आया शादी का मौसम

संतोष भिंगार्डे
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

प्रीमियर 

कोरोनामुळे सगळेच जनजीवन ठप्प झाले होते आणि आता लॉकडाउनंतर व्यवहार सुरू झाले आहेत. सगळीकडे लग्नाचे वारेदेखील वाहू लागले आहेत. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही लग्नाचे फटाके फुटत आहेत. मागील महिन्यात मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही काही विवाह सोहळे झाले. 

नुकताच झालेला एक मोठा सोहळा म्हणजे, वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांचे लग्न. २४ जानेवारी २०२१ रोजी अलिबाग येथे त्यांचा विवाह सोहळा मोठ्या राजेशाही थाटात पार पडला. त्यांच्या लग्नाची घोषणा झाल्यापासूनच त्यांचे लग्न हा सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता. नताशा फॅशन डिझाइनर आहे. वरुण आणि नताशा एकाच शाळेत होते. इयत्ता सहावीत असल्यापासून ते एकमेकांना ओळखतात. तेव्हा ते एकमेकांचे चांगले मित्र होते. पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले आणि वरुणने नताशाला आपल्या प्रेमाची कबुली दिली. परंतु नताशाचा होकार मिळविण्यासाठी वरुणला खूप वाट पाहावी लागली. अखेर वरुण बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्याच्या काही महिने आधी नताशाने वरुणच्या मागणीचा स्वीकार केला. २०१९ साली वरुणने त्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांचे नाते जगासमोर आणले. आता हे बॉलिवूडमधील एक हॅपिली मॅरीड कपल म्हणून ओळखले जाते. 

गेले काही महिने बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेली जोडी म्हणजे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. हे दोघे कधी लग्न करणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०१८ साली सोनम कपूरच्या लग्नाच्या रिसेप्शनला त्यांनी त्यांचे नाते सर्वांसमोर आणले. शिवाय गेल्या वर्षी त्यांनी लपूनछपून साखरपुडाही केला आहे... अशा बातम्यांना उधाण आले होते. यावर्षी आलिया कपूर कुटुंबाची सून होईल अशा बातम्या समोर येत आहेत. परंतु या दोघांनी हे अजून स्पष्ट केले नाहीय. रणबीर कपूरची आई नीतू सिंगचा या लग्नाला होकार आहे. मागील वर्षी रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्यांना रणबीरचा हा विवाह सोहळा पाहायचा होता. परंतु त्यांचे ते स्वप्न स्वप्नच राहिले. त्यांचा प्रथम स्मृतीदिन ३० एप्रिल रोजी आहे. तोपर्यंत तरी रणबीर दोनाचे चार हात करतो का ते पाहावे लागेल.

प्रेमाबरोबरच लग्नाचा विषय निघाला, की अभिनेत्री मलाईका अरोरा-अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री सुश्मिता सेन आणि तिचा प्रियकर रोहमन शॉल या दोन जोड्याही सोशल मीडियावर चांगल्याच गाजत असतात. हे चौघेही सोशल मीडियावर आपल्या जोडीदाराबरोबरचे अनेक फोटो टाकत असतात. अर्जुन आणि मलाईका हे दोघे २०१९ पासून एकमेकांसोबत प्रेमाचे घट्ट धागे बांधून आहेत. ते २०२० साली लग्नही करणार होते असे एका मुलाखतीत उघड झाले होते. परंतु कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमुळे त्यांना त्यांचे लग्न पुढे ढकलावे लागले. सगळी परिस्थिती पूर्ववत झाली की आम्ही लग्नाचा विचार करू, असे अर्जुनने एका मुलाखतीत सांगितले. सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल गेली दोन वर्षे एकमेकांना डेट करत आहेत. अनेक पार्ट्यांमध्ये ते एकत्र दिसतात. एकमेकांच्या कुटुंबांबरोबरही सण समारंभ साजरे करताना दिसतात. ही जोडीही कधी लग्नगाठ बांधत आहे याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

दुसरीकडे अभिनेता अली फज़ल याने अभिनेत्री रिचा चढ्ढाला दोन वर्षांपूर्वी लग्नाची मागणी घातली होती. हे दोघेही २०२० च्या एप्रिल महिन्यात लग्न करणार होते. परंतु लॉकडाउनमुळे त्यांना ठरलेले लग्न पुढे ढकलावे लागले. ही जोडीदेखील यावर्षी विवाह बंधनात अडकणार असे दिसते.

