‘विविध भूमिकांमुळे समृद्ध झालो’

संतोष भिंगार्डे
सोमवार, 30 ऑगस्ट 2021

प्रीमियर 

‘ती परत आलीये’ ही नवी मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू झाली आहे. या मालिकेत अभिनेते विजय कदम काम करीत आहेत, आणि त्यानिमित्ताने त्यांचे छोट्या पडद्यावर कमबॅक होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या एकूणच करिअरबद्दल मारलेल्या गप्पा...

तुम्ही छोट्या पडद्यावर काम करून काही वर्षे झाली आहेत. सध्या छोट्या पडद्याचे स्वरूप खूप बदलले आहे. या बदलत्या स्वरूपाकडे तुम्ही कसे पाहता?
विजय कदम : स्वरूप खूप बदलले आहे हे निश्चित. त्यावेळी एक इंचाच्या कॅसेट होत्या. त्यावर सगळे शूट होत होते. तेव्हाचे कॅमेरे वेगळे होते. तेव्हाची प्रकाश व्यवस्था वेगळी होती आणि आता सगळेच बदलले आहे. कॅमेऱ्याचा आकार छोटा झाला आहे. आता कॅसेटची जागा छोट्या छोट्या कार्डांनी घेतली आहे. तंत्रज्ञान खूपच विकसित झाले आहे. छोट्या पडद्याचा चेहरामोहरा पूर्णतः बदलला आहे. आता एखादा संकलक घरी बसूनही संकलनाचे काम करू शकतो एवढे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. आता वेगवेगळ्या प्रकारच्या लेन्सेस आल्या आहेत. त्यामुळे काम अधिक सुकर झाले आहे. मी ‘घडलंय बिघडलंय’ या मालिकेत काम केलेल्याला आता जवळपास बारा वर्षे झाली आहेत, तसेच तीनेक वर्षांपूर्वी मी ‘जिंदगी नॉटआऊट’मध्ये छोटी भूमिका साकारली होती. मध्यंतरी काही जाहिरातींमध्ये काम केले असल्यामुळे आता मालिकेमध्ये काम करताना काही अडचण येईल असे वाटत नाही.

तुम्ही नाटकांमध्ये विनोदी भूमिका साकारल्या आहेत. विनोदी भूमिका साकारणे आणि गंभीर भूमिका साकारणे वेगळे आहे. प्रत्येक भूमिकेचे बेअरिंग तुम्ही कसे पकडता?
विजय कदम : माझी स्वतःची मी एक थिअरी तयार केलेली आहे. त्यानुसार मी काम करीत असतो. मी माझ्या प्रत्येक भूमिकेला माझी प्रेयसी मानतो आणि प्रेयसीप्रमाणे प्रत्येक भूमिकेवर तेवढेच प्रेम करतो.

मी साकारत असलेल्या प्रत्येक भूमिकेचे मनात दिवसभर चिंतन करीत असतो. त्यातील संवाद तसेच त्या भूमिकेचा लहेजा, याचा सातत्याने विचार डोक्यात घुमत असतो. तसेच मी विविध माणसांचे निरीक्षण करीत असतो. त्यांच्या लकबी टिपत असतो आणि त्याप्रमाणे ती भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे होते काय, की पाहणाऱ्यांना ती भूमिका आपल्या जवळची वाटते. माझ्या नशिबामुळेच मला विनोदी भूमिकांबरोबरच गंभीर भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्याचे अधिक श्रेय मी दिग्दर्शकांना देईन. गंभीर भूमिका साकारताना मला दिग्दर्शक सांगायचे, ‘विजय... भूमिका खूप गंभीर आहे. येथे विनोद नको.’ तात्पर्य असे की गंभीर भूमिका साकारताना माझ्यावर दिग्दर्शकाचा पावलोपावली अंकुश असल्याने गंभीर भूमिकाही मी सहजरीत्या साकारू शकलो. अशा भूमिकांमध्ये मी विनोदाची किंचितशीही झालर येऊ दिली नाही. विशेष बाब म्हणजे विनोदी भूमिका साकारताना मी अधिक गंभीर असतो. कारण ती भूमिका लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचली पाहिजे, लोकांना ती आवडली पाहिजे.

