मनोरंजनाचा बंपर धमाका

संतोष भिंगार्डे
सोमवार, 15 नोव्हेंबर 2021

प्रीमियर 

चित्रपट आणि नाट्यगृहे सुरू होऊन काही दिवस झाले आहेत. मनोरंजन विश्वात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर इंग्रजी ‘इटर्नल्स’ हा चित्रपटदेखील आला आहे. याशिवाय डिसेंबर महिन्यापर्यंत एकापाठोपाठ एक हिंदी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. बॉलिवूडने आपल्या चित्रपटांच्या तारखा निश्चित केल्या आहेत. बिग बजेट चित्रपटांबरोबरच स्मॉल बजेटचे आशयपूर्ण चित्रपट प्रदर्शित होत असल्यामुळे चित्रपट रसिकांना या वर्षअखेरपर्यंत मनोरंजनाची उत्तम मेजवानी मिळणार आहे.  

तसे पाहायला गेले तर ईद, दिवाळी आणि ख्रिसमस असे काही सण म्हटले की बॉलिवूडसाठी ती बंपर लॉटरी असते. अशा सणासुदीच्या काळात बिग बजेट आणि बिग स्टार असलेले चित्रपट प्रदर्शित होत असतात आणि ते चित्रपट चांगली कमाईदेखील करतात. निर्माते व दिग्दर्शक आपापल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा अगोदरच निश्चित करीत असतात. विशेष म्हणजे आमीर खानचे चित्रपट ख्रिसमसला तर शाहरूखचे दिवाळीला आणि भाईजान सलमानचे बहुतेक चित्रपट ईदला प्रदर्शित होत असतात. 

या वर्षाचा विचार करता दिवाळीनंतर राणी मुखर्जीचा ‘बंटी और बबली २’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यशराज बॅनर्सचा हा चित्रपट वरुण व्ही. शर्माने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी बबलीची तर सैफ अली खान बंटीची भूमिका साकारीत आहे. या चित्रपटामध्‍ये राणी ‘फॅशन क्‍वीन ऑफ फुरसतगंज’ची भूमिका साकारीत आहे. या चित्रपटातील आपल्या भूमिकेबाबत अधिक माहिती देताना राणी सांगते, ‘लहान शहरामध्ये एक गृहिणी असणारी विम्मी कंटाळली आहे. तिला माहीत आहे की तिच्‍यामध्‍ये प्रतिभा आहे. ती तिच्‍या वैवाहिक जीवनाबाबत आनंदी असली तरी तिची रोमांचक गोष्‍टी करण्‍याची आणि खास आकर्षण होण्‍याची इच्‍छा आहे. तिला फॅशनची खूप आवड आहे, म्‍हणून ती त्‍यामध्‍ये पुढील करिअर करण्‍याचे ठरवते. फुरसतगंजमधील लोक फॅशन आयकॉन म्‍हणून तिच्‍याकडे पाहत असल्‍यामुळे तिला खूप आनंद होतो. या गावामधील लोकांना फॅशनबाबत फारसे माहीत नाही आणि बबली ‘फॅशन क्‍वीन ऑफ फुरसतगंज’ होते. ‘बंटी और बबली २’मध्‍ये सैफ अली खान रेल्‍वे तिकीट कलेक्‍टर बंटीची भूमिका साकारीत आहे आणि या भूमिकेकरिता त्याला आपले वजन वाढवावे लागलेले आहे. या दोन कलाकारांबरोबर सिद्धांत चतुर्वेदी व नवोदित अभिनेत्री शर्वरीही काम करीत आहे. नोव्हेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

अभिनेता जॉन अब्राहम हा नेहमीच विविध भूमिका साकारण्याचा प्रयत्न करीत असतो. त्याच्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता त्याचा दुसरा भाग ‘सत्यमेव जयते २’ या वर्षी १३ मे रोजी अर्थात ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे त्याच्या प्रदर्शनाची तारीख वारंवार बदलण्यात आली आणि आता हा चित्रपट २५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जॉनचा डबल रोल आहे आणि पुरेपूर अॅक्शन सीन पाहायला मिळणार आहेत.  

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी ‘तड़प- ॲन इनक्रेडिबल लव्ह स्टोरी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. तारा सुतारिया आणि अहान यांची जोडी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या वर्षी मार्च महिन्यात या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. मिलन लुथरिया या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. सन २०१८मध्ये आलेल्या ‘आरएक्स १००’ या अॅक्शन रोमँटिक तेलगू चित्रपटाचा हा रिमेक आहे.

बॉलिवूडमध्ये रोमँटिक बॉय म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या शाहिद कपूरच्या करिअरमध्ये ‘कबीर सिंग’ हा चित्रपट महत्त्वपूर्ण  मानला जातो. या चित्रपटाने घसघशीत यश मिळविलेच शिवाय शाहीद कपूरला पुन्हा मोठे स्टारडम प्राप्त करून दिले. आता त्याचा ‘जर्सी’ हा चित्रपट येत आहे. ‘जर्सी’ या चित्रपटाची कथा अर्जुन नावाच्या तीस वर्षीय व्यक्तीभोवती फिरणारी आहे. त्याचा मुलगा त्याच्याकडे भारतीय क्रिकेट संघाची जर्सी भेट मागतो. अर्जुन स्वतः एक अपयशी क्रिकेट खेळाडू असतो. आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याचा निर्णय घेतो. आपल्या वयाचा अडथळा दूर करत तो आपल्या मुलाचे स्वप्न कसे पूर्ण करतो, हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. गौतम तीन्ननुरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस ३१ डिसेंबरला  चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मल्टिटॅलेंटेड अभिनेता आयुष्मान खुरानाचा बहुचर्चित चित्रपट ‘चंदीगड करे आशिकी’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात आयुष्मान खुराना अभिनेत्री वाणी कपूरसोबत झळकणार आहे. ही आधुनिक काळातील प्रेमकथा आहे, ज्यामध्ये आयुष्मान एका अॅथलिटची भूमिका साकारीत आहे, तर वाणी एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिषेक कपूर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. डिसेंबर महिन्यात दहा तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडचे ‘बाजीराव-मस्तानी’ म्हणजेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी आत्तापर्यंत काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्यांपैकी ही जोडी आहे. ही जोडी आता ‘८३’ या चित्रपटातून पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. कबीर खानने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वकरंडक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ‘८३’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील, साकीब सलीम, ताहिर भसीन, जतिन सरना, जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर, पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पदुकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. यंदाच्या ख्रिसमसमध्ये हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. हिंदीबरोबरच तमीळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळी भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट म्हणजेच ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’. या चित्रपटात सलमान खान आयुष शर्माबरोबर पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. सलमान पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे, तर आयुषचा एक वेगळा लूक या चित्रपटात पाहायला मिळत आहे. आयुष यामध्ये गँगस्टरची भूमिका साकारीत आहे. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करीत आहेत. ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठी हिट चित्रपट ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्स करणार आहे. येत्या २६ नोव्हेंबर २०२१ रोजी जगभरातील चित्रपटगृहात तो प्रदर्शित होणार आहे.

एकूणच काय तर दिवाळीमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या बॉलिवूडमध्ये दिवाळीनंतरही मनोरंजनाचा बंपर धमाका असणार आहे हे नक्की.

संबंधित बातम्या