नवीन वर्षात बॉलिवूडचा धुमधमाका

संतोष भिंगार्डे
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021

प्रीमियर 

आता नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. या नव्या वर्षात नवीन आशाआकांक्षा आणि अपेक्षा घेऊन वाटचाल करायची आहे. प्रत्येक वर्ष काहीतरी नवीन घेऊन येते हे निश्चित. मनोरंजन क्षेत्राचा विचार करायचा झाला तर येथे काही नवीन पाहायला मिळणार आहे, तर काही जुनेच नव्याने पाहायला मिळणार आहे. 

मनोरंजन क्षेत्रासाठी २०२० आणि २०२१ ही वर्षे फारच कटकटीची आणि थोड्याबहुत अपयशाची ठरली. मात्र नवीन वर्षात हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी चांगली भरारी घेईल अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही. 

महाराष्ट्रात चित्रपटगृहांमध्ये सध्या पन्नास टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीला सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात नाराजी असली, तरी ‘सूर्यवंशी’बरोबरच अन्य काही हिंदी चित्रपटांनी चांगली कमाई केल्यामुळे चैतन्याचे वातावरण पसरलेले आहे. आता सगळ्यांचे लक्ष पुढील वर्षी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांकडे लागलेले आहे. सन २०२२ची सुरुवातच धमाकेदार होणार आहे असे दिसते आहे. कारण ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा बहुचर्चित ‘आरआरआर’ हा चित्रपट जानेवारी महिन्याच्या सात तारखेला प्रदर्शित होत आहे. अजय देवगण, आलिया भट, ज्युनियर एनटीआर, रामचरण अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

‘बाहुबली’ या चित्रपटानंतर राजामौली यांचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. अतिशय भव्य स्तरावर त्यांनी हा चित्रपट केला आहे. सन २०१८मध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. या चित्रपटाचे बजेट जवळपास चारशे कोटी रुपयांचे आहे. भारतातील सगळ्यात महागडा चित्रपट म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. 

हा चित्रपट हिंदीबरोबरच तमीळ, तेलगू, मल्याळी आणि कन्नड आदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला रसिकांनी उत्तम दाद दिली आहे. त्यामुळे आता सगळ्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागलेली आहे. हा एक पीरियड ड्रामा आहे आणि या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच थिएट्रिकल राइट्समधून चांगली कमाई केली आहे. महत्त्वाचे म्हणजे अमेरिकेतील जवळपास ९९९ मल्टिप्लेक्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अमेरिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणारा हा पहिलाच भारतीय चित्रपट असावा.

या चित्रपटाबरोबरच अभिनेता प्रभास आणि पूजा हेगडेचा ‘राधेश्याम’ हा चित्रपटदेखील कमालीचा चर्चेत आहे. तो १४ जानेवारी रोजी चित्रपटगृहात येत आहे. हा चित्रपट रोमँटिक आहे. राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित ही बहुभाषिक प्रेमकथा १९७०मध्ये युरोपात घडते. इटली, जॉर्जिया आणि हैदराबादमध्ये याचे शूटिंग करण्यात आले आहे. यामध्ये प्रभास आणि पूजा यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनोख्या रूपामध्ये दिसणार आहेत.

अक्षय कुमार कमालीचा फॉर्ममध्ये आहे. त्याचे एकापाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत आणि तो नवीन चित्रपटदेखील साईन करीत आहे. अक्षयचा ‘पृथ्वीराज’ हा सिनेमा वीर योद्धा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. अक्षय या चित्रपटात पृथ्वीराज चौहान यांचीच भूमिका साकारीत आहे. तर अभिनेत्री मानुषी छिल्लर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यामध्ये ती पृथ्वीराज चौहान यांच्या पत्नीची भूमिका साकारीत आहे. मानुषीने सन २०१७मध्ये ‘मिस वर्ल्ड’ किताब जिंकलेला होता. आता तिच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. या चित्रपटात संजय दत्त, सोनू सूद आणि आशुतोष राणा हे कलाकारही काम करीत आहेत. या ऐतिहासिक चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. २१ जानेवारी २०२२ला सिनेमा रिलीज होणार आहे. 

याशिवाय अक्षयचाच ‘बच्चन पांडे’ हा चित्रपटदेखील ४ मार्चला प्रदर्शित होत आहे. यानंतर त्याचा ‘रक्षाबंधन’ सिनेमा ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याबरोबरच ‘राम सेतू’ हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. 

निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला आहे. हा चित्रपट १८ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात आलिया भटने प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट मुंबईतली कामाठीपुरा येथील ‘माफिया क्वीन’ गंगूबाई काठियावाडी यांच्या जीवनावर आधारित आहे. 

 बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त तीन वेळा हुकला आहे. जवळपास दोनशे दिवस आणि शंभर विविध लोकेशन्सवर हा चित्रपट चित्रित झाला आहे. आमीरबरोबरच करिना कपूर, मोना सिंह आदी कलाकार यामध्ये काम करीत आहेत. आता हा चित्रपट तयार झाला आहे आणि तो एप्रिल महिन्यात मोठ्या पडद्यावर पाहणार आहे. 

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट ही सध्याची बॉलिवूडमधील चर्चेत असलेली जोडी. त्यांचे लग्न कधी होणार या प्रश्न सगळ्यांना पडलेला असला, तरी ही जोडी ‘ब्रह्मास्र’ या चित्रपटाद्वारे  पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र येत आहे. अयान मुखर्जी या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. या चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल काही वेळा बिघडले, तसेच चित्रपट प्रदर्शनाची तारीखही वारंवार बदलण्यात आली. परंतु आता सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल, असे सांगण्यात येत आहे. रणबीर व आलियाबरोबरच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह मौनी रॉय आणि नागार्जुन हेही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारीत आहेत.

या चित्रपटांबरोबरच कंगना रानावतचा ‘धाकड’, तापसी पन्नूचा ‘शाबाश मिट्‌ठू’, क्रीती सेनॉन आणि राजकुमार राव यांचा ‘भेडिया’, कार्तिक आर्यनचा ‘भुलभुलैया २’ असे अनेक चित्रपट एकापाठोपाठ एक रुपेरी पडद्यावर धडकणार आहेत. गेली दोन वर्षे चित्रपटसृष्टी कोरोनामुळे ठप्प झाली होती. परंतु आता हळूहळू, पण छान सुरुवात झाली आहे आणि सन २०२२मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काहीसे वेगळे चित्र दिसेल अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही.

संबंधित बातम्या