घडलं-बिघडलं...

संतोष भिंगार्डे
सोमवार, 12 एप्रिल 2021

प्रीमियर 

सन २०२१ हे नवीन वर्ष मोठ्या आशा-आकांक्षा घेऊन उगवले होते. मागील वर्षीच्या कोरोनाचे संकट आता दूर होईल असे वाटले होते. हळूहळू सगळ्या व्यवहाराची गाडी रुळावर येत होती. 

नवीन वर्ष निश्चित चांगले जाईल असे वाटले होते. सर्वसामान्यांपासून सगळ्यांचाच हुरूप वाढलेला होता. चित्रपटगृह मालक, तेथील कर्मचारी तसेच चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी सुटकेचा श्वास सोडला होता. निर्माते व दिग्दर्शकांनी आपापल्या चित्रपटाच्या तारखा एकामागोमाग एक रिलीज केल्या. अनेक मोठमोठे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज देखील झाले होते. फेब्रुवारी ते मार्चपर्यंत अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीजदेखील झाले. परंतु कोरोनाचा कहर वाढला आणि सगळेच गणित विस्कळीत झाले आहे.

या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात हिंदी चित्रपटसृष्टीची वाटचाल चांगली सुरू झाली होती. हार्दिक मेहता दिग्दर्शित आणि राजकुमार राव, जान्हवी कपूर यांच्या भूमिका असलेला ‘रुही’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांनी त्यातल्या त्यात थोडा फार प्रतिसाद दिला. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटगृहातील आपले जुने दिवस देखील आठवले. यापाठोपाठ मार्च महिन्यात जॉन अब्राहमचा ‘मुंबई सागा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ॲक्शनने भरलेल्या या चित्रपटाने जेमतेम कमाई केली. त्यानंतर परिणीती चोप्राचे दोन चित्रपट लागोपाठ आले. अर्जुन कपूरबरोबरचा ‘संदीप और पिंकी फरार’ आणि जगात भारताची मान अभिमानाने उंचावणाऱ्या बॅडमिंटनपटू साईना नेहवालचा बायोपिक ‘साईना’ आला. या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतोय न मिळतोय तोच कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या बातम्या येऊ लागल्या आणि हिंदी चित्रपटसृष्टीला धस्स झाले. निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी लगेचच आपल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाचे टाईम टेबलच बदलले. एकापाठोपाठ प्रदर्शित होणारे चित्रपट आता पुढे ढकलण्यात आले आहेत. यामध्ये ‘खिलाडी’ कुमारचे चित्रपट आघाडीवर आहेत. 

अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’, ‘बेल बाॅटम’ आणि ‘अतरंगी रे’ हे सगळे चित्रपट आता लांबणीवर पडले आहेत. विशेष बाब म्हणजे रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतची तारीख वारंवार बदलण्यात येत आहे आणि त्याला कारण आहे कोरोनाचा वाढता संसर्ग. खरे तर हा चित्रपट मागील वर्षी मार्च महिन्यात येणार होता. त्यानंतर दिवाळीत येईल आणि ख्रिसमसला येईल असे सांगण्यात आले. आता परवापर्यंत हा चित्रपट एप्रिल महिन्याच्या तीस तारखेला प्रदर्शित होईल असे सांगण्यात येत होते. परंतु आता या चित्रपटाचे प्रदर्शन प्रदीर्घ काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. आता तो कधी प्रदर्शित होईल हे सांगता येत नाही. 

हीच तऱ्हा अन्य चित्रपटांची झाली आहे. ‘चेहरे’ हा चित्रपट कधीपासून तयार आहे. अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारीत आहेत. याआधी ९ एप्रिल रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट आता कधी येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. राणी मुखर्जी-सैफ अली खान अभिनीत ‘बंटी और बबली 2’ या चित्रपटाच्या रिलीजच्या तारखेलाही धक्का बसला आहे. हा सिनेमा २३ एप्रिल रोजी सिनेमागृहात झळकणार होता. राणा दगुबत्तीचा या वर्षातील मेगा बजेट चित्रपट ‘हाथी मेरे साथी’ मागील महिन्यात प्रदर्शित होणार होता. आता या सगळ्या चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले आहे. ‘बाहुबली’ फेम राजामौली यांचा ‘आरआरआर’ तसेच अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’, रणवीर सिंगचा ‘८३’ असे सगळेच चित्रपट आता लांबणीवर गेले आहेत. शिवाय आता ३० एप्रिलनंतर सरकारने चित्रपटगृहे 

सुरू करण्यास परवानगी दिली, तरी प्रेक्षक किती आणि कसे येतील हा प्रश्नही निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना भेडसावीत आहे. कारण कोरोनाचे संक्रमण संपत नाही तोपर्यंत प्रेक्षक चित्रपटगृहात येईल असे बऱ्याचजणांना वाटत नाही. 

जी हिंदी चित्रपटसृष्टीची परिस्थिती आहे, तीच परिस्थिती किंबहुना त्यापेक्षाही कठीण परिस्थिती मराठी चित्रपटसृष्टीची आहे. मराठीमध्ये स्वप्नील जोशी आणि पूजा सावंत यांचा हाॅरर चित्रपट ‘बळी’ याच महिन्यात येणार होता. शिवाय हेमंत ढोमेचे दिग्दर्शन असलेला ‘झिम्मा’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार होता. त्यांनी तसे जाहीर केलेही होते. या दोन्ही चित्रपटांमध्ये तगडी स्टारकास्ट असल्यामुळे मराठीची यावर्षीची सुरुवात चांगली होईल असे वाटले होते. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी तसेच अन्य निर्मात्यांनी मोठी आस धरलेली होती. या चित्रपटांना लोकांनी चांगली पसंती दिली की आपणही त्यापाठोपाठ आपल्या चित्रपटांच्या तारखा जाहीर करू असे त्यांनी ठरविलेले होते. परंतु या दोन्ही चित्रपटांचे तसेच अन्य चित्रपटांचे प्रदर्शन पुढे सरकले आहे. 

मुळात मराठीमध्ये तीस ते चाळीस चित्रपट तयार आहेत आणि ते पडद्यावर येण्याची वाट पाहात आहेत. मराठी इंडस्ट्रीसाठी खूप कठीण कालावधी आहे. परंतु यातूनही चांगले काही तरी निष्पन्न होईल अशी आशा आहे. एकूणच सांगायचे तर कोणता चित्रपट कोणत्या तारखेला येईल हे आता काहीही सांगता येत नाही. चित्रपटगृहे सुरू झाली होती. हळूहळू चित्रपट प्रदर्शित होत होते. काही बाबी घडत होत्या आणि तोच कोरोनाचा कहर पुन्हा वाढला व घडता घडता सगळ्याच बाबी बिघडल्या. तरीही लवकरात लवकर सर्व काही सुरळीत सुरू होईल. हिंदी व मराठी चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित होतील आणि यशाची गुढी ते उभारतील अशा शुभेच्छा मराठी नववर्षानिमित्त देऊया.

संबंधित बातम्या