बॉलिवूडमध्ये एकमेकांना डेट करणे किंवा एकमेकांची साथसंगत करणे हा प्रकार काही नवीन राहिलेला नाही. कोण कधी कुणाचा हात धरेल आणि कोण कधी रिलेशनशिपमध्ये असेल याचा काही नेम नाही. सध्या सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवानी यांच्या डेटिंगच्या चर्चा खूपच रंगलेल्या आहेत. न्यू इअर सेलिब्रेशनसाठी सिद्धार्थ आणि कियारा मालदीवला गेले होते. तेथील काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये जातानादेखील अनेकदा ते दोघे दिसले आहेत. दोघांनीही आपल्या या नात्याचा कोणताही खुलासा केलेला नाही. आपल्यामध्ये केवळ मैत्री असल्याचे ते सांगत असले, तरी त्या दोघांमध्ये सध्या तरी ‘कुछ कुछ होता है’ असे आहे. काही महिन्यांनी त्यांच्या या नात्यातील खुलासा बाहेर येईलही. परंतु सध्या ते एकमेकाला डेट करीत असल्याचे बोलले जात आहे, असो! 

मराठी इंडस्ट्रीबद्दल बोलायचे झाले आपल्या सुरांनी सगळ्यांना भुरळ पाडणारी गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. सारेगमप लिटल चॅम्पफेम कार्तिकी गायकवाड मागील वर्षी डिसेंबर महिन्यात रोनित पिसे या बिझनेसमनबरोबर विवाहबद्ध झाली. त्यांचे अरेंज मॅरेज झाले. या विवाह सोहळ्याला गायकवाड आणि पिसे कुटुंबातील मंडळी उपस्थित होती. हा सोहळा काही मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत पुण्यात पार पडला. 

‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहूल पै यांचेही नुकतेच लग्न झाले आहे. अभिज्ञा आणि मेहूल एकाच कॉलेजमध्ये होते. कॉलेजमधील एका कार्यक्रमात ते एकमेकांना पहिल्यांदाच भेटले होते. गेली पंधरा वर्षे ते एकमेकांना ओळखत आहेत. त्यांच्या मित्रमैत्रिणींनी त्यांना लग्नाचा विचार करण्याचे सुचवले होते. एकमेकांना समजून घेऊन मगच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मेहूल पै मूळचा मुंबईचा आहे. तो इव्हेंट मॅनेजर असून त्याची स्वतःची इव्हेंट कंपनी आहे. अभिज्ञा भावेचा मेहूल पैसोबत ऑक्टोबरमध्ये साखरपुडा पार पडला होता. अभिज्ञाने ‘माझा साखर कारखाना’ असे कॅप्शन देत साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अभिज्ञा आणि मेहूल सहा जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकले. मुंबईमध्ये हा भव्य विवाह सोहळा पार पडला. 

मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचाही विवाह मागील महिन्यात पार पडला. गेली दोन-तीन वर्षे सिद्धार्थ आणि मिताली रिलेशनशिपमध्ये होते. दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि नंतर काही महिन्यांनी त्यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर हे क्युट कपल कधी लग्न करणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांनी जानेवारी महिन्याचा मुहूर्त साधला. त्यांचा विवाह पुण्यात दोन्ही घरच्या मंडळींच्या उपस्थितीत पार पडला. त्यांच्या विवाह सोहळ्याला मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकार मंडळी उपस्थित होती. नृत्यामध्ये कमालीची पारंगत असलेली अभिनेत्री मानसी नाईकनेदेखील दोनाचे चार हात केले. तिने आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेराबरोबर लग्नगाठ बांधली. प्रदीप खरेरा बॉक्सर तर आहेच, शिवाय तो मॉडेल आणि अभिनेताही आहे. त्याने अनेक नावाजलेल्या स्पर्धा जिंकल्या आहेत. 

अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांनी व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर आपले लग्न उरकून घेतले आहे. गेली काही वर्षे ते डेट करीत होते. एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर टाकून त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यामुळे ते लवकरच लग्न करणार हे सगळ्यांना ठाऊक होते आणि  त्यांनीही आता नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.  

गेल्या दोन ते तीन महिन्यांत एकापाठोपाठ होणारे हे लग्नसोहळे पाहता ते एकूणच यावर्षी लग्नाचा माहोल मनोरंजन क्षेत्रात आहे असे म्हणावे लागेल. आता या वर्षअखेर आणखीन किती कलाकार लग्नबंधनात अडकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

संबंधित बातम्या