नवीन मराठी चित्रपटांची घोषणा

संतोष भिंगार्डे
मंगळवार, 27 एप्रिल 2021

प्रीमियर 

कोरोनाचे संक्रमण वाढल्यामुळे चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणाला काही मोजक्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये परवानगी देण्यात आली आहे. शासनाच्या नियमांनुसार चित्रपटगृहे जरी बंद असली, तरी मराठी चित्रपटसृष्टी कमालीची फॉर्मात आहे. चित्रपटांचे मुहूर्त, टीझर आणि पोस्टर लाँच तसेच शूटिंगचा क्लॅप दिला जात आहे. 

यावर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून काही निर्माते आणि दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा केला आहे, तर काहींनी टीझर आणि पहिले पोस्टर लाँच केले आहे. ‘ख्वाडा’ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटातील अभिनेता भाऊसाहेब शिंदे याने गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आपल्या नव्या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच केले आहे. ‘रौंदळ’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ‘रौंदळ’चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे भाऊ शिंदे फिल्म्स या बॅनरखाली बाळासाहेब शिंदे यांच्या साथीने स्वतः भाऊसाहेब या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. अर्थातच या चित्रपटात भाऊसाहेबच मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर एक रांगडा गडी पाहायला मिळतो. गजानन पडोळ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. 

‘कट्यार काळजात घुसली’नंतर आता सुबोध भावे ‘संगीत मानापमान’ हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर ‘मानापमान’ चित्रपटाद्वारे सादर करणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच करण्यात आले आहे. सुनील फडतरे चित्रपटाची निर्मिती करत आहेत. शिरीष गोपाळ देशपांडे या चित्रपटाची पटकथा लिहीत आहेत. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय करणार आहेत. १९११ मध्ये हे नाटक रंगमंचावर आले होते. त्यात बालगंधर्वांची प्रमुख भूमिका होती.

 अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओक ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट करत आहे. प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. आता या चित्रपटाचा ‘टीझर’ प्रदर्शित करण्यात आला. संगीतकार अजय-अतुल यांचे अस्सल मराठी मातीतील संगीत या चित्रपटाला लाभले आहे. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सर्वेसर्वा तसेच निर्माते अक्षय बर्दापूरकर आणि गोल्डन रेशो फिल्म्स यांनी हा चित्रपट केला आहे. या चित्रपटाची पटकथा व संवाद लेखन केले आहे चिन्मय मांडलेकरने. मराठीतील आघाडीची अभिनेत्री यामध्ये चंद्रमुखीची भूमिका साकारीत आहे. 

 दिग्दर्शक मिलिंद कवडेच्या ‘टकाटक’ या अॅडल्ड कॉमेडी चित्रपटाने २०१९मध्ये बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची, ‘टकाटक २’ची घोषणा करण्यात आली आणि गुढीपाडव्याला गोव्यात चित्रीकरणाला सुरुवातही झाली आहे. पर्पल बुल एंटरटेनमेंट प्रा. लि.च्या बॅनरखाली तयार होणाऱ्या ‘टकाटक २’ची निर्मिती ओमप्रकाश भट्ट आणि धनंजय सिंग मासूम करीत आहेत, तर  सहनिर्माते आहेत जगत सिंग. दिग्दर्शन व संकल्पना मिलिंद कवडे यांचीच असून, कथा-पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. किरण बेरड यांनी कथानकाला पोषक असे संवादलेखन केले आहे. प्रथमेश परबसह अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, भारत गणेशपुरे, आशा शेलार आदी कलाकार या चित्रपटात दिसतील.

दिग्दर्शक चंद्रशेखर सांडवे यांच्या ‘बिबट्या’ या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. खरेतर बिबट्या म्हटले की आपल्या मनात धडकी भरते. आता याच नावाचा चित्रपट येतोय म्हटल्यानंतर सगळ्यांच्या भुवया नक्कीच उंचावल्या आहेत. नेमके काय असणार आहे या चित्रपटात याची चर्चा सुरू झाली आहे. या सिनेमात विजय पाटकर, महेश कोकाटे, अनंत जोग, प्रमोद पवार, डॉ. विलास उजवणे आदी कलाकार आहेत

 

संबंधित बातम्या