बॉलिवूड आणि ऐतिहासिक चित्रपट

संतोष भिंगार्डे
सोमवार, 31 मे 2021

प्रीमियर 

हिंदी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची परंपरा ही पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. अशा चित्रपटांसाठी खूप संशोधन आणि अभ्यास करावा लागतो. शिवाय असे चित्रपट तयार करणे ही खूप खर्चीक बाब असते. आता यशराज बॅनर्स दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी यांना घेऊन ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट करीत आहे. यानिमित्त हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मोजक्या ऐतिहासिक चित्रपटांवर टाकलेली एक नजर...

बी -टाऊनची हवाच काहीशी वेगळी आहे. तेथे कोणता चित्रपट चालेल आणि कोणता नाही हे काही सांगता येत नाही. एक मात्र खरे की बायोपिक आणि ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते. काही चित्रपट त्याला अपवाद असले तरी काही चित्रपट उत्तम व्यवसाय करतात. अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर मागील वर्षी आलेल्या ओम राऊत दिग्दर्शित ‘तान्हाजी... द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाचे देता येईल. 

आता यशराज बॅनर्स ‘पृथ्वीराज’ हा ऐतिहासिक चित्रपट करत आहे. हा चित्रपट बाराव्या शतकातील राजपूत राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे आणि या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान यांची व्यक्तिरेखा साकारीत आहे. आता यशराजसारखे प्रख्यात बॅनर हा चित्रपट करत आहे म्हटल्यानंतर तो भव्य आणि दिव्य असणार यामध्ये शंकाच नाही. या चित्रपटाद्वारे मिस वर्ल्ड मनुषी छिल्लर हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. तिच्या पदार्पणाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

आपण फ्लॅशबॅकमध्ये डोकावलो तर आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक चित्रपट आलेले आहेत. त्यातील काही कलाकारांना नावलौकिक मिळाला आहे. प्रेक्षकांनी त्या त्या चित्रपटांवर भरभरून प्रेम केले आहे. १९६०मध्ये ‘मुग़ल-ए-आज़म’ हा चित्रपट आला होता. पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार आणि मधुबाला अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट तयार व्हायला तब्बल सतरा वर्षे लागली होती. दिग्दर्शक के. आसिफ यांचे हे स्वप्न होते. त्यांची जिद्द होती. त्यामुळे या चित्रपटासाठी खूप पैसा खर्च करण्यात आला. ‘जब प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी तेव्हा तब्बल दहा करोड रुपये खर्च करण्यात आले. कधी कधी सेट तोडून पुन्हा बांधण्यात आला, कारण के. आसिफ यांना आपल्या मर्जीनुसार आणि पसंतीनुसार काम करायचे होते. ‘ऐ मोहब्बत जिंदाबाद’ या दुसऱ्या एका गाण्यात तब्बल शंभर कोरस सिंगर्सनी भाग घेतला होता. पृथ्वीराज कपूर यांनी राजा अकबराची भूमिका साकारली होती, तर दिलीप कुमार यांनी सलीमची. मधुबाला यांनी अनारकलीची भूमिका साकारली होती. सलीम आणि अनारकलीची ही प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूप आवडली. तेव्हाच्या काळातील सगळ्यात महागडा चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाते. नंतर हा चित्रपट रंगीत करण्यात आला. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात हा एक चित्रपट माईलस्टोन म्हणून गणला जातो. 

या चित्रपटानंतरही ऐतिहासिक चित्रपट आले आणि गेले. प्रेक्षकांनी त्यातील काही चित्रपटांचे चांगले स्वागत केले. सन २००१मध्ये दिग्दर्शक संतोष सिवनचा ‘अशोका’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटाबद्दल तेव्हा चर्चा खूप रंगल्या. या चित्रपटामध्ये शाहरुख खान मौर्य घराण्याचा प्रमुख अशोक यांच्या भूमिकेत दिसला होता. चित्रपटातील शाहरुख-करिना जोडीने एक वेगळीच कमाल केली होती. 

