मल्लिकाचा डबल धमाका

संतोष भिंगार्डे
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021

प्रीमियर 

अभिनेत्री मल्लिका शेरावत ‘नागमती’ या आगामी चित्रपटामध्ये डबल रोल करीत आहे. आपल्या चित्रपट कारकिर्दीत ती प्रथमच दुहेरी भूमिका साकारीत आहे. तमीळमधील प्रसिद्ध दिग्दर्शक वीसी वादिवुद्यान या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण वेगाने सुरू आहे. या चित्रपटाबद्दल मल्लिका शेरावतशी केलेली बातचीत....

मल्लिका, ‘नागमती’ या चित्रपटात तू पहिल्यांदाच डबल रोल करीत आहेस. या भूमिकेकरिता तू काय तयारी केलीस?
मल्लिका शेरावत : लहानपणी मी ‘सीता और गीता’ चित्रपट पाहिला होता. त्यातील हेमामालिनी यांच्या डबल रोलमुळे मी खूप प्रभावित झाले. अमिताभ बच्चन यांचे चित्रपट पाहिलेले आहेत. त्यांच्या डबल रोलमधील चित्रपटांमुळे मी कमालीची प्रभावित झाले आहे. त्यामुळे एक कलाकार म्हणून मला आता डबल रोल करताना खूप उत्साह वाटतो आहे. डबल रोल करायला मी खूप उत्सुक आहे. मात्र मी काम कसे केले आहे, हे प्रेक्षकांनी ठरवायचे आहे. या चित्रपटात मी खूप अॅक्शन केली आहे. घोडेस्वारी, तलवारबाजी आणि आणखी काही स्टंट मला शिकावे लागले. घोडेस्वारी शिकताना दोन ते तीन वेळा पडता पडता मी वाचले. माझ्यासाठी हे खूप टफ होते.

यापूर्वीही तुला डबल रोलसाठी ऑफर आल्या असणारच ना...
मल्लिका शेरावत : काही ऑफर आल्या होत्या. परंतु त्या भूमिकांमध्ये मला काही विशेष जाणवले नाही. शिवाय मी कोणतीही तडजोड करायला तयार नव्हते. त्यामुळे अशा कित्येक भूमिका माझ्या हातून निसटल्या आहेत. परंतु त्याची फिकीर मी केली नाही. मी माझे काम करीत राहिले आणि प्रामाणिकपणे करीत राहिले. मला एक काम संपले की लगेच दुसरे काम मिळत गेले. मी घरी बसून राहिले नाही. काही भूमिका हातातून गेल्या असल्या, तरी त्याचे दुःख किंवा हुरहूर मनाला वाटू दिली नाही. या इंडस्ट्रीत प्रत्येकाच्या बाबतीत असे घडत असते.

‘नागमती’ चित्रपटात तुझी प्रमुख भूमिका आणि तीदेखील डबल रोल.... जबाबदारी किती वाढली आहे असे तुला वाटते?
मल्लिका शेरावत : जबाबदारी अधिक आहे ही नक्की. शिवाय अन्य नायिकांसाठी ही चांगली बाब आहे. कारण आता अधिक चांगल्या भूमिका लिहिल्या जातील आणि त्यावर उत्तम काम केले जाईल. एक काळ असा होता की नायकांना डोळ्यासमोर ठेवून भूमिका लिहिल्या जात होत्या. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. नायिकाप्रधान चित्रपटांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. प्रेक्षकांचा अशा चित्रपटांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. माझा ‘मर्डर’ चित्रपट सुपरहिट ठरला, तेव्हाचा काळ वेगळा होता. तेव्हा म्हणाव्या तशा उत्तमोत्तम भूमिका माझ्या वाट्याला आल्या नाहीत. विशेष म्हणजे लिहिल्या गेल्या नाहीत. परंतु आता माझ्या वाट्याला छान छान भूमिका येत आहेत. चांगल्या स्क्रीप्ट मी निवडते आहे.
 
