‘टॅलेंटच्या जोरावर यशस्वी...’

संतोष भिंगार्डे
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021


प्रीमियर 

अभिनेत्री रिचा चढ्ढा सध्या चांगल्या सीरीज आणि चित्रपटांमध्ये काम करताना दिसते आहे. तिची ‘कँडी’ ही सीरीज नुकतीच प्रदर्शित झाली आणि त्यातील तिच्या कामाचे कौतुकही करण्यात आले. त्या निमित्ताने रिचाशी साधलेला संवाद...

रिचा, एक काळ असा होता की तुला चित्रपटांमध्ये घेताना निर्माते व दिग्दर्शक खूप विचार करीत होते. परंतु आता चित्र पालटले आहे. तुझे ‘फुकरे’, ‘फुकरे रिटर्न्स्’, ‘शकीला’ असे काही चित्रपट पाहिले असता तुला खूप चांगल्या ऑफर्स येत आहेत. तुझ्या बाबतीत हे बदललेले चित्र आहे, त्याकडे तू कशी पाहतेस?
रिचा चढ्ढा ः माझ्यासाठी ही निश्चितच चांगली आणि आनंदाची बाब आहे. कारण मी काही या इंडस्ट्रीतील नाही किंवा मला कुणी गॉडफादर नाही. दिल्लीत असताना काही नाटकांमध्ये मी काम केले. त्यानंतर हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी सरळ मुंबईचा रस्ता धरला. ‘ओए लकी! लकी ओए!’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर एन्ट्री केली आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक चित्रपट करीत गेले. खरेतर आमच्यासारख्या आऊटसायडर कलाकारांना या इंडस्ट्रीत काम मिळविण्यासाठी खूप झगडावे लागते. खूप मेहनत आणि स्ट्रगल करावा लागतो. कारण येथे सहसा संधी मिळत नाही. पण एकदा का संधी मिळाली की आपण आपले टॅलेंट दाखविणे आवश्यक आहे. माझ्या मते येथे गॉडफादर किंवा वशिला महत्त्वाचा नाही, तर टॅलेंट महत्त्वाचे आहे आणि त्याच्या जोरावर तुम्ही येथे नक्कीच यशस्वी होऊ शकता. तुमच्यामध्ये टॅलेंट असेल तर तुम्हाला कुणी रोखू शकत नाही.

आत्ता तू म्हणालीस की येथे टॅलेंटला खूप महत्त्व आहे. तुझ्यामध्ये टॅलेंट होते. परंतु बॉलिवूडला ते उशिरा समजले, असे तुला वाटत नाही का?
रिचा चढ्ढा ः तुमच्याकडे टॅलेंट आहे हे तुम्हाला माहीत असते. परंतु येथील कुणाला अगोदर त्याची काहीही किंमत नसते. तुम्ही तुमच्यातील टॅलेंट सिद्ध केले की सगळ्यांना तुमचे महत्त्व समजते. त्यामुळे आपण आपले काम चोख आणि प्रामाणिकपणे केले पाहिजे. त्याकरिता चांगले प्रोजेक्ट स्वीकारले पाहिजेत. मी माझ्या कामाचा विचार अधिक करते. चांगले प्रोजेक्ट कसे मिळतील, याचा विचार करते. कारण आमच्यासारख्या आऊटसायडरना येथे नावलौकिक मिळविताना खूप मोठी कसरत करावी लागते. एकदा का यश मिळाले की ते टिकविण्यासाठी धडपड करावी लागते. त्यानंतर खूप विचारपूर्वक प्रोजेक्ट स्वीकारावे लागतात.

येथे घराणेशाहीला खूप महत्त्व दिले जाते असे तुला वाटते का?
रिचा चढ्ढा ः येथेच नाही तर प्रत्येक क्षेत्रात घराणेशाहीला महत्त्व दिले जाते. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीत घराणेशाही आहे, असे म्हणून उपयोग नाही. त्याचा विचार आपण करायचा नाही. आपण आपल्या टॅलेंटच्या जोरावर वाटचाल करायची असते. त्याकरिता स्ट्रगल खूप करावा लागला तरी तो करायचा असतो. कारण येथील स्ट्रगल कधी कुणाला चुकलेला नाही. यश मिळाले तरी स्ट्रगल आणि यश मिळाल्यानंतरही स्ट्रगल करावाच लागतो. सतत स्ट्रगल आणि मेहनत करावी लागते.

आताच तुझी ‘कँडी’ ही वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी तुझा ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता. या दोन्ही प्रोजेक्टमध्ये तुझी मुख्य भूमिका होती. याबद्दल तू काय सांगशील?
रिचा चढ्ढा ः मी कधीच टिपिकल भूमिका असलेले चित्रपट किंवा सीरीज केल्या नाहीत आणि भविष्यात करणारही नाही. एखाद्या भूमिकेमध्ये मला काहीतरी करण्यासारखे किंवा मला आव्हानात्मक वाटेल अशाच भूमिका स्वीकारण्याकडे माझा कल असेल. एखाद्या सत्य घटनेवरील चित्रपट किंवा बायोपिक करायला मला आवडतील. अशा काही चित्रपटांमध्ये काम करायला मला अधिक रस वाटेल. त्याकरिता कितीही मेहनत करायला मी तयार आहे. आता आलेल्या ‘कँडी’मध्ये मी एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली. ही भूमिकाही माझ्यासाठी आव्हानात्मक होती. त्याकरिता मला खूप मेहनत घ्यावी लागली.

