विशाल फुरियाची ‘हॉरर’ हॅटट्रिक
प्रीमियर
दिग्दर्शक विशाल फुरियाच्या ‘लपाछपी’ या मराठी चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘छोरी’ प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर त्याचा ‘बळी’ हा चित्रपटही येत आहे. ‘छोरी’मध्ये नुसरत भरूचाने मुख्य भूमिका साकारली आहे, तर ‘बळी’मध्ये स्वप्नील जोशी आणि पूजा सावंत हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. त्याबद्दल विशालशी केलेली बातचीत..
दिग्दर्शक म्हणून करिअरला केव्हा सुरुवात झाली?
विशाल फुरिया : मी व्हीएफएक्स शिकून आलो आणि टीव्ही इंडस्ट्रीत २००१पासून काम करीत होतो. व्हीएफएक्स आर्टिस्ट म्हणून पाच ते सहा वर्षे मी काम केले. विविध वाहिन्यांवर काम केले. त्यानंतर सन २०१०मध्ये मी ट्रेलर आणि प्रोमो लिहायला सुरुवात केली. सन २०१४पर्यंत माझे ते काम सुरू होते. त्याच दरम्यान मी दोन स्क्रिप्ट लिहिली. त्यामध्ये एक स्क्रिप्ट होते ‘लपाछपी’चे. ते स्क्रिप्ट मी जितेंद्र पाटील यांना दाखविले. त्यांना ती कथा उत्तम वाटली. या कथेवर चित्रपट काढण्यास ते तयार झाले. त्यानंतर मी पूजा सावंतला भेटलो. तिला तिची भूमिका आणि चित्रपटाची कथा सांगितली. तिने काम करण्यास होकार दिला आणि ‘लपाछपी’ चित्रपट आला.
‘लपाछपी’ तुझा पहिलाच चित्रपट. त्यावेळी कशा प्रकारचा स्ट्रगल तुला करावा लागला?
विशाल फुरिया : खरेतर मराठीत हॉरर किंवा सस्पेन्स चित्रपट फारसे होत नाहीत. त्यामुळे काही जणांना भीती वाटत होती. हा जॉनर प्रेक्षकांना आवडेल की नाही...? हा चित्रपट चालेल की नाही...? अशी शंका अनेकांच्या मनात सुरुवातीला होती. त्यामुळे काही जण मला सुचवीत होते, की सध्या कॉमेडीचा ट्रेण्ड आहे. तेव्हा चित्रपटात थोडी कॉमेडी टाका... एखादे विनोदी पात्र कथेमध्ये घ्या... कथेचा ढाचा थोडा बदला.. वगैरे वगैरे. इंडस्ट्रीमध्ये जो फॉरमॅट सुरू आहे, त्याच फॉरमॅटमध्ये चित्रपट करा, असेदेखील काही जणांनी सांगितले. कित्येक लोकांना भेटलो. प्रत्येक जण विविध सूचना करीत होता. परंतु, मी माझ्या मतांवर ठाम राहिलो. कोणत्याही परिस्थितीमध्ये तडजोड केली नाही. कारण आपण एकच चित्रपट करायचा आणि तोदेखील आपल्याला आवडेल अशा पद्धतीने. त्यामुळे कुणाचे काहीही न ऐकता मी शांत बसलो. अशातच माझी भेट जितेंद्र पाटील यांच्याशी झाली आणि ते मला म्हणाले, की तुला आवडेल असाच चित्रपट तू कर. माझे तुला पूर्ण सहकार्य आहे.
चित्रपट करताना कितपत विश्वास वाटत होता?
विशाल फुरिया : विश्वास तर कमालीचा होता. पण मनामध्ये एक प्रकारची भीती होती. प्रेक्षकांना हा चित्रपट कितपत आवडेल? आपल्या कामाची ते दखल घेतील का? असा विचारदेखील मनात होता. चित्रपट प्रदर्शित झाला. अनेक ठिकाणांहून उत्तम प्रतिक्रिया आल्या. प्रेक्षकांना चित्रपट आवडला आणि त्याला काही पुरस्कारदेखील मिळाले. आमच्या कामाचे कौतुक झाले. त्यामुळे नवीन काही तरी करण्याचा हुरूप आला.
‘लपाछपी’चा हिंदी रिमेक ‘छोरी’ चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. हिंदी रिमेक करण्याचा निर्णय कसा काय घेतलास?
