चित्रपटगृहांची दारे उघडणार कधी?

संतोष भिंगार्डे
सोमवार, 24 मे 2021

प्रीमियर 

एक वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या चित्रपटगृह व्यवसाय पुन्हा सुरू होतो की नाही, अशी काळजी वाटण्यासारखी परिस्थिती आता उद्‍भवली आहे. चित्रपटगृहे पुन्हा उघडली तरी प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांमध्ये आणणे हे मोठे आव्हान आहे.

एक काळ असा होता की सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे ही चित्रपटसृष्टीची आन बान आणि शान होती. कित्येक हिंदी व मराठी चित्रपटांनी सिंगल स्क्रीनमध्ये रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव साजरे केले आहेत. सिंगल स्क्रीनमुळेच कित्येक कलाकार रातोरात स्टार झाले. एकेकाळी महाराष्ट्रात या सिंगल स्क्रीनची संख्या खूप मोठी होती. त्यावेळच्या तरुणाईची ही आवडती ठिकाणे होती. कॉलेजमधील लेक्चर बंक करून कित्येकांनी या थिएटरात जाऊन आपली लव्हस्टोरी फुलवली. त्यावेळचे तिकीट दरही जेमतेम होते आणि सर्वसामान्यांना ते परवडणारे होते. परंतु हळूहळू मनोरंजन माध्यमाचा विस्तार होऊ लागला. टीव्हीपाठोपाठ मल्टिप्लेक्सची साखळी भारतात आली आणि सिंगल स्क्रीनला हळूहळू उतरती कळा लागली. टूरिंग टॉकिज पाठोपाठ एकेकाळची वैभवशाली परंपरा असलेली ही चित्रपटगृहे आता नष्ट होतात की काय अशी भीती वाटू लागली. आता तर कोरोनामुळे ही भीती प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हे दिसत आहेत.

‘कोरोनामुळे सिंगल स्क्रीनची अवस्था खूप बिकट झाली आहे. त्यामुळे हा व्यवसाय यापुढे कितपत जगेल ही शंका आहे. कित्येक सिंगल स्क्रीन आता उघडण्याची शक्यता कमी आहे. या इंडस्ट्रीबद्दल सरकारला आस्था आणि आत्मीयता नाही. खरे तर हा व्यवसाय टिकविण्यासाठी राज्य सरकार, महापालिका आणि नगरपालिका यांनी काही ना काही हातभार यापूर्वी लावणे आवश्यक होते. पण कुणीच लक्ष दिलेले नाही. सिंगल स्क्रीनच्या जागी अन्य उद्योग सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी आमची मागणी आहे. परंतु सरकार त्याबाबतीतही काही विचार करीत नाही. आता करमणुकीची साधने दिवसेंदिवस वाढत चाललेली आहेत. ओटीटीसारखा नवा प्लॅटफॉर्म आला आहे. त्यामुळे सिंगल स्क्रीनच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे आणि कोरोनामुळे आता पूर्णपणे हा व्यवसाय डुबलेला आहे. छोटी छोटी चित्रपटगृहे उभारावीत तर ती आर्थिकदृष्ट्या फायद्याची नाहीत.’ सिनेमा ओनर्स अॅण्ड एक्झिबीटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार यांनी सांगितले.

मल्टिप्लेक्सची मुहूर्तमेढ
पुण्यातील सातारा रोड येथील सिटीप्राईड हे मल्टिप्लेक्स १९ एप्रिल २००१ रोजी उभे राहिले. ते सगळ्यात पहिले मल्टिप्लेक्स. त्यानंतर पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निव्हल सिनेमा अशी साखळीच उभी राहिली. आजमितीस महाराष्ट्रात शंभरच्या वर मल्टिप्लेक्स विविध ठिकाणी दिमाखाने उभी आहेत. कोरोनामुळे सिंगल स्क्रीनबरोबरच मल्टिप्लेक्सचा व्यवसाय हा धोक्यात आला आहे. 

चित्रपटगृह व्यवसायाचे पूर्णतः कंबरडेच मोडलेले आहे. कोट्यवधी रुपयांचा फटका या व्यवसायाला बसलेला आहे, कारण कोरोनाच्या साथीमुळे गेल्या एक वर्षाहून अधिक काळ सगळीच चित्रपटगृहे बंद आहेत. चित्रपटगृहे जरी बंद असली तरी एकूणच चित्रपटगृहाची देखभाल व डागडुजी, विजेचे बिल, सरकारचे विविध कर, कर्मचाऱ्यांचा पगार इत्यादी गोष्टींसाठी पैसा खर्च करावा लागला आहे. एसी प्लान्टपासून ते प्रोजेक्टर सुरू आहे की नाही हे वारंवार तपासावे लागते आहे. आता चित्रपटगृहे कधी उघडतील हे काही सांगता येत नाही आणि त्यातच समजा सरकारने चित्रपटगृहे उघडण्यास परवानगी दिली, तरी प्रेक्षक चित्रपट पाहण्यास येतील की नाही हीदेखील शंका आहे. 