‘कँडी’ ही सीरीज सस्पेन्स थ्रिलर होती. एखाद्या सस्पेन्स थ्रिलरमध्ये काम करणे वेगळे आणि एखाद्या रोमँटिक सिनेमात किंवा सीरीजमध्ये काम करणे वेगळे असते. अशा वेगवेगळ्या जॉनरमध्ये काम करताना तुला कम्फर्टेबल कुठे वाटते?
रिचा चढ्ढा ः मी रोमँटिक चित्रपट फारसे केलेले नाहीत. मात्र थ्रिलर-हॉरर चित्रपट किंवा सीरीज करायला मला खूप आवडतात. कारण अशा प्रकारच्या जॉनरचे चित्रपट किंवा सीरीज प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. त्याची मजा काही औरच असते. मी अशा प्रकारचा जॉनर खूप एन्जॉय करते. सीरीजमध्ये काय होते की एक एपिसोड संपला की प्रेक्षकांना पुढील एपिसोड पाहण्याची उत्कंठा खूप असते. आता पुढील भागामध्ये काय होणार याची उत्सुकता त्यांना लागलेली असते. त्यामुळे अशा सीरीजना खूप मोठा प्रतिसाद मिळत असतो. अशा सीरीज करायला मला खूप आवडतात.

‘कँडी’मध्ये तू पोलिस अधिकाऱ्याची भूमिका केली आहेस. त्याकरता पोलिस अधिकाऱ्यांना तू प्रत्यक्ष भेटलीस का?
रिचा चढ्ढा ः हो. मुंबईतील काही पोलिस अधिकाऱ्यांची भेट मी घेतली आणि त्यांचे कामकाज कसे चालते हे पाहिले. त्याचा बारकाईने विचार केला आणि मगच ही भूमिका साकारली. महिला पोलिस अधिकारी आपले कुटुंब सांभाळून कशा काम करतात हेही पाहिले. या सीरीजचे लिखाण मला आवडले आणि म्हणूनच मी ती केली.  

तुझा यावर्षीच्या सुरुवातीला आलेला ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ हा एक राजकीय पट होता. आपल्याकडे महिलांनी राजकारणात मोठी भरारी घेतली आहे. मोठमोठ्या पदांवर त्यांनी काम केले आहे. परंतु त्या तुलनेत महिला आणि राजकारण या विषयावर चित्रपट कमी येत आहेत असे तुला वाटत नाही का?
रिचा चढ्ढा ः मला असे काही वाटत नाही. आत्तापर्यंत राजकारणातील कितीतरी महिलांवर चित्रपट आलेले आहेत आणि प्रेक्षकांनी त्यांचे चांगले स्वागतही केले आहे. भविष्यातदेखील असे चित्रपट येत राहतील. अलीकडच्या काळात बायोपिक आणि सत्य घटनेवरील चित्रपट प्रेक्षकांना आवडत आहेत. त्यामुळे तशा प्रकारचे चित्रपट तयार होत आहेत.

आता तुला येणाऱ्या ऑफर्स कशा प्रकारच्या आहेत?
रिचा चढ्ढा ः ऑॅफर्स खूप येत असतात. परंतु मी निवडक ऑॅफर्सचा विचार अधिक करते. कोणत्याही गुळमुळीत किंवा चावून चोथा झालेल्या कथानकावरील चित्रपट करण्यात मला काही स्वारस्य नाही. मला आवडणारे चित्रपटच मी करणार आहे.  

अभिनयाव्यतिरिक्त तुला आणखी कोणत्या गोष्टीची आवड आहे?
रिचा चढ्ढा ः प्रत्येकामध्ये काही तरी कलागुण असतात आणि आपल्या कामासोबतच आपण ते जोपासले पाहिजेत असे मला वाटते. मला चित्रकला, संगीत, नृत्य आणि फोटोग्राफी करायला आवडते. अभिनेत्री नसते तर मी फोटो जर्नलिस्ट झाले असते. मी नेहमीच माझ्या मोकळ्या वेळेमध्ये माझी आवड जोपासण्याचा प्रयत्न करते.

सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल तू काय सांगशील?
रिचा चढ्ढा ः ट्रोल करणाऱ्या लोकांबद्दल मला खरोखरच काहीही वाटत नाही. मी त्याकडे फारशा गांभीर्याने पाहात नाही. अशा गोष्टींचा माझ्यावर कोणताही परिणाम होऊ देत नाही.
 

संबंधित बातम्या