‘नागमती’ चित्रपट पाच भाषांमध्ये तयार होतो आहे. मनावर दडपण येते आहे की आनंद होतोय?
मल्लिका शेरावत : दोन्हीही आहे. कारण पाच भाषांमध्ये हा चित्रपट येणार म्हणजे करोडो लोकांपर्यंत तो पोहोचणार आहे. त्यामुळे मनावर दडपण आहेच, परंतु एकाच वेळी आपली एक कलाकृती मोठ्या संख्येने प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे याचा आनंद आहेच की! हिंदीबरोबरच तमीळ, कन्नड, तेलगू आणि मल्याळी या भाषांमध्ये चित्रपट येत आहे.

राजकुमारी आणि राणी अशा दोन व्यक्तिरेखा तू या चित्रपटात साकारीत आहेस. याबद्दल अधिक काय सांगशील?
मल्लिका शेरावत : दोन्ही व्यक्तिरेखा भिन्न स्वरूपाच्या आहेत. राजकुमारीचा अनुभव थोडा कमी आहे, तर राणी हुशार आहे. या चित्रपटात कुणी हिरो नाही. संपूर्ण चित्रपट या दोन व्यक्तिरेखांभोवती फिरणारा आहे. अॅक्शन हॉरर चित्रपट आहे हा.

अॅक्शन, हॉररपैकी तुला स्वतःला कोणता जॉनर अधिक आवडतो?
मल्लिका शेरावत : रोमँटिक-कॉमेडी जॉनर मला खूप आवडतो. अॅक्शन चित्रपट करताना मेहनत खूप घ्यावी लागते. वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग घ्यावे लागते. मात्र रोमँटिक-कॉमेडीमध्ये फारशी मेहनत घ्यावी लागत नाही.  
 
तू कधी कधी अशी काही वक्तव्ये करतेस की ज्यामुळे तू वादाच्या  भोवऱ्यात सापडतेस. अशी बेधडक वक्तव्ये करण्याचे काही कारण?
मल्लिका शेरावत : माझा स्वभावच तसा आहे, त्याला मी काय करू. एखादी गोष्ट मला आवडली नाही किंवा एखाद्या गोष्टीबाबत व्यक्त व्हायचे असेल, तर मी माझ्या मनावर ताबा ठेवू शकत नाही. बिनधास्त आणि बेधडकपणे मनात असेल ते बोलून जाते. त्यानंतर काही वाद सुरू होतात. परंतु त्याचा सामना करायला मी घाबरत नाही.

‘मर्डर’ चित्रपटातील मल्लिका आणि आताची मल्लिका यामध्ये नेमका काय फरक झाला आहे असे तुला वाटते?
मल्लिका शेरावत : ‘मर्डर’ चित्रपटाच्यावेळी मी हरियानातून विमान पकडून येथे आले होते. या इंडस्ट्रीची मला काही फारशी माहिती नव्हती. माझ्यासाठी हा माहौल नवीन होता. हळूहळू मी काम करीत गेले आणि ओळखी वाढत गेल्या. त्यावेळी मी फारशी मॅच्युअर नव्हते. मात्र आता खूप मॅच्युअर झाले आहे. बोलताना आणि वागताना काही गोष्टींचे भान ठेवते आहे. शिवाय आता सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत. नवनवीन लेखक आणि दिग्दर्शकांची टीम आली आहे. त्याचे विचार फार निराळे आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत निराळी आहे. मर्डरपासून आत्तापर्यंत माझ्यामध्येच नाही, तर या इंडस्ट्रीतही खूप बदल झाला आहे.

सध्या ओटीटी प्लॅटफॉर्म जोरात आहे. याबाबतीत काही जणांचे म्हणणे असे आहे की याला सेन्सॉरशिप असायला हवी. तुला काय वाटते?
मल्लिका शेरावत : ओटीटीवरील आशय खूप छान आहे. विविध विषयांवरील सीरीज येत आहेत आणि प्रेक्षक चांगले स्वागत करीत आहेत. परंतु कोणत्याही माध्यमाला सेल्फ सेन्सॉरशिप असायला हवी असे मला वाटते. त्याचा विचार लेखक-दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी करायला हवा.

संबंधित बातम्या