मल्टिप्लेक्स असोसिएशनचे सचिव प्रकाश चाफळकर म्हणाले, ‘मल्टिप्लेक्स व्यवसायाला मोठी झळ बसली आहे. या व्यवसायात गुंतवणूक खूप मोठी आहे. त्यामुळे फारशी मल्टिप्लेक्स बंद होतील असे वाटत नाही. आता दुसरी लाट संपतेय तोच तिसऱ्या लाटेची तयारी सुरू आहे. त्यामुळे सगळेच अनिश्चित आहे. मध्यंतरी सरकारने चित्रपटगृहे पन्नास टक्के उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी दिली होती. पण त्यामध्ये खूप नुकसान झाले आहे. आता सरकारने शंभर टक्के उपस्थितीत चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी द्यावी. कारण आता लसीकरण लवकरच पूर्ण होईल आणि प्रेक्षक चित्रपट पाहण्यास येतील. मात्र आता त्यांना चित्रपटगृहात आणणे मोठे कठीण काम आहे. त्याकरिता चांगली वातावरण निर्मिती करावी लागेल. मल्टिप्लेक्सला रंगरंगोटी करावी लागेल. तिकीट दरांबाबत फेरविचार करावा लागेल. मोठ्या स्टार्सचे बिग बजेट चित्रपट आणावे लागतील, तरच प्रेक्षक येतील. परंतु मल्टिप्लेक्सची संख्या कमी होईल असे वाटत नाही. वादातील आणि भाडेतत्त्वावर असलेल्या मल्टिप्लेक्सबाबत काही सांगता येत नाही एखाद-दुसरे बंद होतीलही. परंतु हा व्यवसाय जगावा असे सरकारला वाटत नाही.’

चित्रपटगृह मालकांना प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येण्यासाठी नवनवीन शक्कल लढविणे आवश्यक आहे. सगळ्यात प्रथम चित्रपटगृहांची स्वच्छता उत्तम राखावी लागेल, तसेच प्रेक्षकांना आकृष्ट करण्यासाठी काही तरी नवनव्या योजना आखाव्या लागतील. उदाहरणच द्यायचे झाले, तर दोन तिकिटांवर एक तिकीट मोफत किंवा दोन तिकिटांवर पॉपकॉर्न वा समोसा मोफत अशी एखादी स्कीम आखणे गरजेचे आहे. चित्रपटांचे प्रमोशन मोठ्या प्रमाणात करावी लागेल. चित्रपटातील कलाकारांचा त्याकरिता मोठा सहभाग असणे आवश्यक आहे.

तसे पाहायला गेले तर अशा प्रकारच्या काही स्कीम यापूर्वी राबविण्यात आल्या होत्या आणि त्या यशस्वी ठरल्या होत्या. त्यामुळे आता अशाच किंवा यापेक्षा काही वेगळ्या योजना आखून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे कसे वळविता येईल हे पाहणे आवश्यक आहे. 

ओटीटीचे मोठे आव्हान
आता चित्रपटगृहांसमोर सगळ्यात मोठे आव्हान आहे ते ओटीटी प्लॅटफॉर्मचे. आपल्याकडे ‘अॅमेझॉन प्राइम’, ‘नेटफ्लिक्स’, ‘डिस्ने+ हॉटस्टार’, ‘झी ५’, ‘सोनी लिव’ असे प्रमुख ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत. आजच्या तरुण पिढीने या नव्या प्लॅटफॉर्मचे चांगले स्वागत केले आहे. विविध सीरिजबरोबरच हिंदी चित्रपटही येथे पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षभरात ‘सडक २’, ‘लक्ष्मी’, ‘शकुंतला देवी’, ‘द बिग बूल’ आणि आता ‘राधे..युअर मोस्ट वाँटेड भाई’ असे काही नवीन चित्रपटही येथे प्रदर्शित झाले. भविष्यात आणखीन काही चित्रपट येथे प्रदर्शित होतील. त्यामुळे याचा मोठा परिणाम चित्रपटगृहांवर होऊ शकतो. 

भविष्यात आणखीन नवीन तंत्रज्ञान येईल. त्यामुळे तेथील प्रेक्षक वर्गाला चित्रपटगृहात कसे आणता येईल याचाही विचार होणे आवश्यक आहे. कारण प्रेक्षकांना एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. घरबसल्या फावल्या वेळेत चित्रपट पाहता येतात. एखाद्या ओटीटी प्लॅटफॉर्मची वार्षिक किंवा मासिक-सहामाही शुल्क भरल्यानंतर एखादी सीरिज किंवा चित्रपट वारंवार प्रेक्षकांना पाहता येत होता. परंतु ‘राधे..’ या चित्रपटाने एक वेगळाच ट्रेंड आणला आहे. हा चित्रपट पुन्हा पाहायचा असल्यास जादा शुल्क भरावे लागत आहे. ओटीटीने केलेला हा वेगळा प्रयोग ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारा आहे. तो यशस्वी होईल असे वाटत नाही. कारण सलमानच्या ‘राधे...’ चित्रपटात फारसा काही दम नाही आणि असे चित्रपट पाहण्यासाठी ग्राहक आपल्या खिशात पुन्हा पुन्हा हात घालतील, असे वाटत नाही.

संबंधित बातम्या