मराठी चित्रपटांची जत्रा

संतोष भिंगार्डे
सोमवार, 31 जानेवारी 2022

प्रीमियर 

कोरोना महासाथीमुळे चित्रपटगृहे बंद होती. त्यामुळे कित्येक चित्रपटांचे प्रदर्शन रखडले होते. हिंदीवाल्यांनी त्यातील काही चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केले. परंतु मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक पडदा उघडण्याची वाट पाहत होते. कारण ओटीटीवर मराठी चित्रपटांना म्हणावी तशी रक्कम मिळत नव्हती. आता मात्र अनेक मराठी चित्रपट लागोपाठ प्रदर्शित होत आहेत. 

मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात चित्रपटगृहे उघडण्यास सरकारने परवानगी दिली. मात्र ती देताना काही नियम आणि अटी घातल्या. आता त्याच नियमांनुसार चित्रपटगृहे सुरू आहेत. पन्नास टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये चित्रपटगृहे सुरू झाली आणि त्याच वेळी म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला ओमायक्रॉन या व्हेरिएंटची चर्चा सुरू झाली. केवळ चर्चाच नाही, तर पुन्हा कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. त्यामुळे चित्रपट पाहण्यास प्रेक्षक येतील की नाही अशी शंका निर्माते व दिग्दर्शकांमध्ये निर्माण झाली. हिंदीतील अनेक बिग बजेट आणि बिग बॅनर्सच्या चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. मात्र त्याच वेळी मराठी निर्माते आणि दिग्दर्शकांनी ही संधी घ्यायची  ठरविली. कारण हिंदीतील कोणत्याही मोठ्या चित्रपटाची स्पर्धा नाही, म्हणून हीच वेळ योग्य आहे असे त्यांना वाटू लागले आणि गेली दोनेक वर्षे रखडलेले बहुतेक चित्रपट आता एकापाठोपाठ एक प्रदर्शित होत आहेत. त्यामध्ये महेश मांजरेकर यांचा ‘पांघरूण’, दिग्पाल लांजेकरचा ‘पावनखिंड’, अविनाश कोलतेचा ‘फास’, प्रशांत शिंगटेचा ‘का रं देवा’ अशा काही चित्रपटांचा समावेश आहे.

खरेतर चित्रपटगृहे उघडल्यापासून मराठी चित्रपटांची सुरुवात चांगली झाली आहे. ‘झिम्मा’, ‘पांडू’, ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षक कसे काय प्रतिसाद देतात ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आदित्य सरपोतदार यांचा ‘झोंबिवली’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यापाठोपाठ येत्या ४ फेब्रुवारी रोजी ‘पांघरूण’ आणि ‘फास’ हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक उत्तम समीकरण आहे. ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’ अशा काही उत्तम कलाकृती त्यांनी दिल्या आहेत. आता महेश मांजरेकर एक वेगळा कलाविष्कार घेऊन येत आहेत, तो म्हणजे ‘पांघरूण’ हा चित्रपट. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, कोकणातील नयनरम्य निसर्गसौंदर्य आणि तिथे घडणारी अनोखी प्रेमकहाणी आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. अभिनेता अमोल बावडेकर, गौरी इंगवले, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेखा तळवलकर आदी कलाकारांनी या चित्रपटामध्ये भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाने देश-विदेशातील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये हजेरी लावलेली आहे आणि काही पुरस्कारही या चित्रपटाला मिळालेले आहेत. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता लागलेली आहे.

