छोट्या पडद्यावर मोठ्यांची गर्दी

संतोष भिंगार्डे
सोमवार, 16 ऑगस्ट 2021

प्रीमियर 

लॉकडाउनमुळे चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बंद आहेत. ती कधी उघडतील आणि उघडली तर किती जणांना परवानगी देण्यात येईल हे आत्ता तरी सांगता येत नाही. तो शासनाचा निर्णय असेल आणि त्याचे पालन करावेच लागेल. परंतु लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांची अधिक पसंती टीव्ही वाहिन्या आणि ओटीटी प्लॅटफॉर्मना अधिक आहे. सध्या ओटीटीवर चांगला कन्टेंट येत आहे आणि प्रेक्षक अशा सीरीज आणि चित्रपटांचे चांगले स्वागत करीत आहेत. 

सध्या अनेक स्मॉल बजेटचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. टीव्हीवरदेखील नवनवीन मालिका आणि विविध कार्यक्रम दाखविले जात आहेत. प्रेक्षकांना आपल्याकडे ओढण्याची जणू काही स्पर्धाच लागलेली आहे. ही सगळी चढाओढ आपापला टीआरपी वाढविण्यासाठी चाललेली आहे. त्याकरिता मोठमोठ्या कलाकारांना छोट्या पडद्यावर आणले जात आहे. त्यांची लोकप्रियता कॅश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदीबरोबरच आता मराठीतरी छोट्या पडद्यावर मोठे कलाकार काम करीत आहेत. हे मोठमोठे कलाकार मराठीच्या छोट्या पडद्यावर आल्यामुळे रंगत खूपच वाढणार आहे. प्रेक्षकांना निखळ करमणूक मिळणार आहेच, परंतु वाहिन्यांमधील स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता स्वप्नील जोशी सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करीत आहे. मोठ्या पडद्यावर आपली वेगळी छाप उमटविल्यानंतर स्वप्नीलने पुन्हा छोट्या पडद्यावर आगमन केले आणि त्याचे हे आगमन यशस्वी झाले असेच म्हणता येईल. मोठा व छोटा पडदा अशी यशस्वी इनिंग खेळणारा स्वप्नील आता आणखीन एक वेगळी इनिंग खेळण्यास सज्ज झाला आहे. उद्योगपती नरेंद्र फिरोदियांबरोबर तो भारताचा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करीत आहे. प्रादेशिक भाषेतील चित्रपट तसेच सीरीज यांच्यासाठी हा एक नवा प्लॅटफॉर्म असणार आहे. एक कलाकार म्हणून काही तरी वेगळे करावे असा विचार स्वप्नीलच्या मनात आला आणि त्याने प्रादेशिक भाषेतील चित्रपट आणि वेबसीरीज यांच्यासाठी नवे व्यासपीठ सुरू केले. 

हल्ली बहुतेक कलाकार असे काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच दाद द्यायला हवी. स्वप्नीलबरोबरच मराठीतील हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओकदेखील ‘सोनी मराठी’वरील खळखळून हसायला लावणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून आपली छाप पाडत आहे. ‘कोण होणार करोडपती’द्वारे अभिनेता सचिन खेडेकर प्रेक्षकांच्या बुद्धीला चालना देऊन त्यांच्या ज्ञानाच्या तिजोरीत मोठी भर घालत आहे. सोनी मराठी वाहिनीवरील हा कार्यक्रम अभिनेता सचिन खेडेकरच्या हजरजबाबीपणामुळे आणि समोरच्या स्पर्धकांशी हसत-खेळत गप्पा मारल्यामुळे आता चांगलाच लोकप्रिय ठरलेला आहे. 

अभिनेत्री सई ताम्हणकर, स्पृहा जोशी आदी कलाकार छोट्या पडद्यावर विविध रिॲलिटी शोमध्ये आहेत. वर्षा उसगावकर, अजिंक्य देव, मिलिंद गवळी, आदिती देशपांडे हे सध्या छोट्या पडद्यावर विविध मालिकांतून काम करीत आहेत. अजिंक्य देव कित्येक वर्षांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेमध्ये काम करीत आहे. मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिकासुद्धा ‘सोनी मराठी’वर सुरू आहे.

