‘आव्हानात्मक भूमिका’

संतोष भिंगार्डे
सोमवार, 5 जुलै 2021

प्रीमियर 

लेखक सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ या पुस्तकावर बेतलेली ‘समांतर’ ही वेबसीरीज मागील वर्षी एमएक्स प्लेअरवर प्रसारित झाली होती. या सीरीजमध्ये अभिनेता स्वप्नील जोशीसह नितीश भारद्वाज, तेजस्विनी पंडित आदी कलाकारांनी भूमिका केल्या होत्या. आता या सीरीजचा दुसरा भाग अर्थात ‘समांतर २’ आला आहे. यामध्ये कुमार महाजन ही व्यक्तिरेखा अभिनेता स्वप्नील जोशी साकारत आहे. त्याबद्दल स्वप्नील जोशीबरोबर केलेली बातचीत....

ओटीटी प्लॅटफॉर्म तुझ्यासाठी नवीन आहे. येथे तुला ‘समांतर’ या पहिल्याच वेबसीरीजने स्टारडम मिळाले आहे. या यशाबद्दल सांगशील?
सप्नील जोशी ः स्टारडम किंवा यश या सगळ्या गोष्टींकडे मी फारसे लक्ष देत नाही. कारण मी केवळ प्रामाणिकपणे काम करीत राहतो आणि त्या कामामध्ये माझी वर्षानुवर्षांची मेहनत आहे. त्यातच प्रेक्षकांनी माझ्या कामाला पसंती दिली आहे आणि सतत देत आहेत. त्यांचे प्रेम मला महत्त्वाचे वाटते. त्याकरिता मी मायबाप प्रेक्षकांचा खूप आभारी आहे. त्यांच्या प्रेमामुळेच माझी वाटचाल सुरू आहे. माझ्या ‘समांतर’ सीरीजला त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रेमामुळेच पहिला भाग यशस्वी झाला आणि आता येणारा दुसरा भागदेखील यशस्वी होईल, अशी मला खात्री आणि विश्वास वाटतो.  

एखाद्या चित्रपट किंवा सीरीजचा पहिला भाग जेव्हा यशस्वी होतो तेव्हा दुसऱ्या भागाबद्दल खूप उत्सुकता लागलेली असते. त्यामुळे संपूर्ण टीमवर खूप मोठी जबाबदारी असते. साहजिकच काम करताना मनावर दडपण वगैरे येते. याबाबत तुला नेमके काय वाटते?
सप्नील जोशी ः कोणत्याही कलाकृतीमध्ये काम करीत असताना थोडे फार दडपण मनावर असतेच असते. त्यातच ‘समांतर’ ही लोकप्रिय सीरीज. ही भारतातील सगळ्यात जास्त पाहिली गेलेली सातव्या क्रमांकाची सीरीज होती. त्यामुळे अशा सीरीजच्या दुसऱ्या भागात काम करताना मनावर प्रचंड दडपण होते. मात्र सकारात्मक दडपण घेतले तर त्याचा निश्चित फायदा होतो. आम्ही सगळ्या टीमने सकारात्मक दडपण घेतले आणि काम केले. 

‘समांतर’च्या पहिल्या भागाचा दिग्दर्शक सतीश राजवाडे होता आणि आता समीर विद्वांस आहे. सतीशबरोबर काम करताना जो कम्फर्ट झोन होता, तो आता समीरबरोबर काम करताना तयार झाला होता का?
सप्नील जोशी ः नक्कीच. समीर हुशार दिग्दर्शक आहे. सतीश व समीर या दोघांच्या बाबतीत अधिक बोलायचे तर दोघांच्या कामामध्ये फारसा फरक आहे, असे मला वाटत नाही. दोघेही तितकेच हुशार आणि कल्पक आहेत. दोघांचेही कामावर नितांत प्रेम आहे. दोघांचीही स्क्रीप्टवर चांगली कमांड आहे. त्यामुळे समीरबरोबर काम करताना मला खूप मजा आली आणि आमची छान केमिस्ट्री जुळली. खरेतर समीर आणि मी एकत्र चित्रपटात काम करणार होतो. परंतु तारखांमुळे आम्ही एकत्र चित्रपटात काम करू शकलो नाही. मात्र म्हणतात ना जे होते ते चांगल्यासाठी होते. ‘समांतर’मुळे आमचा एकत्र काम करण्याचा योग जुळून आला आणि आता आमची चांगली मैत्री झाली आहे.

सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असो की वेबसीरीज; यामध्ये बॅकग्राऊंड स्कोअर महत्त्वाचा असतो. याबाबतीत तुझे नेमके मत काय आहे?
सप्नील जोशी ः मला वाटते की बॅकग्राऊंड स्कोअर आणि सिनेमॅटोग्राफी ही दोन महत्त्वाची अंगे आहेत. सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असो की सीरीज यामध्ये या दोन बाबी म्हणजे महत्त्वाची दोन कॅरेक्टर्सच. त्यानंतर कथानक वगैरे. या दोन्ही बाबी आणि कथानक चांगले असले की ते प्रॉडक्ट उत्तम झाले म्हणूनच समजा.