माँ एंटरटेन्मेंट प्रस्तुत माहेश्वरी पाटील चाकूरकर निर्मित ‘फास’ हा चित्रपटदेखील विविध चित्रपट महोत्सवांमध्ये गौरविला गेलेला चित्रपट आहे. जवळपास १३०हून अधिक पुरस्कार या चित्रपटाला मिळालेले आहेत. या चित्रपटाची निर्मिती नरेश पाटील, पल्लवी पालकर, दयानंद अवरादे, बसवराज पाटील, अनिल पाटील, वैशाली पद्देवाड यांनी मिळून केली आहे. अविनाश कोलते या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. शेतकऱ्यांच्या सातत्याने होणाऱ्या आत्महत्या, निसर्गाचे असंतुलन, शेतकऱ्यांची जगण्याची चाललेली धडपड, तसेच त्यांच्या डोळ्यांतील स्वप्ने, सरकारी धोरणांचा त्याच्यावर होणारा परिणाम... हा विषय या चित्रपटात मांडण्यात आला आहे. धरतीच्या कुशीतून सोने पिकवणारा शेतकरी गळ्याला का ‘फास’ लावून घेतो याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या चित्रपटात करण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता उपेंद्र लिमये, सयाजी शिंदे, कमलेश सावंत, पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे, नामदेव पाटील, निलेश बडे, ज्ञानेश उंडगवकर, उमेश राजहंस, शरद काकडे, ईश्वर मोरे, पवन वैद्य, विनय जोशी, देवा पांडे, पूजा तायडे, तेजस्विनी, माधुरी भारती आणि श्रृतिका लोंढे आदी कलाकार या चित्रपटात काम करीत आहेत.

सह्याद्री फिल्म प्रॉडक्शनच्या प्रशांत शिंगटे यांनी ‘का रं देवा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजीत दशरथ जाधव यांचे आहे. ही एक प्रेमकथा आहे आणि या चित्रपटामध्ये विविध मालिकांमध्ये काम करणारा अभिनेता मयूर लाड आणि अभिनेत्री मोनालिसा बागल मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटातील ‘घुमू दे आवाज कानात, वाजू दे डीजे दणक्यात’ हे आनंद शिंदे यांच्या आवाजातील धमाकेदार गाणे आता लोकप्रिय ठरले आहे. ही प्रेमकथा व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर अर्थात १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

शूरवीर, महापराक्रमी बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची यशोगाथा ‘पावनखिंड’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अजय पूरकर यांनी या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारली आहे. ए. ए. फिल्म्स प्रस्तुत आणि आलमंड्स क्रिएशन्स निर्मित ‘पावनखिंड’ची निर्मिती अजय आरेकर, अनिरुद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवरायांची भूमिका केली आहे. यापूर्वी त्याने ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ या दिग्पालच्याच चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची व्यक्तिरेखा साकारली होती. चिन्मयबरोबरच मृणाल कुलकर्णी, वैभव मांगले, अंकित मोहन आदी कलाकारांनी यामध्ये काम केले आहे. दिग्पाल लांजेकरच लेखक आणि दिग्दर्शक आहे. १८ फेब्रुवारीला ‘पावनखिंड’ चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव आणि वैदेही परशुरामी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘लोच्या झाला रे’ हा विनोदी चित्रपट फेब्रुवारी महिन्यातच प्रदर्शित होत आहे. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी केले आहे. जवळपास एक महिना या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये झालेले आहे. तेथील सततच्या बदलत्या हवामानामुळे चित्रीकरणादरम्यान कलाकारांसह संपूर्ण युनिटला विविध समस्यांना सामोरे जावे लागलेले होते. मोठ्या मुश्किलीने चित्रीकरण पार पडलेले आहे. लंडनची सफर घडविणारा आणि मनोरंजन करणारा असा हा चित्रपट आहे. एकूणच सांगायचे झाले तर आता विविध विषयांवरील मराठी चित्रपट एकापाठोपाठ एक प्रदर्शित होत आहेत. जणू काही मराठी चित्रपटांची जत्राच भरणार आहे. परंतु कोणत्याही जत्रेला गर्दीशिवाय मजाच नाही. त्यामुळे रसिकांनी या मराठी चित्रपटांच्या जत्रेला चांगला प्रतिसाद दिला पाहिजे.

संबंधित बातम्या