स्पृहा, सिद्धार्थ व कश्यप यांची ‘कॉफी’

संतोष भिंगार्डे
सोमवार, 17 जानेवारी 2022


प्रीमियर 

स्पृहा, सिद्धार्थ व कश्यप यांची ‘कॉफी’
सध्याच्या तरुणाईमध्ये कॉफीला खासच महत्त्व आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे आजच्या युवा पिढीमध्ये कॉफी कमालीची लोकप्रिय आहे. कॉफीचा सुगंध, भला मोठा फेसाळता कॉफी मग, मोठ्या कलाकुसरीने त्यात चितारले जाणारे बदामाचे, पानाचे डिझाईन आणि जिवलग व्यक्तीचा सहवास... म्हणजे अर्थातच डेट, असे काहीसे कॉफीचे समीकरण झाले आहे. आता अशाच काहीशा कॉफीचा आस्वाद चाखायला मिळणार आहे ‘कॉफी’ या चित्रपटात. जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यामध्ये अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेता कश्यप परुळेकर असे त्रिकूट एकत्र आले आहे. 
‘तन्वी फिल्म्स’ची प्रस्तुती असलेल्या ‘कॅाफी’ची निर्मिती कैलास सोरारी आणि विमला सोरारी यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे. आजवर नेहमीच विविधांगी विषयांवर चित्रपट करणारे नितीन यावेळी प्रेक्षकांसाठी लज्जतदार ‘कॅाफी’ घेऊन आले आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना अनोखी प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. प्रेम आणि कॅाफीचा सुखद संगम या चित्रपटाच्या निमित्ताने घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कॅाफी जशी थोडी गोड, थोडी कडवट असते तशीच लव्हस्टोरीही असते. आजवर पाहिलेल्या प्रेमकथांपेक्षा एक वेगळी लव्हस्टोरी सांगणारा हा चित्रपट आहे.

 

 

‘जर्सी’... ओटीटीवर की चित्रपटगृहात?

अभिनेता शाहीद कपूर सध्या चर्चेत आहे तो त्याचा आगामी चित्रपट ‘जर्सी’मुळे. या चित्रपटात तो आणि मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर मुख्य भूमिका साकारीत आहेत. कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन वारंवार लांबणीवर पडत आहे. मध्यंतरी निर्माते हा चित्रपट ‘ओटीटी’वर प्रदर्शित करणार असे बोलले जात होते. परंतु ती चर्चा हवेत विरली आणि हा चित्रपट ३१ डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्याचे निश्चित झाले. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्यावेळी ही घोषणा करण्यात आली. ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली आणि चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची सगळे वाट पाहू लागले. तोच पुन्हा कोरोनाचे सावट गहिरे झाले आणि पुन्हा एकदा या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आले. आता हा चित्रपट कधी येणार हे काही निश्चित नसले, तरी आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार की चित्रपटगृहात याबाबतची चर्चा जोरदार रंगलेली आहे. 
या चित्रपटात शाहीद एका क्रिकेटरची भूमिका साकारीत आहे. हा चित्रपट एका दाक्षिणात्य चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मृणाल ठाकूर या चित्रपटात शाहीदच्या पत्नीची भूमिका साकारीत आहे. पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर शाहीद व मृणाल ही जोडी दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनादेखील कमालीची उत्सुकता आहे. सिनेमा नेमका कधी रिलीज होईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण लवकरच याबाबत सिनेमाचे दिग्दर्शक गौतम तिन्ननुरी माहिती देतील असे सांगण्यात येत आहे. 
हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित व्हावा अशी शाहीदची इच्छा आहे. त्यामुळे त्याने निर्माते व दिग्दर्शकांना तशी विनंती केल्याचे सांगण्यात येत आहे. आता ते काय निर्णय घेतात हे येणाऱ्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

 

‘आरआरआर’ चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर

बाहुबलीफेम दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाची चर्चा चांगलीच रंगलेली आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासून ते ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आणि अल्पावधीतच तो कमालीचा लोकप्रिय ठरला. यानंतर ७ जानेवारी रोजी हा चित्रपट सगळीकडे प्रदर्शित होईल असे जाहीर करण्यात आले. परंतु आता या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे ‘आरआरआर’च्या टीमकडून सांगण्यात आले आहे. हा चित्रपट हिंदीबरोबरच तमीळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळी या भाषांमध्ये करण्यात आला आहे. हा बिग बजेट चित्रपट आहे आणि तो अतिशय भव्य स्तरावर करण्यात आला आहे.
या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर, राम चरण, अजय देवगण आणि आलिया भट आदी कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. हैदराबादसह अन्य ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख कधी जाहीर होतेय याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे.

संबंधित बातम्या