शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर

संतोष भिंगार्डे
सोमवार, 8 मार्च 2021

प्रीमियर 

मराठी चित्रपटसृष्टीत विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांची निर्मिती केली जात आहे. मराठी चित्रपटांचे कौतुक विविध चित्रपट महोत्सवांमध्ये तसेच पुरस्कार सोहळ्यांमध्ये होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नवनवे कलाकार, तसेच कल्पक आणि हुशार दिग्दर्शकांची फळी निर्माण होत आहे. आत्तादेखील विविध विषयांवरील चित्रपट तयार होत आहेत. विविध विषयांवरील चित्रपटांबरोबरच ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती काहीशी वाढली आहे असेच चित्र दिसत आहे.  

एकेकाळी वर्षाला पन्नास ते साठ चित्रपटांची निर्मिती होत असलेल्या मराठी चित्रपटसृष्टीने शंभरीचा आकडा कधीच ओलांडला आहे. मागील वर्षी कोरोनामुळे इंडस्ट्री ठप्प झाली असली, तरी आता सगळीकडे शूटिंग सुरू झाले आहे. अनेक कलाकार शूटिंगमध्ये रंगलेले आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही शूटिंग पार पडत आहे. 

दोनेक वर्षांपूर्वी प्रसाद ओकने ‘हिरकणी’ चित्रपट आणला होता. त्याचबरोबर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने ‘फर्जंद’ व ‘फत्तेशिकस्त’ हे चित्रपट केले. या तिन्ही चित्रपटांनी चांगले यश मिळविले. त्यामुळेच कदाचित मराठीमध्ये ऐतिहासिक चित्रपट आता अधिक होत असावेत असे वाटते. ते काहीही असो, परंतु आपला धगधगता आणि प्रेरणादायी इतिहास आजच्या पिढीसमोर चित्रपट माध्यमाच्या रूपाने येतोय म्हटल्यानंतर त्याचे स्वागत केलेच पाहिजे. 

सध्या तीन ते चार ऐतिहासिक चित्रपटांचे शूटिंग सुरू आहे, तर काही चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झालेले आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘पावनखिंड’, ‘छत्रपती ताराराणी’ असे काही चित्रपट येत आहेत. त्यामुळे आता मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांचा जणू काही ट्रेंड निर्माण झाला आहे.

‘मुळशी पॅटर्न’सारखा सुपरहिट चित्रपट देणारा लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट आणत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. या भव्य ऐतिहासिक चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन प्रवीण तरडेने केले आहे. शेखर मोहिते पाटील, सौजन्य सूर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात कलाकार कोण आहेत, ही नावे गुलदस्तात ठेवण्यात आली आहेत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा अभिनेता गश्मीर महाजनी साकारणार आहे. हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. महाराजांच्या निधनानंतर ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हिंदवी स्वराज्याच्या या लढवय्या मर्द मराठ्याचा धगधगता इतिहास ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाद्वारे आपल्याला पाहायला मिळणार आहे.

मराठेशाहीच्या इतिहासातील प्रत्येक पान अनेक शूर योद्ध्यांच्या पराक्रमाने सजलेले आहे. त्यातील एक पान म्हणजे पावन खिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी गाजविलेल्या पराक्रमाचे. याच पावनखिंडीतील शौर्यगाथा आणि थरारक इतिहास ‘पावनखिंड’ या चित्रपटाद्वारे उलगडण्यात येणार आहे. बाजीप्रभू देशपांडे यांचा अंगावर शहारे आणणारा पराक्रम या चित्रपटात मांडण्यात आला आहे. दिग्पाल लांजेकरने या चित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन केले आहे. आधी या चित्रपटाचे नाव ‘जंगजौहर’ असे होते, आता ते ‘पावनखिंड’ असे करण्यात आले आहे. ए. ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय-अनिरुद्ध यांनी केली आहे. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा भला मोठा फौजफाटा आहे. पावनखिंडीतील तो थरार आणि पराक्रम १० जूनला चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मागे कणखरपणे स्वराज्याची धुरा सांभाळली... मोगलांना सळो की पळो करून सोडले ते रणरागिणी छत्रपती महाराणी ताराबाई यांनी. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम यांच्या पत्नी ताराबाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कर्तृत्ववान राजस्त्री. त्या एक उत्तम राजकारणी, व्यवस्थापिका तर होत्याच, त्याशिवाय एक आदर्श सून, पत्नी आणि माता या जबाबदाऱ्याही त्यांनी लीलया पार पाडल्या. अशा या रणरागिणीची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने दिग्दर्शक व सिनेमॅटोग्राफर राहुल जाधवने ‘छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात छत्रपती ताराराणीची व्यक्तिरेखा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारणार आहे. सोनालीने यापूर्वी ‘हिरकणी’ या ऐतिहासिक चित्रपटात हिरकणीची भूमिका साकारली होती आणि आता तिने साकारलेल्या भूमिकांमध्ये आणखी एका महत्त्वपूर्ण भूमिकेची भर पडली आहे. खरे तर ही एक आव्हानात्मक भूमिका आहे आणि सोनाली त्याकरिता सज्ज झाली आहे.

जगदंब क्रिएशन या बॅनरखाली खा. डॉ. अमोल कोल्हे ‘शिवप्रताप’ या मालिकेअंतर्गत ‘वाघनख’, ‘वचपा’ आणि ‘गरुडझेप’ असे तीन ऐतिहासिक चित्रपट करीत आहेत. दोनेक वर्षांपूर्वी त्यांनी या चित्रपटांची घोषणा केली होती. आता यावर्षी या चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होणार आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. आता मोठ्या पडद्यावरही ते छत्रपतींची भूमिका साकारणार आहेत. अन्य काही ऐतिहासिक चित्रपट तयार होत आहेत किंवा होणार आहेत. आता प्रेक्षकांनी अशा चित्रपटांचे चांगले स्वागत करणे तितकेच आवश्यक आहे. आपला हा सोनेरी इतिहास रुपेरी पडद्यावरही ऐतिहासिक कामगिरी करील यात शंकाच नाही.

ऐतिहासिक चित्रपट मराठीमध्ये तयार होत आहेत ही नक्कीच चांगली बाब आहे. आपल्या शिवकालीन इतिहासाचे एकेक सुवर्ण पान रुपेरी पडद्यावर येत आहे ही आनंदाची बाब आहे. अशा चित्रपटांद्वारे आजच्या पिढीने काही तरी प्रेरणा घेतली पाहिजे असे मला वाटते. तसेच ऐतिहासिक चित्रपटांबरोबरच आपल्याकडे दुर्मीळ असे साहित्य आहे. अशा साहित्यावरही चित्रपट येणे आवश्यक आहे.

-  समीर दीक्षित, वितरक

‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ आणि आता ‘पावनखिंड’ या चित्रपटांचा मी एक भाग आहे याचा मला आनंद आहे. ‘फर्जंद’ या चित्रपटाला यश मिळाल्यानंतर ‘फत्तेशिकस्त’ आला आणि त्यानंतर ‘हिरकणी’ आला. हे चित्रपट यशस्वी झाले आणि आता ‘सरसेनापती हंबीरराव’ येत आहे. ‘छत्रपती ताराराणी’ आणि ‘पावनखिंड’ या चित्रपटांना कसे यश मिळते हे मला पाहायचे आहे. अशा प्रकारे ऐतिहासिक चित्रपट येत आहेत ही चांगली बाब आहे.
- अजय पूरकर, अभिनेता

संबंधित बातम्या