श्रेयस तळपदे, अंकुश चौधरी, प्रार्थना बेहरे हे कलाकारदेखील आता पुन्हा छोट्या पडद्याकडे वळलेले आहेत. श्रेयस तळपदेने हिंदी चित्रपटसृष्टीत आपला चांगला जम बसविला आहे. आता तो ‘झी मराठी’वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेद्वारे पुन्हा छोट्या पडद्यावर परतत आहे. ही एक सुंदर प्रेमकथा आहे आणि श्रेयसची वेगळी भूमिका आहे. या मालिकेत श्रेयसबरोबरच प्रार्थना बेहरेही छोट्या पडद्यावर कमबॅक करीत आहे. खरेतर प्रार्थनाने आपल्या अभिनयाची इनिंग हिंदी मालिकेतून सुरू केली होती. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. ती सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते. आपल्या चाहत्यांच्या नेहमीच ती संपर्कात असते. आता ती छोट्या पडद्यावर पुन्हा येत असल्यामुळे चाहते कमालीचे उत्सुक आहेत. याबाबत प्रार्थना म्हणते, की मराठी चित्रपटांमध्ये काम करीत असताना मला मालिकांच्या ऑफर्स येत होत्या. परंतु मी तेव्हा निश्चय केला होता की चित्रपटच करायचे. त्यामुळे मालिकांना वेळ दिला नव्हता. परंतु आता ही मालिका करीत आहे आणि त्याला कारण ही भूमिका आहे. या मालिकेतील माझी भूमिका खूप मजेशीर आहे. त्याबद्दल अधिक काही सांगू शकत नाही. परंतु मला अजूनही खूप गोष्टी शिकायच्या आहेत. नवनवीन दिग्दर्शकांबरोबर काम करायचे आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतला डॅशिंग अभिनेता अंकुश चौधरीलादेखील छोट्या पडद्याने भुरळ घातली आहे. ‘दुनियादारी’, ‘धुरळा’, ‘डबल सीट’ असे काही एक से बढकर एक सुपरहिट चित्रपट देणारा अंकुश आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार’ या शोमध्ये परीक्षक म्हणून सहभागी होत आहे. हा एक डान्स रिअॅलिटी शो आहे. महाराष्ट्रातील तरुण-तरुणींच्या नृत्याविष्काराला मोठे व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम आहे. ''या शोद्वारे मी पुन्हा छोट्या पडद्यावर येत आहे. प्रेक्षकांशी संवाद साधता येणार आहे, त्यामुळे मी कमालीचा उत्साहित आहे,’ असे मत अंकुशने व्यक्त केले आहे.

तसे पाहिले तर मोठ्या पडद्यावरच्या आघाडीच्या कलाकारांनी छोट्या पडद्यावर काम करणे हे नवीन राहिलेले नाही. छोट्या पडद्याची व्याप्ती आणि लोकप्रियता पाहता अनेक कलाकार छोट्या पडद्याकडे वळलेले आहेत. नवनवीन कथा-कल्पना तसेच विविध प्रकारचे रिअॅलिटी शो छोट्या पडद्यावर येत आहेत. नवोदित कलाकारांना विविध मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. तसेच विविध रिअॅलिटी शोमधून नव्या टॅलेंटला वाव मिळत आहे. हिंदीतील छोट्या पडद्याचा विचार केला 
तर सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चनपासून सलमान खान, माधुरी दीक्षित, मलाईका अरोरा-खान, शिल्पा शेट्टी, अनुपम खेर आदी कित्येक कलाकार छोट्या पडद्याकडे वळलेले आहेत. मोठ्या पडद्यावरच्या कलाकारांची लोकप्रियता कॅश करण्याचा प्रयत्न छोट्या पडद्याने केला आहे. यामध्ये हा छोटा पडदा नक्कीच यशस्वी झाला आहे. आता हळूहळू मराठीच्या छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्यावरच्या कलाकारांची गर्दी होत चाललेली आहे. मोठ्या पडद्यावर अभिनयाची यशस्वी इनिंग खेळणारे हे कलाकार छोट्या पडद्यावरही यशस्वी होतील यामध्ये काही शंका नाही.
 

संबंधित बातम्या