‘इंडस्ट्रीत टॅलेंटच  महत्त्वाचे...’

संतोष भिंगार्डे
सोमवार, 2 ऑगस्ट 2021

प्रीमियर 

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा याने ‘सदियाँ’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. पण नंतर त्याला अपेक्षित असलेले यश काही मिळाले नाही. मग तो राजकारणाकडे वळला. पण आता राजकारण करीत असतानाच तो पुन्हा हिंदी चित्रपटसृष्टीत कमबॅक करीत आहे. याबाबतीत त्याच्याशी केलेली बातचीत...

हिंदी चित्रपटसृष्टीतील तुझ्या प्रवासाबद्दल तू काय सांगशील?
लव सिन्हा : या दहा वर्षांचा कालावधीत मी तीन चित्रपट केले. पण माझे चित्रपट म्हणावे तसे चाललेले नाहीत. परंतु मी हिंमत हरलेलो नाही. आज ना उद्या मला नक्कीच यश मिळेल याची खात्री आहे. पण एकूणच सांगायचे तर हा प्रवास वाटतो तितका काही सोपा नव्हता. प्रत्येक टप्प्यावर मला संघर्ष करावा लागला आणि आजही मी तितकाच संघर्ष करीत आहे. आता माझ्याकडे दोन मोठे प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे आता एका सक्सेसची वाट पाहत आहे आणि ते मिळेल, कारण मी नेहमी सकारात्मक विचार करणारा माणूस आहे.

या दहा वर्षांच्या कालावधीत तुला अन्य काही प्रोजेक्ट ऑफर झाले नाहीत का?
लव सिन्हा :  ऑफर्स कित्येक येत होत्या, परंतु त्यामध्ये म्हणावा तसा काही दम नव्हता. मी थोडा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. कारण आता पुढे काही करायचे तर ते धमाकेदार आणि तितकेच उत्तुंग असले पाहिजे या मतावर मी ठाम होतो. त्याकरिता प्रतीक्षा करायची तयारी होती. आता मी नावीन्यपूर्ण काम करीत आहे. 

स्टार किडकडून लोकांच्या खूप अपेक्षा असतात. तुझ्याकडूनही खूप अपेक्षा आहेत असे तुला वाटत नाही का?
लव सिन्हा :  मुळातच तुम्ही स्टार किड असलात की तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये सगळ्या गोष्टी सोप्या होतात ही लोकांची मानसिकता आहे. त्यामुळे त्याचे प्रचंड दडपण त्या त्या स्टार किड्सवर असते. त्या दडपणाखाली ही मंडळी काम करीत असतात. त्यात काही यशस्वी होतात तर काही अयशस्वी. परंतु येथे यश मिळविणे वाटते तितके सोपे नसते. एक वेळ तुम्हाला संधी मिळेल, परंतु नंतर तुम्हाला तुमच्यातील कलागुण सिद्ध करावे लागतील. त्याकरिता अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत घ्यावी लागते. माझ्याबद्दलही खूप उलटसुलट चर्चा ऐकिवात आली आहे. परंतु मी त्याकडे काणाडोळा केला आहे. आऊटसायडर्सपेक्षा इनसायडर्सना खूप मोठी परीक्षा येथे द्यावी लागते, असे मला वाटते.

चित्रपटसृष्टीत नशीब महत्त्वाचे की टॅलेंट की गॉडफादर असणे महत्त्वाचे?
लव सिन्हा : टॅलेंट अतिशय महत्त्वाचे आहे, कारण टॅलेंटच्या जोरावरच तुम्ही येथे यशस्वी होऊ शकता. टॅलेंटबरोबरच नशिबाची साथ मिळणेही महत्त्वाचे आहे. गॉडफादर ही नंतरची बाब झाली. कारण गॉडफादरमुळे तुम्हाला एखादी संधी मिळेलही. परंतु जीवनात यशस्वी वाटचाल करायची असल्यास टॅलेंट आणि नशिबाची साथ खूप महत्त्वाची आहे. त्याकरिता अधिक मेहनत घेणे तितकेच आवश्यक आहे. 

जेव्हा तुला अपयश किंवा नैराश्य येते त्यावेळी तू पहिल्यांदा कुणाकडे जातोस?
लव सिन्हा :   मला कोणत्याही प्रकारचे नैराश्य किंवा अपयश आले तर त्यावर कशी मात करता येईल किंवा कोणता तोडगा काढता येईल याचा विचार करतो. अशा वेळी मनाने अजिबात खचत नाही किंवा विचाराने कोलमडून पडत नाही. अशा वेळी आपला आत्मविश्वास दांडगा असावा लागतो. आपल्या मनातील विचार पक्के असावे लागतात आणि मोठी जिद्द अंगी असावी लागते. त्यामुळे मी सहसा कधी नर्व्हस होत नाही. सकारात्मक विचार करतो.