इतकी वर्षे तुम्ही या इंडस्ट्रीत काम करीत आहात. या इंडस्ट्रीने तुम्हाला खूप काही दिले आहे. परंतु नेमके तुम्ही काय मिस केले आहे असे तुम्हाला वाटते?
विजय कदम : आतापर्यंत मी बरेच काम केले असले, तरी मला अजूनही खूप काम करायचे आहे. मला अभिप्रेत असलेल्या व्यक्तिरेखा साकारायच्या आहेत. ‘नटसम्राट’मधील ‘विठोबा’ची भूमिका साकारण्याची माझी खूप इच्छा आहे. मी आजही कित्येकांना सांगितले आहे, की तुम्ही ‘नटसम्राट’ करीत असाल तर पाच प्रयोगांपुरती का असेना, विठोबाची भूमिका मला द्या. तो विठोबा होतकरू नट आहे... उमेदीचा नट आहे. त्या विठोबासमोर अप्पासाहेब बेलवलकरांसारखे ‘नटसम्राट’ उभे आहेत. त्यांच्यासमोर आपली वाक्ये कशी म्हणू अशा निरागसतेने तो त्यांच्याकडे पाहत असतो. ती निरागसता चेहऱ्यावर आणणे, आपल्या देहबोलीतून आणणे किती कठीण आहे. त्यामुळे ती भूमिका साकारण्याची खूप इच्छा आहे. तसेच ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील ‘नारायण’ ही भूमिका. तो नारायण मी शाळेत असताना वाचला आहे. माझ्या मनात तो अजून दडून बसला आहे. आज तो नारायण मी केला तर स्वप्नात येऊन भाई (पु. ल. देशपांडे) मला म्हणतील की हा नारायण मला अपेक्षित होता. तेव्हा अशा बऱ्याच व्यक्तिरेखा आहेत ज्या मला साकारायच्या आहेत. मी विविध भूमिका साकारतो आणि त्या भूमिका पाहत असताना प्रेक्षक हा विजय कदम आहे हे विसरतात, तेथे माझ्या कलेचा कस लागलेला असतो असे मला वाटते. कलाकार म्हणून माझ्यासाठी ती समाधानाची बाब असते. मला रुळलेल्या वाटेवरून चालायला आवडत नाही. मला नेहमीच वेगळी वाट आखायला आवडते. वेगळ्या वाटेने प्रवास करायला आवडतो.

सध्याच्या पिढीबरोबर काम करताना काय वाटते? त्यांच्याबरोबर तुम्ही कसे जुळवून घेता?
विजय कदम : मी आता ज्यांच्याबरोबर काम करीत आहे ती बहुतेक पिढी विशी आणि तिशीतील आहे. त्यामुळे त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची विचार करण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी मी जाणून घेतो आणि त्यांच्या काही नव्या सूचना असतील तर त्यांचा आदर करून काम करतो. आत्ताची पिढी हुशार आहे आणि ती चांगले काम करीत आहेत. त्यांच्याबरोबर काम करताना अजिबात अवघडल्यासारखे वाटत नाही. खेळीमेळीने सगळे काम होत आहे.

