प्रीमियर 

संतोष भिंगार्डे
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022

प्रीमियर 

कल्पेश भांडारकरांचा ‘चाबुक’ 
दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्याप्रमाणेच त्यांचा छोटा भाऊ कल्पेश भांडारकर हे हिंदीतील एक नावाजलेले नाव. आत्तापर्यंत कल्पेशने कित्येक मोठमोठ्या मंडळींबरोबर काम केले आहे. अनेक लोकप्रिय हिंदी चित्रपटांसाठी छायाचित्रण आणि दिग्दर्शन करत कल्पेश आता स्वतःची पहिली मराठी चित्रकृती घेऊन येत आहे. आपल्या ‘श्रीष्टी मोशन पिक्चर कंपनी’च्या बॅनरखाली ‘चाबुक’ या मराठी चित्रपटाच्या निर्मिती व दिग्दर्शनाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. या चित्रपटाची संकल्पना कल्पेश वासुदेव भांडारकर आणि समीर धर्माधिकारी यांची आहे. ‘चाबुक’ चित्रपट येत्या २५ तारखेला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अभिनेता समीर धर्माधिकारी व अभिनेत्री स्मिता शेवाळे मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत सुधीर गाडगीळ आणि मिलिंद शिंदे यांच्यासुद्धा भूमिका आहेत. कल्पेश सांगतात, ‘वाट चुकलेल्या जनावराला सरळ मार्गावर आणण्यासाठी चाबुक उपयोगी येतो. प्रत्येक व्यक्तीला आपण जे वागतो तेच बरोबर आहे असं वाटत असतं. आपल्या विचारांच्या, वागण्याच्या चष्म्यातून प्रत्येक व्यक्ती स्वतःचं मत योग्य असल्याचं दुसऱ्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. हे विचार समोरच्या व्यक्तीला नाही पटले, तर एकमेकांमध्ये वाद निर्माण होतात. आत्मपरीक्षणाचा सणसणीत ‘चाबुक’ जर वेळीच ओढला गेला, तर त्याचा नक्कीच फायदा होतो हे दाखवून देणारा हा चित्रपट आहे’. ‘चाबुक’ चित्रपटाची कथा अभय इनामदार आणि निरंजन पटवर्धन यांची आहे. गीते मंदार चोळकर आणि मिलिंद शिंदे यांनी लिहिली असून संगीत विपीन पटवा यांचे आहे. 

अखेर ‘गंगूबाई...’ला मुहूर्त सापडला
निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट अतिशय भव्य-दिव्य असतात. त्यांच्या चित्रपटातील कलाकार, चित्रपटाचे सेट तसेच संगीत अशा सगळ्या बाजू भक्कम असतात. आता त्यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार झाला आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन वारंवार लांबणीवर टाकण्यात येत होते. परंतु आता त्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. २५ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. गेले कित्येक दिवस सगळ्यांना या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल उत्सुकता होती. आता त्यांची ही उत्सुकता संपलेली आहे. आलिया भट या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. रुपेरी पडद्यावर आलिया पहिल्यांदाच डार्क शेड असलेली भूमिका साकारत आहे. सोबत अजय देवगण आणि अन्य कलाकार आहेतच. या चित्रपटाची पटकथा हुसेन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकापासून प्रेरणा घेऊन लिहिली गेली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत भव्य सेट उभारून करण्यात आले आहे. या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला. त्याला खूप चांगली पसंती मिळाली. खरेतर या चित्रपटाची तारीख दोन-तीन वेळा पुढे ढकलण्यात आली, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चलबिचल सुरू झाली होती. मात्र आता हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

संबंधित बातम्या