मनोरंजनाचे उत्तम पॅकेज...

संतोष भिंगार्डे
सोमवार, 3 जानेवारी 2022

प्रीमियर 

हिंदी चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीतही यावर्षी काही वेगळे प्रयोग पाहायला मिळणार आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतही वेगळ्या आणि नावीन्यपूर्ण कथांवर चित्रपट येत आहेत. ऐतिहासिक चित्रपटांबरोबरच अन्य जॉनरचे चित्रपटही येत आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच मराठी चित्रपटसृष्टीसाठीही हे नवीन वर्ष निश्चितच आल्हाददायक असेल यात शंका नाही. कारण २०२१मध्ये मराठी चित्रपटसृष्टीने छान सुरुवात केली. ‘झिम्मा’, ‘पांडू’, ‘डार्लिंग’ असे काही मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यांनी बॉक्स ऑॅफिसवर चांगली कमाई केली. त्यामुळे मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांच्या आशा अधिक पल्लवीत झाल्या आहेत. यावर्षी अनेक चित्रपट पडद्यावर येत आहेत, कारण गेल्या दोन वर्षांमधील जवळपास सत्तर ते ऐंशी रखडलेले चित्रपट एकापाठोपाठ आता प्रदर्शित होतील, तसेच नव्याने तयार होणारे चित्रपटदेखील प्रदर्शित होतील. त्यामुळे यावर्षी मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाची संख्या वाढणार आहे हे निश्चित. मात्र प्रेक्षकांना मनोरंजनाचे उत्तम पॅकेज मिळणार आहे. यामध्ये कोणते चित्रपट यशस्वी होतात आणि कोणते केवळ हजेरी लावतात हे लवकरच समजणार आहे. 

‘दे धक्का २’ या चित्रपटाने २०२२ची सुरुवात होणार आहे. या चित्रपटाचा पहिला भाग यशस्वी झाला होता. त्यामुळे दुसरा भाग नक्कीच पाहण्यासारखा असेल अशी आशा बाळगायला काही हरकत नाही. 

विशेष बाब म्हणजे मराठीमध्ये यावर्षी कौटुंबिक, विनोदी, प्रेमकथा या जॉनरचे चित्रपट येणार असले तरी ऐतिहासिक चित्रपट अधिक येतील असे दिसत आहे. त्यापैकी एक म्हणजे ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट. लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अतिशय भव्य स्तरावर तयार होणाऱ्या या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता गश्मीर महाजनी आहे, तर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा अभिनेते प्रवीण तरडे साकारीत आहेत. प्रवीण तरडे यांचा चित्रपट म्हटला की तो खास असणार यात शंका नाही. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता उपेंद्र लिमयेच्या ‘फास’ या चित्रपटाने देश-विदेशातील जाणकार प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळविली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने १३०पेक्षा अधिक पुरस्कारांवर आपली छाप उमटविली आहे. हा चित्रपट ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एन्टरटेन्मेंट प्रस्तुत, माहेश्वरी पाटील चाकूरकर निर्मित हा चित्रपट समाजातील सद्यःस्थितीवर भाष्य करणारा आहे. अविनाश कोलते यांनी दिग्दर्शन केले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, निसर्गाचे असंतुलन व सरकारी धोरणे यांचा शेतकरी व त्यांच्या कुटुंबांवर होणारा परिणाम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, कमलेश सावंत, पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे आदी कलाकारांनी यात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 

मराठीतील आघाडीचा अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी ही जोडी जमली आहे ‘लक डाऊन बी पॉझिटिव्ह’ या चित्रपटासाठी. लॉकडाउनदरम्यान ठरलेल्या एका लग्नाच्या धमाल गमतीची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटाची कथा ज्याप्रमाणे लॉकडाउनमध्ये घडली, तसाच हा चित्रपट लॉकडाउनमध्ये चित्रित करण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार, अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची असून चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले आहे. पुढील वर्षी जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. 

प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा ‘वन फोर थ्री’ हा मराठी चित्रपटही प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक, अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांच्याबरोबरच अभिनेता वृषभ शहा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण करीत आहे. 

दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटाची मोठी उत्सुकता चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांना होती. आता हा चित्रपटदेखील जानेवारी महिन्यातच प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. ए.ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्ताने पावन झाल्याने या खिंडीला पुढे ‘पावनखिंड’ नाव पडले. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘पावनखिंड’ या चित्रपटात मांडली आहे. 

दिग्दर्शक मिलिंद कवडेने ‘टकाटक’ हा यशस्वी चित्रपट दिला होता. आता त्याचा ‘एक नंबर’ हा चित्रपट येत आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची निर्मिती महेश शिवाजी धुमाळ, जितेंद्र शिवाजी धुमाळ आणि मिलिंद कवडे यांनी धुमाळ प्रॉडक्शनच्या बॅनरखाली आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने केली आहे. प्रथमेश परब याच्यासह मिलिंद शिंदे, गणेश यादव, निशा परुळेकर, अभिलाषा पाटील, आयली घिया, ऋषिकेश धामापूरकर, अक्षता पाडगावकर, प्रणाली संघमित्रा ढावरे, सुमित भोक्से, सुनिल मगरे आदी कलाकारही काम करीत आहेत. या चित्रपटात एक आगळीवेगळी लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.

छोट्या पडद्यावर नितीश चव्हाणला ‘लागिरं झालं जी’ या मालिकेमुळे कमालीची लोकप्रियता मिळाली होती. आता तो मोठ्या पडद्यावर पदार्पण करीत आहे. ‘सोयरिक’ असे त्या चित्रपटाचे नाव आहे. मकरंद माने या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जानेवारी महिन्यातच हा चित्रपट येत आहे.

निर्माते व दिग्दर्शक, तसेच अभिनेते महेश मांजरेकर यांनी नेहमीच वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिलेले आहेत. त्यांच्या चित्रपटांचा आशय आणि विषय नेहमीच वेगळा असतो. यावर्षी त्यांचे ‘दे धक्का २’बरोबरच पांघरूण, ‘वरनभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. ‘पांघरूण’मध्ये कोकणात घडणारी कथा दाखविण्यात आली आहे. ही एक विलक्षण प्रेमकहाणी आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट गौरविला गेला आहे. अमोल बावडेकर, गौरी इंगवले, रोहित फाळके, सुलेखा तळवलकर आदी कलाकार या चित्रपटात काम करीत आहेत. हा चित्रपट फेब्रुवारी महिन्याच्या अकरा तारखेला चित्रपटगृहात येईल. त्याचप्रमाणे दिवंगत ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांच्या‘वरनभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर आधारित त्याच नावाचा चित्रपट त्यापाठोपाठ प्रदर्शित होईल असे दिसते.

एकूणच मराठीमध्ये अन्य काही चित्रपट याच वर्षी रुपेरी पडदा पाहणार आहेत. काही कलाकार मराठीच्या रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहेत, तर काही नव्या दिग्दर्शकांची फळी उभी राहत आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही नक्कीच चांगली बाब आहे, कारण प्रेक्षकांना चांगले मनोरंजनाचे पॅकेज पाहायला मिळणार आहे.

 

संबंधित बातम्या