झी मराठीवरील ‘ती परत आलीये’ ही मालिका करण्याचे नेमके कारण काय?
विजय कदम : मला काही तरी वेगळे करायचे होते म्हणून ही मालिका करीत आहे. तसेच या मालिकेतील बोलीभाषा वेगळी आहे आणि ती लोकांच्या मनात मी रुळवणार आहे. खरेतर ते एक धाडसी काम आहे आणि त्यामुळेच ती स्वीकारली आहे. ही व्यक्तिरेखाच वेगळी आहे. जयदेव हट्टंगडी आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या शिबिरात आम्हाला सांगितले होते की कोणतीही भूमिका साकारण्यापूर्वी त्या भूमिकेतील तत्त्वज्ञान आधी शोधले पाहिजे. ते पात्र कशा पद्धतीने विचार करते हे पाहिले पाहिजे. त्यानुसार मी प्रत्येक भूमिकेतील तत्त्वज्ञान शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर ती भूमिका साकारतो. या मालिकेत मी ‘बाबूराव तांडेल’ नावाची भूमिका साकारीत आहे. हा बाबूराव कोकणातील लाल मातीतील आहे. एका खेड्यातील सर्वसाधारण माणूस. तो स्वतःचे परखड मत मांडणारा आहे. त्याच वेळी समोर आलेल्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे सुचविणे आणि स्वतःचा बडेजाव मिरविणे अशी ती भूमिका आहे. लेखक आणि दिग्दर्शक यांनी मला बऱ्याच गोष्टी या भूमिकेच्या बाबतीत सांगितल्या आहेत. त्याचे मनात सतत चिंतन सुरू असते. 

प्रत्येक भूमिका कलाकाराला काही ना काही देत असते किंवा शिकविते. तुम्ही आतापर्यंत ज्या भूमिका केल्या, त्यापैकी कोणत्या भूमिकेने तुम्हाला काय शिकविले? कलाकार म्हणून तुम्ही किती समृद्ध झालात असे तुम्हाला वाटते?
विजय कदम : मी १९७४पासून व्यावसायिक रंगभूमीवर काम करीत आहे. तेथे काम करीत असताना मला विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली. तीनेक वर्षापूर्वी ‘हॅम्लेट’ हे नाटक सध्याच्या तरुणाईने नव्याने केले. हे नाटक मी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी केले होते. ती वेगळी भाषा होती. तसेच पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शित केलेले व सुरेश चिखले यांनी लिहिलेले ‘खंडोबाचं लगीन’मध्ये मी ‘हेगडी प्रधान’ ही भूमिका केली. ही भूमिकाही निराळी होती. ही भूमिका इतकी उत्तम झाली की मला त्या वर्षीचे नाट्यदर्पणचे सर्वोत्कृष्ट लोकनाट्य अभिनेत्याचे पहिले बक्षीस मिळालं. याच्या बरोबर विरोधी भूमिका म्हणजे श्री. ना. पेंडसे यांच्या ‘रथचक्र’ नाटकातील. या नाटकातील भाषाच मुळात तेजस्वी-ओजस्वी अशी होती. त्या भाषेचे शब्दोच्चार वेगळे. एका ब्राह्मण कुटुंबात घडणारे हे नाटक. त्या कुटुंबातील मोठ्या मुलाची मी भूमिका केली. खूप वेगळी भूमिका आणि वेगळ्या कथानकावरील नाटक. या नाटकात मी ‘पुंड्या’ नावाची भूमिका केली. माझ्या ही भूमिका श्री.नां इतकी आवडली की त्यांचे निधन होईपर्यंत त्यांनी मला कधीही फोन केला की पुंड्या नावानेच हाक मारायचे. एका कलाकाराला आणखी काय हवे असते. एका मोठ्या लेखकाने दिलेली ती मला शाबासकीच होती. 

टूरटूर’ या नाटकात मला मालवणी भाषा बोलावी लागली. त्या भाषेची धाटणी वेगळी. या नाटकातील माझी भूमिका पाहून मालवणीसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनीदेखील माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. अशा सगळ्या दिग्गज मंडळींनी केलेले कौतुक पाहता माझ्यातील उत्साह वाढत गेला. माझ्यातील ऊर्जा वाढत गेली. ‘विच्छा माझी पुरी’ करा या लोकनाट्यावर माझे निरतिशय प्रेम. तीस वर्षे मी त्याचे प्रयोग केले. या लोकनाट्याने मला सगळे काही दिले. या लोकनाट्यामुळे मला राज्यमान्यता मिळाली, तर ‘टूरटूर’मुळे मला लोकमान्यता मिळाली. व. पु. काळे यांच्या ‘पार्टनर’मधील भूमिकाही वेगळी होती. यामध्ये मी साकारलेली ‘श्री’ ही भूमिका वपुंना खूप आवडली. तेव्हा मला वपुंनी एक पुस्तक भेट म्हणून दिले. आजही ते पुस्तक मी जपून ठेवले आहे.
या सगळ्या भूमिकांमुळे एक कलाकार म्हणून मी हळूहळू समृद्ध होत गेलो.