तुझी बहीण सोनाक्षीबरोबर तुझे बॉँडिंग कसे आहे?
लव सिन्हा : मी तिचा मोठा भाऊ आहे आणि प्रत्येक कुटुंबात मोठ्या भावाला जो मान असतो तोच मान आमच्या घरातही आहे. आई-बाबा, भाऊ कुश व बहीण आमचे सगळ्यांचे एकमेकांबरोबर छान बाँडिंग आहे. तिला गरज भासते तेव्हा ती माझा सल्ला घेते, परंतु तिचे निर्णय ती स्वतःच घेते. तिचा सगळ्यात आवडलेला चित्रपट ‘लुटेरा’. या चित्रपटात तिने अप्रतिम काम केले आहे. आज माझी बहीण लोकप्रियतेच्या एका शिखरावर आहे याचा आम्हा सगळ्यांना नक्कीच आनंद आहे आणि अभिमानही आहे. 
 
‘हाऊस ऑफ क्रिएटिव्हिटी’ या तुझ्या नव्या उपक्रमाबद्दल काय सांगशील?
लव सिन्हा : ही कल्पना मला सुचली आणि मी ती घरातील मंडळींना सांगितली. त्यांनाही ती आवडली. आमच्या घरामध्ये सगळेच कलाकार आहेत. भाऊदेखील चांगला फोटोग्राफर आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला एकत्र घेऊन मला काही तरी नवीन करायचे होते. ज्या लोकांमध्ये खरेच काही तरी टॅलेंट आहे, मात्र त्यांना आत्तापर्यंत योग्य प्लॅटफॉर्म, संधी मिळालेली नाही, अशा लोकांसाठी मला काही तरी नवीन सुरू करायचे होते म्हणून मी ‘हाऊस ऑफ क्रिटिव्हिटी’ची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.

यामध्ये नेमके काय वेगळे बघायला मिळेल?
लव सिन्हा : आम्ही एक वेबसाइट लाँच केली आहे. कुणाला आमच्या वेबसाइटवर त्यांची कला (पेंटिग्ज) दाखवायची असेल तर ते वेबसाइटवरून आमच्याशी संपर्क साधू शकतात. त्यांनी केलेले काम बघून आम्ही ते आमच्या साइटवर लाँच करू. तसेच तुम्हाला स्वतःसाठी काही युनिक डिझाईनचे चित्र हवे असेल तर तुम्ही त्याची साइटवर मागणी करू शकता. जास्तीत जास्त लोकांच्या कला आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरून दाखवण्याचा प्रयत्न करू.

तुझ्या मते क्रिएटिव्हिटीची व्याख्या काय आहे?
लव सिन्हा : मुळातच याची व्याख्या करणे खूप कठीण आहे, कारण प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून क्रिएटिव्हिटीची व्याख्या वेगवेगळी आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल तुझे काय मत आहे?
लव सिन्हा :अनेक कलाकार तसेच दिग्दर्शक यांना यामधून चांगली संधी मिळाली आहे. विशेष बाब म्हणजे नवोदित कलाकारांसाठी हा नवा प्लॅटफॉर्म मोठी संधी देणारा आहे. परंतु या प्लॅटफॉर्मवर किती लोकांनी एखादी सीरीज किंवा चित्रपट पाहिला हे गणित नेमके काय असते तेच मला समजलेले नाही. भारतात आता ओटीटी प्लॅटफॉर्म आत्ता कुठे बाळसे धरत आहे. त्यातील किती टिकतील आणि किती या स्पर्धेत बाद होतील हे लवकरच समजणार आहे. 
 
आता चित्रपटसृष्टी बदलत चाललेली आहे. त्यामुळे आता प्रोजेक्ट स्वीकारताना अत्यंत सतर्क राहावे लागणार आहे ना?
लव सिन्हा : नक्कीच. मी आता एक थ्रिलर सीरीज करीत आहे. याची निर्मिती जॅकी भगनानी यांचा चुलत भाऊ निक्की भगनानी करीत आहे. सीरीजचे नाव, दिग्दर्शक ही सारी गुपिते निर्माता निक्की भगनानी योग्य वेळी उघड करेल. त्याशिवाय एक हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट एका चित्रपटाचा रिमेक आहे. खूप मजेशीर कथानक आहे या चित्रपटाचे. परंतु या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने समोर येतील. या दोन्ही प्रोजेक्टमुळे माझ्या करिअरला वेगळी कलाटणी मिळेल असे मला वाटते. मला तर असे वाटते की माझी आता कुठे सुरुवात होत आहे आणि खूप मोठी मजल गाठायची आहे.  

या क्षेत्रातील तुझे गुरू कोण आहेत?
लव सिन्हा : साहजिकच माझे वडील. त्यांचे चित्रपट पाहूनच मी लहानाचा मोठा झालो आहे. माझे वडीलच माझे प्रेरणास्थान आहेत. त्यानंतर रोशन तनेजा आणि मेहुल चतुर्वेदी यांच्याकडे मी अॅक्टिंगचे धडे गिरविले आहेत. त्यामुळे त्यांनादेखील मी गुरुस्थानी मानतो. मी ज्यांच्याकडून काही ना काही शिकलेलो आहे त्या सगळ्यांना मी गुरू मानतो.

राजकारण अधिक पसंत आहे की अॅक्टिंग?
लव सिन्हा : दोन्ही गोष्टी मला तितक्याच आवडतात. अॅक्टिंग तर आत्ता करत आहे आणि राजकारणात आधीपासूनच आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टींना मी तेवढेच प्राधान्य देतो. अॅक्टिंग माझे काम आहे, राजकारण कर्तव्य आहे.

संबंधित बातम्या