‘ओरिजिनल कन्टेंटवर भर हवा...’

संतोष भिंगार्डे
सोमवार, 20 डिसेंबर 2021


प्रीमियर 

‘तनु वेड्स मनु’, ‘तनु वेड्स मनु रिटर्न’, ‘शुभमंगल सावधान’, ‘रांझणा’ अशा काही चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे निर्माते व दिग्दर्शक आनंद एल. राय आता ‘अतरंगी रे’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. त्याबद्दल त्यांच्याशी केलेली बातचीत...

‘अतरंगी रे’ या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली आहे. त्यामुळे तुम्ही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अर्धे मैदान मारले आहे, असे तुम्हाला वाटत नाही?
आनंद एल. राय : चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंती दिली याचा मला खूप आनंद आहे. कारण चित्रपट पाहण्यापूर्वी पहिल्यांदा त्याचे पोस्टर आणि त्यानंतर त्याचा ट्रेलर कसा झाला आहे हे पाहिले जाते. त्या ट्रेलरवरून त्या चित्रपटात नेमके काय असेल याचा अंदाज बांधला जातो आणि त्यानंतरच प्रेक्षक चित्रपट पाहण्यास येतात. आमच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे आणि आता चित्रपटाला कसा काय प्रतिसाद ते देतात ते पाहावे लागेल.

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काहीसा लग्नाचा माहोल दिसत आहे. आत्तापर्यंत लग्नसोहळ्यावर काही चित्रपट आलेले आहेत. त्यामुळे या चित्रपटात नेमके काय असेल?
आनंद एल. राय : आत्तापर्यंत तुम्ही माझे चित्रपट पाहिले असतील, तर प्रत्येक चित्रपटात मी काही तरी वेगळे देण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटातदेखील तुम्हाला वेगळेपणा दिसेल. ही एक रोमँटिक फिल्म आहे. कौटुंबिक नातेसंबंधावर आधारित हा चित्रपट आहे. वेगवेगळे भावनिक पदर या चित्रपटात पाहायला मिळतील. प्रेक्षकांना एक नवीन कथा पाहायला मिळणार आहे. आता याला कसा काय प्रतिसाद मिळतो ते पाहावे लागेल.

अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान हे कलाकार या चित्रपटात आहेत. धनुषबरोबर तुम्ही ‘रांझणा’ या चित्रपटात काम केले आहे. अक्षय कुमारबरोबर हा चित्रपट, तसेच ‘रक्षाबंधन’ हा चित्रपट तुम्ही करीत आहात. अक्षय आणि साराबद्दल तुम्ही काय सांगाल?
आनंद एल. राय : चित्रपट करणे ही एक मोठी प्रोसेस असते आणि त्यामध्ये सर्वांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा असतो. अक्षय काय किंवा सारा काय... त्या सगळ्यांनी उत्तम सहकार्य केले आहे. माझ्या डोक्यात जो सिनेमा होता तशाच प्रकारे त्यांनी काम केले आहे. माझ्या चित्रपटाच्या कथानकाला त्यांच्यासारख्या अनुभवी आणि कसदार कलाकारांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांना घेतले आहे आणि त्यांनीदेखील आपली कामगिरी उत्तम पार पाडली आहे. शेवटी हा चित्रपट जसा माझा आहे तसाच त्यांचाही आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून हा चित्रपट केला आहे.

आजकाल चित्रपटांचा ट्रेंड बदलत चाललेला आहे. प्रेक्षकांना छोट्या छोट्या शहरातील कथा पाहायला आवडत आहेत. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
आनंद एल. राय : ही बाब जरी खरी असली, तरी तुमच्या कथेमध्ये नावीन्य असणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रेक्षकांना नेहमी नवनवीन विषय, नवनवीन कथानके पाहायला आवडतात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडी त्यांना पाहायला आवडतात. काही जणांना असे वाटते की मोठमोठ्या कलाकारांना घेतले की चित्रपट हमखास चालतो. ते स्टार्सना कमालीचे महत्त्व देतात. मीदेखील स्टार्सबरोबर काम केले आहे. तरीही मी हेच सांगेन की स्टार्सपेक्षा कथा महत्त्वाची आहे. तुमच्या कथेमध्ये काही दम नसेल तर कोणताही मोठा कलाकार काहीही करू शकत नाही. पहिली कथा आणि नंतर कलाकार. आता मी या चित्रपटात अक्षय, धनुष, सारा वगैरे कलाकार असले तरी कथा माझी वेगळी आहे आणि तीच महत्त्वाची आहे.