विजया मेहतांबरोबरही तुम्ही काम केले आहे. त्याबाबत सांगा ना...
विजय कदम : ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या ‘हयवदन’ या नाटकात छोट्या व मोठ्या अशा चार भूमिका केल्या. विजया मेहता यांच्या हाताखाली काम करताना मला खूप काही शिकायला मिळाले. विनोदाचे व्याकरण मी त्यांच्या हाताखाली शिकलो. त्यावेळचे त्यांचे वाक्य अजूनही मी विसरलेलो नाही. त्या सांगायच्या, ‘विजय.. विनोद करायचा तर तो खणण् असा नाण्यासारखा वाजला पाहिजे. चिल्लर घेऊन ते खेळवत बसायचे नाही.’ त्यांचे ते वाक्य माझ्या मनावर आणि हृदयावर इतके भिनलेय की खणखणीत नाणे घेऊनच पुढे जायचे असे मी पक्के ठरविले. विजयाताईंनी मला खूप काही शिकविले. ही माणसे उगीच काही मोठी झालेली नाहीत, हे मला तेव्हा समजले. त्यांच्यातील मोठेपण त्यांनी मोठ्या श्रमसाधनेने मिळविलेले आहे आणि तेच मी एक साधक म्हणून त्यांच्याकडून घेतले आहे.

तुम्ही खूप स्ट्रगल केला आहे. तो काळ कसा होता आणि तेव्हा या इंडस्ट्रीला राम राम करावा असा विचार मनात आला का?
विजय कदम : स्ट्रगल करावाच लागला. विशेष म्हणजे मी बँक ऑफ इंडियातील नोकरी सोडल्यानंतर पाचेक महिने माझ्याकडे कोणतेच काम नव्हते. तो काळ खूप खडतर होता. परंतु मी कधीही घरी माझ्या मनातील ताणतणाव जाणवू दिला नाही. हे दिवसही जातील असाच विचार मनात ठेवला. मला माहीत होते की सगळे काही चांगले घडणार आहे. नेहमी मी सकारात्मक विचार केला आणि म्हणूनच आज इतकी वर्षे या इंडस्ट्रीत काम करीत आहे. लॉकडाउनमध्ये ‘कदमखोल’ नावाचा कार्यक्रम यूट्यूबवर मी सुरू केला. त्यामध्ये मी नाटकांतील तसेच चित्रपट आणि मालिकांतील विविध किस्से आणि अनुभव सांगितले. प्रेक्षकांना तो कार्यक्रमही आवडला. मी नेहमी सकारात्मक विचार केला म्हणून मला कामे मिळत गेली आणि कधीही ही इंडस्ट्री सोडावी असा विचार मनात आला नाही.  

तुमच्या करिअरमधील अशा कोणती कलाकृती आहे, ज्यामुळे करिअरला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली?
विजय कदम : सन १९८०मध्ये ‘रथचक्र’मध्ये मी काम केले. त्याच्या पहिल्या प्रयोगाला दिग्गज निर्माते व दिग्दर्शक मंडळी आली होती. प्रयोग संपल्यानंतर ही दिग्गज मंडळी ‘पुंड्या’ कोण आहे असे विचारीत आतमध्ये आली. व्यावसायिक रंगभूमीवर माझ्या करिअरला ही भूमिका कलाटणी देणारी ठरली. त्यानंतर ‘टूरटूर’ आणि ‘विच्छा माझी पुरी’ करा, तसेच विजय पाटकर यांनी दिग्दर्शित केलेले ‘हलकंफुलकं’ यातील भूमिकाही माझ्या करिअरमधील महत्त्वाच्या आहेत. आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारल्या असल्या तरी अजूनही मी चांगल्या भूमिकांच्या शोधात आहे.

संबंधित बातम्या