इतिहासाच्या पानामध्ये आपली प्रेमकहाणी अजरामर करणारे मुमताज आणि शहाजहान. शहाजहानने आपली पत्नी मुमताजसाठी बांधलेल्या ताजमहालाला लोक प्रेमाचे प्रतीक मानतात. २००५मध्ये ताजमहालाच्या कथेवर आधारित, अकबर खान दिग्दर्शित ‘ताजमहल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अभिनेता अरबाज खानने या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही तरीही अरबाजच्या अभिनयाचे खूपच कौतुक झाले.

हिंदी चित्रपटसृष्टीत आशुतोष गोवारीकर ऐतिहासिक चित्रपट करण्यात कमालीचे माहीर आहेत. त्यांचा या विषयावरील अभ्यास दांडगा आहे. त्यांनी हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना घेऊन. ‘जोधा अकबर’ हा चित्रपट केला. २००८मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. या चित्रपटामध्ये सम्राट अकबरची भूमिका हृतिक रोशनने केली होती, तर ऐश्वर्या राय महाराणी जोधाबाईच्या भूमिकेत होती. या चित्रपटाच्यावेळी काही वादविवादही झाले होते. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला बरीच दाद मिळाली. विशेषतः या चित्रपटामधील ए. आर. रेहमानचे संगीत प्रेक्षकांच्या अजूनही मनात आहे. आशुतोष गोवारीकरांनीच हृतिक रोशनला घेऊन ‘मोहंजदडो’ हा चित्रपट २०१६मध्ये आणला होता. यातील हृतिक रोशनने साकारलेले सरमन नावाची व्यक्तिरेखा अतिशय लोकप्रिय झाली. हृतिकबरोबर या चित्रपटात पूजा हेगडेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. चित्रपटातील संपूर्ण तामजाम उत्तम होता. मात्र चित्रपटाची कथा प्रेक्षकांना एवढी रुचली नाही. त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर एवढी कमाई करू शकला नाही. गोवारीकर यांनी पानिपतच्या लढाईचा इतिहास ‘पानिपत’ या चित्रपटाद्वारे मांडला. अर्जुन कपूर, क्रिती सेनॉन, संजय दत्त आदी कलाकारांनी या चित्रपटात काम केले. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चालला. 

सलमान खान आणि झरीन खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘वीर’ हा चित्रपट २०१०मध्ये आला होता. या चित्रपटात सलमान खानने शक्तिशाली पिंडारी योद्धा पृथ्वी सिंहचा मुलगा वीर प्रताप सिंहची भूमिका साकारली होती. या चित्रपटात जॅकी श्रॉफने माधवगडच्या राजा ज्ञानेंद्र सिंहची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी जॅकी श्रॉफचे बरेच कौतुक झाले.

निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट म्हटले की मोठा तामजाम असतो. भव्य-दिव्य सेट्स, सुमधुर संगीत असा काही थाटमाट त्यांच्या चित्रपटाचा असतो. त्यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटाने चांगली कमाई केली. यामध्ये रणवीर सिंगने बाजीराव पेशवे यांची, दीपिका पदुकोणने मस्तानीची आणि प्रियांका चोप्राने काशीबाईंची भूमिका साकारली होती. यानंतर भन्साळी यांनी २०१८मध्ये ‘पद्मावत’ चित्रपट आणला. ‘पद्मावत’मध्ये शाहिद कपूरने महाराजा रावल रतन सिंहची आणि रणवीरने अल्लाउद्दीन खिलजीची नकारात्मक भूमिका साकारली. रणवीरच्या भूमिकेला चांगली पसंती मिळाली. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’ हे दोन्ही चित्रपट सुरुवातीला वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. 

कंगना रानौतची मुख्य भूमिका असलेला ‘मणिकर्णिका...द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपटही आला होता. यामध्ये कंगनाने झाशीच्या राणीची भूमिका साकारली होती आणि या चित्रपटाने खूप कमाई केली होती. 

असे ऐतिहासिक चित्रपट अनेक आले आणि येतीलही. आजच्या पिढीला इतिहासात डोकावून पाहण्याची संधी देण्यासाठी असे प्रयत्न वारंवार होतील आणि आपण त्याचे स्वागतच केले पाहिजे.

संबंधित बातम्या