प्रीमियर 

संतोष भिंगार्डे
सोमवार, 28 जून 2021

प्रीमियर 

अक्षयने ‘रक्षाबंधन’ चित्रपट बहिणीला केला समर्पित
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार सध्या भलताच बिझी आहे. तो एकापाठोपाठ एक चित्रपट साईन करत आहे आणि एकापाठोपाठ एक चित्रपटांचे शूटिंग संपवत आहे. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे तो या सेटवरून त्या सेटवर पोहोचत आहे. त्याचा ‘बेलबॉटम’ हा चित्रपट पूर्ण झाला असून तो पुढील महिन्यात चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. मागील वर्षीच कोरोना काळात त्याने पहिल्यांदा शूटिंगला सुरुवात केली. आता महाराष्ट्रात हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू होत असताना तो आपल्या ‘रक्षाबंधन’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

या चित्रपटाची घोषणा त्याने मागील वर्षी रक्षाबंधनच्याच दिवशी केली होती. त्यानंतर तो अन्य प्रोजेक्टमध्ये बिझी होता. त्यातच लॉकडाउन लागले आणि सगळे शेड्यूल विस्कळित झाले. परंतु आता मुंबईतच ‘रक्षाबंधन’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर नायिका आहे भूमी पेडणेकर. भूमीने यापूर्वी अक्षयबरोबर ‘टॉयलेट.. एक प्रेमकथा’ या चित्रपटात काम केले आहे. सहेजमिन कौर, दीपिका खन्ना, सादिया खतीब आणि स्मृती श्रीकांत या अक्षयच्या बहिणींच्या भूमिकेत दिसणार आहेत. हिमांशू शर्मा आणि कनिका ढिल्लन यांनी हा चित्रपट लिहिला आहे. आनंद एल. राय या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून माहिती देताना अक्षय कुमार म्हणाला, ‘जेव्हा मी आणि माझी बहीण अलका मोठे होत होतो तेव्हा ती माझी पहिली फ्रेंड होती, आणि ती आमची अगदी नैसर्गिक मैत्री होती. हा चित्रपट तिला समर्पित आहे आणि आमच्या त्या विशेष नात्याचा उत्सव आहे.’

ताहिर राज भसीनची जिद्द
अभिनेता ताहिर राज भसीन ‘आऊटसायडर’ जरी असला, तरी आता तो बॉलिवूडमध्ये हळूहळू आपला पाया भक्कम करीत आहे. यशराज बॅनर्सच्या ‘मर्दानी’ या चित्रपटात त्याने काम केले आणि त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. आताही तो ‘लूप लपेटा’, ‘बुलबुल तरंग’, ‘ये काली काली आँखे’ आणि ‘८३’ या चार चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. आता जरी तो यशाची एकेक पायरी वर चढत असला, तरी त्याने या इंडस्ट्रीत मोठा स्ट्रगल केला आहे. 

खरेतर स्ट्रगल कुणालाच चुकलेला नाही. परंतु ताहिरचा स्ट्रगल ऐकता हा पठ्ठा भलताच जिगरी आणि जिद्दी दिसतो. तो म्हणाला, ‘आदित्य चोप्रा यांचा ‘मर्दानी’ हा चित्रपट मी केला असला, तरी तत्पूर्वी मला काय सोसावे लागले आहे हे माझे मलाच माहीत. तब्बल अडीचशे वेळा मला नाकारण्यात आले होते. तो तीन वर्षांचा काळ माझी परीक्षा पाहणारा आणि मनाला वेदना देणारा होता. तेव्हा कधी कधी नकारात्मक विचारही मनात आला. परंतु मी आशा सोडली नाही. आज ना उद्या या इंडस्ट्रीत आपल्याला नक्कीच यश मिळेल असे माझे मन मला सांगत होते. त्या आशेवर मी पुढील वाटचाल करीत होतो आणि त्याच वेळी ‘मर्दानी’ हा चित्रपट मला मिळाला. त्यानंतर पुढे काय झाले ते मी सांगायला नको. आता माझ्याकडे चांगले प्रोजेक्ट असले तरी स्ट्रगल काही चुकलेला नाही.’

संबंधित बातम्या