बॉलिवूडचे मुहूर्त ठरले

संतोष भिंगार्डे
सोमवार, 1 मार्च 2021

प्रीमियर 

हिंदी चित्रपटसृष्टीची चाके आता हळूहळू रुळावर येत आहेत असेच दिसते आहे. चित्रपटांचे शूटिंग महाराष्ट्राबरोबरच महाराष्ट्राबाहेर, तसेच परदेशताही सुरू झाले आहे. सगळेच कलाकार आपापल्या कामामध्ये बिझी झाले आहेत. एकापाठोपाठ एक तारखा जाहीर होत आहेत. 

सुमारे पंचवीस ते सत्तावीस चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एकाच दिवशी अर्थात एकाच शुक्रवारी दोन चित्रपटांची टक्करदेखील होणार आहे. त्यामध्ये कोण बाजी मारणार हे त्या त्या कलाकृतींवरूनच स्पष्ट होईल.

मागील वर्षापासून सगळ्यांच्या चर्चेचा विषय असलेला आणि सगळ्यांची उत्सुकता ताणून धरलेला चित्रपट म्हणजे ‘सूर्यवंशी’. अॅक्शनवर अफाट प्रेम असणारा दिग्दर्शक रोहित शेट्टीचा हा चित्रपट मागील वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता. आता हा चित्रपट २ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. लॉकडाउननंतर प्रदर्शित होणारा हा बॉलिवूडचा सगळ्यात मोठा चित्रपट असेल. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत आहेत. 

त्याचबरोबर आणखीन एक बिग बजेट आणि बिग बॅनरचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. गेल्या वर्षापासूनच या चित्रपटाबाबत सगळ्यांना उत्सुकता लागलेली होती. त्या चित्रपटाचे नाव आहे ‘८३’. हा चित्रपट ४ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती अभिनेता रणवीर सिंहने दिली आहे. तो या चित्रपटात कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. भारताने २५ जून १९८३ रोजी जिंकलेल्या क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेवर आधारित हा चित्रपट आहे. दिग्दर्शक कबीर खानने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे, तर यशराज फिल्म्सने याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट हिंदी, तामीळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ईद आणि सलमान खान यांचे समीकरण जुळलेले आहे. भाईजानचे बहुतेक चित्रपट ईदलाच प्रदर्शित होत असतात. भाईजानचा ‘राधे यूअर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट ईदच्या दिवशीच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले आहे. याची निर्मिती सलमान खान, सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री यांनी केली आहे. या चित्रपटात सलमान खान, दिशा पटनी, रणदीप हुडा आणि जॅकी श्रॉफ हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विशेष बाब म्हणजे त्‍याच दिवशी म्हणजे १४ मे रोजी जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ हा चित्रपटही येत आहे. सन २०१८ मध्ये आलेल्या सत्यमेव जयतेचा हा सिक्वेल आहे. या दोन चित्रपटांची टक्कर या वेळी पाहायला मिळेल. 

सत्यमेव जयतेच्या सिक्वेलमध्ये जॉनबरोबर मनोज वाजपेयी, दिव्य कुमार खोसला, बॉलिवूडची सेन्सेशनल गर्ल नोरा फतेह यांच्या मुख्य भूमिका आहेत. खिलाडी कुमार अक्षय सध्या फॉर्मात आहे. त्याचे तीन ते चार चित्रपट यावर्षी पडद्यावर येतील असे दिसते. त्यापैकी ‘सूर्यवंशी’पाठोपाठ येणारा चित्रपट म्हणजे ‘बेल बॉटम’. अक्षय या चित्रपटात एका रॉ एजंटची भूमिका साकारत आहे. वाणी कपूर, लारा दत्ता, हुमा कुरेशी आदी कलाकारांचा नजराणा असलेला हा चित्रपट २८ मे रोजी चित्रपटगृहामध्ये येईल. त्याचबरोबर त्याचा आनंद एल राय दिग्दर्शित ‘अतरंगी रे’ हा लव्ह ट्रँगल असलेला चित्रपटही प्रदर्शित होईल. त्याची तारीख आत्ता ६ ऑगस्ट सांगितली जात आहे. यावर्षी दसऱ्याचा मुहूर्त साधत १३ ऑक्टोबरला एस. एस. राजमौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राम चरण, ज्युनियर एनटीआर, अजय देवगण, आलिया भट्ट, समुद्रिकाणी, ऑलिव्हिया मॉरिस, अ‍ॅलिसन डूडी आणि रे स्टीव्हनसन ही बॉलिवूड आणि साउथची तगडी स्टारकास्ट एकत्र येणार आहे. या चित्रपटाच्या दोन दिवसांनंतर लगेचच अभिनेता अजय देवगणचा दुसरा चित्रपट ‘मैदान’ रीलीज होणार आहे. अमित शर्मा दिग्दर्शित ‘मैदान’ हा भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक, तसेच भारतीय फुटबॉलचे शिल्पकार सय्यद अब्दुल रहीम यांच्या प्रेरणेने लिहिलेल्या जीवनचरित्रावर आधारित आहे. यामध्ये अजय देवगण, प्रियामनी, गजराज राव आदी कलाकार  आहेत. हे दोन्ही चित्रपट एकामागोमाग येत असल्यामुळे त्यांच्यामध्ये तगडी स्पर्धा पाहायला मिळेल. दिवाळीत बॉक्स ऑफिसवर बॉम्ब फोडण्यासाठी अनेक चित्रपट सज्ज आहेत. खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार आणि बी टाऊनचा गुणी अभिनेता शाहीद कपूर हे दोन्ही कलाकार या दिवाळीमध्ये अर्थात ५ नोव्हेंबरला एकमेकांशी भिडणार आहेत. अक्षयचा ‘पृथ्वीराज’ तर शाहीदचा ‘जर्सी’ हा चित्रपट दिवाळीसाठी सज्ज झाले आहेत. अक्षयसोबत मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर या चित्रपटात आहे. या चित्रपटाद्वारे मानुषीचे रुपेरी पडद्यावर आगमन होत आहे. ‘पृथ्वीराज’ हा ऐतिहासिक चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी करीत आहेत. हा यशराज फिल्मचा बिग बजेट चित्रपट आहे. तर ‘जर्सी’ हा चित्रपट त्याच नावाच्या तेलगू चित्रपटाचा बॉलिवूड रीमेक आहे. यामध्ये शाहीद क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे.