‘समांतर’मधील कुमार महाजनच्या व्यक्तिरेखेतील तुला जाणवलेले वैशिष्ट्य काय?
सप्नील जोशी ः कुमार महाजन हा माझ्यापेक्षा खूप वेगळा आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारताना मला खूप मेहनत घ्यावी लागली. ही व्यक्तिरेखा माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होती. त्यामुळे त्या भूमिकेचे बेअरिंग बरोबर पकडणे मला खूप कठीण गेले. कुमार विक्षिप्त स्वभावाचा आहे. तो उ‍द्धट आहे आणि सडाफटिंगही आहे. 

एखाद्या चित्रपटातील रोमँटिक भूमिका आणि सीरीजमध्ये कुमार महाजन सारख्या व्यक्तिरेखा साकारण्यात खूप फरक असतो. भूमिकेचे बेअरिंग कॅच करणे तुला कसे जमते?
सप्नील जोशी ः मी इंडस्ट्रीत खूप वर्षे काम करीत आहे. सातत्याने अभ्यास करीत आहे. अभिनय म्हणजे दररोजची ती एक तालीमच आहे. गाण्यासाठी जसा रियाज करावा लागतो, तसाच रियाज अभिनयासाठी करावा लागतो. त्यामुळे अनुभवातून हे सगळे जमते असे मला वाटते. परंतु हे सगळे सोपे नसते. ते खूप कठीण काम असते.    

या सीरीजमध्ये भविष्य आणि नशीब यावर भाष्य करण्यात आले आहे. तुझा स्वतःचा नशिबावर आणि भविष्यावर कितपत विश्वास आहे?
सप्नील जोशी ः भविष्यावर विश्वास नसेल असा एकही व्यक्ती आपल्याला भेटणार नाही. जो उद्याच्या दिवसावर विश्वास ठेवतो त्या प्रत्येक माणसाचा भविष्यावरदेखील विश्वास असतो हे नक्की. त्यामुळे माझादेखील भविष्यावर तेवढाच विश्वास आहे. पहिल्या सीझनमध्ये कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला. सुदर्शन चक्रपाणी यांनी त्यांचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ असलेली डायरी कुमारच्या स्वाधीन केली. त्यानुसार कुमारच्या आयुष्यात काही गोष्टी घडतही होत्या. एका मनोरंजक वळणावर येऊन ही कथा संपली होती. आता दुसरा भाग अधिक रोमांचकारी असणार आहे.

तू स्वतःच्या जीवनातील भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ याबद्दल काय सांगशील?
सप्नील जोशी ः भविष्यकाळ उत्तमच आहे. वर्तमानकाळसुद्धा चांगला आहे. यामध्ये नक्कीच चांगले होणार आहे. मात्र मी भूतकाळाकडे फारसे लक्ष देत नाही. वर्तमान आणि भविष्यकाळाकडे जास्त लक्ष द्यायला हवे असे मला वाटते.

‘महाभारत’मधील ‘श्रीकृष्ण’ नितीश भारद्वाज आणि ‘श्रीकृष्ण’ मालिकेत श्रीकृष्ण म्हणजे तू, या ‘समांतर’मध्ये एकत्र आला आहात. त्यामुळे नितीश भारद्वाज यांच्याबद्दल काय सांगशील?
सप्नील जोशी ः या सीरीजमधील कास्टिंगचे संपूर्ण श्रेय सतीश राजवाडेला दिले पाहिजे. कारण सतीशने या गोष्टी जुळवून आणल्या आहेत. तसेही नितीश सरांनीदेखील खूप काळ मराठीमध्ये काम केलेले नाही. त्यामुळे श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे हे दोन्ही कलाकार या सीरीजमध्ये एकत्र आले आहेत.  

एखाद्या पुस्तकावर किंवा कादंबरीवर चित्रपट किंवा वेबसीरीज करताना थोडी फार सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावी लागते. यामध्ये किती लिबर्टी घेतली आहे असे तुला वाटते?
सप्नील जोशी ः मुळातच आम्ही पुस्तकाशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही केवळ व्हिज्युअलायझेशन आमच्या पद्धतीने केले आहे. तसेच काही वेबसीरीजमध्ये पुस्तक सोडून खूप काही केले जाते, त्याबाबतीत मला अधिक काही भाष्य करायचे नाही. मात्र आम्ही पुस्तकाशी एकरूप राहून ही वेबसीरीज करण्याचा प्रयत्न केला आहे.  

सुहास शिरवळकर यांच्या ‘दुनियादारी’ पुस्तकावर दुनियादारी चित्रपट आला होता. आता त्यांच्याच पुस्तकावर ही सीरीज आली आहे. हा निव्वळ योगायोग म्हणायचा का?
सप्नील जोशी ः सुहास शिरवळकर माझे आवडते लेखक आहेत. खरेतर त्यांना अधिक नावलौकिक-मानमरातब आणि बरेच काही मिळायला हवे होते. पण ते मिळाले नाही याची खंत मला वाटते.  

ओटीटी प्लॅटफॉर्मवर हल्ली सस्पेन्स थ्रिलर, कोर्ट ड्रामा, क्राईम सीरीज अधिक चालतात याचे कारण काय असावे?
सप्नील जोशी ः मागणी तसा पुरवठा, असे मला वाटते. त्यामुळे जशी प्रेक्षकांची मागणी तसा पुरवठा करावा लागतो. मुळातच ओटीटी प्लॅटफॉर्म हा अतिशय बलाढ्य प्लॅटफॉर्म आहे. येणारा काळ हे माध्यम गाजवणार. येणारे दशक हे ओटीटीचे आहे.

संबंधित बातम्या