तुमच्या चित्रपटाला संगीत ए. आर. रेहमान यांनी दिले आहे. त्यातील ‘चकाचक...’ हे गाणे लोकप्रिय ठरले आहे. चित्रपटातील संगीत किती महत्त्वाचे आहे?
आनंद एल. राय : मगाशीच मी सांगितले की पहिली कथा महत्त्वाची आणि कथेच्या अनुषंगाने संगीत असावे लागते. माझ्या कथेला उत्तम संगीत रेहमानसरच देऊ शकतात असे वाटले आणि महत्त्वाचे म्हणजे ते केवळ उत्तम संगीत देतात असे काही नाही, तर तुमच्यातील आत्मविश्वास वाढवितात. त्यांच्या अनुभवाचा फायदा आमच्यासारख्या दिग्दर्शकांना होतो. त्यांच्या संगीताचे सूर चित्रपटाच्या व्यक्तिरेखांना मजबूत करतात.

‘अतरंगी रे’ या चित्रपटाची कथा तुम्हाला नेमकी कोठे सापडली?
आनंद एल. राय : सन २०१४मध्ये मी आणि हिमांशू ‘तनु वेड्स मनु रिटर्न’ चित्रपट करीत असताना या चित्रपटाची कल्पना आम्हाला सुचली. त्यानंतर आम्ही थोडं थांबण्याचा निर्णय घेतला. ‘तनु वेड्स मनु’ हा चित्रपट पू्र्ण केला. आणि आत्ता आम्हाला असे वाटले की त्या कथेवर चित्रपट केला पाहिजे आणि आम्ही हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला.

आत्ता तुम्ही सांगितले की सन २०१४मध्ये ही कथा तुम्हाला सापडली. आता या गोष्टीला सहा ते सात वर्षे झाली आहेत.. मग ती कथा तेवढीच फ्रेश असेल का?
आनंद एल. राय : खरेतर तेव्हा आमच्या डोक्यात केवळ कल्पना आली होती. त्या कल्पनेला कहाणीचे स्वरूप दोनेक वर्षांपूर्वी दिले. त्यानंतर आमच्यासमोर कलाकारांची नावे आली. मग आम्ही एकेका कलाकारांना भेटलो. त्यांना स्क्रीप्ट ऐकविली आणि नंतर चित्रीकरणाला सुरुवात केली. 

आता चित्रपटगृहे सुरू झाली आहेत. मग असे असताना तुमचा चित्रपट ओटीटीवर देण्याचे कारण काय?
आनंद एल. राय : हा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला आहे. शिवाय सध्या काही चित्रपट ओटीटीवर, तर काही चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहेतच. त्यामुळे आम्ही आमचा चित्रपट ओटीटीवर देण्याचा निर्णय घेतला.

चित्रपटगृहात चित्रपट पाहणे आणि ओटीटीवर चित्रपट पाहणे यामध्ये फरक आहे. चित्रपटाने शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय केला की त्या चित्रपटातील कलाकारांची मान अभिमानाने उंचावते. त्यामुळे हंड्रेड करोड क्लबला तुम्ही मिस कराल असे वाटत नाही?
आनंद एल. राय : ही बाब खरी आहे. हंड्रेड करोड क्लबला आम्ही जरी मुकणार असलो, तरी आमचा चित्रपट जगभरात जाणार आहे. असंख्य लोकांपर्यंत तो पोहोचणार आहे. त्याचा आनंद आहेच की. शिवाय आम्ही चित्रपट करतो, तो अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा याकरिताच ना! त्यामुळे तो चित्रपट कधी चित्रपटगृहातून अधिक लोकांपर्यत पोहोचतो, तर कधी ओटीटीमार्फत.

सध्या एकापाठोपाठ एक रिमेक येत आहेत. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रिमेक येण्याचे कारण काय असावे?
आनंद एल. राय : सध्याचा माहोल वेगळा आहे. कुणीही रिस्क घ्यायला तयार नाही. त्यातच रिमेक चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे साहजिकच त्यांची संख्या वाढत आहे. परंतु, इंडस्ट्रीसाठी ही घातक बाब आहे. सगळ्या चित्रपटाचे असे रिमेक होत गेले, तर पुढील पाच वर्षांत काहीही नवीन उरणार नाही. त्यामुळे रिमेकबरोबरच ओरिजिनल कन्टेंट येणे तितकेच आवश्यक आहे. निर्माते व दिग्दर्शकांनी, तसेच लेखकांनी याचा विचार केला पाहिजे. ओरिजिनलवर भर अधिक दिला पाहिजे. कारण प्रादेशिक चित्रपटात ओरिजिनल कन्टेट येत आहे आणि तो खूप छान आहे.

संबंधित बातम्या