 या चित्रपटांबरोबरच अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता राजकुमार राव यांचा ‘रुही’ हा चित्रपट ११ मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन हार्दिक मेहता यांनी केले असून हा हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. नागराज मंजुळेचा ‘झुंड’ हा चित्रपट १८ जूनला थिएटरात धडकणार आहे. अमिताभ बच्चन यांनी यामध्ये फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका केली आहे. तसेच अमिताभ यांचाच ‘चेहरे- फेस द गेम’ हा चित्रपट ३० एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अन्नू कपूर, क्रिस्टल डिसूझा, रघुवीर यादव, इमरान हाशमीदेखील असणार आहेत. हा एक थ्रीलर चित्रपट आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा ‘प्यार का पंचनामा’ हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट १८ मार्च रोजी येईल. मल्टिटॅलेंटेड अभिनेता आयुष्मान खुराना याचे दोन चित्रपट या वर्षात येणार आहे. अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘चंदीगड करे आशिकी’ यामध्ये आयुष्मान व वाणी कपूर ही जोडी रोमान्स करताना दिसणार आहे. तर आयुष्मानचा ‘अनेक’ हा चित्रपट १७ सप्टेंबरला बॉक्स ऑफिसवर धडकणार आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा आणि आयुष्मानची जोडी पुन्हा यामधून एकत्र येणार आहे. अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘भूल भूलैया २’ हा चित्रपट १९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट अक्षय कुमार आणि विद्या बालन यांचा हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूल भूलैया’चा सिक्वेल आहे.

साउथचा सुपरस्टार प्रभासला आत्तापर्यंत अॅक्शन करताना बघितले आहे. आता ‘राधे श्याम’ या चित्रपटातून प्रभासला त्याचे चाहते अभिनेत्री पूजा हेगडेबरोबर रोमान्स करताना बघणार आहेत. ३० जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून याचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. यापाठोपाठ साउथच्या आणखी एका सुपरस्टारचा चित्रपट १६ जुलै रोजी झळकणार आहे, त्याचे नाव आहे ‘केजीएफ २’. सुपरस्टार यशचा हा चित्रपट आहे आणि या चित्रपटात अभिनेता संजय दत्त निगेटिव्ह भूमिकेत आहे. 

आमीर खानचा बहुचर्चित ‘लालसिंह चढ्ढा’ चित्रपट याच वर्षी ख्रिसमसला येईल. रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्र’ हा चित्रपटदेखील ख्रिसमसला येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये तीव्र स्पर्धा लागलेली दिसेल. ‘ब्रह्मास्र’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वारंवार बदलण्यात येत आहे. त्यामुळे नक्की तारीख काही दिवसांनी अधिकृत जाहीर होईल.

शाहरूख खानचा ‘पठाण’ आणि संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ या दोन्ही महत्त्वाच्या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू आहे. त्यांच्या प्रदर्शनाची तारीखदेखील काही दिवसांनी जाहीर केली जाईल. अन्य काही चित्रपटांच्या तारखाही जाहीर होतील. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीने आता आपल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरविला आहे.

संबंधित बातम्या