विशाल फुरिया : माझ्या चित्रपटाला महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विशेष बाब म्हणजे महिला वर्गाने हा चित्रपट अधिक पाहिला. त्यामुळे आता हा चित्रपट आपण हिंदीत काढला तर आणखी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल असा विचार मनात आला. शिवाय मराठीत किती दमदार विषय आहेत, किती चांगला कन्टेंट आहे ते हिंदी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही कळेल. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीलाही प्रोत्साहन मिळेल असे मला वाटले.
हा चित्रपट हिंदीत काढताना तुला कशा प्रकारचे बदल करावे लागले.?
विशाल फुरिया : फारसे बदल नाही करावे लागले. जे बदल केले ते सगळ्या भारतातील प्रेक्षकांचा विचार करून करावे लागले.
आता चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. असे असताना ‘छोरी’ चित्रपट ओटीटीवर देण्याचे कारण काय?
विशाल फुरिया : जेव्हा आम्ही चित्रपट तयार करायला घेतला, तेव्हा तो कुठे जाईल असे काही ठरवलेले नव्हते. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आणि कोरोनाची दुसरी लाट आली. त्यानंतर आम्ही थांबलो. परिस्थिती थोडी सुधारल्यानंतर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. आताही चित्रपटगृहात पन्नास टक्के प्रेक्षकांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे किती प्रेक्षक आमचा चित्रपट पाहायला येतील आणि किती नाही अशी शंका होती. त्यामुळे मग निर्मात्यांनी (भूषण कुमार, क्रिशन कुमार, विक्रम मल्होत्रा, जॅक डेव्हीस आणि शिखा शर्मा हे निर्माते आहेत.) ओटीटीवर हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.
‘लपाछपी’मध्ये पूजा सावंत नायिका होती. आता ‘छोरी’मध्ये नुसरत भरूचा आहे. तिला घेण्याचे कारण काय?
विशाल फुरिया : नुसरतने हिंदीमध्ये ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘ड्रीमगर्ल’ व ‘छलांग’ असे यशस्वी चित्रपट केले आहेत. तिला काहीशी वेगळी भूमिका द्यावी या उद्देशाने तिला घेतले आहे. पूजा माझी आवडती अभिनेत्री आहे. माझ्या आगामी जीसिम्स’ची निर्मिती असलेल्या, प्रस्तुतकर्ते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या ‘बळी’ या मराठी चित्रपटात ती आहे. तिच्याबरोबर अभिनेता स्वप्नील जोशीदेखील काम करीत आहे.
हॉरर चित्रपटासाठी बॅकग्राऊंड स्कोअर महत्त्वाचा असतो. याबाबतीत तुझे मत काय आहे?
विशाल फुरिया : नक्कीच. बॅकग्राऊंड स्कोअर महत्त्वाचा असतोच. पण तो कुठे असावा आणि नसावा हेदेखील तितकेच महत्त्वाचे असते. कारण हॉरर चित्रपटांचा बाजच वेगळा असतो. त्याकरिता बॅकग्राऊंड म्युझिक करणाऱ्यांचे कसब पणाला लागलेले असते. आम्ही हे सगळे अचूक मांडलेले आहे.
‘बळी’ हा चित्रपट तू दिग्दर्शित केला आहेस. त्याबद्दल काय सांगशील?
विशाल फुरिया : हादेखील एक वेगळ्या कथानकावर बेतलेला हॉरर चित्रपट आहे. स्वप्नील आणि पूजाने या चित्रपटात काही तरी वेगळे केले आहे. या चित्रपटाचा टीझर पाचेक महिन्यांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावरून प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली आहे. आता लवकरच आम्ही या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करणार आहोत. आता मला ‘बळी’ या चित्रपटाचा हिंदीमध्ये रिमेक करण्याच्या ऑफर्स येत आहेत.
‘लपाछपी’, ‘छोरी’ आणि आता येणारा मराठी चित्रपट ‘बळी’; तू प्रेक्षकांना घाबरविण्याचे काम करतोस. तू प्रत्यक्षात कुणाला घाबरतोस?
विशाल फुरिया : मी लोकांना खूप घाबरतो. ते आपल्या पाठीमागे काय विचार करतात, आपल्याबद्दल काय बोलतात, याची भीती वाटते. तसेच आपले कुणी पाकीट मारेल अशीदेखील भीती वाटते. मला पाण्याचीही भीती वाटते, कारण मला पोहता येत नाही.
आता एकापाठोपाठ एक तू हॉरर चित्रपट करीत आहेस. तर भविष्यात याच जॉनरचे चित्रपट करणार आहेस का?
विशाल फुरिया : असे काही नाही. मला चांगल्या आणि उत्तम कथा असणारे चित्रपट करायचे आहेत. हॉररमध्ये अधिक काम करायचे आहे.