशा प्रकारे कमाल करतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. 

अहान पांडे हा अनन्या पांडेचा चुलत भाऊ आणि चंकी पांडेचा पुतण्या. अहान पांडे यावर्षी रुपेरी पडद्यावर दिसण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशराज फिल्म या बॅनरतर्फे अहान पदार्पण करीत आहे. यशराजचा चित्रपट म्हटले की सगळा तामजाम मोठा असणार यात शंका नाही.

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदादेखील चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. बी-टाऊनमधील अनेक पार्ट्यांमध्ये तो दिसला आहे. करण जोहरच्या एका पार्टीतदेखील अगस्त्य दिसला होता. त्याला अभिनय आणि दिग्दर्शन याची खूप आवड आहे. मात्र तो कोणत्या बॅनरमधून पदार्पण करणार हे अद्याप ठरलेले नाही.

अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूरला, तिची चांगली मैत्रीण असलेल्या अनन्या पांडेसारखे चित्रपटात करिअर करायचे आहे. सूत्रांनी सांगितले, की शनाया यावर्षी चित्रपटांमध्ये झळकणार असे दिसते. ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ या चित्रपटात ती साहाय्यक दिग्दर्शकदेखील होती. 

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरनंतर आता खुशी कपूरही चित्रपटांमध्ये पदार्पण करू शकते. खुशी ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे आणि बऱ्‍याचदा सोशल मीडिया पेजवर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. त्यामुळे आता खुशीदेखील आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. मध्यंतरी खुशीचे वडील आणि निर्माते बोनी कपूर यांनी खुशी आपल्या प्रॉडक्शन हाउसतर्फे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार नाही असे सोशल मीडियावर सांगितले होते. याचा अर्थ असा होतो की खुशी चित्रपटसृष्टीत काम करण्यास उत्सुक आहे, पण अन्य कोणत्या तरी बॅनरतर्फे तिला रुपेरी पडद्यावर यायचे आहे हे नक्की.  

खरे तर स्टार किड्सनी हिंदी चित्रपटामध्ये काम करणे यामध्ये काही नावीन्य नसले, तरीही येथे सगळ्यांना यश मिळतेच असे काही नाही. काही जणांना मिळते तर काही जणांना घरीदेखील बसावे लागते. कारण ही मुले जरी 

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली असली, तरी इंडस्ट्रीत टिकण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. नम्रता आणि संयमाबरोबरच टॅलेंटदेखील असावे लागते. कारण यश मिळते ते तुमच्यातील टॅलेंटमुळेच!
 

 

 

संबंधित बातम्या